कीटकांचा डॉक्टर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2021   
Total Views |

milind bhakare_1 &nb


रुग्णसेवा करण्याबरोबरच निसर्गाची सेवा करण्याचे व्रत घेऊन कीटकशास्त्रात मोलाची भर घालणार्‍या डॉ. श्रीराम उर्फ मिलिंद दिनकर भाकरे यांच्याविषयी...


पेशाने डोळ्यांचा डॉक्टर असलेल्या या माणसाला व्यासंग मात्र आहे तो कीटकांचा. कीटकांच्या मागावर राहत त्याने रानवाटा पिंजून काढल्या. रुग्णांचे डोळे तपासत असतानाच त्यांनी सामान्य माणसाच्या डोळ्यांवर असलेले कीटकांविषयीच्या अज्ञानाचे झापड दूर केले. फुलपाखरांच्या मागे पश्चिम घाट पिंजून काढला आणि त्याची सहजसोपी माहिती पुस्तकरूपाने उपलब्ध करून दिली. फुलपाखरांविषयीची दुर्मीळ निरीक्षणे नोंदवली. सध्या हा डॉक्टर ‘ओडोनेट’ म्हणजेच चतुर आणि टाचण्यांच्या निरीक्षणामागे दंग आहे. याच कामातून त्याने टाचणीच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. रुग्णसेवा करत असताना निसर्गाच्या सेवेचे व्रत करणारा हा डॉक्टर म्हणजे डॉ. मिलिंद भाकरे.


डॉ. भाकरेंचा जन्म दि. २ सप्टेंबर, १९६८ रोजी सातारा जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील दिनकर भाकरे हेदेखील पेशाने डॉक्टर आणि त्यांनादेखील निसर्ग निरीक्षणाचा छंद होता. त्यांना मत्स्यपालनाची आवड असल्याने घरामध्ये निरनिराळ्या रंगाचे मासे असायचे. त्यांना पाहतच डॉ. भाकरेंचे बालपण गेले. वडिलांचा पेशा आणि छंद या दोन्ही गोष्टी डॉ. भाकरेंनी आत्मसात केल्या. सातार्‍यामध्ये बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून ते ‘एमबीबीएस’च्या शिक्षणासाठी मिरजला गेले. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १९९० साली त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वर्षभर सातार्‍यातील सिव्हिल रुग्णालयात काम केले. ‘आय स्पेशालिस्ट’ म्हणून ‘एमएस’चे शिक्षण घेतले. पुढल्या काळात मदुराईला जाऊन लहान मुलांमधील डोळ्यांच्या आजारावर काम करण्यासाठी ‘फेलोशिप’ मिळवली.

मदुराईवरून परतल्यानंतर डॉ. भाकरेंनी १९९७ साली आपल्या पत्नीच्या मदतीने सातार्‍यामध्ये डोळ्यांवर उपचार करणारा दवाखाना सुरू केला. या संपूर्ण शैक्षणिक आणि कामाच्या प्रवासात त्यांचा निसर्ग छंद हा बाजूलाच राहिला होता. मात्र, २००४ साली या छंदाला चालना मिळण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर हा छंद डॉ. भाकरेंच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला. २००४ साली आपल्या दवाखान्यामध्ये स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी सातार्‍याजवळ एक जमीन विकत घेतली. या जमिनीवर शेती करताना भाकरे पुन्हा एकदा निसर्गात ते रमू लागले. २००६च्या सुमारास सातार्‍यामध्ये इंटरनेट सेवा आली आणि त्याचदरम्यान भाकरेंनी एक कॅमेरा विकत घेतला. सातार्‍याच्या आसपास असलेल्या जंगलांमध्ये फिरून ते कीटकांचे फोटो काढू लागले. इंटरनेटवरील ‘नेचर ग्रुप’मध्ये हे फोटो टाकून त्याविषयी माहिती मिळवू लागले. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून पर्यावरणीय ज्ञान मिळवू पाहणार्‍या समविचारी लोकांशी ओळख झाली.

