निष्प्रभांचे उसने अवसान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2021   
Total Views |


politics_1  H x




प्रचाराची रणनीती आखणे आणि प्रत्यक्ष निवडणुकीत उतरून यश मिळविणे यात फरक असल्याची जाणीव प्रशांत किशोर यांना आहे. त्यामुळे ‘राष्ट्र मंच’चा वापर करणे आणि शरद पवारांसह अन्य निष्प्रभांना कामास लावून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रकार तर प्रशांत किशोर करत नाहीत ना, याविषयी शंका आहे.


एकेकाळी यशवंत सिन्हा हे देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नेते होते. अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात अर्थमंत्रिपद भूषविणार्‍या सिन्हा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात मार्गदर्शक मंडळात बसावे लागले. अर्थात, त्यांच्या मुलाला म्हणजे जयंत सिन्हा यांना मोदींनी मंत्रिमंडळात स्थान दिले. विशेष म्हणजे, यशवंत सिन्हा दररोज पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करीत असतानाही जयंत सिन्हा यांना त्याचा फटका बसला नाही. अखेरीस २०१९ साली त्यांनीही अन्य विरोधी पक्षांप्रमाणे ‘राफेल’ घोटाळा, पुलवामा दहशतवादी हल्ला, भारतीय सुरक्षादलांचा ‘एअर स्ट्राईक’ यावर विकृत राजकारण आपल्या जुन्या सहकार्‍यासह-अरुण शौरी यांच्यासह करून बघितले. मात्र, एव्हाना सिन्हा आणि शौरी यांना जनता विसरली होती. त्यात त्यांनी स्वत:हून मोदींच्या राजकीय ट्रॅपमध्ये अडकण्याचे ठरविलेच होते. पुढे मग सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ज्या ममता बॅनर्जी यांनी एकेकाळी सिन्हा यांच्या हाताखाली वाजपेयी सरकारमध्ये काम केले होते, त्यांच्याच हाताखाली काम करण्याचा निर्णय सिन्हा यांनी घेतला. पुढे त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष वगैरे पद ममतांनी दिले. मात्र, राजकारणात राष्ट्रीय उपाध्यक्षपदास किती महत्त्व असते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यात सिन्हा यांची उपयुक्तता आणि उपद्रवमूल्य दोन्हीही संपुष्टात आले आहे, हे ममतांनी अचूकपणे ओळखले आहे.


त्यामुळे त्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये अजिबातच महत्त्व न देण्याचे ममतांचे धोरण आहे. अर्थात
, राष्ट्रीय राजकारणात अद्यापही आपली चलती आहे, असा समज असलेल्या सिन्हा यांनी ‘राष्ट्र मंच’ नामक नव्या राजकीय व्यासपीठाची स्थापना केली आहे. या व्यासपीठाचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता सहभागी होऊ शकतो, देशातील सर्वसामान्य नागरिक सहभागी होऊ शकतो. अट एकच- भाजप आणि नरेंद्र मोदी यांचा हरतर्‍हेने विरोध करता यायला हवा. आता हे करण्यासाठी राजकीय नेत्यांना आपापले पक्ष असताना ‘राष्ट्र मंच’ची गरज काय, हा रास्त प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे.



कारण, केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांचा विरोध करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रमुक हे पक्ष दररोज नवनवी रणनीती आखतच असतात. आता त्यात यश येत नाही हा भाग अलाहिदा. मात्र, प्रस्थापित राजकीय पक्षांना यश मिळत नसताना त्याच पक्षांमधून आलेल्या नेत्यांच्या एखाद्या स्वतंत्र व्यासपीठावर सर्वसामान्य जनता विश्वास ठेवणार, हा अतिशय भाबडा आशावाद आहे. सिन्हा यांच्यासारख्या अनुभवी नेत्यास ते लक्षात येऊ नये, हे अधिक विचित्र आहे. त्यात सिन्हा यांच्या या प्रयोगास राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार वगळता एकाही पहिल्या फळीतील नेत्याने प्रतिसाद दिलेला नाही.



त्यामुळे हा ‘राष्ट्र मंच’ स्थापन करून नेमके करायचे काय, यासाठी शरद पवार यांच्या ‘६,जनपथ’ या नवी दिल्लीतील निवासस्थानी नुकतीच एक बैठक पार पडली. अनिल देशमुख प्रकरणापासून कमालीचे भांबावलेल्या शरद पवारांचा पाठिंबा या ‘राष्ट्र मंच’ला मिळणे यात कोणतेही आश्चर्य नाही, तर मंगळवारी झालेल्या या बैठकीपूर्वी दोन ते तीन दिवस शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत, असा भाबडा समज असलेल्या मंडळींनी जोरदार वातावरणनिर्मिती करण्यास प्रारंभ केला. तिसर्‍या आघाडीसाठी शरद पवारांचा पुढाकार, काँग्रेसला वगळून शरद पवारांची नवी आघाडी, २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार सज्ज, अशा प्रकारच्या बातम्या देण्यास प्रारंभ केला. या बैठकीस १५ पक्षांचे नेते सहभागी होणार, अशीही वातावरणनिर्मिती करण्यात आली. एकूणच पवारांच्या आजवरच्या कार्यशैलीनुसार चिमूटभर कामास पर्वताएवढे दाखविण्याचे प्रयत्न हरतर्‍हेने करण्यात आले.



