वन्यजीवांचा पशुवैद्यक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2021   
Total Views |

manas_1  H x W:
 
 
आज हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच वन्यजीव पशुवैद्यक हे राज्यात काम करत आहेत. यामधीलच एक तरुण वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर याच्याविषयी...
 
 
या मुलाला नेहमीच्या चौकरीबद्ध पशुवैद्यकाचे काम करायचे नव्हते. लहानपणी जडलेल्या वन्यजीवांविषयीच्या आवडीला जपूनच त्याला आपले जीवन जगायचे होते, म्हणूनच कुठेही चाचपडत न राहता त्याने या क्षेत्रामध्ये काम करण्याच्या उद्देशाने आपला शैक्षणिक प्रवास आखला. या प्रवासाच्या वाटेवर मार्गस्थ होऊन व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून केनियामधून ‘वन्यजीव आरोग्य आणि व्यवस्थापन’ या विषयामध्ये पदव्युत्तर पशुवैद्यकीय शिक्षण मिळवले. त्यामुळे पाळीव प्राण्यांपेक्षा संकटात सापडलेल्या वन्यजीवांसाठी काम करण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली. सध्या हा मुलगा जुन्नर येथील ‘माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रा’मध्ये ‘वाईल्डलाईफ एसओएस’ या संस्थेमार्फत वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. वन्यजीव क्षेत्रामध्येच काम करण्याचे आपले स्वप्न साकारणारा हा मुलगा म्हणजे डॉ. निखिल बनगर.
 
 
निखिलचा जन्म दि. २० जून, १९८९ रोजी मुंबईत झाला. त्याचे बालपण डोंबिवली आणि दादरमध्ये गेले. सामान्यत: लहान मुलांना पक्षी न्याहाळून किंवा सापांविषयीचे आकर्षण वाटून वन्यजीवांप्रति आवड निर्माण होते. निखिलच्या बाबतीतही काही वेगळे नव्हते. शालेय जीवनात खेळाची आवड असणार्‍या निखिलला मैदानातील गवतामध्ये अनेक साप आणि पक्षी दिसायचे. त्यांचे निरीक्षण करूनच वन्यजीवांविषयीची आवड त्याच्या मनात रुजत गेली. या रुजलेल्या आवडीचे छोटे रोपटे त्याच्या मनाच्या एका कप्प्यात बहरत होते. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणही त्याच अनुषंगाने घेण्याचा निर्णय झाला. अकरावी-बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा वन्यजीवांमधील रस अधिक फुलला होता. त्यामुळे भविष्यातील या क्षेत्रातील संधीचा विचार करून निखिलने पशुवैद्यकीय शिक्षण घेण्याचे ठरवले.
 
 
परळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्याने प्रवेश मिळवला. या शिक्षणाच्या दरम्यान त्याचा अधिकाधिक वेळ मुंबई आणि पुण्याच्या प्राणिसंग्रहालयांमध्ये जात होता. या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम करून, तिथल्या पशुवैद्यकांशी बोलून त्याच्या वन्यजीवांविषयामधील रसाला खतपाणी मिळत होते. शिवाय ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’मध्ये तो निसर्ग सहलींना मार्गदर्शन करायचा. तिथल्या ‘नॅशनल जिओग्राफी’च्या ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ प्रकल्पामध्येही त्याने काम केले. त्यानंतर ‘टायगर वॉच’ संस्थेअंतर्गत ‘रणथंबोर व्याघ्र प्रकल्पा’तील लांडग्यांवरील एका प्रकल्पामध्ये संशोधक साहाय्यक म्हणून काम केले. म्हणजेच, पशुवैद्यकीय शिक्षण घेत असतानाच निखिलने सर्व मार्गाने वन्यजीवविषयक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांचे फलित म्हणजे, २०१६ साली पशुवैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच्यातील वन्यजीवांमधील रसाचे रोपटे अजून काही फुटांनी वाढले होते. आता या रोपट्याचा वटवृक्ष होण्यासाठी आवश्यक असलेला प्रवास सुरू करण्याची वेळ आली होती.
 
