पहिल्या महिला डॉक्टरची द्विजन्मशताब्दी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

Elizabeth Blackwell_1&nbs
 
 
 
जगभरातली पहिली महिला डॉक्टर एलिझाबेथ ब्लॅकवेल हिचा जन्म ३ फेबु्रवारी, १८२१ सालचा, म्हणजे नुकतीच तिची द्विजन्मशताब्दी झाली. तिची ही जीवनकहाणी...
 
आपल्याला साधारणपणे फ्लोरेन्स नाईटिंगेल माहिती असते. कारण ‘दि लेडी विथ दि लँप’ या नावाचा तिच्या कार्याचं वर्णन करणारा एक लेख किंवा धडा आपण पिढ्यान्पिढ्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात वाचत आलो आहोत. आजारी किंवा जखमी व्यक्तींची शुश्रूषा किंवा ‘नर्सिंग’ हा आधुनिक प्रकार फ्लोरेन्स नाईटिंगेलने स्वत: आचरणात आणून दाखवला, हे तिचं मोठेपण निर्विवाद आहेच. फ्लोरेन्सच्या आधी रुग्णालयाच्या आजारी लोकांची काळजी घ्यायला किंवा रणांगणावरच्या जखमी लोकांची शुश्रूषा करायला पुरुष परिचारक म्हणजे ‘मेल नर्स’ असायचे. पुरुष हा स्वभावत:च स्त्रीपेक्षा कठोर, रांगडा आणि थोडा बेपर्वा असतो. त्यामुळे रुग्ण आणि जखमी यांची नीट काळजी घेतली जात नसे, म्हणून फ्लोरेन्स नाईटिंगेलने महिला परिचारिका म्हणजेच ‘नर्स’ ही नवी संकल्पना निर्माण केली.
 
आता या पाश्चात्त्यांसाठी नव्या असणाऱ्या संकल्पना ऐकता-वाचताना आपण हेही लक्षात ठेवायला हवं की, कौटिल्याच्या अर्थशास्त्रात रणांगणावरच्या वैद्यकीय पथकाचा स्पष्ट उल्लेख आहे. आघाडीवर घमासान युद्ध चालू असताना पिछाडीवर शस्त्रवैद्यांची एक तुकडी जखमींची शुश्रूषा आणि परिचर्या करायला सज्ज असे. त्यांच्याकडे विविध प्रकारच्या शस्त्रांच्या आघातांसाठी विविध प्रकारची औषधं तयार असत, तसंच या पथकामध्ये महिलाही असत. मात्र, कौटिल्याच्या उल्लेखानुसार असं दिसतं की, या महिला प्रत्यक्ष वैद्यकीय शुश्रूषा करत नसून, उत्तम अन्नपदार्थ आणि शक्तिवर्धक पेयं तयार करत असाव्यात. आज आपल्याला शक्तिवर्धक पेयं म्हटल्यावर चहा-कॉफी-कोको एवढीच आठवतात. कौटिल्याच्या काळात भारतीय योद्धे कोणती बरं शक्तिवर्धक पेयं पीत असतील?
 