मात्र, या बैठकीस भाजपविरोधी प्रमुख पक्षांचे पहिल्या फळीतील नेते गैरहजर राहिले. नाही म्हणायला, ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे फारुख अब्दुल्ला यांनी काही मिनिटे केवळ हजेरी लावली. मात्र, बैठकीत पूर्ण वेळ तेही सहभागी झाले नव्हते. हिंदी चित्रपटांसाठी संवाद आणि गीतांचे लेखन करणारे जावेद अख्तर मात्र बैठकीस पूर्ण वेळ उपस्थित होते. बैठकीनंतर झालेली पत्रकार परिषद तर अतिशय विनोदी होती. आता सुमारे अडीच तास चाललेल्या बैठकीमध्ये काहीतरी ठोस भूमिका पुढे येणे अपेक्षित होते. मात्र, पत्रकार परिषदेसाठी यशवंत सिन्हा अवघे दोन मिनीट उपस्थित राहिले. त्यानंतर पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेसचे माजिद मेमन आणि समाजवादी पार्टीचे घनश्याम तिवारी यांनी संबोधित केली. त्यातही पुन्हा एकदा शरद पवारांच्या बेभरवशी राजकारणाचे उदाहरण मेमन यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, “ही बैठक शरद पवार यांनी आयोजित केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नाही. ही बैठक केवळ पवार यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्याचे यजमान शरद पवार नसून यशवंत सिन्हा हेच आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी भाजपविरोधी पक्षांचीही ही बैठक नव्हती. कारण, या बैठकीस काँग्रेसचे कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, विवेक तन्खा, शत्रुघ्न सिन्हा आदी नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे काँग्रेसला दूर ठेवण्याचा प्रश्नच नाही,” असे स्पष्टीकरण शाब्दिक कसरती करून मेमन यांनी दिले, तर घनश्याम तिवारी यांनी, “राष्ट्रमंच आता इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करणार आहे,” असे सांगून पत्रकार परिषद गुंडाळली.



त्यात सर्वांत लक्षणीय ठरले ते माजिद मेमन यांनी शरद पवारांविषयी दिलेले स्पष्टीकरण. कारण, यापूर्वी तिसर्‍या अथवा चौथ्या आघाडीची चर्चा झाली होती, त्यावेळी पवारांनी त्यात आपल्या सहभागाविषयी संभ्रम निर्माण करणारीच वक्तव्ये केली आहेत. मात्र, यावेळी पवार प्रथमच बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले आहे. काँग्रेसला दूर ठेवण्याचा कोणताही प्रयत्न नाही, हे मेमन अगदी अजिजीने सांगत होते. आता पवारांच्या निर्देशाशिवाय मेमन असे करणार नाहीत. त्यामुळे पूर्वी राजीव गांधी, नरसिंह राव, प्रणव मुखर्जी, सीताराम केसरी आणि आता सोनिया गांधी अद्यापही शरद पवारांना राष्ट्रीय राजकारणात सहजपणे निष्प्रभ करतात, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे दिसते. त्यामुळे काँग्रेस सोडणार्‍या ममता बॅनर्जी आणि जगनमोहन रेड्डी यांच्याप्रमाणे काँग्रेसला आव्हान देणे आणि यश मिळविणे पवारांना कधीही शक्य झालेले नाही. त्यामुळे यावेळीही ‘राष्ट्र मंच’शी आपला तसा काही संबंध नाही, हे पवारांना जाहीर करावे लागले. यातूनच ‘राष्ट्र मंच’ची पुढील वाटचाल कशी असेल, हे लक्षात येते.




यातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशांत किशोर. सध्या शरद पवारांनी निवडणूक प्रचाराचा व्यवसाय करणार्‍या प्रशांत किशोर यांच्याकडून सल्ला घेण्याचे ठरवले आहे. प्रशांत किशोर यांच्यासोबत मुंबई आणि दिल्लीत चर्चा केल्यानंतरच ‘राष्ट्र मंच’ची बैठक पवारांच्या घरी आयोजित करण्यात आली. प्रशांत किशोर यांची राजकीय महत्त्वाकांक्षा सध्या भाजपचा लोकसभा निवडणुकीत पराभव करणे, अशी वाढली आहे. अर्थात, प्रचाराची रणनीती आखणे आणि प्रत्यक्ष निवडणुकीत उतरून यश मिळविणे यात फरक असल्याची जाणीव प्रशांत किशोर यांना आहे. त्यामुळे ‘राष्ट्र मंच’चा वापर करणे आणि शरद पवारांसह अन्य निष्प्रभांना कामास लावून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रकार तर प्रशांत किशोर करत नाहीत ना, याविषयी शंका आहे. मात्र, तसे असल्यास प्रशांत किशोर यांच्या हातीच शरद पवारांसह अन्य विरोधी पक्षांची सूत्रे जाऊ शकतात आणि त्यातून अपयश पदरी पडण्याचीच शक्यता सर्वाधिक आहे.






 
@@AUTHORINFO_V1@@