ले. ज. वॅग पिंटो आणि बसंतार नदीची लढाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

Pinto_1  H x W:
 
 
 
आता भारतीय लष्कर थेट सियालकोटवर धडक मारू शकेल, असं दिसल्यावर पाकिस्तानच्या ‘पहिली कोअर’ सेनादलाने बिनशर्त शरणागती स्वीकारली. पठाणकोट नि जम्मू राहिलं बाजूला, सियालकोट गमावण्याची वेळ आली!
१९७१च्या भारत-पाक युद्धाचं किंवा बांगलादेश युद्धाचं हे ‘सुवर्णजयंती वर्ष’ चालू आहे. त्या वर्षातच या युद्धातल्या एका महान सेनापतीने जगाचा निरोप घेतला. गेल्या महिन्यात २५ मार्च रोजी लेफ्टनंट जनरल वॉल्टर अ‍ॅन्टनी गुस्ताव्ह उर्फ वॅग पिंटो यांचं पुण्यात निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते.
 
 
जनरल पिंटोचं घराणं मूळ गोव्यातल्या खालापूरचं, पण त्यांचे वडील अलेक्झांडर पिंटो यांनी पोर्तुगीज अंमलातल्या गोव्यात राहण्यापेक्षा ब्रिटिश अंमलातल्या पुण्यात येऊन, ब्रिटिश लष्कारात नोकरी धरली, तिथेच वॉल्टरचा जन्म १९२४ साली झाला. लष्करातल्या लोकांच्या सतत बदल्या होत असतात. त्यामुळे वॉल्टरचं शिक्षण पुणे, बंगळुरू आणि जबलपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी झालं.
 
 
१९४३ साली वॉल्टर ७व्या ‘इंडियन इन्फन्ट्री डिव्हिजन’मध्ये दाखल झाला, तेव्हा तो फक्त १९ वर्षांचा होता, दुसरं महायुद्ध ऐन भरात होतं. जपानी सैन्य ब्रह्मदेशमार्गे भारताच्या सरहद्दीवर येऊन ठेपलं होतं. इंग्रजांना मिळतील तितकी माणसं हवी होती. त्यामुळेच वॉल्टर आणि त्याच्यासारख्या इतर अनेक होतकरू तरुणांना भराभर अधिकारी श्रेणीमध्ये घेण्यात आलं. इंग्रजांच्या काळात भूदलातील अधिकारी श्रेणी चढत्या भाजणीने अशी असे-सेकंड लेफ्टनंट-लेफ्टनंट-कॅप्टन-मेजर-लेफ्टनंट कर्नल-ब्रिगेडिअर-मेजर जनरल-लेफ्टनंट जनरल-जनरल. यांच्या वरील पायरी म्हणजे फील्ड मार्शल परंतु, ती बढतीनुसार मिळणारी जागा नसून मानद पदवी असते. म्हणजे जनरल हा वयोमानानुसार सेवानिवृत्त होतो. फील्ड मार्शल हा प्रत्यक्ष सेवेतून निवृत्त झाला, तरी मरेपर्यंत तो ‘फील्ड मार्शल’च राहतो.
 
 
आता यातलं ‘सेकंड लेफ्टनंट’ हे पद रद्द करण्यात आलं आहे. म्हणजे अधिकारी श्रेणी लेफ्टनंट या पदापासून सुरू होते. सप्टेंबर १९४३ मध्ये फक्त १९ वर्षांचा तरणाबांड सेकंड लेफ्टनंट वॉल्टर पिंटो, सातवी ‘इन्फन्ट्री डिव्हिजन’ या त्याच्या दलासह पंजाबातून थेट ब्रह्मदेशात इरावती नदीच्या खोर्‍यात दाखल झाला. प्रसिद्ध ब्रिटिश सेनानी लेफ्टनंट जनरल फ्रँक मेसर्व्ही याच्या चौथी कोअर या दलाचा एक भाग म्हणून त्यांना लढायचं होतं. ब्रह्मदेश आघाडीवरच्या या लढाया फार हिंस्र, फार कचाकचीच्या झाल्या. कारण, जपानी सैनिक फार चिवट आणि तितकेच क्रूर होते, भारतीय जवान आणि भारतीय अधिकारी यांना या युद्धात फार मौल्यवान असा प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव मिळाला.
 
