हिंदूविरोधी षड्यंत्रास पुरून उरणारे योगी आणि देवधर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2021   
Total Views |

Yogi Sunil
 
 
सुनील देवधर आणि योगी आदित्यनाथ आज राष्ट्रवाद, हिंदुत्व, आधुनिकता आणि आर्थिक विकास यांची सांगड घालणारे राजकारण करीत आहेत. त्यांची हिंदुत्व-राष्ट्रवादाची मांडणी उथळ नसून त्यास मजबूत वैचारिक बैठक लाभली आहे. त्यामुळे हिंदूंच्या अशा नेतृत्वास नामोहरम करणे आणि हिंदूंच्या अस्मितेवर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा काँग्रेस आणि ‘इकोसिस्टीम’चा प्रयत्न वारंवार हाणून पाडावा लागेल.
भारत देश आणि भारतीय राजकारण ही आमची वैयक्तिक जहागिरी आहे. काँग्रेसचा विचार हा देशाचा विचार, काँग्रेसशिवाय अन्य कोणीही देशावर राज्य करू नये,’ असे राजकारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेस पक्षाने दीर्घकाळापर्यंत केले. त्यासाठी आपल्या विरोधी विचारसरणीचे आणि नेत्यांचे दमन करण्याचे कामही काँग्रेसने केले. त्यामुळेच काँग्रेसच्या कथित धर्मनिरपेक्ष राजकारणात आव्हान देऊ शकेल असा हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी विचार देशात रुजू न देण्याचे षड्यंत्र स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसने, त्यातही प्रामुख्याने गांधी-नेहरू घराण्याने केले.
देशात हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी विचार, तो विचार मांडणारे नेते वरचढ झाले, तर आपल्या मुस्लीम आणि ख्रिश्चन लांगूलचालनाच्या राजकारणावर त्याचा परिणाम होईल, परिणामी सत्तेतून पायउतार व्हावे लागेल; याची व्यवस्थित जाणीव काँग्रेस पक्षाचा मालकी हक्क असणाऱ्यांना होती आणि आहे. कदाचित त्यामुळेच देशाचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू हे सोमनाथाचा जीर्णोद्धार करण्याच्या सरदार वल्लभभाई पटेलांविषयी नाराजी व्यक्त करतात. एकूणच, हिंदुत्ववादी विचार हा देशात रुजू नये आणि हिंदूंनी सदासर्वकाळ दमन सहन करतच जगावे, याची तजवीज काँग्रेस आणि काँग्रेसच्या आधाराने वाढलेल्या ‘इकोसिस्टीम’ने केली आहे. त्यामुळेच ‘एक देश में दो विधान, दो निशान दो प्रधान नहीं चलेंगे’ असा नारा देणाऱ्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा काश्मीरमध्ये कोठडीत संशयास्पद मृत्यू होतो, तर ‘एकात्म मानवतावाद’ ही खास हिंदू विचारसरणी देशाला देणाऱ्या पं. दीनदयाळ उपाध्याय यांचा मृतदेह रेल्वे स्टेशनवर सापडतो. या दोन्ही नेत्यांच्या राजकारणामध्ये हिंदू, हिंदुत्व आणि राष्ट्रवाद हे केंद्रस्थानी होते आणि त्यांना जनाधारही होता. त्यामुळे या नेत्यांचा संशयास्पद मृत्यू झाला नसता, तर स्वातंत्र्यानंतर लगेचच काँग्रेसी राजकारणाला समर्थ असा पर्याय उभा राहिला असता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघासही संपविण्याचे अनेक प्रयत्न काँग्रेसने केले, महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर घालण्यात आलेले बंदी, त्यानंतरही अजूनपर्यंत गांधीहत्येविषयी संघाची बदनामी करणे, रा. स्व. संघाचा विचार मानणाऱ्यांना खुनी अथवा हिंसक ठरविणे, हे आणि असे अनेक प्रकार आजही सुरू आहेत. अर्थात, पं. नेहरूंपासून काँग्रेस