कन्स्ट्रक्ट महाराष्ट्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2021   
Total Views |

Maha_1  H x W:
 
 
‘कन्स्ट्रक्ट महाराष्ट्र’ या कार्यक्रमात एक दिवसाची ‘व्हर्च्युअल कॉन्फरन्स’ घेतली जाणार आहे. यामध्ये जगभरातील बांधकाम, उत्पादन, बँकिंग, वित्तीय सेवा इत्यादी उद्योगातील आघाडीचे विचारवंत व धोरणकर्ते सहभागी होतील आणि त्यांचे विचार तसेच कौशल्य सर्वांपुढे मांडतील.
 
औद्योगिक क्षेत्रात कित्येक वर्ष महाराष्ट्र आघाडीवर होता. पण, आता उत्तर प्रदेश, गुजरात व अन्य काही राज्यांनी महाराष्ट्रापुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राने सर्वंकष औद्योगिक प्रगती साधण्याच्या आपल्या प्रयत्नात बांधकाम उद्योगाला जास्त महत्त्व देण्याचे ठरविले आहे व हे एकाअर्थी बरोबर आहे. कारण, बांधकाम उद्योग हा फार मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करू शकतो. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रालाही चालना मिळेल व लोकांनाही रोजगार मिळेल. केंद्र सरकारचेही बांधकाम उद्योगाला प्रोत्साहन आहे. कारण, पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे, केंद्र सरकारला २०२२ पर्यंत सर्वांना परवडणाऱ्या दरात घरे द्यावयाची आहेत. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांनी त्यांच्या नावावर घर खरेदी केले, तर त्यावर एक टक्का स्टॅम्प ड्युटी सवलत जाहीर केली आहे. बांधकाम उद्योजकांना ‘प्रीमियम’मध्ये ५० टक्के सवलत दिली आहे. याबाबत राज्यातील विरोधी पक्ष समाधानी नसून त्यांचा याला विरोध आहे. बांधकाम उद्योगासाठी ‘कन्स्ट्रक्ट महाराष्ट्र २०२१’ चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि उर्वरित भारतात जागतिक दर्जाच्या, महाकाय स्वरूपाच्या पायाभूत सुविधा आणि बांधकाम प्रकल्पांची सुरुवात करणारा ‘कन्स्ट्रक्ट महाराष्ट्र २०२१’ हे बांधकाम व तंत्रज्ञानावरील प्रदर्शन तसेच परिषद १८ ते २० मार्च, २०२१ या कालावधीत मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील ‘बॉम्बे एक्झिबिशन सेंटर’मध्ये आयोजित करण्यात आली आहे.
 
 
महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या समारंभाचे सहआयोजन केले आहे. ‘कन्स्ट्रक्ट महाराष्ट्र २०२१’ शुभारंभाचे पर्व स्वयंवित्तपुरवठा प्रकल्पांमार्फत मोठ्या गुंतवणुकांसाठी उत्प्रेरक ठरेल आणि भारतात जागतिक दर्जाच्या बांधकाम व पायाभूत सुविधा ‘ऑफरिंग्ज’सह या उद्योगाला एका नवीन उंचीवर घेऊन जाईल. या प्रदर्शन व परिषदेत २४० अब्ज डॉलर्स मूल्याच्या (सुमारे १७.६ लाख कोटी रुपये) विशाल पायाभूत प्रकल्पांचे दर्शन घडविले जाईल. या प्रकल्पांमधून २०२४-२०२७ या काळात महाराष्ट्रभर आणि भारतात २६ दशलक्षांहून अधिक नवीन रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पांमध्ये सहभाग घेणाऱ्या सहयोगी राष्ट्रांमध्ये आणखी ६० हजार नवीन रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे. नावीन्यपूर्ण पद्धतीने वित्तपुरवठा केले जाणारे, तसेच अमलात आणले जाणारे हे शाश्वत पायाभूत सुविधा प्रकल्प ग्रामीण व शहरी भागांवर समान भर देतील. या परिवर्तन घडविणाऱ्या प्रकल्पांपैकी काही म्हणजे मुंबई पूर नियंत्रण व मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, महाराष्ट्र बहुमार्गीय रिंग कॉरिडोर, बुलेट ट्रेन प्लस सुपर हायवे, मुंबईतील कचरा ६० वर्षांपर्यंत साठवून ठेवता येईल, असे वेस्ट आयलंड, मुंबईतील घनकचरा संकलित करण्याचा प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया इत्यादी. यातील काही प्रकल्प स्वत:चा निधी स्वत: उभारणार आहेत. यामुळे त्यांची व्यवहार्यता खूप वाढली आहे.
 
