कल्याणचा ‘स्नेकमॅन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2021   
Total Views |

Suhas Pawar_1  
 
 
कल्याण आणि आसपासच्या परिसरातील वन्यजीवांच्या बचावासाठी झटणारा कार्यकर्ता सुहास संजय पवार याच्याविषयी...
 
 
कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या क्षेत्रात वाढत्या शहरीकरणामुळे संकटात सापडलेल्या वन्यजीवांचा हा रक्षणकर्ता. इथल्या मुक्या वन्यजीवांचा बचाव करून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करणारा. बालपणीच प्राण्यांविषयी निर्माण झालेली आवड त्याने जोपासली आणि जाणतेपणी प्राण्यांसाठीच काम करण्याचा विडा उचलला. पोलीस, अग्निशमन दल आणि वन विभागासोबत त्याने आजवर अनेक वन्यजीवांचे प्राण वाचवले आहेत आणि तस्करांच्या तावडीतून त्यांची सुटका केली आहे. सध्या तो ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’मध्ये कार्यरत आहे. असा हा कल्याणकर ‘स्नेकमॅन’ म्हणजे सुहास पवार.
 
 
सुहासचा जन्म दि. १६ एप्रिल, १९८८ रोजी कल्याणमध्ये झाला. त्याचे बालपण चाळीत गेल्यामुळे दारात येणारे मदारी, अस्वलवाले आणि गारुडींची त्याला भुरळ पडली. मदार्‍यांकडील माकडाशी हस्तांदोलन करून किंवा अस्वलाला हात लावून लहानग्या सुहासची प्राण्यांविषयीची आवड बहरत गेली. ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात,’ या म्हणीप्रमाणेच सुहासचे पुढील आयुष्य घडत गेले. प्राण्यांच्या आवडीपोटी कुठे पाल किंवा सरडे पकडून आणण्याचे उद्योग त्याने सुरू केले. या सर्व उद्योगांमुळे सापांविषयी माहिती घेण्याची उत्सुकता वाढत गेली. मात्र, त्याच्या मनात सापाविषयीची भीतीदेखील होती. ही भीती घालवण्यासाठी कल्याणमधील ज्येष्ठ सर्पमित्र दत्ता बोंबे आणि योगेश कांबळे यांची त्याला मदत मिळाली. सुहास आठवीत असताना त्याने बोंबे यांनी पकडलेल्या धामण सापाला स्पर्श केला आणि त्याची सापांविषयी असलेली भीती एकाएकी पळून गेली.
 
 
सुहासने शालेय शिक्षणादरम्यानच साप पकडण्याचे प्राथमिक तंत्र अवगत करून घेतले. दहावीत असताना साप पकडण्याच्या उत्सुकतेपोटी विषारी नागाला पकडले. या नागाला डोक्याच्या बाजूने पकडल्यामुळे सुहासला दंश होण्याची शक्यता होती. त्याने पकडलेला नाग अग्निशमन दलाकडे सोपवला. मात्र, अग्निशमन अधिकार्‍यांनी त्याचीच उलट कानउघडणी केली. तंत्र आणि अनुभव असल्याशिवाय विषारी साप पकडून नये, हा धडा त्यावेळी अधिकार्‍यांकडून त्याला मिळाला. या प्रसंगानंतर सुहासचा सर्पमित्र म्हणून प्रवास सुरू झाला. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे महाविद्यालयीन शिक्षण तो काम करूनच पूर्ण करत होता. नीलमकुमार खैरे यांच्या पुस्तकांनी सुहासला सापांच्या ‘टॅक्सनॉमी’विषयीचे जुजबी ज्ञान दिले.
 
