उल्हासनगर : भाजपचे माजी नगरसेवक आणि पक्षाचे ‘कोअर कमिटी’सदस्य प्रकाश माखीजा यांच्या कार्यालयाची शनिवारी तोडफोड करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी गुंड जग्गु सरदार उर्फ जगदीश लबाना याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर-२ येथील सोनार गल्ली परिसरात प्रकाश माखीजा यांचे संपर्क कार्यालय आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जगदीश लबाना या ठिकाणी आला आणि त्याने कार्यालयाबाहेर असलेले दुचाकी वाहने पाडून कार्यालयाच्या काचा फोडल्या. यावेळी कार्यालयात बसलेल्या माखीजा यांचा सहकारी धीरज चंचलानी याला प्रकाश माखीजा कुठे आहे, असे विचारून पाच हजार रुपयांची मागणी केली.
धीरज यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर रागाच्या भरात जगदीश लबाना याने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच महिला कर्मचार्यांनादेखील धक्काबुक्की केली. कार्यालयाच्या बाहेर जाताना लबाना याने मला दर महिन्याला पाच हजार हफ्ता द्यावा लागेल, नाहीतर तुमचे हातपाय तोडून टाकेल, अशी धमकी दिली.दरम्यान, जगदीश लबाना हा सराईत गुंड असून त्याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.या प्रकरणी धीरज चंचलानी यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी आरोपी जगदीश लबाना याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी. एस. चव्हाण हे करीत आहेत.