सिंधुदुर्ग-कर्नाटकातील वाघांचा गोव्यात आसरा; तिन्ही राज्यात समन्वयाचा अभाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2021   
Total Views |
tiger_1  H x W:



मुंबई (अक्षय मांडवकर) - सह्याद्रीतील व्याघ्र अधिवासाचे संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्याच्या वन विभागाने संयुक्त व्यवस्थापनाने काम करणे आवश्यक झाले आहे. कारण, महाराष्ट्रातील वाघिणीने (sahyadri tiger) आणि कर्नाटकातील वाघाने गोव्याच्या म्हादई अभयारण्यात स्थलांतर केल्याचे समोर आले आहे. परिणामी या वाघांचे (sahyadri tiger) संरक्षण आणि तिन्ही राज्यातील व्याघ्र अधिवास अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने समन्वय होणे आवश्यक आहे.


'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'मध्ये मे, २०१८ मध्ये कॅमेराबद्ध झालेला नर वाघ (sahyadri tiger) मे, २०२० मध्ये कर्नाटकातील 'काली व्याघ्र प्रकल्पा'त आढळून आला होता. 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'मधील वाघ दक्षिण भारतामध्ये स्थलांतर करत असल्याचा तो पहिलाच पुरावा होता. परिणामी पश्चिम घाटामध्ये अस्तित्त्वात असलेल्या व्याघ्र भ्रमणमार्गाचे महत्त्वही लक्षात आले होते. त्यानंतर तिलारी खोऱ्यात २०१८ साली कॅमेऱ्यात छायाचित्रित केलेली 'TT 7' ही वाघिणी (sahyadri tiger) ३० जून, २०२१ रोजी गोव्यातील 'म्हादई अभयारण्या'मध्ये आढळून आली होती. त्यानंतर आता कर्नाटकातील भीमगड अभयारण्यातील एक नर नुकताच म्हादई अभयारण्यात आढळून आला आहे. २०१५ साली भीमगड अभयारण्याचे तत्कालीन मुख्य वनसंरक्षक विजय मोहन राज यांनी या नर वाघाचे (sahyadri tiger) छायाचित्र आपल्या समाजमाध्यमावर प्रसिद्ध केले होते. त्यावेळी हा वाघ साधारण दोन वर्षाचा होता. नुकतेच या वाघाचे पौढावस्थेतील छायाचित्र म्हादई अभयारण्यातून प्रसिद्ध झाले आहे.


भीमगडमध्ये मोहन राज यांनी कॅमेराबद्ध केलेला नर वाघ (sahyadri tiger) हा म्हादईमध्ये स्थलांतर झाल्याची पुष्टी दोन्ही छायाचित्रांमधील वाघाच्या अंगावरील पट्ट्यांची रचना तपासून सह्याद्रीमध्ये व्याघ्र अधिवासावर संशोधन करणारे गिरीश पंजाबी यांनी केली आहे. त्यामुळे कर्नाटकातील वाघ आणि महाराष्ट्रातील वाघिणी (sahyadri tiger) सद्यपरिस्थितीत म्हादई अभयारण्यात कायमस्वरुपी वास्तव्यास असल्याचे त्यांनी सांगितले. म्हादई अभयारण्यात सध्या एक नर आणि दोन मादी वाघिणींचा अधिवास आहे. जानेवारी, २०२० मध्ये म्हादई अभयारण्यात चार वाघांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर सद्यपरिस्थितीत या अभयारण्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकातून स्थलांतरित झालेल्या वाघांचा (sahyadri tiger) संरक्षणाचा मुद्दा अधोरेखित झाला आहे. त्यामुळे पश्चिम घाटातील व्याघ्र अधिवास अबाधित राखण्यासाठी तिन्ही राज्यांमध्ये वाघांचे स्थलांतर आणि संरक्षणाच्या अनुषंगाने समन्वय आणि व्यवस्थापन असण्याची गरज निर्माण झाली आहे.




व्यवस्थापन आवश्यक
सद्यपरिस्थितीत सह्याद्रीतील व्याघ्र स्थलांतर आणि त्यांच्या संरक्षणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यांमध्ये कोणत्याही प्रकारची बातचीत होत नाही. तिन्ही राज्याअंतर्गत स्थलांतरित होणाऱ्या वाघांची माहिती ही राज्ये एकमेकांना देत नाहीत. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांच्या आधारेच संशोधकांना आपआपल्या राज्यातील वाघांची ओळख पटवावी लागते. शिवाय सीमालगतच्या भागातील लोकं राज्याअंतर्गत शिकार करण्यासाठी भटकताना दिसतात. अशा परिस्थितीत तिन्ही राज्यांच्या वनविभागांमध्ये समन्वय साधून संशोधन आणि वन्य गुन्हेगारी संदर्भातील माहितीची देवाणघेवाण करण्याची आवश्यकता असल्याची गरज पंजाबी यांनी मांडली आहे. असे घडल्यास सह्याद्रीतील वाघांची संख्या वाढण्यास मदत होईल.





@@AUTHORINFO_V1@@