पक्षाने कितीही प्रयत्न केले तरीही हिंदुत्ववादी -राष्ट्रवादी विचारांचा प्रचार आणि प्रसार काही थांबला नाही. काँग्रेसच्या मुस्लीम लांगूलचालनाच्या राजकारणास सर्वांत मोठे आव्हान मिळाले ते नव्वदच्या दशकात श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या रूपाने. त्यावेळी जागृत झालेल्या हिंदू समाजाने आपल्या अस्मितेवर आणि राष्ट्रवादावर बाबरी ढाँचाच्या रूपाने असलेला डाग उद्ध्वस्त केला. काँग्रेस आणि काँग्रेसी ‘इकोसिस्टीम’चा भाग असलेले डावे इतिहासकार, समाजवादी कुटीरद्योग चालविणारे ‘एनजीओवाले’, देशातील शैक्षणिक विश्वात अतिक्रमण करून बसलेले कथित अभ्यासक आणि आपला घातक अजेंडा पुढे नेणारे इस्लामी कट्टरतावादी यांच्यासाठी ही घटना म्हणजे मोठा धक्का होता. कारण, या घटनेमुळे देशातील हिंदू आपले दमन खपवून घेणार नाही, हे स्पष्टपणे दाखवून देण्यात आले होते. त्यानंतर देशात भाजपच्या रूपात प्रथमच बिगरकाँग्रेस सरकार अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आले. सरकारने हिंदुत्वासह आर्थिक विकास हा नव्या मॉडेलची पायाभरणी केली आणि सहा वर्षे सत्ता अतिशय यशस्वीपणे चालविली.
त्यानंतर २००४ साली भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. मात्र, देशात हिंदुत्ववादी राजकारण यशस्वी होते, हे वाजपेयी सरकारने दाखवून दिले होते. त्यामुळेच गुजरात, छत्तीसगढ, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांमध्ये भाजपची सरकारे आली. त्याचप्रमाणे लोकसभेतही हिंदुत्वाचा मुद्दा जोरदारपणे मांडणारे, हिंदूविरोधी दमन सहन न करणारे खासदार निवडून जाण्यास प्रारंभ झाला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य हिंदू मतदाराला आपल्या मताची क्षमता या निमित्ताने समजली होती. देशातील सर्वसामान्य हिंदू समाज इस्लामी दहशतवाद आणि इस्लामी कट्टरतावाद याविरोधात बोलायला लागला होता. नेमका हाच धोका काँग्रेस आणि त्यांच्या ‘इकोसिस्टीम’ने ओळखला आणि सर्वसामान्य हिंदूंच्या मनात एक जबरदस्त अपराधीभाव कसा निर्माण करता येईल, यासाठी ‘इकोसिस्टीम’ कार्यरत झाली. यावेळी हाती सत्ता असल्याने यंत्रणांचा गैरवापर करून हिंदूंचे दमन करणे अधिक सोयीचे होते. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये २००९च्या लोकसभा निवडणुकीच्या एक वर्ष अगोदर, म्हणजे २००८ साली बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोट झाल्यावर लगेचच काँग्रेसच्या नेत्यांनी हा बॉम्बस्फोट हिंदुत्ववाद्यांनी घडविल्याचे जाहीर करून ‘हिंदू दहशतवाद’ - ‘भगवा दहशतवाद’ जन्माला घातला. ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाचे मार्केटिंग करण्यासाठी काँग्रेसची ‘इकोसिस्टीम’ तयारच होती. त्यांनी मग अगदी जोरदारपणे ‘हिंदू दहशतवाद’, त्यामुळे देशावर आलेले कथित संकट, हिंदू असणे म्हणजे कसे चुकीचे आहे, असा प्रचार सुरू केला. त्याद्वारे हिंदू राष्ट्रवादी अस्मितेचे दमन करण्याचा त्यांचा स्पष्ट हेतू होता. या स्फोटाच्या तपासाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्ववादी नेते यांना कायमचे नेस्तनाबूत करण्याचा मनसुबा होता. त्यानुसार पुढे जे काही घडविण्यात आले ते सर्वश्रृत आहेच.
 
