माणसाच्या आकाराएवढ्या 'लेदरबॅक' कासवाचे पालघरच्या समुद्रात दुर्मीळ दर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2021   
Total Views |
leatherback _1  



मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात 'लेदरबॅक' या जगातील सर्वात मोठ्या सागरी कासवाचा वावर आढळून आला आहे. राज्याच्या समुद्री कक्षेत या कासवाचे दुसऱ्यांदा दर्शन झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी पालघरमधील मच्छामाऱ्याच्या जाळ्यात हे कासव अडकले होते. त्यावेळी मच्छीमाराने प्रसंगावधान राखून जाळे कापून या कासवाची सुखरुप समुद्रात सुटका केली आणि या घटनेचे छायाचित्रण 'कांदळवन संरक्षण विभागा'कडे (मॅंग्रोव्ह सेल) पाठवले. महत्वाचे म्हणजे 'लेदरबॅक' कासवाचा हा महाराष्ट्रातील दुसरा छायाचित्रीत पुरावा असून यापूर्वी २०१९ मध्ये रायगडच्या भारदखोलनजीक समुद्रात या कासवाचे दर्शन घडले होते.
 
 
 
 
राज्याच्या सागरी परिसंस्थेमध्ये प्रामुख्याने चार समुद्री कासवे आढळतात. यामध्ये 'आॅलिव्ह रिडले', 'ग्रीन सी', 'हाॅक्सबिल' आणि 'लाॅगरहेड' या कासवांचा समावेश होतो. यामधील 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या दरवर्षी मोठ्या संख्येने कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येतात, तर इतर तीन प्रजातींच्या कासवांचा केवळ वावर आढळतो. मात्र, आता 'लेदरबॅक' प्रजातीच्या कासवाचे दर्शनही राज्याच्या समुद्रामध्ये झाले आहे. सागरी संशोधनाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्वाची आहे. कारण, भारतात केवळ अंदमान-निकोबार बेटावर 'लेदरबॅक' प्रजातीची कासवे विणीसाठी येतात. महाराष्ट्रात १९८५ साली मालवणमधील देवबागच्या किनाऱ्यावर साडेचार फूटाचे 'लेदरबॅक' कासव आढळले होते. तशी नोंद 'केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे'कडे (सीएमएफआरआय) आहे. परंतु, त्याचे कोणत्याही प्रकारचे छायाचित्र उपलब्ध नाही. जून, २०१९ मध्ये भारदखोल समुद्रकिनाऱ्यानजीक आढळेल्या 'लेदरबॅक' कासवाचे छायाचित्रण मिळाले होते. त्यानंतर आता पालघरनजीक समुद्रामध्ये या कासवाचा वावर आढळून आला आहे.
 
 
 

सातपाटीमधील सर्वोद्य सोसायटीतील मच्छीमार प्रकाश तांडेल यांच्या जाळ्यात 'लेदरबॅक' कासव अडकले होते. १२ मार्च रोजी पालघरच्या किनाऱ्यापासून ५० ते ६० मीटर अंतरावर मासेमारी करताना तांडेल यांच्या जाळ्यात हे कासव अडकल्याची माहिती 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'च्या सागरी जीवशास्त्रज्ञ धनश्री बगाडे यांनी दिली. त्यावेळी बोटीवरील मच्छीमारांनी त्याची जाळ्यातून सुटका करुन पु्न्हा समुद्रात सोडून दिले. महत्वाची बाब म्हणजे त्यांनी या सर्व घटनेचे छायाचित्रण केल्याने राज्याच्या किनारपट्टीवर 'लेदरबॅक' कासवाच्या अस्तित्वाचा अजून एक पुरावा मिळाल्याचे बगाडे यांनी नमूद केले. 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'ने पालघर येथील मच्छीमार संघटनांमध्ये संरक्षित सागरी प्रजातींबाबत जनजागृती अभियान राबविल होते. या अभियानाच्या माध्यमातून झालेल्या जनजागृतीमुळे 'लेदरबॅक' कासवाचे हे छायाचित्रण समोर आले आहे. भारतीय 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत 'लेदरबॅक' कासव प्रथम श्रेणीत संरक्षित आहे. 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'कडून राज्यातील किनारपट्टीलगतच्या गावांमध्ये संरक्षित सागरी प्रजातींबाबत जनजागृती अभियान राबविले जाते. शिवाय राज्याच्या प्रत्येक किनाऱ्यावर वाहून येणाऱ्या सागरी जीवांची माहिती देण्याबाबतही स्थानिकांमध्ये प्रबोधन करण्यात येते.
 
 
 
लेदरबॅक कासवाची वैशिष्ट्ये
 
* जगात आढळणाऱ्या सात सागरी कासवांच्या प्रजातींपैकी 'लेदरबॅक' सर्वात मोठे कासव.
* साधारण ६ फुटांपर्यंत वाढते. वजन ५०० किलो असते.
* या कासवाचे कवच कातडीचे असल्याने त्यास 'लेदरबॅक' असे म्हणतात.
* त्यांच्या काळ्या त्वचेवर पांढऱ्या रेषा असून पुढील दोन पर मोठे असतात.
* मे ते आॅगस्ट या विणीच्या हंगामात चार ते सहा वेळा अंडी घालतात.
* हिंद महासागरातील बर्ड हेड पेनिनसुला, पश्चिम पापुआ, ग्रेट निकोबार आयलॅण्ड याठिकाणी सर्वाधिक घरटी
* तर अंदमान, श्रीलंका, नाटाळ आणि दक्षिण आफ्रिकेत तुरळक घरटी
* जेलीफिश आणि समुद्री फुलपाखरू (Cymbuliidae) हे प्रमुख खाद्य
@@AUTHORINFO_V1@@