गोंदियाचा ‘सारस’ मित्र

    27-May-2021   
Total Views | 265

Sawan Bahekar _1 &nb
 
 
 
गोंदिया जिल्ह्यातील वन्यजीव संवर्धनाच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्या निराकरणासाठी झटणार्‍या सावन बहेकार यांच्याविषयी...
 
 
महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवरील गोंदिया जिल्ह्यातील वन्यजीवांचा रखवालदार असणारा हा माणूस. गोंदिया-बालघाटमध्ये तग धरून राहिलेल्या मोहक अशा ‘सारस’ पक्ष्यांच्या संरक्षणार्थ झटणार्‍या माणसांपैकी एक. गोंदिया जिल्ह्यातील वन्यजीव संरक्षणाच्या मूळ समस्या ओळखून त्या सोडवण्याचा मार्ग त्यांनी निवडला आहे. आपल्या सहकार्‍यांसोबत केलेल्या प्रयत्नांमुळेच आज गोंदिया जिल्ह्यात सारस आणि काळविटांची संख्या वाढली आहे. स्थानिकांच्या रोजगाराची नाळ वन्यजीव संवर्धनाच्या चळवळीशी जोडून ते काम करत आहेत. निसर्गासमोर माणूस कोणीही नाही, या विचारांनी वसुंधरेच्या रक्षणाचे काम करणारा हा माणूस म्हणजे सावन बहेकार.
 
 
 
बहेकार यांचा जन्म दि. २७ जुलै, १९८४ साली गोंदियामधील अदासी या गावात झाला. घरची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती ही उत्तम होती. प्राण्यांविषयीचे आकर्षण त्यांच्या रक्तामध्येच होते. कारण, पूर्वीच्या काळी शिकारीमध्ये रस असणारी माणसं त्यांच्या घरामध्ये होऊन गेली होती. मात्र, बहेकारांचे प्राण्यांप्रतिचे हे आकर्षण संवर्धनाच्या अनुषंगाने फुलत गेले. लहानपणी ते जखमी पक्ष्यांची देखभाल करायचे, जंगलात हिंडायचे, निसर्गाचे निरीक्षण करायचे. शालेय शिक्षणानंतर ही आवड अधिक बहरत गेली. वन्यजीवांना पाहण्याबाबत कुतूहल निर्माण झाले. २००१ साली फार्मसीमधून डिप्लोमाचे शिक्षण घेत असताना त्यांचे निसर्गामध्ये फिरणे वाढले. त्यातून समविचारी माणसं जोडत गेली आणि २००५ साली सारस संवर्धनाच्या मोहिमेचे काम सुरू झाले.
 
 
 
गोंदिया आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असणार्‍या बालाघाटच्या जिल्ह्यामध्ये ‘सारस क्रेन’ पक्ष्यांचा अधिवास आहे. २००५ साली ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासकांसह बहेकार सारस पक्ष्यांच्या संवर्धनाच्या कामात उतरले. या काळात त्यांनी फार्मसीमधून पदव्युत्तर पदवीचे शिक्षणही पूर्ण केले. सारस संवर्धन मोहिमेच्या सुरुवातीच्या काळात संवर्धनाचे काम कठीण होते. कारण, याविषयी पूर्वी काम न झाल्याने या कामाला पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे सारस पक्ष्यांचा अधिवास शोधण्यापासून या कामाला सुरुवात झाली. सारस पक्ष्यांना शोधणे, त्यांच्या जोड्या ओळखणे, त्यांच्या घरट्यांच्या जागा नोंदवणे आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या अधिवासाला असणारे धोके ओळखण्याचे काम सुरुवातीच्या काळात करण्यात आले. सारस हा पक्षी जंगलात राहणारा नसून तो मानवी वस्तीनजीक राहतो. त्यामुळे त्याला मानवनिर्मिती कारणांपासून धोका आहे. असे धोके ओळखून त्याचे निराकरण करण्याचे काम बहेकार यांनी केले.
 