पण, अडीच हजार वर्षांपूर्वीचं कशाला, मराठी फौजांबरोबरही वैदू, हकीम आणि तबीब असायचेच. वैदू आणि हकीम हे झाडपाल्याची रामबाण औषधं जवळ बाळगून असायचे, तर तबीब म्हणजे शस्त्रवैद्य हे मुख्यत: जखमा धुणं आणि शिवून टाकणं, ही कामं करायचे. मुसलमानी बादशहांच्या काळापासून तलवारी, खंजीर, बाणांची टोकं ही विषामध्ये किंवा तेजाबमध्ये (अ‍ॅसिड) बुडवून त्यांचा शत्रूवर प्रहार करण्याची पद्धत सुरू झाली. या विषारी हत्यारांच्या जखमा धुणं आणि शिवणं हे मोठं कौशल्याचं काम असायचं. शिवाय जबर मुका मार लागणं, हाड मोडणं, तोफगोळे किंवा अग्निबाण किंवा उकळती तेलं अंगावर पडून भाजणं, अशा वेगवेगळ्या जखमांना वेगवेगळे उपचार असायचे. ही कामं हिंदवी स्वराज्याच्या काळात न्हावी लोक म्हणजे नाभिक समाज फार कुशलतेने करीत असे. आजही नाभिक समाजातल्या अनेक लोकांना मानवी शरीररचनेचं उत्तम ज्ञान असतं. ते मोडलेली हाडं, निखळलेले साधे सहजपणे बसवतात आणि ते उत्कृष्ट ‘मसाजिस्ट’ असतात. सैन्याबद्दल बोलायचं तर आज जगभरच्या प्रत्येक सैन्यदलाचं अद्ययावत ‘मेडिकल कोअर’ असतं. भारताचंही आहेच. भारतीय सेनेच्या वैद्यकीय पथकातले एक ‘ऑर्थोपेडिक सर्जन ब्रिगेडिअर’ जोसेफ यांच्याबद्दलचा एक हृद्य अनुभव सुनीताबाई देशपांडे यांनी त्यांच्या ‘आहे मनोहर तरी’ या आत्मचरित्रात दिला आहे. वाचकांनी तो आवर्जून वाचावा.
 
असो, तर मुद्दा काय की, पुरुष परिचारकांप्रमाणे महिला परिचारिका असायला हव्यात, हे फ्लोरेन्स नाईटिंगेलने आग्रहपूर्वक मांडलं आणि स्वत: तसं जगून दाखवलं. त्यामुळे त्या काळापर्यंत आरोग्य या क्षेत्रात महिलांना फक्त सुईण काम एवढंच जे एकमेव कार्य उपलब्ध होतं, ते आणखी खूप विस्तृत झालं. जगभराच्या असंख्य महिलांना त्यांच्या प्रवृत्तीला मानवणारं असं प्रेम, वात्सल्य, सेवा यांच्याबरोबरच वेतन मिळवून देणार क्षेत्र मिळालं.
 
हे सगळं ठीकच झालं. आरोग्यसेवा क्षेत्रात महिलांचा दर्जा सुईणीच्या आणखी थोडा वर चढला. त्यांना परिचारिका-‘नर्स’ असा मान मिळाला. पण, डॉक्टर? छे, छे! महिला आणि डॉक्टर? अशक्य? असंभव! असं म्हणणारे लोक कुणी हिंदू, सनातनी, कर्मठ वगैरे नव्हते बरं का! अगदी सुधारणा, प्रगती, पुरोगामित्व इत्यादींचे गाळीव अर्क असणारे पाश्चिमात्त्य लोकच असं म्हणत होते. यात ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका सगळेच होते. खरं म्हणजे, १९व्या शतकाच्या सुरुवातीपासून युरोप-अमेरिकेतले अनेक शहाणे लोक, स्त्रियांना सर्व क्षेत्रांत सहभागी करून घ्यावं, असं आग्रहपूर्वक मांडत होते. पण, कोणतीही सुधारणा एकदम होत नसते. महिलांचे सर्वच क्षेत्रांत हाल होतात, तसेच वैद्यकीय क्षेत्रातही व्हायचे. ‘स्टेथास्कोप’चा शोध १८१६ साली फ्रान्समध्ये लागला होता. युरोप-अमेरिकेत डॉक्टर लोक ‘स्टेथास्कोप’ वापरूही लागले होते. पण, ‘स्टेथास्कोप’ने का होईना, एका पुरुष डॉक्टरला आपल्या शरीराला स्पर्श करू देणं, महिला रुग्णांना अजिबात मान्य नसायचं. त्या लाजेनेच अर्धमेल्या होत असतं (होय, होय! त्या काळी पाश्चिमात्त्य महिलांनाही लाज वाटत असे.).
 
