‘आत्मनिर्भर भारता’चा पाईक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2021   
Total Views |

kamlesh shah_1  


भारतीय संस्कृतीत ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे म्हटले जाते. कोरोनामुळे उद्भवलेल्या ‘लॉकडाऊन’च्या गंभीर परिस्थितीतही समाजाप्रतीची आपली जबाबदारी वेळीच ओळखून अनेकांनी आपली चूल पेटती ठेवून अन्नदानाचे सत्कार्य केले आणि उद्योजक कमलेश शहांनीदेखील आपल्या केटरिंगच्या व्यवसायाला नवी दिशा देऊन ‘लॉकडाऊन’ काळात ‘आत्मनिर्भर भारता’चा संकल्प घेतला. समाजातील गरजूंबरोबरच आपल्या कर्मचार्‍यांचीही दोन वेळच्या जेवणाची त्यांनी आवर्जून सोय केली. तेव्हा, ‘कोविड’ काळातील त्यांच्या व्यावसायिक प्रवासाचा घेतलेला हा आढावा.



‘लॉकडाऊन’च्या कार्यकाळात अनेक नियोजित लग्न समारंभ रद्द झाले. त्यामुळे या समारंभांवर अवलंबून असलेल्या उद्योगांचा पुरता बोजवारा उडाला. त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला तो केटरिंग उद्योगांनाही आणि त्यावर अवलंबून असलेल्या मजुरांना. अशा कठीण परिस्थितीत कामगारांचा विचार करून भारतभर व्यवसायाचा पसारा असलेल्या ‘कमलेश केटरिंग सर्व्हिसेस अ‍ॅण्ड कन्सल्टन्सी’चे कमलेश शहा यांनी आपल्या उद्योगाची दिशा बदलली. कोविड काळात छोट्या-मोठ्या ‘केटरिंग’च्या ऑर्डर्स स्वीकारून त्यांनी आपला व्यवसाय चालू ठेवला. परंतु, त्याच निखार्‍यांवर ‘आत्मनिर्भर भारत योजने’अंतर्गत आपल्या मुलांना नवीन व्यवसायही सुरू करुन दिला. मुंबईत जन्मलेल्या कमलेश शहांनी 32 वर्षांपूर्वी ‘कमलेश केटरिंग सर्व्हिसेस अ‍ॅण्ड कन्सल्टन्सी’ची स्थापना केली. हळूहळू त्यांनी आपला उद्योग भारतभर विस्तारला. आज ही कंपनी लग्न समारंभांमध्ये उत्कृष्ट शाकाहारी जेवणाच्या सुविधेसाठी खासकरुन ओळखली जाते. देशात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेल्या ‘लॉकडाऊन’ची झळ शहा यांच्या ‘केटरिंग’ व्यवसायालाही बसली. त्या काळात लग्नसमारंभ होणे शक्य नसल्याने त्यांच्याकडील ‘केटरिंग’च्या ऑर्डरही रद्द झाल्या. वाढत्या ‘लॉकडाऊन’मुळे कोणत्याही विशेष समारंभ आयोजनाची शाश्वती नव्हती. अशा परिस्थितीत आपल्याकडील हंगामी मजुरांची परवड होण्याची चिंता शहांना सतावत होती.


kaml;esh_1  H x



सरून गेलेल्या भूतकाळातील गोष्टींचा विचार करू नका. माहिती नसलेल्या भविष्याचा विचार करू नका. कारण, तेव्हा काय घडणार आहे, याचा केवळ कयास तुम्ही बांधू शकता. त्यामुळे बहुमूल्य वर्तमानात तुम्हाला कोणत्या गोष्टी करता येतील, याचा विचार करणे आवश्यक आहे.


एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एका सामाजिक संस्थेकडून शहा यांना खाद्य पाकिटे तयार करण्यासाठी विचारणा झाली. दालखिचडी आणि पुरी भाजीची दीड हजार पाकिटे बनवून देण्याची ती ऑर्डर होती. अशावेळी त्यांचा मजूर वर्ग मात्र, आजूबाजूच्या परिस्थितीमुळे घाबरला होता. शहांनी त्यांना हिंमत देत सामाजिक अंतराचे पालन करून काम करण्यास सांगितले. मजुरांनीदेखील मोठ्या धीराने कामाला सुरुवात केली. दहा दिवस खाद्य पाकिटांचा पुरवठा केल्यानंतर शहांना अजून एका संस्थेकडून खाद्यपाकिटांसंबंधी विचारणा झाली. पुन्हा एकदा मजुरांचा होकार मिळाल्यानंतर त्यांनी या कामाला सुरुवात केली. यातून जवळपास महिनाभर पाच हजार खाद्यपाकिटे तयार करून ती वाटण्यात आली. हे खाद्य तयार करण्यासाठी शहांना ’हिंगवाला उपासक ट्रस्ट’ने जागा उपलब्ध करून दिली. शीवमधील ’जियो रोटी’ संस्थेकडून शहांना एक लाख पोळ्या आणि थेपले तयार करून देण्यासंदर्भात विचारणा झाली. ‘लॉकडाऊन’मध्ये एवढी मोठी ऑर्डर स्वीकारावी कशी, असा प्रश्न प्रथमदर्शनी शहांना पडला. मात्र, या माध्यमातून अनेक लोकांच्या हाताला काम मिळाले, या हेतूने त्यांनी ही ऑर्डर स्वीकारून पूर्ण करून दिली. यानंतर ऑर्डर येणे बंद झाले. त्यामुळे काय करावे, या प्रश्न पडला असतानाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’आत्मनिर्भर भारता’चा संकल्प सोडला. या संकल्पावर आधारित काम करून रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने शहांनी आपले भाऊ कीर्ती शहा आणि मुलांशी चर्चा केली. या चर्चेअंती ’कमलेश फूड’ या नावाने नवा व्यवसाय सुरू करण्याचे निश्चित झाले. कमलेश शहा यांचा मुलगा कुणाल आणि अक्षय शहा यांनी या व्यवसायाची धुरा सांभाळली. या माध्यमातून नाश्त्याचे पदार्थ तयार करून विकले जातात. त्यामुळे मजुरांनाही काम मिळाले आणि व्यवसाय ठप्प पडला नाही.



kaml;esh_1  H x

जगाचा निरोप घेताना आपली झोळी ही रिकामीच असते, या भावनेतून शहा हे समाजकार्यात उतरले. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांनी स्नेहसंबंध जोडले आहेत. ‘लॉकडाऊन’च्या काळातही त्यांना अशाच प्रकारे समाजाचे ऋण फेडण्याची संधी मिळाली. शहा हे ’ओंकार अंध केव्हीके सोसायटी’चे ट्रस्टी आहेत. ही संस्था दरवर्षी दृष्टिबाधित आणि गरजू विधवा महिलांना अन्नधान्य वाटपाचे काम करते. मात्र, यंदा ‘लॉकडाऊन’मुळे त्यांना हे काम करणे जमले नाही. त्यामुळे त्यांना घरपोच अन्नधान्य पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता शहा यांनी पुढाकार घेऊन आपल्या कर्मचार्‍यांच्या मदतीने दोन हजार खाद्यपाकिटांचे वाटप घरपोच केले. ‘केटरिंग कॉलज’मध्ये शिकणार्‍या मुलांना प्रशिक्षण देण्याचे कामही ‘कमलेश केटरिंग सर्व्हिसेस अ‍ॅण्ड कन्सल्टन्सी’मध्ये करण्यात येते. शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या नवख्या मुलांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून शहांनी हे पाऊल उचलले आहे. या माध्यमातून मुलांना काम करण्याची संधी दिली जाते. शहा हे मुलांना व्यक्तिमत्त्व, वक्तशीरपणा आणि प्रामाणिकपणाचे धडे देतात. ‘केटरिंग’ व्यवसायामध्ये वक्तशीरपणा महत्त्वाचा असल्याचे शहा मुलांना सांगतात. शिवाय आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करून प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्लाही ते देतात. शहांच्या हाताखाली तयार झालेल्या अनेक मुलांनी आज स्वत:चे व्यवसाय सुरू केले आहेत. प्रत्येक उद्योजकाचा वाईट काळ कधीना कधी तरी येतोच. शहांच्या आजवरच्या उद्योगप्रवासातही अशाच प्रकारचा वाईट काळ आला होता. त्यावेळी त्यांनी चार नियम आखून घेतले. कामाशिवाय कुठे जायचे नाही, मागितल्याशिवाय कोणाला ते मदत देत नाहीत, कोणी विचारल्याशिवाय बोलायचे नाही आणि अतिविचार करायचा नाही. अतिविचार करून आपल्या जगण्यावर ताण आणत असल्याचे ते सांगतात. त्याऐवजी आहे त्या परिस्थितीचा सामना करा, नाहीतर पुढे निघून जा, असा संदेश शहा देतात.
@@AUTHORINFO_V1@@