केरळमध्ये ‘सबकुछ विजयन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2021   
Total Views |

P Vijayan_1  H
 
 
 
तब्बल ४४ वर्षांनी सत्ताधारी आघाडीलाच केरळच्या मतदारांनी पुन्हा निवडून दिले आहे. यामध्ये अर्थातच सर्वात महत्त्वाची भूमिका ठरली ती मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांची. त्यामुळे केरळच्या निकालावर चर्चा करण्यापूर्वी कॉम्रेड पिनरायी विजयन यांना ‘डिकोड’ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
 
 
नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, पुदुच्चेरी आणि केरळ विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. त्यामध्ये बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तामिळनाडूमध्ये द्रमुक, आसाममध्ये भाजप, पुदुच्चेरीमध्ये भाजप-एनडीए आणि केरळमध्ये पुन्हा एकदा डावी आघाडी असे निकाल लागले आहेत. यापैकी केरळचा निकाल महत्त्वाचा ठरतो, कारण, तब्बल ४४ वर्षांनी सत्ताधारी आघाडीलाच केरळच्या मतदारांनी पुन्हा निवडून दिले आहे. यामध्ये अर्थातच सर्वात महत्त्वाची भूमिका ठरली ती मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांची. त्यामुळे केरळच्या निकालावर चर्चा करण्यापूर्वी कॉम्रेड पिनरायी विजयन यांना ‘डिकोड’ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
 
 
पिनरायी विजयन यांचा जन्म कन्नूरमधल्या एका सर्वसाधारण कुटुंबात २१ मार्च, १९४४ रोजी झाला. शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी कुटुंबाची गरज म्हणून हातमाग कामगार म्हणून काम करण्यास प्रारंभ केला होता. मात्र, तेथे होणारे कामगारांचे शोषण पाहून ते डाव्या विचारांकडे आकर्षित झाले. पुढे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केले आणि १९६४ साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात त्यांचा औपचारिक प्रवेश झाला. डाव्या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला, त्यांचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने कन्नूर हेच राहिले. पक्षात विविध पदांवर काम केल्यानंतर त्यांनी अनेक मंत्रालयेदेखील सांभाळली, त्यानंतर अखेर मुख्यमंत्रिपदी त्यांची निवड करण्यात आली. विजयन यांच्या राजकारणाची शैली पाहिल्यास अन्य कॉम्रेड मंडळींप्रमाणे ते टिपिकल झोलाछाप दिसत नाहीत. त्याचप्रमाणे ऊठसूट केंद्र सरकारवर टीका करणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना अर्वाच्य भाषेत बोलणे हेदेखील विजयन यांनी केल्याचे आढळून आलेले नाही.
 
 
विजयन हे कॉम्रेड असले तरीदेखील पोथीनिष्ठ होणे त्यांनी अगदी चलाखीने टाळले आहे. पक्षात आणि प्रशासनात काही महत्त्वाचे बदल त्यांनी अतिशय चातुर्याने केले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, डाव्या पक्षांची संपूर्ण भारतामध्ये पीछेहाट अथवा अस्तित्व संपत असताना केरळमध्ये अस्तित्व मजबूत करण्यासोबतच पक्षविस्तारही त्यांनी साधला आहे. केरळमध्ये माकप हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणावर जनाधार असलेला पक्ष; मात्र त्यामुळे अडचणी येतील हे विजयन यांनी योग्य वेळीच ओळखले. त्यानंतर त्यांनी मुस्लीम आणि ख्रिश्चनांना पक्षासोबत जोडून घेण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे कम्युनिस्ट असूनही त्याचा बाऊ न करता, राज्याची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक ते सर्व काही त्यांनी केले. त्यासोबतच पक्षाची गंगाजळी वाढविण्यासाठी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणांचा अवलंब त्यांनी केला. राज्यात आरोग्य, पायाभूत सुविधा यावरही त्यांनी मेहनत घेतली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विजयन हे कुशल प्रशासक आहेत, हे नाकारता येणार नाही. मुक्त अर्थव्यवस्था आणि डावा विचार यांचे एक अजब मिश्रण त्यांनी तयार केले आहे आणि तेथील जनतेनेही ते स्वीकारले आहे.
 
 
विजयन यांचा स्वभावही जरा रोखठोक, त्यामुळे भाजपने दिलेले आव्हानही त्यांनी त्यांच्या शैलीत स्वीकारले. त्यामुळेच राज्यात फक्त भाजपने सोने तस्करी प्रकरणावर रान उठवून विजयन यांना लक्ष्य केलेले असतानाही जनतेने त्यांना नाकारले नाही, यात त्यांचे राजकीय कसब लक्षात येते. त्याचप्रमाणे अयप्पा मंदिर, शबरीमला आणि पद्मनाभ मंदिर हे वादही त्यांनी अत्यंत कौशल्याने हाताळले. अर्थात, भाजपला केरळमध्ये लगेच सत्ता मिळेल, असे चित्र नव्हतेच. मात्र, यावेळी भाजपचा एकही आमदार त्यांनी विधानसभेत येऊ दिलेला नाही. आता पुन्हा हेच विजयन पाच वर्षे सत्तेत राहणार आहेत. या पाच वर्षांमध्ये माकपचा विस्तार करणे, भाजप आणि काँग्रेसला राज्यातून हद्दपार करणे यावर ते अधिक भर देतील. काँग्रेसच्या राहुल गांधींना कदाचित 2024 साली वायनाडऐवजी आणखी एखादा सुरक्षित मतदारसंघ शोधायलाही ते भाग पाडतील. कारण, त्यांचे लक्ष्य अगदी स्पष्ट आहे, ते म्हणजे केरळमध्ये केवळ डावा विचारच राज्य करू शकतो, अन्य कोणी नाही.
 