 
‘कन्स्ट्रक्ट महाराष्ट्र’ प्रदर्शन आणि परिषद हा महाराष्ट्र व मुंबईतील वेगवान संरचना गुंतवणुकीवर प्रकाश टाकणारा अशा प्रकारचा पहिलाच मोठा कार्यक्रम आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आता कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न पूर्वी झालेला नाही. हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण कालखंडात आयोजित केला जात आहे. भारत ‘कोविड-१९’ साथीच्या विळख्यातून यशस्वीरीत्या बाहेर येत असल्यामुळे अर्थव्यवस्था एका महत्त्वाच्या वळणावर पोहोचलेली असताना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसांच्या कार्यक्रमांत व्यापारातील ग्राहक, सरकारी अधिकारी, गुंतवणूकदार, विकासक, आर्किटेक्ट्स, डिझायनर्स, नियोजनकर्ते, बिल्डर्स, इंजिनिअर्स, कॉन्ट्रॅक्टर्स आदी आघाडीच्या बांधकाम, संरचना व तंत्रज्ञान ब्रॅण्ड्सबाबत जाणून घेण्यासाठी सहभागी होणार आहेत. ‘कन्स्ट्रक्ट महाराष्ट्र’ या कार्यक्रमात एक दिवसाची ‘व्हर्च्युअल कॉन्फरन्स’ घेतली जाणार आहे. यामध्ये जगभरातील बांधकाम, उत्पादन, बँकिंग, वित्तीय सेवा इत्यादी उद्योगातील आघाडीचे विचारवंत व धोरणकर्ते सहभागी होतील आणि त्यांचे विचार तसेच कौशल्य सर्वांपुढे मांडतील. या समारंभात दोन दिवस अत्यंत प्रभावी अशा ‘बी टू बी’ (बिझनेस टू बिझनेस) बैठका होतील. हा ट्रेड शो, ‘नेस्को एक्झिबिशन्स’ने आयोजित केला आहे, तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने याचे सहआयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी www. constructmaharashtrev.in या वेबसाईटला आपण भेट देऊ शकता.
 
