मुंबईच्या राजकीय युद्धात नवा बॉम्ब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2021   
Total Views |
 
bmc_1  H x W: 0
 
 
 
मुंबई : आशिया खंडातील आर्थिकदृष्ट्या वजनदार समजल्या जाणाऱ्या आणि महाराष्ट्रासह देशभरातील आर्थिक घडामोडींचे केंद्रस्थान असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा अवकाश आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये होऊ घातलेल्या या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून तयारी सुरु केली आहे. एकीकडे आरोप प्रत्यारोपांचे तोफगोळे फुटत असताना दुसरीकडे मात्र बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर फुटलेल्या बॉम्बमुळे शहराचे राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रभाग संख्येत नव्या ९ प्रभागांची वाढ करण्याचा निर्णय बुधवार, दि. १० नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. मात्र सरकारने घेतलेल्या या निर्णयावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने कडाडून टीका केली आहे. त्यामुळे मुंबईच्या राजकीय रणांगणावर पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा "सामना" रंगण्याची शक्यता आहे.
 
 
 
हा तर रडीचा डाव ; येणार तर फक्त भाजपच’- आ. अतुल भातखळकर
 
"मागील पंचवीस वर्षाच्या काळात केलेला शिवसेनेने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत मुंबईला खड्ड्यात घालण्याचे काम केलेले आहे. यातून शिवसेनेला आपला पराभव डोळ्यासमोर दिसत आहे. त्यामुळे त्यांनी भयभीत होऊन निवडणूक तोंडावर असताना महापालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे ठाकरे सरकार रडीचा डाव टाकत आहे, अशी टीका मुंबई भाजपचे प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे. त्यासोबतच "मुख्यमंत्री महोदय, तुम्ही काहीही केलंत तरीही मुंबईत येणार तर फक्त भाजपच" असा विश्वासही आ. भातखळकर यांनी व्यक्त केला आहे.
"सत्तेचा दुरुपयोग करून व सर्व नियम धाब्यावर बसवून प्रभागांची पुनर्रचना करण्याचा ठाकरे सरकारचा डाव निवडणूक आयोगाच्या कठोर भूमिकेमुळे शक्य होत नाही हे शिवसेनेच्या लक्षात आले होते. त्यामुळे आता नगरसेवकांची संख्या वाढवायची आणि त्यातून आपल्यासाठी पोषक ठरतील अशी प्रभागांची पुनर्रचना करायची असा प्रकार मुख्यमंत्र्यांनी चालविला आहे. परंतु ठाकरे सरकारचा भ्रष्टाचारी व वसुली पॅटर्न मुंबईच्या जनतेने चांगलाच ओळखला आहे, त्यामुळे शिवेसेनेच्या अकार्यक्षमतेचा भोपळा आगामी निवडणुकीत मुंबईची जनता नक्की फोडणार आहे, असेही आ. भातखळकर यांनी यावेळी म्हटले आहे.
 
 
 
लोकसंख्या वाढीमुळे निर्णय : एकनाथ शिंदे
"2001 नंतर लोकसंख्येत मोठी वाढ झालेली आहे. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात नागरीकरण देखील झाले आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या संख्येत वाढ करणे आवश्यक होते. वाढलेल्या मतदारांच्या संख्येनुसार प्रभाग संख्या वाढवण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. २० वर्षानंतर नगरसेवक संख्येत वाढ करणे आवश्यकता होते. त्यानुसार आता ९ प्रभाग वाढवले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ वर पोहोचली आहे. शहरवासीयांना मूलभूत सुविधा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.
 
 
 
निवडणूक लांबविण्याचा प्रयत्न : भालचंद्र शिरसाट
"शहरातील संपूर्ण २२७ प्रभाग फोडून त्यामध्ये नवे ९ प्रभाग जोडले जाणार व त्यातून २३६ नगरसेवक निवडले जाणार आहेत, असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. मात्र, हा निर्णय फेब्रुवारी मध्ये होऊ घातलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या महापालिका निवडणूक काही महिने लांबविण्यासाठीचा प्रयत्न आहे," असा आरोप भाजपचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी 'दै.मुंबई तरुण भारत'शी बोलताना शिवसेनेवर केला आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@