एजंट स्नायपर? की मायकेल गोलेनिवस्की? की युवराज अलेक्सी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

Michael Goleniewski _1&nb
 
एवढा अभ्यास करुनही गोलेनिवस्कीच्या गुंतागुंतीच्या हेर कामगिऱ्यांचं संपूर्ण रहस्य उलगडलंय असं म्हणता येणार नाही. कारण, ब्रिटनच्या ‘एमआय ५’ या गुप्तहेर खात्याने गोलेनिवस्कीची फाईल टिम टेटला दिली नाही. त्यांच म्हणणं असं की, त्यातली माहिती इतकी संवेदनशील आहे की, ती खुली होणं आजही उचित ठरणार नाही.
पाश्चिमात्त्य संशोधक नको नको त्या विषयांवर सतत संशोधन करत असतात आणि ती विविध संशोधन पत्रिकांमधून प्रकाशितही करत असतात. यांतील शास्त्रीय आणि तांत्रिक संशोधन बाजूला ठेवूया. कारण, ती संशोधनं क्वचितच निरुपयोगी ठरत असतील. पण, साहित्य, इतिहास इत्यादी क्षेत्रांमधली संशोधनं कित्येकदा हास्यास्पद वाटावी अशी असतात. लिओनार्दो-द-विंची, शेक्सपियर आणि नेपोलियन हे लोक या संशोधकांना फार म्हणजे फारच आवडतात. लिओनार्दोने चितारलेली मोनालिसा ही नेमकी कोण होती, याबद्दल; आणि नेपोलियनचा मृत्यू नैसर्गिक होता की, त्याच्यावर विषपप्रयोग झाला होता; या विषयांना धरुन आतापर्यंत इतकी संशोधनं झाली आहेत की, त्या थोर लोकांना खरंच विष प्यावंसं वाटेल. सध्याची लेटेस्ट फॅशन म्हणजे काहीही करुन या तिघांना ‘गे’ ठरवणं अशी आहे.
 
पण, याखेरीज काही उपयुक्त संशोधनं म्हणजे विविध देशांची एकेकाळी गुप्त असणारीकागदपत्रं आता खुली झाल्यामुळे, त्यांचा होणारा अभ्यास आणि त्यातून उलगडणारी रहस्यं. प्रत्येक देशाची सरकारी कागदपत्रं ही काही ठराविक काळापर्यंत ‘क्लासिफाईड’ म्हणजे गुप्त असतात. त्या ठराविक मुदतीनंतर ती सर्वांना अभ्यासासाठी खुली म्हणजे ‘डी-क्लासिफाय’ केली जातात. पाश्चिमात्त्य देशांत अनेक अभ्यास-संशोधक अशा दस्तऐवजांचा नियमित अभ्यास करुन अनेक रहस्य उजेडात आणत असतात. भारतावर इंग्रजी राजवट असताना भारताचाकारभार पाहण्यासाठी ब्रिटिश केंद्रीय मंत्रिमंडळात ‘भारतमंत्री’ असं एक खास पद होतं. या भारतमंत्र्याचं कार्यालय म्हणजे ‘इंडिया ऑफिस.’ मध्य लंडनच्या ‘किंग चार्ल्स स्ट्रीट’वर हे कार्यालय १८५८ साली उघडण्यात आलं आणि १९४७ साली ते बंद करण्यात आलं. आज त्याचं इमारतीत ‘फॉरिन अ‍ॅन्ड कॉमनवेल्थ डिपार्टमेंटस्’ आहेत. इ. स. १६०० म्हणजे ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या स्थापनेपासून १९४७ म्हणजे इंग्रजांनी भारत सोडेपर्यंतची, म्हणजेच संपूर्ण भारतीय उपखंडाबाबतची सर्व अधिकृत कागदपत्रं या ‘इंडिया ऑफिस’च्या ग्रंथालयात होती. ती आता मध्य लंडनच्याच ‘यूस्टन रोड’वरील ‘ब्रिटिश लायब्ररी’ या अत्यंत सुसज्ज, प्रतिष्ठित आणि ख्यातनाम ग्रंथालयात हलवण्यात आलेली आहेत.
 
लंडनमध्ये अशी काही लायब्ररी आहे नि तिथे भारताबाबतची आत्यंतिक महत्त्वाची अशी अगणित कागदपत्रं नीट जतन करुन ठेवलेली आहेत, हे आम्हा भारतीय, हिंदू, मराठी माणसांना १९७७ नंतर समजलं. मुकुंद सोनपाटकी हा संशोधक तिथे,सावरकरांवर काय काय कागदपत्रं आहेत, याचा शोध घ्यायला गेला. तेव्हा त्याला तिथे नव्याने ‘डी-क्लासिफाय’ झालेली सावरकर विषयक बरीच कागदपत्रं मिळाली, त्यातून सावरकरांच्या ‘मार्सेलिस’च्या गाजलेल्या उडीबद्दल बरीच नवी माहिती उजेडात आली. त्याबद्दल मुकुंद सोनपाटकींनी लिहिलेल्या ‘दर्यापार’ या पुस्तकातून मराठी वाचकांना ‘इंडिया ऑफिस’ लायब्ररीबद्दल प्रथमच माहिती समजली. सोनपाटकी लिहितात की, त्या फाईल्समध्ये काहींवर स्पष्टपणे असं लिहून ठेवण्यात आलं आहे की, यातील कागदपत्रं कधीच खुली करु नयेत, अशी कोणती रहस्य असतील त्यात?
 
