दामिनी आणि वैभवीचे यश प्रेरणादायी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Nov-2021   
Total Views |
Damini Topale _1 &nb
 
 
 
 
विवेकानंद केंद्र प्रशिक्षण व सेवा प्रकल्प त्र्यंबकेश्वरपासून चार किलोमीटर जव्हारवरील फाट्यावर असलेल्या पिंपळद येथे आहे. गेली सुमारे २५ वर्षं, या प्रकल्पामार्फत आरोग्य सेवा, स्वयंरोजगार मार्गदर्शन, शेती जलव्यवस्थापन व व गोसंवर्धन इत्यादी उपक्रम राबविले जातात. तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात.
 
 
विवेकाश्रम या वसतिगृहात ३० मुलं आणि २० मुलींची व्यवस्था होऊ शकते. त्र्यंबकेश्वरपासून २५ किमीपर्यंतच्या गाव आणि पाड्यांतील मुलांना येथे प्रवेश मिळतो. वसतिगृहात मुख्यतः वनवासी आणि भटक्या-विमुक्त समाजाची मुलं राहतात. आपल्या गावांमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण करून ती त्र्यंबकेश्वर येथे माध्यमिक शिक्षणासाठी येतात. वसतिगृहाकडून वार्षिक ५०० रुपये इतके नाममात्र शुल्क आकारून त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था केली जाते. केंद्रात सेवाव्रती आणि वानप्रस्थी म्हणून अशा भूमिकांतून काम करणार्‍या कार्यकर्त्यांकडून मुलांचा गृहपाठ, उजळणी व्यतिरिक्त मुलांसाठी खेळ आणि संस्कारवर्गाचे आयोजन करण्यात येते.
 
 
सुमारे तीन वर्षांपासून शेखर सहाणे आणि आनंद अभ्यंकर हे कार्यकर्ते आठवड्यातून एक दिवस स्वखर्चाने पिंपळद येथे येऊन मुलांना तीन तास ज्युडोचे प्रशिक्षण देतात. केवळ प्रशिक्षणच नाही, तर दर आठवड्याला मुलांसाठी खाऊदेखील घेऊन येतात. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आठवड्याचे उरलेले सहा दिवस ही मुलं स्वतःचा सराव करतात. ज्युडोचे वर्ग सुरू केल्यापासून पहिल्याच वर्षी एका मुलीला राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळाले. गेल्या वर्षी ‘कोविड’मुळे स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. गेल्या दीड वर्षांतील बहुतांश काळ, ही मुलं ‘कोविड-१९’च्या संकटामुळे स्वतःच्याच घरी अडकून पडली होती.
 
 
 
या वर्षी विवेकाश्रमच्या गणेश वाघेरे, उत्तम महाले, रोशन बेंडकोळी, गायत्री राऊत, रूपाली भोये, वैभवी आहेर आणि दामिनी टोपले या सात मुलांची राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धांसाठी निवड झाली. संस्थेत सेवाव्रती म्हणून कार्यरत सुधा जोगळेकर यांच्यासोबत ही मुलं २८-३१ ऑक्टोबर दरम्यान सांगली येथे गेली होती. या वर्षीच्या स्पर्धांमध्ये सबज्युनियर वर्गात २८ किलो वजनी गटात सातवीत शिकणार्‍या वैभवी आहेरला सुवर्णपदक मिळाले, तर उत्तम महालेला कांस्य पदक मिळाले. ३० किलो वजनी गटात आठवीत शिकणार्‍या दामिनी टोपलेला सुवर्णपदक मिळाले. नाशिक जिल्ह्याला राज्यात सर्वाधिक म्हणजे पाच सुवर्णपदकं मिळाल्यामुळे ‘करंडक’ मिळाला. वैभवी आणि दामिनी १० नोव्हेंबर रोजी पंजाबमधील लुधियाना येथे पार पडणार्‍या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत.
 
 
वैभवी त्र्यंबकेश्वरपासून सुमारे दहा किमी अंतरावर असणार्‍या धुमोडी गावात राहणारी असून, उत्तम आणि दामिनी राजेवाडी गावात राहतात. दामिनीच्या घरची परिस्थिती हलाखीची असून, तिचे आई-वडील उपजीविकेसाठी शेतमजुरी करतात. मुलांना पोटभर जेवायला मिळावे म्हणून तिची आई आठवड्यातून चार दिवस उपास करते. आर्थिक आणि आरोग्यविषयक अडचणींवर मात करून या मुलांनी संपादित केलेल्या यशाचे कौतुक आहे.
 
