अरबी शिकाऱ्यांच्या तावडीत बिचारे माळढोक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

arabi_1
 
 
पाकिस्तान सरकार मग ते कोणत्याही पक्षाचं असो, भुत्तोंची पाकिस्तान ‘पीपल्स पार्टी’ असो, नवाझ शरीफांची ‘मुस्लीम लीग’ असो वा वर्तमान पंतप्रधान इमरान अहमद खान नियाझींची ‘तहरीके इन्साफ पार्टी’ असो, हे सर्व लोक अरबी देशांमधल्या मोठ्या मोठ्या धेंडांना पाकिस्तानात येऊन शिकार करण्याचे अधिकृत परवाने देतात का? उत्तर स्पष्टच आहे. या श्रीमंत अरबांनी पाकिस्तानात भरपूर आर्थिक मदत द्यावी.
 
 
१९६३ साली भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ‘मोर’ हा सुंदर पक्षी घोषित झाला. त्यावेळी अनेकांना असं वाटत होतं की, गरुड या पक्ष्याला हा मान मिळावा. अमेरिका, जर्मनी, इंडोनेशिया, मेक्सिको इत्यादी देशांचा राष्ट्रीय पक्षी गरुडच आहे. शिवाय आपल्या परंपरेनुसार गरुड हाच पक्ष्यांचा राजा मानला जातो. धार्मिकदृष्ट्या तो भगवान विष्णूचं वाहनही आहे.
 
परंतु, पक्षितज्ज्ञ वेगळा विचार करत होते. त्यांनी माळढोक या पक्ष्याला भारताचा राष्ट्रीय पक्षी घोषित करण्याची शिफारस केली होती. खुद्द डॉ. सालिम अलींचा (सलीम अली हा उच्चार चूक)देखील या शिफारशीला पाठिंबा होता. पण, केंद्र सरकारातल्या बाबू लोकांच्या डोक्यात आणखीनच वेगळा विचार आला. या सगळ्या इंग्रजाळलेल्या बाबू लोकांना त्या बिचाऱ्या माळढोक पक्ष्याचं इंग्रजी नाव खटकलं-‘ग्रेट इंडियन बस्टर्ड’! त्यांना असं वाटलं की, लोक चुकून किंवा मुद्दाम खोडसाळपणे त्या ’बस्टर्ड’चं ’बास्टर्ड’ करतील. तेव्हा नकोच ती भानगड, त्यापेक्षा आपला मोर बरा! मोर हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सर्व प्रदेशांमध्ये विपुल प्रमाणात असतो. हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्मांमध्ये मोराला महत्त्वाचं स्थान आहे आणि सौंदर्यामुळे मोर भारतातच का, जगातल्या सगळ्या आबालवृद्धांना आवडतो. त्यामुळे ‘ग्रेट इंडियन बस्टर्ड’चा पत्ता कापला गेला आणि ‘इंडियन पीकॉक’ राष्ट्रीय पक्षी बनला.
 
असो, तर ‘बस्टर्ड’ किंवा ‘माळढोक’ पक्षाच्याही काही जाती आहेत. त्यापैकी पाकिस्तानात आणि अफगाणिस्तानात आढळणारी एक जात म्हणजे ‘हौबारा बस्टर्ड’ किंवा सिंधी आणि पंजाबीत त्याला ‘तल्लूर’ असं म्हटलं जातं, त्याच्या शिकारीवर आता अर्थातच बंदी आहे.
 
खरं पाहता शिकार हा फार प्राचीन असा मर्दानी खेळ आहे. हिंमत, ताकद, रानावनात तासन्तास फिरणं, अचूक निरीक्षण, अचूक नेमबाजी असे मर्द योद्धयांना आवश्यक ते गुण या खेळातून जोपासले जात असत. भारतात समृद्ध निसर्ग आणि विपुल पशुपक्षी असल्यामुळे कितीही शिकार झाली, तरी निसर्गाचा समतोल फारसा ढळत नसे, शिकारीचेही काही नियम असतं. पक्ष्यांमध्ये कवडे, बगळे, पशूंमध्ये ससे, हरीण, रानडुक्कर यांची शिकार केली जात असे. कारण, त्यांची वीण भरपूर असते. त्यातही त्यांच्यातल्या नरांची शिकार होत असे.मादीला मारलं जात नसे. याचा एक साहित्यिक पुरावा पाहा. तमसा नदीच्या तीरावरुन स्नान उरकून परत येत असलेल्या वाल्मिकी ऋषींना एक क्रौंच पक्ष्यांची जोडी दिसते. तेवढ्यात एका निषादाच्या बाणाने नर घायाळ होऊन पडतो. क्रौंच मादीच्या करुण विलापाने वाल्मिकी ऋषींच्या तोंडून काव्यरुपात शापवाणी उच्चारली जाते. तीच रामायण या आद्य महाकाव्याची सुरुवात होय.
 