दरम्यानच्या काळात जंगल पालथे घालून कॅमेर्‍यात टिपलेल्या कीटकांच्या छायाचित्रांचे डॉ. भाकरेंनी प्रदर्शन भरवले. २००८ साली सातार्‍यामध्ये भरलेल्या या तीन दिवसीय प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादामुळे भाकरेंच्या कीटक निरीक्षणाप्रति असलेल्या आवडीला खतपाणी मिळाले. २००८ सालीच ते गोव्यामध्ये भरलेल्या ‘बटरफ्लाय मीट’मध्ये सहभागी झाले. यावेळी त्यांची भेट फुलपाखरू संशोधनामध्ये काम करणार्‍या तज्ज्ञ लोकांशी झाली. त्यांच्याकडून फुलपाखरांच्या प्रजातींचे आणि स्वभावाचे ज्ञान मिळाले. या कार्यक्रमामुळे फुलपाखरांच्या माहितीची देवाणघेवाण करणारा आणि ती संकलित करणारा एक गट तयार झाला. या कार्यक्रमानंतर डॉ. भाकरे फुलपाखरांच्या शोधात गोवा, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रातील पश्चिम घाट फिरू लागले. फुलपाखरांची छायाचित्र टिपून त्यांच्या स्वभाववैशिष्टांची निरीक्षणे नोंदवू लागले.

फुलपाखराच्या जीवनचक्रामध्ये डॉ. भाकरेंना विशेष रस होता. म्हणून फुलपाखरांच्या शोधात गेल्यावर भाकरे त्यांच्या जीवनचक्राचे निरीक्षण करत. फुलपाखरांच्या नादात त्यांनी ईशान्य भारतातील जंगलही भटकून काढले. तिथल्याही फुलपाखरांच्या वैविध्याची नोंद केली. फुलपाखराच्या दोन वेगवेगळ्या प्रजातींमधील मिलन प्रक्रियेची त्यांनी भारतामधून प्रथमच नोंद केली. या काळात फुलपाखरांविषयी वैज्ञानिक भाषेत ज्ञान देणारी पुस्तके बाजारात उपलब्ध होती. मात्र, फुलपाखरे कशी ओळखावी, त्यांच्या नर-मादींमधील फरक आणि एकंदरीत फुलपाखरांविषयी सामान्य ज्ञान देणारे सहजसोप्या भाषेतील पुस्तक बाजारात उपलब्ध नव्हते. म्हणूनच डॉ. भाकरेंनी पश्चिम घाटामध्ये दहा वर्षे फिरून गोळा केलेली फुलपाखरांची निरीक्षणे एकाच पुस्तकात उतरवण्याचा संकल्प सोडला. मोठ्या मेहनतीने आपल्या दवाखान्यातील कामकाज सांभाळून त्यांनी ‘अ गाईड टू बटरफ्लाईस ऑफ वेस्टर्न घाट (इंडिया)’ हे ५०० पानांचे पुस्तक लिहून काढले. त्यासाठी त्यांना फुलपाखरू अभ्यासक हेमंत ओगले यांची सहलेखक म्हणून साथ मिळाली. या पुस्तकामध्ये त्यांनी पश्चिम घाटात सापडणार्‍या फुलपाखरांच्या ३४५ प्रजातींची इत्थंभूत माहिती दिली आहे.

सध्या डॉ. भाकरे सातार्‍यामध्ये आढळणार्‍या चतुर आणि टाचण्यांच्या अभ्यासात गुंतले आहेत. सातार्‍याच्या आसपासच्या वनामध्ये भटकून चतुर आणि टाचण्यांचे निरीक्षण नोंदविण्याचे काम त्यांनी सहकार्‍यांच्या मदतीने सुरू केले आहे. निरीक्षणाच्या या कामामध्ये त्यांना यशही मिळताना दिसते. कारण, या कामादरम्यान त्यांनी चतुराच्या एका प्रजातीचा १०० वर्षांनंतर पुनर्शोध लावला आहे. सोबतच या आठवड्यात त्यांनी आपल्या सहसंशोधकांसोबत सातार्‍यातील चाळकेवाडी आणि कास पठरावरून शोधलेल्या टाचणीच्या दोन नव्या प्रजातींचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. कीटकांचा पाठलाग करणारा हा प्रवास असाच सुरू राहणार असल्याचे डॉ. भाकरे सांगतात. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

@@AUTHORINFO_V1@@