 
महायुद्धानंतर लगेचच स्वातंत्र्य आलं. फाळणीमुळे विस्कळीत झालेल्या भारतीय सैन्य दलांची पुनर्रचना करण्याचं अत्यंत महत्त्वाचं पण तितकंच किचकट आणि वेळखाऊ काम जनरल के. एम. करिअप्पा यांच्यावर सोपवण्यात आलं. जनरल करिअप्पांनी आपलं सगळं कौशल्य, अनुभव पणाला लावून मोठ्या तडफेने काम पूर्ण केलं. त्यात तोवर मेजर हुद्द्यावर पोहोचलेल्या वॉल्टर पिंटोच्या ‘ब्रिगेड ऑफ गार्ड्स’ या पथकाला जोडण्यात आलं.
 
 
१९६२ साली पिंटो यांची ब्रिगेड कोलकत्याला असताना चीनने अकस्मात आक्रमण केलं आणि त्यांची ब्रिगेड तातडीने सिक्कीममध्ये नेण्यात आली. १९६५च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी लेफ्टनंट कर्नल हुद्द्यावर पोहोचलेले पिंटो कॅबिनेट सचिवालयाचे सल्लागार होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चीफ कॅबिनेट सेके्रटरीला सल्लागार म्हणून भूदलाचा एक लेफ्टनंट कर्नल आणि वायुदल, नौदल यांचा सन्मान पातळीचा प्रत्येकी एक अधिकारी अशी त्रिसदस्य समिती कायम कार्यरत असते.
१९७१ मध्ये एप्रिल महिन्यापासूनच तत्कालीन पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू झाला. दिवसेंदिवस तो अत्यंत तीव्र होत गेला. पाकिस्तानी सैन्याच्या बेछूट अत्याचारांमुळे लाखो पूर्व पाकिस्तानी नागरिक सरहद्द ओलांडून भारतीय प्रदेशात आश्रयालायेऊ लागले. आज ना उद्या भारताला या संघर्षात उतरावंच लागणार, अशी स्पष्ट चिन्हं दिसू लागली आणि नेमक्या या मुहूर्तावरच एप्रिल १९७१मध्ये तोवर मेजर जनरलच्या हुद्द्यावर पोहोचलेल्या वॉल्टर पिंटोंकडे ५४व्या ‘इन्फट्री क्रिव्हिजन’ची सूत्रं सोपवण्यात आली. या डिव्हिजनचं मुख्यालय होतं सिकंदराबाद. हैदराबाद आणि सिकंदराबाद ही जवळजवळ वसलेली जोड शहरं आहेत.
 
 
प्रत्यक्ष युद्ध पुढे ३ डिसेंबर, १९७१ या दिवशी सुरू झालं. पण, मेजर जनरल पिंटो यांनी आपली ५४वी ‘इन्फन्ट्री डिव्हिजन’ मे १९७१ मध्येच सिकंदराबादहून पंजाब सीमेवर हलवली. यावरून भारतीय सेनापती कसे तयारीला लागले होते, ते कळतं.
आपण भारताच्या पंजाब आणि जम्मू-काश्मीर राज्यांचा नकाशा नीट पाहिलात, तर असं दिसून येईल की, पंजाबच्या गुरुदासपूर आणि काश्मीरच्या जम्मू या शहरांच्या मध्ये खोलवर पाकिस्तानी प्रदेश घुसला आहे. मुळात तो गुरुदासपूर जिल्ह्याच्या शक्करगढ तालुक्याचा भाग, फाळणीत पाकिस्तानकडे गेला. लष्करी परिभाषेत त्याला म्हणतात, ‘शक्करगढ बल्ज.’ बल्ज म्हणजे उंचवटा. पाकिस्तानच्या येथील सरहद्दीपासून भारतीय पंजाबातलं पठाणकोट शहर जेमतेम ३०-३५ किमी अंतरावर होतं. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराचा डाव असा होता की, या ‘शक्करगढ बल्ज’मधून ‘पॅटन’ रणगाड्यांनी मुसंडी मारून थेट पठाणकोट गाठायचं. म्हणजे पंजाबमधून जम्मूकडे जाणारे रस्ते ताब्यात घ्यायचे.
 
