प्रदूषणाच्या धुरात गुदमरणारा पाकिस्तान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

pollution.jpg_1


जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत पाकिस्तानातील दुसरे मोठे शहर असलेले लाहोर हे वरच्या क्रमांकावर आहे. तेव्हा, लाहोरसह प्रदूषणाच्या धुरात गुदमरणार्‍या पाकिस्तानमधील विदारक परिस्थितीचा आढावा घेणारा हा लेख...

लाहोर शहराचा समावेश मध्ययुगीन काळाआधी सर्वाधिक शानदार शहरांमध्ये केला जात असे. मध्ययुगीन काळात मध्य आशिया, अरब आणि युरोपातून येणार्‍या प्रवाशांनी संपन्नता व उच्च कलात्मक उपलब्धीसाठी लाहोरची मुक्त कंठाने प्रशंसा केली. इतकेच नव्हे, तर ज्याने लाहोर पाहिले नाही, त्याने काहीच पाहिले नाही, असेही म्हटले जाऊ लागले. फाळणीनंतर पाकिस्तानच्या राजकारणाचे केंद्र होणार्‍या पंजाब प्रांताच्या राजधानीच्या रुपात लाहोरचा प्रभाव राहिला. परंतु, काळाबरोबर लाहोरने आपले आकर्षण गमावणे सुरु केले. गावातून शहरांकडे होणार्‍या सातत्यपूर्ण आणि मोठ्या संख्येच्या स्थलांतराने शहरी व्यवस्थेवर दबाव निर्माण केला, तर दुसरीकडे असंबद्ध विकास, औद्योगिकीकरण आणि धार्मिक कट्टरपंथाने पाकिस्तानच्या या शहराला दुरवस्थेत ढकलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आज पाकिस्तानचे हे दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या दैनिक सूचित शीर्षस्थानी आले आहे. जागतिक पर्यावरण ‘थिंक टँक’ ‘आयक्यूएअर’नुसार लाहोरची हवा गुणवत्ता २९६ नोंदवण्यात आली व यामुळे दि. ३ डिसेंबरला हे शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले.




ही परिस्थिती जवळपास संपूर्ण पाकिस्तानची आहे. यंदाच्या मे महिन्यात ‘आयक्यूएअर’च्या जागतिक हवा गुणवत्ता अहवालात पाकिस्तानला जगातील दुसर्‍या सर्वाधिक प्रदूषित देशाच्या रुपात स्थान देण्यात आले होते. आकडेवारीनुसार गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये पीएम २.५ची सांद्रता जागतिक आरोग्य संघटनेद्वारे अनुशंसित हवा गुणवत्ता स्तराच्या पाचपट अधिक होती. ‘पीएम’ २.५ वायुमंडळीय ‘पर्टिक्युलेट मॅटर’ला संदर्भित करते. त्यात २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी व्यासाचे कण सामील असतात, जे मानवी केसांच्या व्यासाच्या जवळपास तीन टक्के आहे. पाकिस्तानमध्ये ‘पर्टिक्युलेट मॅटर’ ५९ आहे, जो अस्वस्थ श्रेणीत येतो आणि ‘डब्ल्युएचओ’ अनुशंसित स्तर दहा मायक्रोग्रॅम प्रतिमीटरक्यूबपेक्षा पाच पट अधिक आहे. जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२०मध्ये पाकिस्तानने भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना यासाठी जबाबदार ठरवले आहे. त्यामुळे आज पाकिस्तानच्या महानगरांत हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर धूर आणि घातक धुके निर्माण करत आहे. सोबतच ‘आयक्यूएअर’ने असेही सांगितले की, पाकिस्तानमध्ये होणार्‍या २० टक्क्यांपेक्षा अधिक मत्यू वायूप्रदूषणाच्या जोखमीच्या नकारात्मक प्रभावांशी जोडले जाऊ शकते. विशेषज्ज्ञांच्या मते, देशातील हवा अस्थमाने पीडित लोकांसाठी घातक होऊ शकते आणि परिणामी स्वस्थ बालकांनादेखील हा आजार होऊ शकतो.





