भारत-रशिया आणि राजकारण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2021   
Total Views |

PM _1  H x W: 0


भारत आणि रशिया हे जागतिक राजकारणातील दीर्घकाळपासूनचे मित्रराष्ट्र. भारताचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय हितांना सर्वोच्च प्राधान्य देणे या सर्व कसोट्यांवरही भारत-रशियाचे संबंध हे कायमच टिकून राहिलेले आहेत.



बदलत्या परिस्थितीनुसार भारताचे प्राधान्य बदलते राहिले. मात्र, त्याचा परिणाम भारत-रशिया संबंधांवर झाल्याचे चित्र नाही. अर्थात, अनेकदा भारत-रशिया संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चा होत असते. मात्र, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौर्‍यानंतर त्या चर्चांनाही आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे जागतिक राजकारणामध्ये भारत आणि रशियाच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त झालेले दिसते.


 
आगामी काळामध्ये आशियामधील चीनच्या वाढत्या वर्चस्वाला लगाम घालणे हे भारताचे प्राथमिक उद्दिष्ट असणार आहे. बहुध्रुवीय जग आणि बहुध्रुवीय आशिया हेच सर्वांच्या हिताचे आहे. अर्थात, रशिया याचे समर्थनच करेल आणि त्यासाठी प्रयत्नही करेल, अशी अपेक्षा करण्यात हरकत नाही. रशियाच्या दृष्टीने अमेरिका हा एक महत्त्वाचा प्रतिस्पर्धी आहे. चीनचा प्रभाव कमी झाला, तर अमेरिकेचे वर्चस्व वाढेल अशी काहीशी गणिते रशिया जुळवताना दिसतो आहे. त्यामुळे चीनच्या प्रभावाला रशियाकडून तितकासा विरोध होईल किंवा केला जाईल असे वाटत नाही. भारत आणि रशिया यांचे हित वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असेल तरी बहुध्रुवीय जगासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न केला जाईल.
 
 
 
दोन्ही देशांमधील धोरणात्मक वारसा हा दोन्ही देशांना जोडून ठेवणारा महत्त्वाचा दुवा आहे. सध्या घडत असलेल्या जागतिक घडामोडींमध्ये भारत व रशिया हे सक्रिय घटक आहेतच. पण, यासोबतच या सर्व घडामोडींचा सखोल परिणाम या देशांवरही दिसून येत आहे. चीनचे वर्चस्व मान्य करून चीनचा कनिष्ट भागीदार होणे रशियाने मान्य करू नये, अशीच भारताची अपेक्षा राहणार आहे. स्वतःच्या फायद्यासाठी चीनसारख्या देशाशीही मतभेद झाल्यास मागे न हटण्याचा स्वतंत्र बाणा रशियाने दाखवावा, असे भारताला वाटते. याच कारणासाठी या द्विपक्षीय संबंधांमध्ये गुंतवणूक करण्यास भारत प्रयत्नशील आहे.
 
 
काही धोरणात्मक प्रश्नांची उत्तरे भारताने मात्र शोधण्याची गरज आहे. त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न पुढीलप्रमाणे - ज्याप्रमाणे आपण ‘मेक इन इंडिया’मध्ये रशियाचा सहभाग वाढवण्यासाठी उत्सुक आहोत, त्याच पार्श्वभूमीवर रशियाच्या अतिपूर्वेकडीलप्रदेशामध्ये, तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपण तयार आहोत का? भारत आणि रशियातील नातेसंबंधांसाठी यापेक्षा मजबूत पाया असू शकत नाही. या दोन्ही देशांनी परस्परांमधील अफगाणिस्तान आणि ‘इंडो-पॅसिफिक’ अशा आव्हानात्मक बाबींवर मात करणे गरजेचे आहे.
 
 
संरक्षण हा दोन्ही देशांमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा. सन २०२० पर्यंत भारतीय सशस्त्र दलाच्या यादीत रशियन प्रणाली, शस्त्रास्त्रे आणि उपकरणे यांचा सुमारे ६० टक्के वाटा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रास्त्रांची आयात करण्यास व ती वाढवण्यास भारत उत्सुक आहे आणि याच पार्श्वभूमीवर रशिया हा एक महत्त्वाचा भागीदार देश आहे. आधीपासून आपल्याकडे असलेली शस्त्रास्त्रे अद्ययावत करण्यावर पुढील काळात अधिक भर देण्यात येईल. अर्थात, इतर नवीन पर्यायही उपलब्ध आहेतच. यामध्ये ‘एस-४००’ क्षेपणास्त्र करार (यावर्षी त्याच्या पहिल्या टप्प्याचे वितरण केले जाईल); ११३५.६ फ्रिगेट्सच्या चार प्रकल्पांचे उत्पादन; ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत जगातील सर्वात प्रगत एक ‘२०३ असॉल्ट रायफल’ची निर्मिती; ‘टी ९० एस’, ‘सुखोई ३० एमकेआय’, ‘मिग २९’, ‘मँगो’ आणि ‘व्हीएसएचओआरएडी’ प्रणालीचे वितरण यांचा समावेश असेल.
 
 
त्यासोबतच दोन्ही देशांमधील एकत्रित युद्ध सरावांची संख्याही वाढवण्यात आली आहे. रशियामधील राजदूत डीबी व्यंकटेश वर्मा यांनी पद सोडताना एक बाब निदर्शनास आणून दिली आहे की, दोनही देश वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात, त्यामध्ये लष्कराची जलद हालचाल आणि ही हालचाल अधिक सुलभ, वेगवान होण्यासाठी उपयुक्त वाहतूक सुविधा, आधुनिक युगामध्ये ड्रोन प्रणालीचा वापर, सायबर हल्ल्यांचा प्रभाव कमी करणे व त्यांच्यावर उपाय शोधणे यांचा समावेश आहे. परिणामी, भारत आणि रशिया यांच्यातील परस्परांबाबतचे आकलन आणि समन्वय वाढण्यासाठी बराच वाव आहे, हे मात्र नक्की!



@@AUTHORINFO_V1@@