 
बांधकाम उद्योग सध्या अस्थिर
 
सध्या बांधकाम व्यावसायिक सळी, सिमेंट आणि मजुरी, वीट, वाळूपासून ते किरकोळ साहित्याच्या दरांतील चढ-उतारामुळे अस्थिरतेच्या चक्रव्यूहात अडकला आहे, यातून या उद्योगाला ‘कन्स्ट्रक्ट महाराष्ट्र’ बाहेर काढू टाकेल काय? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ‘घर पहावे बांधून’ या म्हणीची बांधकाम उद्योजकांना पावलोपावली आठवण यावी, अशी अस्थिर परिस्थिती या क्षेत्रात निर्माण झाली आहे. सळी, सिमेंट आणि मजुरी, वीट, वाळूपासून ते किरकोळ साहित्यापर्यंत बाजारभाव अस्थिरतेच्या चक्रव्यूहात अडकला आहे. वीटदर अचानक ३० हजारांवर पोहोचला. सिमेंटने ३७०चा टप्पा गाठला. सळी ५५ ते ६० रुपये किलो झाली. १,३०० ते १,४०० रुपये प्रतिचौरस फूट खर्चाच्या हिशोबाने हाती घेतलेले बांधकाम उद्योगाचे काम प्रत्यक्षात १,५०० रुपयांहून अधिक खर्चाचे होत आहे, अशी परिस्थिती आहे. केंद्र शासनाची गोरगरीब, प्रत्येकाचे दर असले पाहिजे, अशी घोषणा आहे. पंतप्रधान आवास योजनेतून ग्रामीण भागात सरकारतर्फे एक लाख २० हजार रुपये मिळू शकतात. यात ग्रामीण भागातही घर बांधणे अशक्य होते. वीट दरातही मोठी वाढ झाली आहे. बांधकाम मजुरी वाढते आहे. कोरोनानंतर जोरदार गतीने बांधकाम वाढले होते. पण, या वाढीव दराने त्यालाही खीळ बसण्याची शक्यता आहे. वीट बनविण्यासाठी माती, कामगारांची मजुरी, वीट मागणी सारेच एकदम वाढल्याने दरवाढ अटळ झाली. डिझेलच्या दरवाढीचा जसा सर्व उद्योजकांना फटका बसत आहे, तसा या उद्योगालाही बसत आहे.
 
 
गरज तंत्रज्ञानाची
 
बांधकाम क्षेत्राकडे उद्योग व रोजगार म्हणून बघणाऱ्या नवीन पिढीने या क्षेत्रात असणाऱ्या नव्याने येणाऱ्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतल्यास स्वतःची तसेच उद्योगाची प्रगती साधणे सहज शक्य होईल. बरीच शहरे ‘स्मार्ट’ होणार, अशा एक ना अनेक गोष्टी नागरिकांवर बिंबविल्या जात आहेत. यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे बांधकाम क्षेत्र, हे तंत्रज्ञानाशी हवे तेवढे जुळवून घेताना दिसत नाही. सध्याच्या आर्थिक उलाढाली बघता, बांधकाम क्षेत्राची वाढ, एक अनिवार्य घटक बनत चालला आहे. सर्व प्रगत देशांमध्ये, बांधकाम क्षेत्र अत्यंत जोमाने वाढताना दिसते. ‘स्मार्ट सिटी’च्या संकल्पनेतून अत्याधुनिक सोयी-सुविधा देण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. या क्षेत्रामुळे तांत्रिक असो वा व्यवस्थापन, कुशल असो वा अकुशल, अशा विविध मनुष्यबळाला रोजगार मिळत आहे. या एका क्षेत्रावर निगडित अनेक व्यवसाय वाढताना दिसतात, तसेच यामुळे अनेक उद्योगांना चालनाही मिळत आहे. बांधकाम व्यावसायिक, वास्तूविशारद, इंटिरिअर डिझायनर, ठेकेदार, बांधकाम साहित्य पुरविणारे, सिमेंट, फर्निचर, लोखंड यांसारखे कितीतरी उद्योग या क्षेत्रावर अवलंबून आहेत. अशा या बांधकामक्षेत्राचे देशाच्या प्रगतीमधील योगदान मोठे असून, त्याची वाढ होणे ही काळाची गरज ठरते. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात बांधकाम क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी, अजून बऱ्याच आव्हानांना सामोरे जायचे आहे.
 
 
जसे या क्षेत्रात हवे असणारे उच्चस्तरीय तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळाची गरज, नैसर्गिक संसाधनांचा उपयोग, नवनवीन संशोधनाची गरज, अशा एक ना अनेक बाबी आहेत. या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यकता आहे ती फक्त दोन गोष्टींची, पहिली म्हणजे आपली मानसिकता आणि दुसरी उच्चस्तरीय तंत्रज्ञानाची जोड. नवनवीन शोध हे फक्त बांधकाम उद्योगात अपेक्षित नसून, त्या उद्योगाशी निगडित इतर उद्योगांमध्येही आवश्यक आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@