यंदा कोकण किनारपट्टीवर समुद्री कासवांच्या घरट्यांमध्ये दुप्पटीने वाढ; ही आहेत कारणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2021   
Total Views |
sea turtle_1  H



मुंबई (अक्षय मांडवकर) -
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोकण किनारपट्टीवर सापडलेल्या समुद्री कासवांची घरट्यांमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. वन विभागाच्या आकडेवारीनुसार यंदा एकूण 451 घरटी कासवमित्रांनी संवर्धित केली आहेत. सध्या या घरट्यांमधून बाहेर पडलेल्या पिल्लांना समुद्रात सोडण्याचे काम सुरू असून कोकण किनारपट्टीवर गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या ’सागरी कासव संवर्धन’ मोहिमेमुळे घरट्यांची संख्या वाढल्याची शक्यता आहे.
 
 
 
राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनार्‍यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील ’ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. यामध्ये रायगड जिल्ह्यातील चार, रत्नागिरीमधील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी 13 किनार्‍यांच्या समावेश आहे. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. या कालावधीत वन विभागाने किनार्‍यांवर नमलेल्या कासवमित्रांकडून सागरी कासव संवर्धनाचे काम केले जाते. संवर्धनाच्या या कामाअंतर्गत यंदा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मिळून कासवांच्या एकूण 451 घरट्यांची नोंद करण्यात आली आहे. ही नोंद गेल्यावर्षी नोंदवलेल्या घरट्यांपेक्षा दुप्पट आहे. 2019-20 या वर्षात एकूण 239 घरटी आढळून आली होती आणि त्यामधून बाहेर पडलेल्या 11 हजारांहून अधिक पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले होते. समुद्री कासवांनी अंडी टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्याला ’घरटे’ म्हटले जाते.
 
 
 



यंदा रायगड जिल्ह्यातील दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि मारळ किनार्‍यावर कासवाची एकूण 28 घरटी आढळली. रत्नागिरीतील वेळास, केळशी, आंजर्ले, कर्दे, मुरुड, दाभोळ, कोळथरे, लाडघर, वेळास, गुहागर, तवसाळ, गावखडी, माडबन, वडाव्येत्ये या किनार्‍यांवर एकूण 277 घरटी संवर्धित करण्यात आली आहेत. सिंधुदुर्गमध्ये ही संख्या 146 आहे. मात्र, सिंधुदुर्गातील कासवमित्रांकडून चुकीच्या पद्धतीने एका घरट्याची विभागणी दोन घरट्यांमध्ये केली जात असल्याने या संख्येत तफावत असल्याची शक्यता एका सागरी अभ्यासकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली. गेल्या तीन वर्षांपासून कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येणार्‍या कासवांच्या घरट्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. मात्र, हवामान बदलामुळे विणीच्या मुख्य हंगामात बदल झाल्याचेही निदर्शनास आले आहे. पूर्वी नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यात मोठ्या संख्येने कासवांची घरटी आढळून येत होती. परंतु, आता फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये ही घरटी आढळत असल्याची नोंद कासवमित्रांसह सागरी संशोधकांनी केली आहे.
 
 
वाढीमागील कारण काय ?
 
 
कासवांच्या घरट्यांमध्ये झालेल्या वाढीला अनेक घटक कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. ‘लॉकडाऊन’ आणि समुद्रात आलेल्या चक्रीवादळांमुळे गेल्या दीड वर्षामध्ये मच्छीमारांकडून मोठ्या प्रमाणात मासेमारी झाली नाही. परिणामी, यंदा मासेमारीच्या जाळ्यात कासव अडकल्याच्या आणि किंवा किनार्‍यांवर मृतावस्थेत वाहून आलेल्या कासवांच्या संख्येत घट दिसली. त्यामुळे विणीसाठी आलेल्या कासवांच्या संख्येत वाढ झाल्याची शक्यता कासवमित्र मोहन उपाध्ये यांनी व्यक्त केली. याशिवाय राज्याच्या किनारपट्टीवर गेल्या दोन दशकांपासून सागरी कासव संवर्धनाचे काम सुरू आहे. याचे फलित म्हणजे काही वर्षांपूर्वी सोडलेली कासवाची पिल्ले आता प्रौढ होऊन अंडी घालण्यासाठी पुन्हा आपल्या किनार्‍यांवर येत असावी. त्यामुळे घरट्यांच्या संख्येत वाढ होत असल्याची शक्यता ’मँग्रोव्ह फाऊंडेशन’चे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे यांनी व्यक्त केली. तसेच कासवांची घरटी शोधण्यासाठी कासवमित्रांकडून किनार्‍यावर वाढलेले पेट्रोलिंगही यामागील कारण असू शकते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@