तर पाकिस्तानच्या सिंध प्रांतातल्या वडेरा नामक ग्रामीण परिसरात नुकतीच एक घटना घडली. नाझिम जोखियो नावाच्या एका तरुणाने पाहिलं की, गावाच्या परिसरात टप उघडे ठेवलेल्या सफारी जीप्सचा एक तांडा फिरतो आहे. त्यात बरेच अरब आहेत. ते सगळे हत्यारबंद आहेत आणि कीड्यामुंग्यांप्रमाणे ते टचाटच तल्लूरांना गोळ्या घालत आहेत. नाझिमने हातातल्या मोबाईल कॅमेऱ्याचा सदुपयोग करुन हे सगळं टिपून ठेवलं. थोड्या वेळाने खेळ बदलला. अरब जीपांमधून खाली उतरुन एके ठिकाणी कोंडाळं करुन बसले. काही जणांनी शेकोटी पेटवली. दुसऱ्या काही जणांनी जीपांमधून काही पिंजरे बाहेर काढले. त्यांचे दरवाजे उघडून आतल्या शिकारी ससाण्यांना बाहेर काढण्यात आलं. पहिल्यांदा त्या ससाण्यांनी काही कबुतरं पकडून आणली. मग ते माळढोकांच्या मागे लागले. जसजसे पक्षी आणले जात होते, तसतसे त्यांना जीवंत सोलून आगटीत टाकण्यात येत होतं. मग सर्वांनी मिळून त्यांच्या चविष्ट मांसावर ताव मारला.
 
विशिष्ट पशू किंवा पक्ष्याच्या मांसाच्या चविष्टपणामुळे माणसाने त्यांची चोरुन शिकार करावी, हे एकवेळ सजता येईल. पण, सध्या जगभर सर्वत्र नव्याने आलेली ‘फॅशन’ म्हणजे, एखाद्या पशू/पक्ष्याचं मांस हे वाजीकर म्हणजे पौरुष वाढवणारं आहे, असं समजलं की, लोक वाटेल त्या मार्गाने ते मिळवतात.
 
नाझिम जोखियो या सगळ्या उद्योगांचं लांबून चित्रिकरण करतो आहे, हे जाम ओवैस याच्या लक्षात आलं. हा कोण इसम? हा ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ पक्षाचा स्थानिक आमदार आहे आणि उंटांचा तांडा -चुकलो-जीपांचा तांडा घेऊन आलेले अरब हे त्याचे पाहुणे होते. तो नाझिमला काहीच बोलला नाही. त्याने नाझिमचा थोरला भाऊ अफजल याला बोलावून घेतलं आणि सांगितलं, “उद्या भावाला पाठवून दे वाड्यावर.” लक्षात आली ना गुर्मी? ‘बाई, येऊन जा वाड्यावर!’
 
 
अफजल नाझिमला घेऊन ओवैसच्या वाड्यावर म्हणजे फार्म हाऊसवर गेला. जाताना त्याने नाझिमला बरंच उपदेशामृत पाजलं. ‘बळिवंताशी वैर पत्करुन चालणार नाही. तू तुझा मोबाईल आमदाराला दाखव. तो व्हिडिओ डिलिट केल्याची त्याची खात्री पटू दे. काय शिव्या घालेल, चार थपडा मारेल त्या मुकाट्याने सहन कर,‘ इत्यादी गोष्टी त्याने सिंधी किवा उर्दूमधून सांगितल्या असाव्यात.
 
रात्री उशिरापर्यंत नाझिम घरी न परतल्यामुळे अफजल पुन्हा त्याला शोधायला ओवैसच्या फार्म हाऊसवर गेला. तेव्हा त्याला सांगण्यात आलं की, ‘तुझा भाऊ मरण पावला आहे.’ अफजलच्या ताब्यात देण्यात आलेलं नाझिमचं प्रेत बेदम मारहाणीच्या जखमांनी भरलेलं होतं.
 
आता हे प्रकरण सिंध प्रांतीय न्यायालयात आहे. संशयित आरोपी असणाऱ्या आमदारावर आणि अरबांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. मात्र, या प्रकरणामुळे जगभरच्या पर्यावरणप्रेमीचं लक्ष पाकिस्तानकडे वळलं आहे. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ या संस्थेच्या शिफारशीमुळे पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने तल्लूर पक्ष्याच्या शिकारीवर कडक निर्बंध घातले आहेत. मग तरीही, कोण हे उपटसुंभ अरब बेधडक शिकार करतायत, याबाबत विविध स्तरावर माहिती गोळा करण्यात आली. ती पाहिल्यावर पर्यावरणप्रेमी थक्क झाले.
 
