मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2021   
Total Views |
 
Bhai-Jagtap-Zeeshan_d_1&n
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केलेल्या मुंबई काँग्रेस मधील अंतर्गत बंडाळी दिवसेंदिवस अधिकाधिक उफाळून येत आहे. मुंबई काँग्रेसच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात हे अंतर्गत वाद स्पष्टपणे उघड झाले. काँग्रेस नेते व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्यात जोरदार वाक्युद्ध रंगले होते. सिद्द्दीकी आणि जगताप यांच्यात झालेल्या या वादाची चित्रफीत समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल झाली आहे. दरम्यान, जाहीरपणे रंगलेल्या या मानापमान नाट्यामुळे मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
 
 
 
पेट्रोल, डिझेलचे दर आणि इतर काही मुद्द्यांवरून मुंबई काँग्रेसतर्फे नुकतेच मुंबईत एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाला काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मात्र आंदोलनाच्या दरम्यान काही कारणांवरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप आणि आ.झिशान सिद्दीकी यांच्यात वादाला सुरुवात झाली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजगृह या निवासस्थानात प्रवेश करण्यावरूनही मोठे नाराजीनाट्य बघायला मिळाले.
 
 
 
भाई जगतापांची सारवासारव
“झिशान सिद्दिकी तरुण आहेत. बाबासाहेबांच्या घरी जाण्यासाठी जी यादी पाठविण्यात आली होती, त्यात केवळ दहा जणांचा समावेश होता. त्यात तुमचे नाव नाही हे सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो. तो आमचा आमदार आहे. मात्र, त्या यादीत आपले नाव नसल्याने त्याला वाईट वाटले. मात्र हा आमचा अंतर्गत विषय असून आमच्यात कुठलाही वाद नाही,” अशी सारवासारव करत आ.भाई जगताप यांनी या वादावर पडदा पडण्याचा प्रयत्न केला.
 
 
 
सिद्दिकींची नाराजी
तसेच या वादावर आमदार झिशान सिद्दिकी यांनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. “राजगृहावर जाण्यासाठी १२ लोकांची यादी करण्यात आली होती. ज्यांची नावे होती ते आत गेले. बाकी आम्ही मात्र बाहेर होतो. आमच्यात कोणताही वाद नाही. आम्ही सर्व एकसाथ आहोत. भाई जगताप म्हणतात राजगृहामध्ये 10 व्यक्तींनाच परवानगी होती. मी मुंबई युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष, आमदार असूनही माझे नाव नव्हते. कदाचित त्यांना ते महत्वाचे वाटत नसावे," या शब्दांत आ. झिशान सिद्दिकी यांनी घडलेल्या प्रकारावर आपली नाराजी व्यक्त केली.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@