 
 
द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली, स्व. एकनाथजी रानडेंच्या अथक प्रयत्नांमुळे आणि लाखो भारतीयांच्या आर्थिक योगदानातून कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंदांचे भव्य शीलास्मारक उभे राहिले. राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी केवळ दगड-विटांचे स्मारक पुरेसे नाही, तर त्यासाठी देशाचे भविष्य असलेल्या तरुण-तरुणींना घडविणे आणि त्यांना मानवसेवेसाठी प्रेरित करणे, या हेतूने ७ जानेवारी, १९७२ रोजी कन्याकुमारी येथे विवेकानंद केंद्राची स्थापना झाली. पुढच्या वर्षी या घटनेला ५० वर्षं पूर्ण होत आहेत. आज २८ राज्यांमधील एक हजारहून जास्त ठिकाणी केंद्राचे काम चालले आहे. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश आणि आसामसारख्या राज्यांमध्ये शाळा आणि वसतिगृहांच्या माध्यमातून केंद्राने तेथील जनतेसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिले आहेत. या भागातील तरुणांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे काम केंद्राद्वारे केले जात आहे.
 
 
 
गेल्या काही वर्षांमध्ये भारत क्रीडा क्षेत्रात खूप झपाट्याने पुढे येत आहे. पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असलेल्या हरियाणा किंवा एकेकाळी दहशतवाद आणि अस्थैर्याने ग्रासलेल्या मणिपूरसारख्या राज्यांनी क्रीडाक्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. या राज्यांतील महिला क्रीडाक्षेत्रात आज पुरुषांच्या दोन पावलं पुढे गेल्या आहेत. महाराष्ट्रात वनवासी तसेच भटक्या विमुक्त समाजाची संख्या लक्षणीय आहे. या समाजातील मुलांमध्ये अंगभूत क्षमतेची कमी नाही. या क्षमतेला पोषक आहार, प्रशिक्षण आणि प्रोत्साहनाची जोड मिळाल्यास या भागातील मुलं क्रीडाक्षेत्रात राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा झेंडा रोवू शकतात.
 
 
 
नाशिक जिल्ह्यातील सावरपाडा गावातील वनवासी समाजातील कविता राऊतने अर्ध मॅरेथॉनमध्ये २०१० सालच्या राष्ट्रकूल स्पर्धांमध्ये कांस्यपदक जिंकून आणि एशियाड स्पर्धांमध्ये रौप्य पदक जिंकून या भागाला क्रीडाक्षेत्रात देशाच्या नकाशावर आणले. आजही कविताने प्रस्थापित केलेला राष्ट्रीय विक्रम कोणी मोडू शकलेले नाही. कविताच्या यशामुळे या भागातील लोकांचा क्रीडाक्षेत्राकडे बघण्याचा आणि खासकरून मुलींच्या त्यातील सहभागाबद्दलचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणावर बदलला. असे असले तरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेत्यांची फळी उभारण्याच्या दृष्टीने सरकार आणि समाजाकडून बर्‍याच अपेक्षा आहेत.
 
 
 
शेखर आणि आनंददादांनी सेवाभावी वृत्तीने पिंपळद येथे ज्युडो प्रशिक्षणवर्ग सुरू केले असता पहिल्याच वर्षी केंद्राच्या विद्यार्थिनीला राज्यपातळीवरील स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळणे आणि ‘कोविड-१९’ च्या परिस्थितीत पुढील वर्षी दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक मिळणे, हे जसे या मुलांच्या अंगभूत कौशल्यांचे निदर्शक आहे, तसेच केंद्राचे अध्यक्ष जयंतराव दीक्षित आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या समर्पित वृत्तीचेही आहे. या भागातील मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहात एका चांगल्या क्रीडा प्रशिक्षण केंद्राची निर्मिती व्हायची आणि येथील उदयोन्मुख क्रीडापटूंना अधिक चांगल्या सुविधा मिळायच्या, तर त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. संस्थेला मदत करण्यासाठी बँक खाते आणि संपर्क क्रमांक लेखाच्या शेवटी दिले आहेत. ज्युडो राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निघालेल्या वैभवी आणि दामिनीसह अन्य विद्यार्थ्यांना खूप खूपशुभेच्छा.
 



 
Bank Details : -
 
A/c Name : Vivekananda Kendra Prashikshan Va Seva Prakalpa.
 
Bk Name: IDBI Bk Ltd.
 
Sathe Baug, M.G.Rd Nasik 422001.
 
SB Bk A/c. A/c no.458104000015604
 
IFSC IBKL0000458,
 
MICR 422259003
@@AUTHORINFO_V1@@