 
 
सारसाची अंडी पळवणे आणि त्यांच्या शिकार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बहेकार आणि सहकार्‍यांनी तातडीने जनजागृतीच्या कामाला सुरुवात केली. तातडीने तत्सम गावातील पोलीसपाटील, सरपंच, शाळकरी मुले, ग्रामस्थांना बोलावून जनजागृती केली. आज या सगळ्यांच्या मदतीने सारस संरक्षणाचे काम सुरू आहे. २०१३-१४ साली सारस संवर्धनाचे काम मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आले. सारस पक्ष्यांच्या अधिवासाकरिता आवश्यक असणार्‍या तलावांच्या व्यवस्थापनाचे काम करण्यात आले. त्यानंतर २०१२ पासून ‘सारस पक्षी गणने’ला सुरुवात झाली. २०१२ सालच्या गणनेमध्ये त्यांना सहा सारस पक्षी आढळून आले. मात्र, मधल्या काळात झालेल्या जनजागृती आणि संवर्धनाच्या कामामुळे गेल्या वर्षीच्या गणनेत त्यांना 94 सारस आढळून आले. दरम्यानच्या काळात नवेगाव-नागझिरा अभयारण्यामध्ये वन्यजीव नोंदणीच्या कामामध्ये बहेकार आणि सहकार्‍यांनी सहभाग नोंदवला. वनविभागाला मदत म्हणून त्यांनी ‘कॅमेरा ट्रॅप’च्या मदतीने वन्यजीव नोंदणीच्या कामामध्ये मदत केली. २०१२ साली बहेकारांनी Sustaining Environment and Wildlife Assemblage (सेवा) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आणि पुढे २०१४ मध्ये या संस्थेची त्यांनी नोंदणी केली.
 
संस्थेच्या माध्यमातून बहेकार यांनी गोंदियातील काळवीट संवर्धनासंदर्भात काम करण्यास सुरुवात केली. गोंदिया जिल्ह्यात तुरळक प्रमाणात असणार्‍या गवताळ प्रदेशांमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतकी काळविटांची संख्या होती. या काळविटांच्या संवर्धनासाठी दहेगाव (मानेगाव) येथील स्थानिकांची मदत घेण्यात आली. गवताळ प्रदेशाच्या संवर्धनासाठीही प्रयत्न करण्यात आले. या सगळ्या प्रयत्नांमुळे काळविटांची संख्या वाढण्याबरोबरच त्यांची शिकार करणार्‍या लांडग्यांचीदेखील संख्या वाढली. वन्यजीव संवर्धनाबरोबर त्यांच्या शिकारीवरही प्रतिबंध आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. नवेगाव-नागझिरा अभयारण्याच्या कवचक्षेत्रातील जांभळी ‘ब्लॉक’मधील १३ गावांमध्ये उपजीविका निर्माण योजनेचे काम सध्या सुरू आहे. गोंदियामध्ये स्थलांतर करून येणार्‍या वाघांच्या भ्रमणमार्गासंदर्भातही बहेकारांनी विशेष काम केले आहे. त्यांनी नागझिरा, नवेगाव, उमरेड करांडला, पेंच, पारसिवनी येथील वाघांच्या भ्रमणमार्गाच्या सर्वेक्षणाचा अभ्यास केला असून, आजपर्यंत आठ-नऊ वाघांचे स्थलांतरण अभ्यासाअंती सिद्ध केले आहे. या कामामध्ये बहेकारांच्या सहकार्याचा सिंहाचा वाटा आहे.
 
 
बहेकारांची गोंदियाचे ‘मानद वन्यजीव रक्षक’ म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा व्याघ्रकक्ष समिती, जिल्हा जैवविविधता समिती, जिल्हा पर्यटन विकास समिती आणि ‘अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड’चे ते सदस्य आहेत. त्यांना ‘महाराष्ट्र युथ आयकॉन अ‍ॅवॉर्ड २०१४, राज्यस्तरीय ‘वाईल्ड लाईफ अ‍ॅवॉर्ड २०१५’, ‘सँक्चुरी एशिया वाईल्ड लाईफ अ‍ॅवॉर्ड २०१७’, ‘महाराष्ट्र राज्य जैवविविधता सन्मान २०१८’ या सन्मानांनी गौरविण्यात आलेले आहे. गोंदियासारख्या जिल्ह्याला बहेकारांसारख्या नव्या दमाच्या तरुण वन्यजीव रक्षकांची गरज आहे. त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121