एक कोटींपेक्षा अधिक लोकसंख्येचे लाहोर यंदाच्या नोव्हेंबरमध्ये नवी दिल्लीला प्रदूषणाच्या बाबतीत मागे टाकत सर्वाधिक प्रदूषित शहर झाले. अर्थात, ही आकडेवारी आणि अहवाल अलीकडच्या दिवसांतील आहे. परंतु, पाकिस्तानमधील हवामान बदलविषयक घडामोडींचे निरीक्षण करणार्‍या विशेषज्ज्ञांपासून सामान्य माणसालादेखील पाकिस्तान व त्यातही विशेषत्वाने लाहोर परिसरात प्रदूषणाची समस्या किती मोठी झाली आहे, याची माहिती आहे. तथापि, दरवर्षी हिवाळा सुरु होताच पाकिस्तानमध्ये प्रदूषणविषयक चर्चांना जोर येतो. कारण, धूर आणि धुक्यामुळे दैनंदिन जनजीवन ठप्प होण्यापर्यंत प्रदूषणाची पातळी वाढते. सोबतच सरकारकडूनही प्रदूषणविरोधी उपायांचे दरवर्षीच्या विधीप्रमाणे सार्वजनिक प्रदर्शन सुरु होते.यंदाच्याच वर्षी पंजाब सरकारने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत म्हटले की, आम्ही ५००पेक्षा अधिक औद्योगिक आस्थापनांना ‘सील’ केले असून धूर पसरवणार्‍या वाहने आणि वीटभट्टीवर दणदणीत दंडात्मक कारवाई केली आहे. परंतु, जनतेच्या मते, लाहोरमधील वाढते वायूप्रदूषण सरकारच्या अपयशाव्यतिरिक्त काहीही नाही.
 
 
 
पाकिस्तानी अधिकारी लाहोरमध्ये वायूप्रदूषण आणि धूर-धुक्यासाठी औद्योगिक उत्सर्जन, वीटभट्ट्या आणि वाहनांतून निघणारा धूर, पीकांचे अवशेष व सामान्य कचरा जाळून टाकण्याला जबाबदार धरतात. तथापि, जगभरातील विविध देशांच्या प्रदूषणविषयक आकडेवारीनुसार पाकिस्तान एक टक्क्यांपेक्षाही कमी वैश्विक कार्बन उत्सर्जन करतो. परंतु, तो जगातील शीर्षस्थ सर्वाधिक हवामान-संवेदनशील देशांपैकी एक आहे. पाकिस्तानच्या बहुतांश पश्चिमेकडील प्रदेशात जंगल-वने नाहीत आणि विकासाच्या चढाओढीत उरलेल्या वनांचीदेखील बेसुमार कत्तल सुरु आहे. २०१९ मध्ये पाकिस्तानने २०२३ पर्यंत दहा अब्ज वृक्षारोपणाच्या उद्देशाने चार वर्षे चालणारे अभियान सुरु केले होते. परंतु, तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही या अभियानांतर्गत केवळ एक अब्ज वृक्षारोपणाचा टप्पाच गाठता आला.




जगभरात ‘कोविड-१९’ मुळे आर्थिक घडामोडी ठप्प पडल्या व यामुळे अस्थायी स्तरावर हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली. परंतु, या आधीच्या एका अध्ययनावरुन समजते की, जगभरात कोरोना विषाणूमुळे होणार्‍या सात ते ३३ टक्के मृत्यूंना दीर्घकालीन हवा प्रदूषणाशी जोडले जाऊ शकते. ‘आयक्यूएअर’ने काढलेल्या निष्कर्षानुसार, मानवनिर्मित हवा प्रदूषण घटवून या मृत्यूंना रोखले जाऊ शकते. परंतु, पाकिस्तान सरकार याबाबत कोणतीही सुधारक पावले उचलताना दिसत नाही. ‘सीपीईसी’ योजनेंतर्गत सर्वात मोठी बाब कोळशावर आधारित विद्युत प्रकल्पांच्या निर्मितीची आहे. उल्लेखनीय म्हणजे, जगभरात कोळसा आणि हायड्रोकार्बनवर आधारित इंधनाचा वापर कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, पाकिस्तानमध्ये त्याचा वापर वाढतच चालला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये प्रदूषणाचे प्रमाण निरंतर वाढतच जाईल. आज पाकिस्तानमध्ये पावसाचे प्रमाण सातत्याने कमी होत असून, इथल्या लोकसंख्येचा मोठा भाग पेयजलासाठी तळमळत आहे. बिघडलेल्या हवामान बदलाने पाकिस्तानमधील परिस्थिती आणखी खराब होण्याची संपूर्ण शक्यता आहे.



 
पाकिस्तान इस्लामी कट्टरपंथी, दहशतवाद आणि आर्थिक दिवाळखोरीसारख्या संकटांचा सामना करत आहे. परंतु, त्यांच्या तुलनेत स्वच्छ हवा व पाण्याच्या अभावामुळे पाकिस्तानमध्ये कित्येक पटींनी अधिक धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, त्यावर नियंत्रणासाठी पाकिस्तानकडे ना इच्छाशक्ती आहे ना कार्ययोजना. अशा स्थितीत पाकिस्तान आणि इथल्या जनतेची दशा नेमकी कशी होईल, याचे उत्तर भविष्यातच दडलेले आहे.


(अनुवाद : महेश पुराणिक)
@@AUTHORINFO_V1@@