तर अशीच एलिझाबेथ ब्लॅकवेलला तिच्या ओळखीची एक महिला रुग्ण म्हणाली, “लिझ, तू किती सेवा करतेस गं माझी! पण, तूच डॉक्टरपण असायला हवी होतीस” आणि तेथेच एलिझाबेथ ब्लॅकवेलच्या मनात ठिणगी पडली. आपण डॉक्टर व्हायचं. ब्रिटनमध्ये ब्रिस्टॉल या ठिकाणी राहणाऱ्या सॅम्युअल आणि हॅना ब्लॅकवेल दाम्पत्याला तब्बल नऊ मुलं. पाच मुली आणि चार मुलगे. शिवाय सॅम्युअलच्या चार अविवाहित बहिणी त्याच्यासोबत राहायच्या. १५ सदस्यांचं एकत्र कुटुंब. त्याकाळी पश्चिमेतही अशी कुटुंब असायची. नऊ भावंडांतली एलिझाबेथ तिसरी. तिचा जन्म ३ फेबु्रवारी सन १८२१. सॅम्युअलचा एक छोटासा म्हणजे जुन्या पारंपरिक पद्धतीने उसापासून साखर बनविण्याचा कारखाना होता. त्यावर या कुटुंबाची गुजराण चालत असे. १८३२ साली त्या कारखान्याला आग लागली. चरितार्थाचं साधनच नष्ट झालेल्या सॅम्युअलने सरळ देशांतर केलं. ब्लॅकवेल कुटुंब अमेरिकेत न्यूयॉर्कला आलं. सॅम्युअल, त्याच्या बहिणी आणि त्याची बायको हे सर्व जण राजकीय, सामाजिक आणि धार्मिक बाबतीत अत्यंत सजग होते. त्या काळात फक्त अमेरिकेतच नव्हे, तर युरोपीय देशांमध्येही गुलामगिरीची पद्धत सर्वांना प्रचलित होती. ही पद्धत साफ नाहीशी व्हावी म्हणूनही चळवळ सुरू होती. त्या चळवळीला म्हणायचे ‘अ‍ॅबॉलिशनीझम.’ ब्लॅकवेल कुटुंब ‘अ‍ॅबॉलिशनिस्ट’ होतं. आता ही गुलामगिरी म्हणजे फक्त काळ्या लोकांचीच नव्हे, तर सर्वच वर्गातल्या महिलांना जी असमान वागणूक दिली जाते, तीही थांबली पाहिजे आणि खरोखरच सॅम्युअलने आपल्या मुलींना मुलांप्रमाणेच संपूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं.
 
पण, कुटुंबाची आर्थिक स्थिती मात्र वाईटच होती. ती सुधारावी म्हणून सॅम्युअल न्यूयॉर्कहून ओहायो प्रांतात सिनसिनाटी इथे आला आणि एकाएकी मरण पावला. ते साल होतं १८३८. एलिझाबेथ फक्त १७ वर्षांची होती. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अ‍ॅना, मरियन आणि एलिझाबेथ या तिघी बहिणींनी एक शाळा सुरू केली आणि याच काळात एलिझाबेथ उर्फ लिझच्या डोक्यात ती ठिणगी पडली. आपल्याला मुलांप्रमाणेच अनेक भाषा, अनेक विषय येतात. मग आपण वैद्यकीय शिक्षण का घेऊ नये? १८३८ ते १८४७ अशी नऊ वर्षे लिझ झगडत होती. प्रथम चरितार्थासाठी, मग मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पुरेसे पैसे साठवण्यासाठी आणि अखेर प्रत्यक्ष प्रवेश मिळवण्यासाठी. एकंदर १२ मेडिकल संस्थांनी तिला सरळ नकार दिला. मुलगी? आणि आमच्या कॉलेजात येऊन डॉक्टरकी शिकणार? नको बुवा!
 
