‘डर से नही, दिल से...’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2021   
Total Views |

gamdhi_1  H x W



‘दिल से नही, डर से...’ केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर मनापासून नव्हे, तर भीतीने कमी केले, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. लालू यादव आणि संजय राऊत यांचे एकंदर वाक्चातुर्य आणि विचार इतके सारखे आहेत की, दोघेही असेच ‘कब के बिछडे’ भावंड वाटतात. या दोघांनीही असेच वक्तव्य केले की, पाच-दहा रुपये कमी करून काय होणार?



 वगैरे... तसेही भाजपप्रणित केंद्रीय सत्तेविरोधात केवळ आणि केवळ टीका करण्यात या सर्व विरोधी पक्षाची सात वर्षे वाया गेली. या सगळ्या कालावधीमध्ये आपल्या देशाची जागतिक स्तरावर कीर्ती उंचावली. आपण पाकिस्तान किंवा चीनसारख्या पारंपरिक शत्रुराष्ट्रांना त्या त्या स्तरावर मात दिली. औद्योगिक क्षेत्रात, विदेशीनीतीमध्ये देशाने नेत्रदीपक यश मिळवले. पण, याबाबत ‘ब्र’ही न काढता पेट्रोल-डिझेलचा दर दहा-पाच पैशांनी तरी वाढला तरी आकाश-पाताळ एक करणारे लोक, जणू काही कांद्याशिवाय आणि डाळीशिवाय काही दुसरे खातच नाही, अशा अविर्भावात कांद्याचा, डाळीचा भाव थोडा जरी वाढला, तरी टाहो फोडणारे लोक. हे लोक याच गोष्टींचा भाव कमी झाल्यावर कुठे जातात? पेट्रोल-डिझेलचा दर वाढला वाढला, असे म्हणत कंठशोष करणार्‍यांनी आता पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यावर काय प्रतिक्रिया दिल्या? आता या लोकांनी पेट्रोल-डिझेल वगैरे वापरायचे सोडले का? अर्थात, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे आणि न पटणार्‍या निर्णयावर बोलायचा हक्कही आहे. पण, जेव्हा या अशा लोकांच्या समर्थनार्थ निर्णय होतो तेव्हाही हे लोक असंतुष्टच असतात. याच लोकांचे नेतृत्व प्रियांका आणि संजय राऊत तसेच लालू यांसारखे लोक करतात. कोरोनाकाळात जनतेने यांना पाहिले. त्यावेळीही मोदींनी, भाजप केंद्र सरकारने हे करावे, ते करावे असे हे लोक म्हणत राहिले. पण, त्यांच्या सत्ताधारी राज्यात मात्र यांनी काहीच केले नाही. यांचे सरकार महाराष्ट्रात आल्यापासून सगळ्याच योजना आणि कामाला स्थगिती आहे. कोरोना आणि येणार्‍या प्रत्येक पूर, दुष्काळ, वादळाबद्दल यांचे सरकार केंद्र सरकारकडून ‘पॅकेज’ मागते. आता वेळ आली आहे की, महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे भाव चांगले ५० रुपयांनी कमी करून दिवाळीनिमित्त जनतेला ‘पॅकेज’ द्यावे आणि मग बोलावे ‘डर से नही दिलसे...!’



क्षुद्र जंतुत्व!



प्रभू रामचंद्रांची अयोध्या दिवाळीनिमित्त १२ लाख दिव्यांनी उजळून निघाली. त्यात ३६ हजार लीटर मोहरीचे तेल वापरले गेले. बापरे! त्या दिव्यांना किती पैसे खर्च झाले. गरिबांना इथे भाकरी मिळत नाही आणि हे दिवे का लावले? असे म्हणत सध्या काही लोकांचे रडगाणे सुरू आहे. ही तीच मंडळी आहेत, ज्यांना वर्षभराच्या प्रदूषणाने नाही, तर दिवाळीमधल्या पाच दिवसांत फोडल्या जाणार्‍या फटाक्यांनी दमा आणि भयंकर श्वसानाचा त्रास होतो. हे तेच लोक, ज्यांना वर्षभर वाया जाणार्‍या पाण्याबद्दल काहीच देणेघेणे नसते. मात्र, होळी आली की यांची पर्यावरणाची जाण जागृत होते. थोडक्यात, कोणतीही हिंदू सांस्कृतिक परंपरा जपण्याचा क्षण आला की, यांना मस्तकशूळ, पोटशूळ आणि कसले कसले शूळ उठतात.



१२ लाख दिवे लावल्याने तेल वाया गेले? पण, १२ लाख दिवे कुण्या दिवे बनवणार्‍यांकडून विकतच घेतले असतील ना? 36 हजार लीटर मोहरीचे तेल म्हणे वाया गेले? तेसुद्धा कुठेतरी बनले असेल? कुण्या शेतकर्‍याच्या शेतात मोहरी पिकली असेलच ना? की हे ३६ हजार लीटर तेलही आकाशातून आले का? हे दिवे तयार करणार्‍या, हे तेल काढणार्‍या प्रक्रियेत असणारे, यांना अपेक्षित नफा झाला असेलच ना? पण, हा विचार या ‘रडतराऊतां’ना (‘रडतराऊत’ हा शब्दप्रकार आहे, नाहीतर कुणाला ते दिव्यदृष्टीवाले राऊत वाटतील!) का पडत नाही? यांना गरीब समाजबांधवांचा पुळका कमी आणि हिंदू प्रथा-परंपरांचा द्वेष जास्त आहे. बरे यांच्या वैयक्तिक आयुष्यात हे सगळे या परंपरा-प्रथा पाळत असतातच. पण, हिंदू धर्म, सण उत्सव आणि श्रद्धा यांना मानणे म्हणजे काही पापच आहे, असे हे सार्वजनिक जीवनात आव आणतात. तो आव कुणासाठी कशासाठी? हे सगळ्या भारतीयांना माहिती आहे. कोरोना काळात सगळा देश आपापल्या घरात कैद झाला. त्यावेळी प्रत्येकामध्ये भयंकर एकटेपणा आला. ‘मी एकटाच आहे’ अशी असुरक्षितता मनात निर्माण झाली. त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून जनतेने थाळी वाजवली. ‘कोरोना योद्ध्यां’च्या सन्मानार्थ दीप प्रज्वलित केले. त्यावेळीही याच लोकांना भारी प्रश्न पडले होते. पण, जनतेने यांच्या प्रश्नांना भीक घातली नाही. आता या चिंतातुर जंतूंना रामललांच्या मंदिरामधल्या रोषणाईबद्दल चिंता वाटते. पण, जनतेला यांचे क्षुद्र जंतुत्व माहिती आहे.




- योगिता साळवी




















@@AUTHORINFO_V1@@