आधी अभय, मग भय !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Nov-2021   
Total Views |

bmc_1  H x W: 0
 
मुंबई, ओंकार देशमुख : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबई शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशांनंतर शहरात काही ठिकाणी अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईदेखील महापालिका प्रशासनाच्यावतीने सुरू करण्यात आली. मात्र, या प्रकारानंतर विरोधकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून सत्ताधार्‍यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. वर्षानुवर्षे सत्ता असताना सत्ताधार्‍यांनी कानाडोळा केल्याने शहरात अनधिकृत बांधकामांना अभय मिळाले. मात्र, आता कारवाईची भूमिका सत्ताधार्‍यांनी घेतली आहे. सत्ताधार्‍यांचे हे वागणे म्हणजे ‘आधी अभय, मग भय’,” असा प्रकार असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
 
 
कोरोनाकाळात मुंबईत अनधिकृत बांधकामांना मोठ्या प्रमाणात पेव फुटले होते. २५ मार्च २०२० ते २५ फेबुवारी, २०२१ या कालावधीत शहरामध्ये तब्बल ९,५५८ अनधिकृत बांधकामे उभारली गेल्याची माहिती महापालिका प्रशासनाने माहिती अधिकारात दिलेल्या आकडेवारीतूनच समोर आली. त्यापैकी काही मोजक्याच बांधकामांवर अद्याप पालिका प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात आली. दि. २५ मार्च २०२० पासून दि. २५ फेबुवारी, २०२१ पर्यंत महापालिकेकडे अनधिकृत बांधकामाच्या १३,३२५ तक्रारींची नोंद झाली होती. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणेज इतक्या मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेल्या या अनधिकृत बांधकामांपैकी केवळ आणि केवळ ४६६ अनधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीत म्हटले होते. यातील सर्वात जास्त तक्रारी ३,२५१ या एकट्या ‘एल वॉर्ड’ म्हणजे कुर्ल्यात झाल्याची म्हटले होते.
 
 
“शहरात उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर मुंबई महापालिकेने तातडीने कारवाई करावी. या कारवाईदरम्यान येणार्‍या कुठल्याही दबावाला महापालिका आणि कर्मचार्‍यांनी बळी पडू नये. आम्ही सरकार म्हणून तुमच्या पाठीशी आहोत,” अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सूचना दिल्या होत्या. यावरून मुख्यमंत्र्यांनी आपण अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र, यावरूनच मुख्यमंत्री आणि शिवसेनेला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.
 
 
काँग्रेसची दुटपी भूमिका
  
मुंबई महापालिका क्षेत्रात सुरू करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधातील कारवाईला आमचा पाठिंबा आहे. मुख्यमंत्र्याच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. मात्र, महापालिका ज्याप्रकारे ही कारवाई करत आहे, त्यावर आम्हाला हरकत आहे, असे म्हणत मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी सावध पवित्रा घेतला आहे. एकीकडे शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन, तर दुसरीकडे त्याच शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेच्या कारभारावर टीका अशी दुटप्पी भूमिका काँग्रेसतर्फे घेण्यात आली आहे.
 
विरोधकांच्या आरोपाला खुद्द महापौरांचा दुजोरा?
 
 “विरोधकांच्यावतीने करण्यात येत असलेल्या आरोपांत काही प्रमाणात तथ्य आहे. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनधिकृत बांधकामांविरोधात दिलेल्या आदेशावर काही कारणांमुळे अपेक्षित अशी कारवाई सध्या होत नाही. हे काही प्रमाणात आम्हाला मान्य आहे,” अशा शब्दांत महापौर किशोरी पेडणेकर यांनी एकप्रकारे विरोधकांच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. दरम्यान, “ही कारवाई करण्यात कुचराई करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात येईल तसेच अशा प्रकारच्या कारवाया करण्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये याचा आम्हा प्रयत्न करू,” असेही महापौर किशोरी पेडणेकर यांनी ’दै.मुंबई तरुण भारत’ला सांगितले.
 
 
गो.रा.खैरनार यांचे धक्कादायक गौप्यस्फोट
 
 अनधिकृत बांधकामे आणि त्यावर होणार्‍या कारवाया हा नेहमीच एक चर्चेचा आणि वादाचा मुद्द्दा ठरत आलेला आहे. त्यातच मुंबईत काही वर्षांपूर्वी महापालिकेचे तत्कालीन अधिकारी गो.रा.खैरनार यांनीदेखील मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई कारण्याचा सपाट लावला होता. खैरनार यांनी काही वर्षांपूर्वी एका वाहिनीशी बोलताना असा गौप्यस्फोट केला होता की, एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या मुलाच्या हॉटेलवर होणारी कारवाई थांबविण्यासाठी मुंबईतील एका प्रादेशिक पक्षाच्या प्रमुखांनी त्यांना सांगितले होते, असे खैरनार यांनी म्हटले होते. त्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले मात्र, वस्तुस्थिती हीच की राजकीय वरदहस्तामुळेच शहरातील अनधिकृत बांधकामांना पेव फुटते, असे म्हटल्यास गैर ठरणार नाही.
@@AUTHORINFO_V1@@