मात्र, काँग्रेस आणि त्यांच्या ‘इकोसिस्टीम’चा हा कांगावा फार काळ टिकला नाही. मालेगाव प्रकरणाचा तपास ‘एनआयए’ने ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्र ‘एटीएस’ने यामध्ये नेमके काय केले, हे समोर येण्यास प्रारंभ झाला. त्यामध्ये नुकत्याच झालेल्या ताज्या खुलाशामध्ये मालेगाव स्फोटामध्ये योगी आदित्यनाथ आणि सुनील देवधर यांची नावे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याची कबुली एका साक्षीदाराने ‘एनआयए’ विशेष न्यायालयात दिली. त्यामुळे हिंदूंचा मानभंग करण्याचे काँग्रेसचे हे कुभांड पुन्हा एकदा उघडे पडले. मात्र, हा एक भाग झाला. सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे या प्रकरणामध्ये योगी आदित्यनाथ आणि सुनील देवधर यांना गोवण्याचे षड्यंत्र आणि त्याची ‘क्रोनोलॉजी’ समजून घेणे गरजेचे आहे.
 
त्यासाठी २००८ सालात हे दोन्ही हिंदुत्ववादी राष्ट्रवादी नेते काय करीत होते, हे पाहणे आवश्यक आहे, तर २००८ साली योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे खासदार होते आणि सुनील देवधर यांच्याकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘हिंदू जागरण मंचा’ची जबाबदारी सोपविली होती. गोरखपूरच्या मठाचे महंतपदही सांभाळणारे योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशात हिंदूंचे संघटन करण्यात अग्रेसर होते, तर देवधर काँग्रेसचा दहशतवादी कारवायांना असलेला पाठिंबा उघड करीत होते. या दोन्ही नेत्यांमुळे काँग्रेस आणि त्यांची ‘इकोसिस्टीम’ अडचणीतही येत होती. या दोघांना दहशतवादाच्या प्रकरणात अडकविले की, आपल्या मार्गातील अडथळा दूर होण्यासोबत हिंदूंच्या मनात पुन्हा एकदा ‘हिंदू दहशतवाद’ असे काहीतरी अस्तित्वात आहे, हे ठसविणे सोपे जाईल; असा विचार करण्यात आल्याचे दिसते. त्यानुसार, योगी आदित्यनाथ आणि सुनील देवधर या हिंदूंच्या उगवत्या नेतृत्वास संपविण्याचा डाव रचला गेला.
 
‘मालेगाव स्फोट-हिंदू दहशतवाद’ या ‘थिअरी’मध्ये योगी आदित्यनाथ आणि सुनील देवधर यांना अडकविण्याचा झालेला प्रयत्न हा हिंदूंच्या राष्ट्रवादाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेतृत्वास संपविण्यासाठीच होता. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातले सुनील देवधर हे केवळ इस्लामी कट्टरतावादावर बोलत नाहीत, तर ईशान्य भारतात जाऊन, तेथे दीर्घकाळ राहून ख्रिश्चन मिशनऱ्यांना आव्हानही देतात. पुढे जाऊन त्रिपुरामध्ये ३५ वर्षांची डाव्यांची राजवटही संपुष्टात आणतात. पुन्हा देवधर यांना ईशान्य भारत, मध्य भारत, दक्षिण भारत अशी सर्वदूर लोकप्रियता आहे. अगदी तसेच योगी आदित्यनाथ यांचेही, योगी उत्तर प्रदेशसारख्या राज्याचे मुख्यमंत्रिपद यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्याचप्रमाणे आर्थिक विकासाची भाषा बोलताना हिंदुत्वही तेवढ्याच जोरकसपणे ते मांडत आहेत. त्यांचीही लोकप्रियता केवळ उत्तर प्रदेशपुरती मर्यादित नाही, तर अनेक लोकांना योगी यांनी राष्ट्रीय पातळीवर जावे, असे वाटते. यातून एक बाब सिद्ध होते, ती म्हणजे हिंदुत्व आणि राष्ट्रवाद जोरकसपणे मांडणारी नेतृत्वाची एक फळी आता कार्यरत आहे. मात्र, या फळीस संपविण्याचा एक कुटील प्रयत्न म्हणजे मालेगाव स्फोटाची घटना होती. जर त्यामध्ये काँग्रेस आणि ‘इकोसिस्टीम’ला यश आले असते, तर हिंदूंचे दमन करणे त्यांना अधिक सोपे गेले असते.
 
सुनील देवधर आणि योगी आदित्यनाथ आज राष्ट्रवाद, हिंदुत्व, आधुनिकता आणि आर्थिक विकास यांची सांगड घालणारे राजकारण करीत आहेत, ज्याला समाजातील सर्व थरांचा जनाधार लाभत असल्याचे स्पष्ट दिसते. त्याचप्रमाणे त्यांची हिंदुत्व-राष्ट्रवादाची मांडणी उथळ नसून त्यास मजबूत वैचारिक बैठक लाभली आहे. देवधर-योगी यांचे नेतृत्व आज नव्या भारताचे आणि समर्थ हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व करीत आहे. त्यामुळे हिंदूंच्या अशा नेतृत्वास नामोहरम करणे आणि हिंदूंच्या अस्मितेवर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा काँग्रेस आणि ‘इकोसिस्टीम’चा प्रयत्न समजून घेणे आणि त्याचा सामना करणे गरजेचे आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@