सुहासला ‘टॅक्सनॉमी’बद्दल मिळालेल्या या जुजबी ज्ञानाची ओढ पुढे त्याला ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’पर्यंत घेऊन गेली. या संस्थेने त्याने ‘हर्पेटोलॉजी’ विषयातील सहा महिन्यांचा कोर्स पूर्ण केला. दरम्यानच्या काळात अग्निशमन आणि पोलिसांसोबत सुरू असलेल्या वन्यजीव बचावाच्या कार्यामुळे तो वनविभागाशी जोडला गेला. या तिन्ही विभागांसोबत त्याने वन्यजीव बचाव आणि वन्यजीव तस्करीच्या घटनांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. २००७ साली त्याने पहिल्यांदा पोलिसांच्या मदतीने वन्यजीवांसंबंधित सुरू असलेला गैरव्यवहार उघडकीस आणला. कल्याणमधील काळा तलाव परिसरात एका व्यक्तीने घरात पाळलेल्या मुंगुसाची सुटका त्याने केली आणि तेव्हापासून सर्पमित्राबरोबरच वन्यजीव बचावाच्या कामाला सुरुवात झाली. माकड, उदमांजर, रानमांजर, रानडुक्कर, सांबर, भेकर, मोर, लांडोर अशा वन्यजीवांच्या बचावाची कामे त्याने केली.
 
 
वन्यजीव बचावाचे हे काम सुरू असतानाच सुहास ठाण्यातील ‘पर्यावरण दक्षता मंडळा’च्या कामाशी जोडला गेला. मंडळासोबत प्रकल्प व्यवस्थापक म्हणून त्याने टिटवाळ्यातील रुंदे गावात देवराई प्रकल्प उभारण्यासाठी काम केले. १९ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या जागेवर सुमारे नऊ हजारांहून अधिक झाडे लावण्यासाठी त्याने अपार मेहनत घेतली. त्यासाठी स्थानिक वनवासी बांधवांची मदत घेऊन त्यानिमित्ताने त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. या भागातील वन्यजीवांना अभय देण्याचे काम केले. या प्रकल्पादरम्यान त्याची वनवासी बांधवांशी जवळीक निर्माण झाली. याचा फायदा त्याला पुढे वन्यजीव बचाव आणि तस्करीच्या कामादरम्यान झाला. देवराई प्रकल्पादरम्यानच सुहासला कल्याणमध्ये कित्येक वर्षांपासून असंघटित स्वरूपात सुरू असलेल्या वन्यजीव बचावासंबंधीच्या कामाची जाणीव झाली. या कामाला संघटित स्वरूप देण्यासाठी त्याने ‘वाईल्ड अ‍ॅनिमल अ‍ॅण्ड रेप्टाईल रेस्क्यू फाऊंडेशन’
 
 
 
या संस्थेची स्थापना केली आणि कामाची पुढील वाटचाल संस्थेच्या माध्यमातून सुरू झाली. २०१८ साली त्याने रायगडमधून मुरबाड तालुक्यात होणार्‍या वाघ आणि बिबट्याच्या कातडीची मोठी तस्करी उघडकीस आणली. ‘केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागा’च्या मदतीने कल्याण रेल्वे स्थानकामध्ये बाहेरील राज्यामधून होणारी कासवांची तस्करी उघड केली. सर्पबचावाच्या कामादरम्यान त्याला कल्याणमधून दोन वेळा दुतोंडी घोणस साप मिळाला. सर्पविज्ञानाच्या दृष्टीने या महत्त्वाच्या नोंदी होत्या. सुहासने सर्पबचावाच्या कामादरम्यान सुमारे सात हजारांहून अधिक सापांना जीवदान दिले आहे. या कामादरम्यान त्याला एकदाही सर्पदंश झालेला नाही. वन्यजीव तस्करीच्या ३२ प्रकरणांची त्याने वनविभाग, पोलीस आणि ‘डब्ल्यूसीसीबी’च्या मदतीने उकल केली आहे. विद्यार्थ्यांसाठी ५००हून अधिक जनजागृतीपर व्याख्याने दिली आहेत. पोलीस विभागात ‘पोलीसमित्र’ आणि अग्निशमन विभागात ‘जीवरक्षक’ म्हणूनही तो कार्यरत आहेत. याच कामादरम्यान त्याने २०१९च्या पूरपरिस्थितीमध्ये २२ नागरिकांना जीवदान दिले आहे. सध्या तो ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’मध्ये राष्ट्रीय विष संशोधक प्रकल्पांतर्गत ‘सर्पपाल’ म्हणून कार्यरत आहे. सुहासला पुढील वाटचालीकरिता दै. मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@