कोकणातील सागरी कासवाच्या घरट्यांना चक्रीवादळाचा फटका; अंडी पाण्याखाली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2021   
Total Views |
sea turtle_1  H



मुंबई (अक्षय मांडवकर) -
तौत्के चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर संवर्धित करण्यात आलेल्या सागरी कासवांच्या घरट्यांचे नुकसान झाले आहे. घरट्यांवरुन पाणी गेल्याने यामधील अंडी खराब होण्याची दाट शक्यता आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कोकण किनारपट्टीवर समुद्री कासवांची दुपटीने घरटी सापडली होती. मात्र, चक्रीवादळामुळे समुद्रातील लाटांचा तडाखा यामधील काही घरट्यांना बसल्याने त्यामधून पिल्लांचा जन्म होण्याची आशा मावळली आहे.
 
 
 
 
राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनार्‍यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील ’ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. यामध्ये रायगड जिल्ह्यातील चार, रत्नागिरीमधील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी १३ किनार्‍यांच्या समावेश आहे. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. या कालावधीत वन विभागाने किनार्‍यांवर नमलेल्या कासवमित्रांकडून सागरी कासव संवर्धनाचे काम केले जाते. संवर्धनाच्या या कामाअंतर्गत यंदा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मिळून कासवांची एकूण ४५२ घरटी संवर्धित करण्यात आली होती. यामधील बहुतांश घरट्यांमधून जन्मास आलेल्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले होते. मात्र, काही घरट्यांमधून पिल्लांचा जन्म होण्यास अवकाश होता. अशा उरलेल्या घरट्यांना तौत्के चक्रीवादळाचा फटका बसला आहे.
 
 
 
 
 

चक्रीवादळामुळे समुद्राच्या उसळलेल्या लाटा या कासवांच्या उरलेल्या घरट्यांवरुन गेल्या आहेत. तसेच काही किनाऱ्यावर घरट्यांच्या संरक्षणासाठी बांधलेल्या हॅचरीचे नुकसान झाले आहे. घरट्यांवरुन पाणी गेल्याने त्यामधील अंड्यांना बुरशी पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अंडी परिपक्व होऊन त्यामधून पिल्लं बाहेर पडण्याची शक्यता फार कमी असल्याची महिती सागरी कासव संशोधक सुमेधा कोरगावकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. दापोली वनपरिक्षेत्रामधील कोळथरे किनाऱ्यावरील नऊ घरटी (अंडी ८६१), दाभोळमधील दोन घरटी (१९४ अंडी) आणि कर्दे, वेळास, आंजर्ले येथील प्रत्येकी एका घरट्याला चक्रीवादळामुळे आलेल्या लाटांचा आणि मुसळधार पावसाचा फटका बसल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव बोराटे यांनी दै.'मुंबई तरुण भारत'ला दिली. यामधील वेळास, कर्दे, दाभोळ आणि आंजर्लेतील घरटी प्लास्टिकच्या ताडपत्र्या आणि तत्सम उपाययोजना केल्याने थोड्याफार प्रमाणात वाचली असून कोळथरेमधील घरटी ही पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने त्यामधून पिल्लांचा जन्म होण्याची शक्यता धूसर असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय गुहागर किनाऱ्यावरही उरलेल्या आठ घरट्यांवरुन (७७६ अंडी) लाटा गेल्याने त्याचेही नुकसान झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री कीर यांनी दिली. रत्नागिरीतील गावखडीच्या किनाऱ्यावरही एका घरट्यांमधून पिल्लं बाहेर पडलेली नाहीत.
 
 
 
 
सिंधुदुर्गमध्येही नुकसान
 
तौत्के चक्रीवादळाचा फटका सर्वाधिक तडाखा सिंधुदुर्ग किनारपट्टीला बसला. परिणामी येथील किनाऱ्यांवर संवर्धित केलेल्या सागरी कासवांच्या घरट्यांना त्याची झळ बसली आहे. सिंधुदुर्गातील वायंगणी येथील कासवांच्या ४ आणि शिरोड्यातील २ घरट्यांचे चक्रीवादळामुळे नुकसान झाल्याची माहिती कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डाॅ. व्ही. क्लेमंट बेन यांनी दिली. मात्र, या घरट्यांमधून पिल्लं बाहेर पडण्याची आशा आम्हाला असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
हवामान बदलाचा परिणाम
 
राज्यातील सागरी कासवांच्या विणीवर हवामान बदलाचा परिणाम जाणवत आहे. हवामान बदलामुळे विणीच्या मुख्य हंगामात बदल झाल्याचेही निदर्शनास आले आहे. पूर्वी नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यात मोठ्या संख्येने कासवांची घरटी आढळून येत होती. परंतु, आता फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये ही घरटी आढळत आहेत. शिवाय हवामान बदलामुळे सातत्याने निर्माण वादळांचा फटकाही सागरी कासव विणीला बसला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@