 
 
सामान्यत: पदव्युत्तर पशुवैद्यकीय शिक्षण हे क्लिनिकल विषयामधून घेतले जाते. मात्र, निखिलने पदव्युत्तर पशुवैद्यकीय शिक्षण हे वन्यजीव विषयामध्येच घेण्याचे निश्चित केले होते. भारतामध्ये हे शिक्षण देणारी काही विद्यापीठे होती. परंतु, तिथे यासंबंधीचे प्रत्यक्ष ज्ञान देण्यापेक्षा पुस्तकी ज्ञान देण्यावर भर होता. म्हणूनच, त्याने परदेशी जाण्याचा निर्णय घेतला आणि केनियामध्ये नैरोबी विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवला. या ठिकाणी त्याचे ‘वन्यजीव आरोग्य आणि व्यवस्थापन’ विषयाचे पदव्युत्तर पशुवैद्यकीय शिक्षण सुरू झाले. केनियामधील वन्यजीव संरक्षित क्षेत्रांना प्रत्यक्ष भेटीगाठी देऊन त्या ठिकाणी काम करून निखिलचे हे शिक्षण सुरू होते. याचदरम्यान त्याने ‘नॅशनल म्युझियम ऑफ केनिया’मधील सरिसृप उद्यानामध्ये सल्लागार पशुवैद्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी दोन वर्षांचा अनुभव घेतला. पदव्युत्तर पशुवैद्यकीय अभ्यासक्रमातील शोधप्रबंधासाठी त्याने पुण्याच्या प्राणिसंग्रहालयातील चितळ आणि काळविटांवर काम केले. २०१८ साली त्याचे शिक्षण पूर्ण झाले आणि २०१९ साली तो महाराष्ट्रात परतला. केनियामध्ये त्याला वन्यजीव पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करण्याच्या दृष्टीने समृद्ध अनुभव मिळाला.
 
 
 
महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर निखिलने रत्नागिरी वनविभागांतर्गत ‘पशुवैद्यकीय अधिकारी’ म्हणून काम करण्यास सुरुवात केली. येथील पाच-सहा महिन्यांच्या काळात त्याने विविध वन्य आणि सागरी जीवांसाठी काम केले. मानव-बिबट्या संघर्षामध्ये जनजागृतीचे काम सक्षमपणे हाताळले. १ फेब्रुवारी, २०२० पासून तो ‘वाईल्डलाईफ एसओएस’ या संस्थेअंतर्गत जुन्नर येथील ‘माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रा’मध्ये ‘वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी’ म्हणून काम करत आहे. या निवारा केंद्रातील ३२ बिबट्यांचे दररोजचे नियोजन आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम तो सर्मथपणे करत आहे. याशिवाय आसपास घडणार्‍या बिबट्या बचावकार्यामध्येही त्याचा सहभाग आहे. गेल्या वर्षभरामध्ये निखिलने अंदाजे १२ बिबट्यांचा बचाव केला आहे. तसेच मादी बिबट्यापासून दुरावलेल्या अंदाजे १६ पिल्लांना पुन्हा आपल्या आईच्या कुशीत विसावून देण्याचे कामही त्याने केले आहे. जुन्नरमध्ये ‘भारतीय वन्यजीव संस्थान’कडून सुरू असलेल्या बिबट्यांना ‘रेडिओ कॉलर’ लावण्याच्या प्रकल्पामध्येही त्याचा सहभाग आहे. शिवाय, मानव-बिबट्या संघर्ष निवारणाअंतर्गत जनजागृती आणि त्याचे व्यवस्थापनाचे कामही निखिल करत आहे. आज हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच वन्यजीव पशुवैद्यक महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. त्यातही निखिलसारखे तरुण हे वन्यजीव पशुवैद्यक क्षेत्राला लाभलेले हिरे आहेत. निखिलला त्याच्या पुढील वाटचालीकरिता अनेक शुभेच्छा!
 
 
@@AUTHORINFO_V1@@