ती माहिती अशी की, पाकिस्तान सरकार मग ते कोणत्याही पक्षाचं असो, भुत्तोंची पाकिस्तान ‘पीपल्स पार्टी’ असो, नवाझ शरीफांची ‘मुस्लीम लीग’ असो वा वर्तमान पंतप्रधान इमरान अहमद खान नियाझींची ‘तहरीके इन्साफ पार्टी’ असो, हे सर्व लोक अरबी देशांमधल्या मोठ्या मोठ्या धेंडांना पाकिस्तानात येऊन शिकार करण्याचे अधिकृत परवाने देतात का? उत्तर स्पष्टच आहे. या श्रीमंत अरबांनी पाकिस्तानात भरपूर आर्थिक मदत द्यावी. गंमत म्हणजे, २०१७ साली स्वत: इमरान खाननेच तत्कालीन सत्तारुढ नवाझ शरीफ सरकारविरुद्ध , पाकिस्तानी संसदेत, या शिकार परवान्यावरुन प्रचंड गोंधळ घातला होता. आज इमरान सरकार ते करीत आहे. सरकारी अधिकारी सांगतात की, या परवान्यासाठी आम्हाला शुल्क म्हणून भरपूर महसूल मिळतो.
 
गेल्या म्हणजे २०२० या वर्षात ‘कोविड’ने थैमान घातलेलं असूनही पाकिस्तान सरकारने तीन मोठ्या अरब धेंडांना शिकार परवाने दिले, अशी माहिती बाहेर आली आहे. सौदी अरेबियाचा युवराज मोहम्मद बिन सलमान, सौदीच्याच तबुक प्रांताचा राज्यपाल राजपुत्र फहद बिन सुल्तान आणि बातिन प्रांताचा राज्यपाल मन्सूर बिन मोहम्मद हे तीन अतिश्रीमंत शिकारी आहेत आणि महसुली उत्पन्नाची फजिती तर पुढेच आहे. राजपुत्र फहद बिन सुल्तान याने एकूण दोन हजार तल्लूर मारले. त्याची एक लाख अमेरिकन डॉलर्स इतकी रक्कम त्याने अजूनही दिलेली नाही. शिवाय शिकारी ससाणे भाड्याने आणले होते. त्यांचं ६० हजार डॉलर्स भाडं त्याने दिलंच नाही. राजपुत्र मन्सूरकडूनही जवळपास तेवढीच रक्कम येणं आहे.
 
तल्लूर पक्ष्याच्या शिकारीवरुन सुप्रसिद्ध अमेरिकन पत्रकार स्टीव्ह कोल याने त्याच्या ‘घोस्ट वॉर्स’ या पुस्तकात दिलेली माहिती फारच भयंकर आहे. हे पुस्तक २००४ साली प्रकाशित झालं आणि त्यासाठी स्टीव्ह कोलला २००५ सालचं ‘पुलित्झर’ हे प्रतिष्ठित पारितोषिक मिळालं होतं.
 
त्यात कोलने वर्णन केलेली घटना अशी की, १९९९ साली अरब अमिरातीतल्या एका श्रीमंत अरब शेखची शिकार पार्टी दक्षिण अफगाणिस्तानात आली होती. अमेरिकन गुप्तचर संस्था ‘सीआयए’ला अशी पक्की खबर मिळाली की, या शिकार पार्टीत ओसामा बिन लादेन वेष बदलून, ओळख लपवून घुसलेला आहे. ‘सीआयए’ हस्तकांनी त्याची ओळख पटवण्याचा खूप प्रयत्न केला. पण,त्याच्यासारखे भासणारे बरेच इसमं त्या गटात होते. मग दुसरा पर्याय पुढे आला की, त्याच्यासारखे दिसणाऱ्या सर्वांनाच उडवायचं किंवा सगळ्या शिकार पार्टीचाच निकाल लावायचा. पण, विचारांनी यातला कुठलाच पर्याय स्वीकारला गेला नाही. कारण, यामुळे अरब अमिरातीबरोबरचे अमेरिकेचे राजनैतिक संबंध बिघडले असते. म्हणून ‘सीआयए’ने चक्क ओसामाला हातचा जाऊ दिला.
 
आणि मग पुढे दि. ११ सप्टेंबर, २००१चा भीषण उत्पात घडला. ते कसंही असो. वर्तमान तल्लूर शिकार प्रकरणाचं पुढे काय होईल? काहीही होणार नाही. काही काळ विरोधी पक्ष इमरान सरकारला अडचणीत आणण्यासाठी गदारोळ करतील. नंतर विषय मागे पडेल. जिथे माणसाच्या प्राणांना कवडीची किंमत नाही, तिथे तल्लूर-बिल्लूर पक्ष्यांना कोण विचारतो? ते पौरुष वाढवण्यासाठी अरबांच्या पोटातच जायचे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@