 
उलट भारतीय लष्कराने ठरवलं की, आपलं रणगाडा दळ, चिलखती दळ, तोफा आणि पायदळ यांना या ‘शक्करगढ बल्ज’मध्ये उतरवून तो उंचवटा कापूनच टाकायचा. सुमारे ४०० चौ. किमींचा म्हणजे सुमारे ५०० खेड्यांचा हा ‘बल्ज’ सरळ ताब्यातच घेऊन टाकायचा. १९७१ची मुख्य लढाई ही पूर्व पाकिस्तानला होणार आहे. इकडे पंजाब किंवा काश्मीरमध्ये नाही, हे पाकिस्तानी सेनापती जाणून होतेच. पण, पंजाब आघाडीवरही युद्ध सुरू करण्यात त्यांचे दोन हेतू होते-एक म्हणजे भारतीय सैन्याला एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढायला भाग पाडायचं आणि दुसरा म्हणजे १९४८ पासून ज्या काश्मीरची पाकिस्तानला अतोनात तहान लागली होती, तो काश्मीर जमेल तितका काबीज करणं. यातला आणखी एक छुपा उद्देश म्हणजे नंतर वाटाघाटी करताना पूर्व पाकिस्तान सोडावा लागलाच, तर त्या बदल्यात काश्मीर कायमचा पदरात पाडून घेणं.
 
 
अशा प्रकारे मे १९७१ पासूनच युद्धाच्या नौबती झडू लागल्या होत्या. अखेर ३ डिसेंबर, १९७१ला पाकिस्तानचा धीर सुटला. त्याने पश्चिम सीमेवर ‘बॉम्बफेक’ करून अधिकृतपणे युद्धाला सुरुवात केली. पूर्वेकडे मेजर जनरल जेकब यांच्या सेनापतीत्वाखाली भारतीय सेना ढाक्याच्या रोखाने निघाल्या. या आघाडीचे प्रमुख सेनापती होते, लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरा. पश्चिमेकडचे प्रमुख सेनापती होते, लेफ्टनंट जनरल खेमकरणसिंग यांच्या नेतृत्वाखाली मेजर जनरल वॉल्टर पिंटो यांच्या ५४व्या ‘इन्फन्ट्री डिव्हिजन’ने आपला डाव आखला. ‘शक्करगढ बल्ज’मध्ये घुसायचं आणि थेट सियालकोटचा मोहरा धरायचा. पाकिस्तानच्या घमेंडीचा हा उंचवटा साफ कापूनच काढायचा. हे कसं करायचं याचं तंत्र ठरलेलं असतं. अतिशय कुशल, तरबेज असे पायदळ सैनिक प्रथम सरहद्द ओलांडतात. कोणता मार्ग योग्य आहे, कुठे भूसुरुंग किंवा अन्य सापळे लावलेले आहेत. याचा ते इंचाइंचाचा तपशील बनवतात. मग इंजिनिअर पथकाचं काम सुरू होतं. ते लोक शत्रूने पेरलेले भूसुरुंग आणि सापळे (बुबी ट्रॅप्स) निकामी करून तसंच दलदलयुक्त जमीन किंवा ओढा, नाला असल्यास त्यावरून रणगाडे, चिलखती गाड्या, पायदळ सैनिक बिनधास्तपणे जाऊ शकतील, असा मार्ग निश्चित करतात. हे काम करत असताना समोरून शत्रूच्या मशीनगन्स कडकडतच असतात. उखळी तोफा आपटबार टाकतच असतात. ती सगळी आग चुकवत काम करायचं. मग त्या निर्वेध केलेल्या मार्गावरून आपले रणगाडे आणि तोफा शत्रूवर आग ओकत आगेकूच करू लागतात.
 
