‘क्वाड’ आणि हवामानबदल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2021   
Total Views |

QUAD _1  H x W:



‘जागतिक हवामानबदल’ ही आजघडीची सर्वात मोठी समस्या मानली जाते. त्यासाठी संयुक्त राष्ट्रासह अन्य जागतिक संघटनादेखील सातत्याने कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे विविध जागतिक आघाड्यांच्या बैठकांमध्ये अन्य मुद्द्यांसोबत हवामानबदल हा मुद्दा नेहमीच चर्चेला असतोच.



हवामानबदल ही केवळ मोजक्याच देशांना भेडसावणारी समस्या नाही, त्याचा धोका हा संपूर्ण जगालाच आहे. त्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सध्या सर्वच देश प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये भारतदेखील आपले महत्त्वाचे योगदान देत आहेत. पॅरिस कराराचे पालन करणे असो की, देशामध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी विविध उपाय असो, यामध्ये भारत जगातील अन्य देशांपेक्षा नक्कीच उजवे काम करीत आहे.
 
 
‘क्वाड’ गटाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ‘हवामानबदल’ हा विषय महत्त्वाचा होता. अफगाणिस्तानातील पेचप्रसंग आणि एकूणच कोरोनाग्रस्त जगातील समस्यांवर भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका हे ‘क्वाड’ गटातील देशांनी चर्चा केली. नोव्हेंबर महिन्यात होणार असलेल्या ‘ग्लासगो सीओपी २६’ मध्ये वातावरणीय बदलांवर शीघ्र कृती करण्याविषयी मजबूत आणि सर्वव्यापी कृती गरजेची असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
 
 
‘क्वाड’ गटातील सदस्य देश भूतलावरील बहुतांश भाग व्यापतात. अमेरिका प्रशांत महासागर तर भारत आणि जपान दक्षिण व दक्षिणपूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलिया हा तो परिसर. या चारही देशांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हवामानबदलाच्या परिणामांचे स्वरूप आणि प्रारूप उपलब्ध आहेच. त्यामुळे हवामानबदलांचे होणारे परिणाम या प्रत्येक देशावर स्पष्टपणे दिसून येत असतात. या चारही देशांमध्ये जगाची एक तृतीयांश लोकसंख्या सामावलेली असून जागतिक ‘जीडीपी’मध्ये त्यांचा वाटा ३५ टक्के एवढा आहे. त्यामुळेच हवामानबदलाच्या अजेंड्यासाठी ‘क्वाड’ हाच जागतिक स्तरावरील प्रमुख गट म्हणून सशक्त पर्याय आहे.
 
 
हवामानबदलातील उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी भारत प्रामाणिकपणे प्रयत्न करत असताना ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका मात्र तेवढ्या पोटतिडकीने या क्षेत्रात काम करत नसल्याचे दिसून येत आहे. ‘जर्मनवॉच’ या संस्थेने अलीकडेच जाहीर केलेल्या ‘क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स’ अनुसार यंदाच्या ‘क्लायमेट अ‍ॅक्शन नेटवर्क’मध्ये ६१ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक दहावा असून, ‘क्वाड’ गटातील इतर देशांचे स्थान पुढीलप्रमाणे आहे : जपान आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे ४५ व ५४व्या क्रमांकावर असून, अमेरिका शेवटच्या म्हणजेच ६१व्या स्थानावर आहे.
 
 
एक लष्करी सहकार्य गट म्हणून जगात ‘क्वाड’ची जी प्रतिमा आहे, ती जागतिक प्रतिमा पुनर्रचित करण्यासाठी ‘क्वाड’ने प्रयत्न करायला हवेत. हवामानबदलाच्या क्षेत्रात चांगले काहीतरी करून दाखविण्याची तळमळ असलेला गट अशी ‘क्वाड’ची प्रतिमा निर्माण होणे गरजेचे आहे. दक्षिण चीन समुद्रासारख्या क्षेत्रीय वादाच्या मुद्द्यांसंदर्भात ‘क्वाड’ गट जसा जागतिक समुदायाशी वर्तन करतो, तसेच समर्पित आणि एकता दर्शवणारे वर्तन ‘क्वाड’ देशांकडून हवामानबदलांसारख्या जागतिक धोक्यांशी संबंधित असायला हवे.
 
 

‘क्वाड’ गट निर्माण करण्यामागील एकमेव प्रेरणास्थान असलेल्या चीननेही २०६० पर्यंत नेटशून्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हवामानबदलाच्या क्षेत्रात काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे त्याचाही विचार ‘क्वाड’ देशांनी करण्याची गरज आहे. त्यासाठी ‘क्वाड’ देशातील लोकशाही महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
 
 
‘क्वाड’ने आपल्या देशातील लोकशाहीचा वापर करून हवामानबदल क्षेत्रात ठोस कृती करणे गरजेचे आहे. हवामानबदल क्षेत्रात उत्कट भावनेने काम करत एक संस्थात्मक आदर्श घालून देण्याची संधी ‘क्वाड’ देशांना असून, त्यांनी त्या दिशेने प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे ‘क्वाड’ गटांची शक्ती असलेल्या लोकशाही परंपरांचा वापर करून हे देश जगाला स्थिरता देण्यात महत्त्वाची भूमिका वठवू शकतात.
 
 
त्यामुळे या गटाने हवामानबदल क्षेत्रात अधिक आक्रमकपणे काम करणे, पुढाकार घेणे अपेक्षित आहे. त्यांचे अनुकरण इतर देश करणार आहेत. त्यामुळे ‘क्वाड’ गटातील सदस्य देशांनी हवामानबदल क्षेत्रातील आव्हानांचा सामना अधिक संघटितपणे करणे अत्यंत आवश्यक आहे.










@@AUTHORINFO_V1@@