मुंबई महानगरात केवळ ५० टक्के सांडपाण्याचे शुद्धीकरण; 'एमपीसीबी'चा अहवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2021   
Total Views |
mumbai stp_1  H




मुंबई (अक्षय मांडवकर) -
मुंबई महानगर प्रदेशामध्ये (एमएमआर) २०१९-२० साली तयार झालेल्या एकूण सांडपाण्यामधील केवळ ५० टक्के सांडपाण्याचे शुद्धीकरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने (एमपीसीबी) प्रसिद्ध केलेल्या ‘जलप्रदूषण गुणवत्ता अहवाल, २०१९-२० ’मधून यासंदर्भातील माहिती मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१९-२० या वर्षात मुंबई, ठाणे आणि पनवेल महापालिकेने त्यांच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेच्या क्षमतेपेक्षा निम्म्याच सांडपाण्यावर प्रक्रिया केल्याचे वास्तवही या अहवालामधून उघड झाले आहे.
 
 
 
’एमपीसीबी’ने नुकताच प्रसिद्ध केलेल्या ’जलप्रदूषण गुणवत्ता अहवाला’त २०१९-२० साली ’एमएमआर’मध्ये तयार झालेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकियेची आकडेवारी मांडली आहे. ’एमएमआर’ क्षेत्रात मुंबई, ठाणे, पनवेल, नवी मुंबई, उल्हासनगर, वसई-विरार, मिरा-भाईंदर, भिवंडी-निझामपूर आणि कल्याण डोंबिवली महापालिकांचा समावेश होतो. अहवालातील आकडेवारीनुसार असे लक्षात आले की, ’एमएमआर’मध्ये २०१९-२० या वर्षात निर्माण झालेल्या सांडपाण्यापैकी ५० टक्के म्हणजेच ९७८.८५ एमएलडी सांडपाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया झालेली नाही. म्हणजे हे पाणी थेट जलस्त्रोतांमध्ये सोडण्यात आले आहे. मुंबई, ठाणे आणि पनवेल या मोठ्या महापालिकांना सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेत आलेले अपयशही अहवालातील आकडेवारीवरुन उघड झाले आहे.
 
 
मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण ८ सांडपाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी) कार्यान्वित आहेत. एकूण २,६३८ एमएलडी सांडपाणी शुध्द करण्याची क्षमता या केंद्रांची आहे. ’एमपीसीबी’च्या अहवालातील आकडेवारीनुसार २०१९-२० मध्ये शहरात २,१९० एमएलडी सांडपाणी तयार झाले. त्यापैकी १,२८५ एमएलडी (५८.७ टक्के) सांडपाणी शुद्ध करण्यात आले. 2017-18 आणि 18-19 या वर्षातील सांडपाणी शुद्धीकरणाच्या टक्केवारीपेक्षा २०१९-२० वर्षाची टक्केवारी कमी आहे. 2017-18 आणि 18-19 या वर्षात शहारात 2,727 एमएलडी सांडपाणी तयार झाले आणि त्यापैकी 1,850 एमएलडी पाणी (67.84 टक्के) शुद्ध करण्यात आले. म्हणजेच २०१९-२० या वर्षात तयार झालेल्या सांडपाण्यात घट झालेली असताना आणि सांडपाणी शुध्द करण्याची क्षमता 2,683 एमएलडी असतानाही पालिकेने केवळ 1,850 एमएलडीपेक्षा कमीच सांडपाणी शुद्ध केले.
 
 
याबाबत मुंबई महापालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया विभागातील एका अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवरुन सांगतिले की, सांडपाणी वाहून नेणार्‍या वाहिन्या बदलण्याचे काम सुरू असल्याने बरेच पाणी वाहून जाते. अशा परिस्थितीत संकलन केंद्रांमध्ये कमी प्रमाणात सांडपाणी पोहोचते. त्यामुळेच २०१९-२० या वर्षात शहारामध्ये तयार झालेल्या सांडपाण्यामध्ये घट झाल्याची शक्यता आहे.
 
 
ठाणे-पनवेलची परिस्थिती
 
ठाणे आणि पनवेल महापालिका क्षेत्रातही सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेची अवस्था मुंबईप्रमाणेच आहे. ठाण्यामध्येही 2017-18 आणि 18-19 या वर्षांपेक्षा (336 एमएलडी) 19-20 मध्ये कमी प्रमाणात (325 एमएलडी) सांडपाणी तयार झाले होते. तरीही 206.38 एमएलडी सांडपाणी शुद्धीकरण क्षमता असलेल्या या पालिकेला केवळ 88.5 एमएलडी सांडपाणी शुद्ध करता आले. तर पनवेलमध्ये गेल्या दोन वर्षांपेक्षा 2019-20 मध्ये तयार झालेल्या सांडपाण्यात (252 एमएलडी) वाढ झाली. अशा परिस्थितीत 8 ‘एसटीपी’ असणार्‍या या महापालिकेने केवळ 147 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली. उलटपक्षी 17-18 आणि 18-19 या दोन्ही वर्षांत 164 एमएलडी पाणी तयार झालेले असतानाही त्यांनी 156 एमएलडी पाणी शुद्ध केले होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@