लसीकरणासंदर्भात ४५ वयोगटातील व्यक्तींसाठी केली 'ही' मागणी
मुंबई: गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊले उचलण्यात येतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच त्यांनी लसीकरणाचा वेग वाढवता येईल अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी, तसेच हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळावी अशी विनंती केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची सूचना लगेचच उचलून धरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ व प्रोत्साहन देण्यात येईल असे जाहीर केले.
आज दि. १७ मार्च २०२१ रोजी दुपारी देशातील काही राज्यातील वाढत्या कोविड संसर्गाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन केले होते. लसीकरणासाठी महाराष्ट्रात देखील अनेक खासगी रुग्णालयांनी नोंदणी केली आहे. पण त्यापैकी किती जणांची प्रत्यक्ष तयारी आहे, हे तपासून लसीकरण वाढवण्यात येईल व दररोज ३ लाखांपर्यंत लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे कोविड लसीचे हाफकिनकडून उत्पादन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती केली. हाफकिन बायो फार्मासिटीकल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना मिशन कोवीड सुरक्षेअंतर्गत लसीची टेक्नॉलॉजी हस्तांतरण करण्या साठी आयसीएमआरच्या मार्गदर्शनाने परवानगी मिळावी, अशी विनंतीदेखील केली. यावर पंतप्रधानांनी देशात सर्वच राज्यांत अशा प्रकारे लस उत्पादनात पुढाकार घेणाऱ्या उद्योग व संस्थांना प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांची क्षमता २४ X ७ पूर्णपणे कशी वापरता येईल, ते पाहण्याचे बैठकीत जाहीर केले.
४५ वयोगटापासून सर्वांना लस देण्याची विनंती
लसीचे दोन डोस घेतल्यावरही विशिष्ट कालावधी उलटून गेल्यावर कोरोना झाल्याच्या काही घटना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच राज्यात पुढील काळात आम्ही मोठ्या प्रमाणावर लसीकरण आणि त्या जोडीनेच मास्क वापरत राहणे, सुरक्षित अंतर ठेवणे या आरोग्याच्या नियमांवर जास्तीत जास्त भर देणार आहोत असेही म्हणाले. मुख्य म्हणजे बाधितांमध्ये तरुण गट पण आहे; हे लक्षात घेऊन ४५ वर्षे वयोगटापासून पुढे सहव्याधी असो किंवा नसो, सर्वांना लसीकरण करावे अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.