असो. अमेरिकेत नुकतीच मायकेल गोलेनिवस्की या इसमाबद्दलची काही कागदपत्रं खुली करण्यात आली आहेत. मायकेल गोलेनिवस्की हा पोलिश म्हणजे पोलंड देशाचा नागरिक सोव्हिएत गुप्तहेर खातं ‘केजीबी’चा हस्तक होता. प्रथम त्याने अमेरिकन हेरखातं ‘सीआयए’ला खुद्द सोव्हिएत रशिया, त्याचे पूर्व युरोपातले पोलंड, पूर्व जर्मनी, हंगेरी इत्यादी मांडलिक देश आणि पश्चिम युरोपातल्या ब्रिटन, फ्रान्स, पश्चिम जर्मनी इत्यादी लोकशाही राष्ट्रांमध्ये नाव बदलून वावरणारे ‘केजीबी’चे हेर यांची भरपूर माहिती पुरवली. मग १९६० साली अमेरिका आणि रशिया यांच्यातलं शीतयुद्ध अगदी कळसाला पोहोचलेलं असताना तो अमेरिकेत पळून आला. अमेरिकेने त्याचा जाहीरपणे खूप सन्मान केला. आत्तापर्यंत कुणीही न केलेली अशी कामगिरी म्हणजे, रशियाच्या असंख्य लष्करी गुपितांसह एकंदर १६९३ गुप्त हस्तकांची माहिती ‘सीआयए’ला पुरवल्याबद्दल त्यांच्यावर भरपूर लेख, अग्रलेख, कहाण्या लिहिण्यात आल्या. अशा उघडकीला आलेल्या गुप्तहेरांचं काय करतात माहितेय ना? शक्य असेल, तर गुप्तपणे निकाल लावला जातो. ते न जमलं, तर अटक करुन रीतसर खटला चालवून फासावर लटकावतात किंवा जन्मपेठेवर पाठवतात. यातलं काहीच न जमल्यास त्यांची त्यांच्या मायदेशी हकालपट्टी करतात.आपण अधनंमधनं बातम्या वाचतोना की, अमक्या देशाने, आपल्या राजधानीतीलतमक्या देशाच्या वकिलातील फलाण्या मुत्सद्यांनी ताबडतोब मायदेशी परतावं, असा आदेश काढला आहे, तोच हा प्रकार असतो. तर मायकेल गोलेनिवस्की याने तब्बल १,६९३ इतक्या मोठ्या संख्येने सोव्हिएत हेरांना पृथ्वीतलावरुन नाहीसं केलं किंवा घरी बसवलं.
 
या १,६९३ लोकांमध्ये काही फारच महत्त्वाची नावं होती. जॉर्ज ब्लेक, गॉर्डन लॉन्सडेल, पीटर आणि हेलन क्रोगर हे पती-पत्नी, हेन्झ फेल्थ, स्टिग वेन्नरस्ट्रॉम ही मंडळी नुसती गुप्तहेर नव्हती, तर गुप्तहेर जाळ्यांची निर्माती, संघटक आणि सूत्रसंचालक होती. यांनी वर्षांनुवर्ष एकेका पश्चिम युरोपीय लोकशाही देशात राहून तिथे अनेक हेरजाळी निर्माण केली होती. गोलेनिवस्कीच्या माहितीमुळे त्यांचं पितळ उघडं पडलं.गोलेनिवस्कीने स्वतःला नाव घेतलं होतं ‘हेकेनशुट्झ.’ या जर्मन शब्दाचा अर्थ होतो ‘स्नायपर’ म्हणजेच अचूक नेमबाजी करून हमखास सावज टिपणारा तरबेज शिकारी.गोलेनिवस्कीने ‘सीआयए’ आणि ब्रिटनच्या ‘एमआय ५’ इत्यादी गुप्तहेर खात्यांना मुबलक सावजं टिपून दिली. साहजिकच या खात्यांनी त्याचा ‘एजंट स्नायपर’ म्हणून गौरव केला. ‘सीआयए’ने त्याला अधिकृतपणे स्वसंरक्षणासाठी हत्यार दिलं. त्याची पहिली बायको जीवंत असतानाच त्याने अमेरिकेत दुसरं लग्न केलं. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं. पाश्चिमात्त्य देशात द्विभार्या प्रतिबंधक कायदा कडक आहे. लफडी कितीही करा, पण, दुसरं लग्न करायचं असेलं, तर पहिल्या बायकोला रितसर घटस्फोट (आणि अर्थातच पोटगी) दिल्याशिवाय करता येत नाही.
 