 
 
अखेर १८४७ साली न्यूयॉर्कच्याच जीनिव्हा मेडिकल कॉलेजने तिला प्रवेश दिला. २३ जानेवारी, १८४९ या दिवशी लिझ डॉक्टर बनली. डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल! संपूर्ण अमेरिकेतली, नव्हे संपूर्ण जगातली पहिली महिला डॉक्टर! तिला पदवी प्रदान करताना जीनिव्हा कॉलेजचा डीन डॉ. चार्ल्स ली हा आपल्या आसनावरून उठून व्यासपीठावर मोकळ्या जागेत आला आणि पदवीचं पत्र तिच्या हाती देत त्याने तिला झुकून अभिवादन केलं. जीनिव्हा कॉलेजने तिला शिक्षण दिलं खरं; पण ते अर्धवटच होतं. म्हणजे कोणत्याही डॉक्टरला मानवी शरीररचनेचं प्रॅक्टिकल ज्ञान हवं. इतर सर्व पुरुष विद्यार्थ्यांबरोबर एलिझाबेथला असं प्रॅक्टिकल ज्ञान द्यायची प्राध्यापकांचीच तयारी नव्हती. खऱ्याखुऱ्या मानवी देहावर उपचार करताना, रक्तबिक्त पाहून या पोरीला चक्कर आली तर? उगाच भानगड नको! बघा, १८४७ साली खुद्द अमेरिकेतले, जगातल्या कथित सर्वात पुढारलेल्या देशातले डॉक्टर्ससुद्धा असाच विचार करत होते.
 
 
 
पण एलिझाबेथ समोर प्रश्न आला. तिला नुसतीच पदवी नको होती. तिला प्रत्यक्ष वैद्यकीय सेवेत उतरायचं होतं. त्यासाठी प्रॅक्टिकल ज्ञान आवश्यक होतं. मग एप्रिल १८४९ मध्ये ती प्रथम लंडनला आणि नंतर पॅरिसला गेली. तिथे तिने भरपूर प्रॅक्टिकल अनुभव मिळवला आणि अत्यंत निष्णात प्रसूतितज्ज्ञ अशी कीर्तीही मिळवली. १८५१ साली ती न्यूयॉर्कला परतली. तोवर तिची धाकटी बहीण एमिली वैद्यकीय शिक्षण घेऊ लागली होती. १८५२ साली एलिझाबेथने न्यूयॉर्कमध्ये स्वत:चा स्वतंत्र दवाखाना काढला. एका महिला डॉक्टरने सर्वांसाठी काढलेला आधुनिक जगातला हा पहिला दवाखाना. या खेरीज गुलामगिरी विरोधी चळवळ, स्त्री शिक्षण, स्त्रियांना समान अधिकार, बालकामगार विरोधी कायदा व्हावा म्हणून भाषणं देणं इत्यादी सामाजिक उपक्रम तिने धडाक्याने सुरू केले. १८५७ साली डॉक्टरकी पूर्ण करून हाताशी आलेली धाकटी बहीण एमिली आणि एक शिष्या डॉ. मारी झाक्रझेवस्का, यांच्यासह तिने फक्त महिला आणि मुलं यांच्यासाठी एक रुग्णालय सुरू केलं.
 
१८६१ साली गुलामगिरी हटवण्याच्या प्रश्नावरूनच अमेरिकेत सुप्रसिद्ध यादवी युद्ध पेटलं. दक्षिणेकडल्या संस्थानांचा गुलामगिरी हटवण्यास विरोध होता. पण, राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने गुलामगिरी कायद्याने रद्द केली. त्यावरून युद्ध पेटलं. मुळातच गुलामगिरीच्या विरोधात असणाऱ्या डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेलने लिंकनच्या पक्षाला आणि सैन्याला संपूर्ण सहकार्य केलं. पुढे १८६९ साली न्यूयॉर्कचं रुग्णालय एमिलीवर सोपवून ती कायमची इंग्लडला आली. पुढे ४० वर्षं तिने इंग्लंडसह एकंदर युरोपात भरपूर वैद्यकीय आणि सामाजिक कार्य केलं. ३१ मे, १९१० या दिवशी, वयाच्या ८०व्या वर्षी ती स्कॉटलंडमध्ये किलमन इथे राहत्या घरीच मरण पावली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@