महाराष्ट्रात केवळ ४१ सारस पक्ष्यांचे वास्तव्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2021   
Total Views |
sarus_1  H x W:



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
गेल्या आठवड्यात पार पडलेल्या सारस गणनेव्दारे महाराष्ट्रात अंदाजे ४१ सारस क्रेन पक्ष्यांचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. गोंदिया, भंडारा जिल्ह्यात ही गणना पार पडली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सारस पक्ष्यांच्या संख्येत घट झाल्याने या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी धोरणात्मक पाऊल उचलणे आवश्यक आहे.
 
 
 
महाराष्ट्रात वाघ-बिबट्यांप्रमाणे सारस पक्ष्यांचीही दरवर्षी गणना होते. 'सेवा' (Sustaining Environment and Wildlife Assemblage) ही संस्था २००४ पासून दरवर्षी या पक्ष्यांची गणना करते. महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात स्वंयसेवक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही गणना पार पडते. यंदा ही गणना १२ ते १९ जून दरम्यान या जिल्ह्यांमध्ये पार पडली. या गणनेअंती महाराष्ट्रात केवळ ४१ सारस पक्ष्यांचे वास्तव्य असून मध्यपद्रेशातील बालाघाट जिल्ह्यात ४७ सारस पक्ष्यांचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. गेल्यावर्षी या गणनेअंतर्गत राज्यात ४५ सारस पक्षी आढळून आले होते. यंदा या संख्येत घट झाली आहे. सारस हा दुर्मीळ आणि राजबिंडा पक्षी आज फक्त दोन आकडी संख्येत फक्त पुर्व विदर्भातील तिन जिल्ह्यापुरता उरलेला आहे. त्यामुळे त्याची आहे ती संख्या वाढविण्यासाठी त्यांचे अधिवास अबाधित राखण्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न होणे आवश्यक आहे.
 
 
 
sarus_1  H x W:
 
 
 
 
चिंतेची बाब
 
यंदाच्या गणेनुसार महाराष्ट्र राज्यात ४१ सारस पक्षी आढळले असून ही चिंतेची बाब असल्याची माहिती 'सेवा' संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी दिली.त्यामुळे सारस संरक्षणासाठी शेतकरी आणि स्वयंसेवी संस्थांसह प्रशासकीय पातळीवर विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा गणना करताना मोजलेला सारस पक्षी पुन्हा मोजला जाऊ नये म्हणून विशेष काळजी घेतल्याचे बहेकार यांनी नमूद केले. या गणनेवर गेल्यावर्षीप्रमाणेच कोरोनाचे सावट होते.
 
 
चंद्रपूरातून सारस नामशेष ?
 
 
गेल्यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात एक सारस पक्षी आढळला होता. या नर सारस पक्ष्याला प्रजननासाठी मादी न मिळाल्यास या प्रदेशातून सारस पक्षी स्थलांतर करण्याची भीती गेल्यावर्षीच वर्तवण्यात आली होती. ही भीती खरी ठरल्याची शक्यता आहे. कारण, यंदा चंद्रपूर जिल्ह्यात सारस पक्षी आढळलेला नाही.
 
 
सारसविषयी...
 
महाराष्ट्रातील केवळ गोंदिया या जिल्ह्यात मोठ्या संख्येने सारस या पक्ष्याचे अस्तित्व टिकून राहिले आहे. सारस क्रौंच हा मुख्यत्वे भातशेतीत किंवा छोटय़ा तलावात (याला बोडी म्हणतात) घरटे तयार करतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या पक्ष्यांच्या अस्तित्वाला अधिवास नष्ट होणे, कीटकनाशकांचा वापर आणि मानवी हस्तक्षेपाचा धोका निर्माण झाला आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@