 
५ डिसेंबर, १९७१ या दिवशी संध्याकाळी ठीक ७.३० वाजता मेजर जनरल पिंटोंच्या पथकांनी ‘शक्करगढ’ उंचवट्यावरील आपली कारवाई सुरू केली. पायदळ सैनिक आणि इंजिनिअरिंग पथकांनी आपली कामगिरी उत्तम रीतीने पार पाडल्यावर सोळाव्या आर्मर्डडिव्हिजनचे भारतीय सेंचुरियन रणगाडे ‘शक्करगढ’मध्ये घुसले आणि त्यांनी ‘पाकी पॅटन’ रणगाड्यांचा हुरडा भाजायला सुरुवात केली. या डिव्हिजनमध्ये ‘पूना हॉर्स’ या पथकाचे रणगाडे होते. ‘पूना हॉर्स’ या पथकाचा इतिहास मोठा गंमतीदार आहे. सन १८१७ साली ‘माऊंट स्टूअर्ट एल्फिन्स्टन’ने दुसर्‍या बाजीरावाला ‘पूना हॉर्स’ हे पथक सक्तीने सोपवले. म्हणजे असं की, बाजीरावाविरुद्ध कोणी बंडबिंड केल्यास हे पथक त्याचं संरक्षण करेल, पण स्वत: बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध बंड केलं, तर हे पथक त्यालाच अटक करेल. या ‘पूना हॉर्स’चं मुख्य ठाणं होत शिरुर. म्हणजे आजचे पुणे-नगर रस्त्यावरचं शिरुर, घोडनदी हे गाव या शिरुरमध्ये पैदास केली जाणारी भीमथडी तट्टं, तर इंग्रज अधिकार्‍यांना उत्तरेतल्या उंच घोड्यांपेक्षा जास्त पसंत होती.
 
 
असो. पुढे घोड्यांचा जमाना संपला. त्या ठिकाणी रणगाडे आणि चिलखती गाड्या आल्या, पण नाव तेच राहिलं, तर या ‘पूना हॉर्स‘ पथकातला फक्त २१ वर्षांचा सेंकड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल याने अपूर्व पराक्रम गाजवला. ‘पाकिस्तानी पॅटन’ रणगाडे आणि रणगाडाविरोधी अ‍ॅकअ‍ॅक गन्स समोरुन आग ओकत असताना हा पठ्ठा पुढे पुढेच घुसत राहिला. तो स्वत: आणि त्याचा रणगाडा जायबंदी झाले होते. त्याचे वरिष्ठ त्याला ’फील्ड टेलिफोन’वरून परत फिरायला सांगत होते. त्याचं उत्तर आलं, ‘नाही सर, माझा रणगाडा जायबंदी झाला असला तरी तोफ अजून उत्तम काम देतेय. आय विल गेट दोज वास्टर्डस्.’ मात्र हे त्याचं शेवटचं वाक्य ठरलं. अपूर्व शौर्य गाजवून अरुण खेत्रपाल धारातीर्थी पडला. त्याने एकट्याने शत्रूचे सात ‘पॅटन’ रणगाडे उद्ध्वस्त केले होते. अशी ही रणगाड्यांची भीषण लढाई १६ डिसेंबरपर्यंत अविरत चालू होती. मेजर जनरल पिंटोंच्या जवानांनी आणि अधिकार्‍यांनी ठरल्याप्रमाणे ‘शक्करगढ बल्ज’ कापला. आता भारतीय लष्कर थेट सियालकोटवर धडक मारू शकेल, असं दिसल्यावर पाकिस्तानच्या ‘पहिली कोअर’ सेनादलाने बिनशर्त शरणागती स्वीकारली. पठाणकोट नि जम्मू राहिलं बाजूला, सियालकोट गमावण्याची वेळ आली! यालाच म्हणतात, ‘लेने के देने पड गये.‘ मेजर जनरल पिंटोंच्या ५४व्या ‘इन्फन्ट्री डिव्हिजन’ला या अभूतपूर्व यशाबद्दल एकूण १९६ सन्मान पदकं मिळाली. त्यात दोन परमवीरचक्र, सहा महावीरचक्र आणि तीन वीरचक्र आहेत. १९८० साली सुमारे ४० वर्षांच्या लष्करी सेवतेतून लेफ्टनंट जनरल आणि सेंट्रल कमांडचे मुख्य सेनानी म्हणून ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते पुण्यात राहिले होते.
@@AUTHORINFO_V1@@