
अमित शहा येत्या २६ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात दोन जाहीर कार्यक्रमांबरोबरच अमित शहा महानगरपालिकेलाही भेट देणार आहेत. त्याचबरोबर आता अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहर भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावाही आयोजिण्यात आला आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्र येथे होणाऱ्या या मेळाव्याला अमित शहा यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, विद्यमान आमदारांसह भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.''या मेळाव्याच्या तयारीच्या दृष्टीने शहर भारतीय जनेता पक्षाने जय्यत तयारी सुरू केली असून यासाठी शहर भाजप पदाधिकाऱ्यांची विविध व्यवस्था आणि नियोजन बैठकही घेण्यात आली आहे . आजपासून (१८ नोव्हेंबर) चार दिवस मंडलनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये स्थानिक आमदार, मंडल अध्यक्ष, शहर पदाधिकारी आणि नगरसेवक मार्गदर्शन करतील. त्यानंतर चार दिवसांत मंडलनिहाय पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख आणि बूथ समिती सदस्यांच्या बैठका होणार आहेत,' अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आज दिली.