अशारीतीने १९६० पासून १९६३ पर्यंत गोलेनिवस्की हा अमेरिकेत ‘सीआयए’चं गुणी, लाडकं बाळ म्हणून मजेत राहत असतानाच एक विचित्र घटना घडली. १९६३च्या अखेरीस अनातोली गोलिस्तिन हा आणखी एक रशियन हेर अमेरिकेत पळून आला. त्याने अनेक गुप्तहेरांची नावं उघड केली. त्यातलं एक नाव ऐकून ‘सीआयए’ आणि ‘एमआय ५’चे अधिकारी फारच चकित झाले. गोलिस्तिनच्या म्हणण्याप्रमाणे ब्रिटनचा एक फारच नामवंत मजूर पक्षीय नेता हेरॉल्ड विल्सन हाच ‘केजीबी’चा खबऱ्या होता. शिवाय गोलिस्तिनच्या म्हणण्यानुसार, त्याच्या अगोदर अमेरिकेत आश्रय घेणारे हेर हे ‘केजीबी’ने मुद्दाम ‘सीआयए’ची दिशाभूल करण्यासाठी पाठवलेले लोक होते. यामुळे गोलेनिवस्कीकडे संशयाने पाहिलं जाऊ लागलं. त्याच्यावर नजर ठेवण्यात आली. त्यातच भर म्हणजे, मे १९६४ मध्ये गोलेनिवस्कीने एक नवीनच नाटक सुरू केलं. त्याने प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या की, ‘१९१८ साली कम्युनिस्ट क्रांतिकारकांनी झार राजकुटुंबाची कत्तल केली. त्यातून बचावलेला युवराज अलेक्सी निकोलायविच तो मीच!’ यामुळे सर्व पश्चिमी देशांमध्ये एकच खळबळ उडाली.
 
१९१७ साली साम्यवादी रशियात क्रांती झाली. सम्राट झार निकोलस, त्याची बायको आणि पाच मुलं यांना उरल पर्वताच्या पायथ्याशी एकॅतरिनाबर्ग इथे कैद करुन ठेवण्यात आलं. तिथेच जुलै १९१८ मध्ये त्यांना साम्यवाद्यांनी सरळ गोळ्या घातल्या यापैकी अनास्ताशिया ही राजकन्या बचावलीआणि ती म्हणजे आपणच असा दावा करणाऱ्या काही बायका नंतर पुढे आल्या. पण, कुणीही हे सिद्ध करु शकल्या नाहीत. यावर हॉलीवूडने १९५६ साली ‘अनास्ताशिया’ हा सुंदर चित्रपट, १९७२ साली दिग्दर्शक मोह सहगलने ‘राजा जानी’ हा हिंदी चित्रपट आणि १९८८ साली प्र. ल. मयेकरांच ‘रमले मी’ हे मराठी नाटक येऊन गेलंय. असो. तर मायकेल गोलेनिवस्कीने आता आपण त्या कत्तलीतून वाचलेले झारपुत्र अलेक्सी आहोत, असा दावा केला. परंतु, ‘सीआयए’ आणि अन्य गुप्तचर संस्थांच्या संशोधनात तो टिकला नाही. यातून घडलं ते एवढंच की, ‘सीआयए’ने गोलेनिवस्कीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली.यामुळे त्याचं मनःस्वास्थ्य बिघडत जाऊन तो पूर्ण वेडा झाला आणि अखेर त्याच स्थितीत १९९३ साली मरण पावला. पण, शेवटपर्यंत तो हेच म्हणत होता की, ‘मीच युवराज अलेक्सी आहे आणि रशियन राजघराण्याची भरपूर मालमत्ता अमेरिकन बँकांमध्ये आहे. ती ‘सीआयए’ने मला मिळू दिली नाही.’
 
आता टिम टेट या पत्रकाराने मायकेल गोलेनिवस्कीवर ‘एजंट स्नायपर’ नावाचं पुस्तकच लिहिलं आहे. त्यात त्याने ‘सीआयए’ने खुली केलेली कागदपत्रं पोलिश सरकारच्या गुप्तहेर खात्याची कागदपत्रं आणि स्वतः गोलेनिवस्कीची तब्बल ११०० कागदपत्रं यांचा वापर केला आहे. एवढा अभ्यास करुनही गोलेनिवस्कीच्या गुंतागुंतीच्या हेर कामगिऱ्यांचं संपूर्ण रहस्य उलगडलंय असं म्हणता येणार नाही. कारण, ब्रिटनच्या ‘एमआय ५’ या गुप्तहेर खात्याने गोलेनिवस्कीची फाईल टिम टेटला दिली नाही. त्यांच म्हणणं असं की, त्यातली माहिती इतकी संवेदनशील आहे की, ती खुली होणं आजही उचित ठरणार नाही. अशी कोणती बरं रहस्य असतील त्यात?
@@AUTHORINFO_V1@@