नापाकांची परत पाठवणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2021   
Total Views |

pak_1  H x W: 0



पाकिस्तानच्या स्थापनेवेळी त्याच्या नामकरणाचा अर्थ- ‘पाक’ म्हणजे पवित्र भूमी असा सांगितला गेला. मात्र, पाकिस्तानच्या अस्तित्वापासूनच भारतद्वेषापोटी केल्या जाणार्‍या कारवायांतून पाक किंवा पवित्र भूमीऐवजी ती ‘नापाकांचीच भूमी’ असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले.


नव्वदच्या दशकात त्या नापाकांनी जम्मू-काश्मीर हस्तगत करण्यासाठी तर घुसखोरी व दहशतवादाचा मार्ग अवलंबला. मागील तीन दशकांत पाकिस्तानच्या नापाक कारस्थानांमुळे शेकडो भारतीय सैनिकांचा जीव घेतला, तर हजारो सर्वसामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला. त्याविरोधात भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे, विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर पाकिस्तानची पोलखोल केल्यामुळे आणि ती नापाकांचीच भूमी असल्याचे पटवून दिल्यामुळे आज मात्र तो देश एकाकी पडल्याचे दिसते. चीन, तुर्की वगैरे निवडक मित्रांव्यतिरिक्त पाकिस्तानला कोणीही फारशी किंमत देताना दिसत नाही. परिणामी, ‘एफएटीएफ’च्या ‘ग्रे लिस्ट’मधील नाव, ‘आयएमएफ’, जागतिक बँक आदींनी पैशाची खिरापत वाटण्यात घेतलेल्या आखडत्या हातामुळे पाकिस्तानची अवस्था दयनीय झाल्याचे दिसते. तरीही पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठीशी घालण्याच्या राष्ट्रीय धोरणात आमूलाग्र बदल झाल्याचे दिसले नाही. आपण दिवाळखोर असलो तरी इतरांना त्रास देण्याची, उपद्रव देण्याची त्या देशाच्या नेतृत्वाची, लष्कराची मानसिकता तिथल्या जनतेतही थोड्या फार प्रमाणात उतरली असल्यास त्यात नवल नाही. अर्थात, तो त्रास, तो उपद्रव दहशतवादी वा लष्करासारखा हिंसक असेलच असे नाही, कारण सर्वसामान्य माणूस तितका शक्तिशाली नसतो. पण, तो आपल्या वैयक्तिक पातळीवर इतरांना नक्कीच त्रास देऊ शकतो, उपद्रव करू शकतो आणि कदाचित याचमुळे आपल्या नागरिकांच्या बेकायदेशीर आचरणामुळे पाकिस्तानला दररोज बेइज्जतीचा सामना करावा लागत आहे. कसा, ते पाहुया...


अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या सहा वर्षांत १३८ देशांतून एकूण सहा लाख १८ हजार ८७७ पाकिस्तानी नागरिकांना मायदेशात पिटाळून लावण्यात आले आहे. अर्थात, दररोज सरासरी ३०० पाकिस्तानी नागरिकांना पकडून परदेशातून पाकिस्तानात पाठवले गेले. पाकिस्तानच्या ‘फेडरल इनव्हेस्टिगेशन एजन्सी’नुसार परत पाठवणी केलेल्या या नागरिकांना त्या देशातील पाकिस्तानी दूतावास वा उच्चायोगाकडून योग्य सहकार्य मिळाले नाही. यामुळेही मोठ्या संख्येने परत आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना अडचणी झेलाव्या लागल्या. कितीतरी नागरिकांच्या व्हिसाचा किंवा ‘वर्क परमिट’चा कालावधी संपला होता. परंतु, त्यात बेकायदेशीररीत्या परदेशात गेलेल्या आणि अटक केलेल्या पाकिस्तानी नागरिकांची संख्याही प्रचंड आहे. गेल्या सहा वर्षांत जे पाकिस्तानी नागरिक परत पाठवले गेले, त्यात ७२ टक्क्यांपेक्षा अधिक पाकिस्तानच्या सात मित्रदेशांनीच पाठवले. त्यात सौदी अरेबिया, ओमान, संयुक्त अरब अमिराती, कतार, बहारीन, इराण आणि तुर्कीचा समावेश होतो. त्यात सर्वाधिक तीन लाख २१ हजार ५९० पाकिस्तानी नागरिकांची तर सौदी अरेबियातून परत पाठवणी केली गेली. गेल्या सहा वर्षांत दररोज १४७ पाकिस्तानी नागरिक सौदी अरेबियातून परत आले, तर ५३ हजार ६४९ पाकिस्तानी नागरिकांना युएईने आणि ३२ हजार ३०० जणांना तुर्कीने परत पाठवले, तर इराणी प्रशासकीय संस्थांनी एक लाख ३६ हजार ९३० पाकिस्तान्यांना परत पाठवले आणि त्यात बेकायदेशीर घुसखोरांची संख्या मोठी आहे. म्हणजेच, या पाकिस्तानी नागरिकांनी सुरुवातीला बेकायदेशीरपणे इराण वा अन्य देशांत घुसखोरी केली, तिथे गेल्यानंतरही ते गुण्यागोविंदाने राहिले असतील असे नाही आणि त्यातूनच त्यांचा संबंधित देशांतील प्रशासकीय यंत्रणेला संशय आला व त्यांना हाकलून लावले गेले.


दरम्यान, ब्रिटनने कायदेशीर कागपत्रांशिवाय राहणार्‍या आठ हजार व अमेरिकेने १,७००, तर रशियाने 564 पाकिस्तान्यांना परत पाठवले. भारतानेदेखील २४३ पाकिस्तानी नागरिकांना परत मायदेशी पाठवले. परतपाठवणी केलेल्यांत बनावट कागदपत्रांद्वारे परदेशांत गेलेल्यांची संख्या मोठी आहे. एकूणच जगभरातून पाकिस्तानमध्ये परत पाठवलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे व त्यात बेकायदेशीरपणे घुसखोरी केलेल्यांचे, तिथे राहणार्‍यांचे प्रमाण मोठे आहे. आपापल्या स्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी नागरिकांनी केलेला हा नापाकपणाच नाही तर अन्य काय? त्यांच्या याच नापाकीमुळे आज पाकिस्तानचीही आंतरराष्ट्रीय स्तरावर लाज काढली जात आहे. तरीही त्यांच्या नापाकपणात सुधारणा होईल, याची कोणीही खात्री देऊ शकत नाही.



@@AUTHORINFO_V1@@