'प्रमोद महाजन कला उद्याना'तील प्रकल्पाला स्थानिकांचा कडाडून विरोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2021   
Total Views |
Pramod Mahajan  _1 &


मुंबई (ओम देशमुख) : मुंबईच्या मध्यवर्ती भागात दादर येथील तब्बल ४२ हजार चौरस मीटर जागेवर उभ्या असलेल्या ‘प्रमोद महाजन कला उद्यान‘ येथील भूमिगत टाक्यांच्या प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध करायला सुरुवात केली आहे. “आम्हाला या प्रकल्पाची गरज नाही, महापालिकेने हा प्रकल्प दुसरीकडे स्थलांतरित करावा,” अशी आक्रमक भूमिका आता स्थानिक घेत आहेत.
 
‘प्रमोद महाजन कला उद्यान‘ येथे होऊ घातलेल्या भूमिगत टाक्यांच्या प्रकल्पावरून आता ‘स्थानिक विरुद्ध पालिका प्रशासन’ असा संघर्ष पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पालिका मनमर्जी कारभार करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दै.‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली.
 
या कामाबाबतची कुजबुज कानी लागताच नागरिक या प्रकल्पाच्या विरोधात उतरले. स्थानिकांचा रोष पाहून गेले १५ दिवस हे काम बंद होते. पण, पुन्हा दि. २६ मार्चपासून रेल्वे रुळाशेजारील उद्यानाच्या मागील भागात खोदकामाला सुरुवात झाली आहे. खोदकाम, भराव टाकणे आणि ‘पाईपलाईन’ टाकणे, या दोन कामांसाठी दोन स्वतंत्र कंपन्यांना कंत्राट दिल्याची माहिती तिथे काम करणार्‍या स्थानिक कामगारांनी दिली.
 
अनेक ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना खेळण्यासाठी दादर आणि माहिम परिसरातील ही एकमेव जागा आहे. काही निवांत क्षण घालवण्यासाठी व मुलांना खेळण्यासाठी ही जागा सर्वोत्तम आहे. उद्यानाची कसलीही नासधूस होऊ नये, अशी आमची विनंती आहे. गार्डनची मागील बाजू उद्ध्वस्त करून त्या जागेवर भूमिगत टाक्या बसवून गार्डनचे विद्रूपीकरण करण्याचा हा प्रकार बंद व्हावा, अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी मांडली आहे.
 
सदरील कामासाठी रेल्वेमार्गाखालून जलवाहिन्या टाकण्यात येणार असून, या कामासाठी रेल्वेविभागाची परवानगी आहे का? पर्जन्यजल विभाग कार्यशाळा उपलब्ध असतानाही उद्यानाची जागा का वापरली जात आहे? प्रशासन विकासाच्या गोंडस नावाखाली या उद्यानाचे केवळ विद्रूपीकरण करण्याचा प्रयत्न का करत आहे? हा खरा सवाल आहे.
 
स्थानिक लोकप्रतिनिधी अनभिज्ञ : आ. कोळंबकर
 
“ ‘प्रमोद महाजन कला उद्यान’ येथे होणार्‍या कुठल्याही कामाविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला कुणीही विश्वासात घेतलेले नाही. अगोदरच ११० कोटींचा एक प्रकल्प त्या भागात अस्तित्वात असताना या नव्या प्रकल्पाची काय आवश्यकता आहे? ११० कोटींचा जुना प्रकल्प फुकट गेला का? संपूर्ण मैदानच बंद करण्याचा हा डाव आहे का? हा प्रकल्प कामगार मैदान किंवा इतर मैदानावर का केला जात नाही?” असे अनेक सवाल भाजपचे स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी उपस्थित केले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@