 
भाजपने केरळमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा अनेक वर्षांपासून लावून धरला आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातील अनेक संघटना तेथे दीर्घकाळपासून कार्यरत आहेत. अनेकांनी तर डाव्यांच्या हिंसाचारात आपले प्राणही गमावले आहेत. मात्र, अद्यापही तेथे म्हणावे तसे यश भाजपला मिळालेले नाही. याविषयी केरळमध्ये वास्तव्य केलेले राजकीय विश्लेषक प्रसाद देशपांडे यांनी अगदी नेमक्या शब्दात सांगितले, ते म्हणतात, “उत्तर प्रदेशमध्ये हिंदू अस्मिता घेऊन किंवा तामिळनाडूत द्रविड अस्मिता घेऊन कोणताही पक्ष सहज निवडणूक लढवू शकतो. पण, केरळमध्ये हा फॉर्म्युला चालत नाही. शेकडो वर्षांचा बाहेरून आलेल्या आक्रमणांचा प्रभाव म्हणा किंवा मार्क्सवाद, मिशनरी किंवा इस्लाम याचं भारतातील पहिलं प्रवेशद्वार म्हणा, त्यामुळे इथली संस्कृती प्रचंड वेगळी आहे. सगळ्या धर्मांची आणि जातींची इतकी बेमालूम सरमिसळ आहे की, माझ्या माहितीतले असेही लोकं आहेत की, ज्यांच्या आजोबांपर्यंतची पिढी हिंदू होती. वडिलांपासून ख्रिश्चन आहे आणि त्यांच्या घरात दोन्ही धर्माची पूजापद्धती अवलंबली जाते. तिथे मी अशी अनेक कुटुंबं पाहिली आहेत की, ज्यांच्या घरचा कर्तापुरुष कम्युनिस्ट नेता/कार्यकर्ता आहे. पण, त्याची बायको प्रचंड श्रद्धाळू आणि मुलगा चक्क संघ कार्यकर्ता!! त्यामुळे तिथे कुठलीच बाजू सरसकट घेणं हे अशक्य होतं.”
 
 
यावरून एक गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे देशाच्या अन्य भागांमध्ये भाजप ज्याप्रकारे हिंदुत्वाची मांडणी करतो, तशी मांडणी केरळमध्ये करता येणार नाही. तेथील लोकसंख्येचे गणितही असे आहे की, केवळ हिंदू मतदारांचे ध्रुवीकरण करूनही भाजपला सत्ता प्राप्त करणे सोपे नाही. त्यासाठी भाजपला हिंदू मतपेढीसह तेथील ख्रिश्चन मतपेढीकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. त्यासाठी संघ परिवाराच्या आघाडीवर ख्रिस्ती संघटनांसोबत चर्चाही वेळोवेळी होत असतात. मात्र, त्याकडे आता रणनीती म्हणून बघावे लागणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशात मांडले जाणारे हिंदुत्व केरळमध्ये वेगळ्या प्रकारे कसे मांडता येईल, याकडेही भाजपला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. कारण, शबरीमला प्रकरणात भाजपची भूमिका स्पष्ट वाटत असली तरीदेखील केरळमध्ये हिंदू मतदारांना आकर्षित करण्यास अपयशच आले आहे.
 
 
विजयन यांनी भाजपचे पानिपत तर केलेच; पण त्यासोबतच ‘युडीएफ’ला स्पष्ट इशारा दिला आहे. ‘युडीएफ’मध्ये ‘मुस्लीम लिग’ हा प्रमुख पक्ष, तर त्यासोबत अंतर्गत लाथाळ्यांना ग्रस्त असलेला काँग्रेस हे दोनच प्रमुख पक्ष. निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच काँग्रेसचा अंतर्गत कलह टोकाला गेला होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेस नेतृत्वानेही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे या आघाडीकडे त्यांच्या पारंपरिक मतदारांनी प्रामुख्याने मुस्लिमांनी विश्वास टाकला नाही. त्यामुळे आता पुढील भविष्यात मुस्लीम लीगला काँग्रेसला वार्‍यावर सोडण्याशिवाय गत्यंतर नसेल. कारण, काँग्रेसची अवस्था सध्या अडगळ अशीच झाली आहे.
 
 
 
एकूणच, केरळचे गणित भाजपसाठी आणखी पाच वर्षे अवघड झाले आहे. अर्थात, भाजपची कार्यशैली पाहता दीर्घकाळ वाट पाहण्याची आणि शांतपणे काम करण्याची त्यांना जुनी सवय आहे. मात्र, यावेळी आता रणनीती बदलावी लागणार आहे. काँग्रेसला आता केरळमध्येही जागा उरलेली नाही, हे पक्षासाठी धोकादायक आहे. कारण, उत्तर प्रदेश सोडून केरळमध्ये राहुल गांधींनी आपल्यासाठी मतदारसंघ शोधला होता, तेथे ते निवडूनही आले. मात्र, तरीदेखील काँग्रेसमधील अंतर्गत कलह संपविण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली नाही. त्यामुळे पुढील काळात मुस्लीम लीगदेखील काँग्रेसचे जोखड फेकून देण्यास मागेपुढे पाहणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढील पाच वर्षे सर्वच पक्ष पिनरायी विजयन यांचा सामना कितपत सक्षमपणे करतात, यावर सर्वच पक्षांचे भवितव्य ठरेल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@