जिथे नैतिकता तेथे विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2021   
Total Views |

Devendra _1  H
 

 
भाजपच्या शक्तीचा विचार करता आघाडीकडे जे धनबळ आहे, जात आणि धर्माचे राजकारण करण्याची जी शक्ती आहे आणि अनेक ठिकाणी त्यांच्याकडे जी मसल पॉवर आहे, याबाबतीत भाजप दुर्बल आहे. भाजपची सगळ्यात मोठी शक्ती भाजपच्या विचारधारेत आहे.
 
 
चार समविचारी कार्यकर्ते भेटले की, महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी चर्चा सुरू होते, काही प्रश्न उपस्थित केले जातात. पहिला प्रश्न हे सरकार किती काळ टिकेल? दुसरा प्रश्न भाजपचे सरकार येण्याची किती शक्यता आहे? तिसरा प्रश्न तीन पक्षांची आघाडी कायम राहील का? चौथा प्रश्न येणार्‍या निवडणुकीत ही आघाडी टिकेल का? हे सगळे प्रश्न भविष्यातील प्रश्न उत्पन्न करणारे आहेत. भविष्यवेत्ताही त्याची अचूक उत्तरे देऊ शकत नाही. आपल्यासारख्यांकडे अशा प्रश्नांची ठोस उत्तरे नसतात.
 
 
 
असे असले तरी काही ठोकताळे बांधता येऊ शकतात. पहिल्या प्रश्नाचे उत्तर असे की, हे सरकार पाच वर्षं काही पडत नाही, हे सत्तेवर राहील. त्याची दोन कारणे आहेत. आघाडीतील तिन्ही पक्षांचे ‘भाजप सत्तेवर नको, याबाबतीत एकमत आहे’ हा त्यांचा समान कार्यक्रम आहे. दुसरे कारण असे की, सत्तेत राहण्याचे असंख्य फायदे असतात. प्रत्येक पक्षाला सत्तेत राहून अफाट धनशक्ती जोडता येते आणि तिसरे कारण असे की, ही आघाडी कोणत्याही विचारावर किंवा नैतिक मूल्यांवर निर्माण झालेली नसल्यामुळे असे प्रश्न निर्माण झाले असता आघाडी फुटण्याची शक्यता शून्य. माजी गृहमंत्री खंडणी वसूलीच्या आरोपात अडकले, त्यामुळे सरकार पडले नाही. त्यांना जावे लागले. असे जे जे कुणी अडकतील ते दूर होतील, आघाडी कायम राहील. कारण, राजकीय नीतिमूल्यांशी या आघाडीला काही देणे-घेणे नाही. पाच वर्षे सत्तेवर राहायचे आहे, भाजपला सत्तेवर येऊ द्यायचे नाही, हे दोन निश्चय या सर्वांना बांधून ठेवतील.
 
 
 
यामुळे नजीकच्या काळात भाजपचे सरकार येण्याची शक्यता जवळजवळ नाही. तसे काही राजकीय नेत्यांना वाटत नाही. आपण त्यांना त्यांच्या स्वप्नभूमीत रममाण होऊ दिले पाहिजे. तीन पक्षांची आघाडी पुढची निवडणूक येईपर्यंत कायम राहील आणि निवडणुकीच्या काळातही ती कायम ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न केला जाईल. जागावाटप हा अत्यंत कळीचा प्रश्न राहील. तो कशाप्रकारे सोडविला जाईल, हे आताच सांगणे अवघड आहे. ते भाजप सत्तेवर नको, या भूताने पछाडलेले राहिले तर वाट्टेल ते करून ते आघाडी टिकविण्याचा प्रयत्न करतील.
 
 
 
पुढील विधानसभा निवडणुकीचा विचार करता भाजपपुढे कोणती आव्हाने आहेत, हीदेखील बघितली पाहिजेत. या त्रिकुटाशी भाजपला लढायचे आहे. त्याची सुरुवात नगरपालिका आणि महापालिकेच्या निवडणुकांनी होईल. तेथील यशापयशावर विधानसभेची निवडणूक संपूर्णपणे अवलंबून असते, असे नाही. प्रत्येक निवडणुकीचे मुद्दे उभे राहतात. तरीदेखील या त्रिकुटाशी भाजपला एकट्याने लढायचे आहे.
 
 
 
अशी लढाई करीत असताना प्रतिपक्षाची बलस्थाने कोणती आणि त्यांची दुर्बल स्थाने कोणती, याचा विचार करावा लागतो. आजतरी त्यांची शक्ती तिघांनी एकत्रित राहण्यात आहे. या तिघांची मतदानाची बेरीज भाजपपेक्षा अधिक होते. याचा अर्थ मतदार हा मतदानाच्या रूपाने या तीन पक्षांंच्या मागे उभा आहे. या पक्षांची शक्ती म्हणजे त्यांच्या त्यांच्या मतदारांची शक्ती आहे. यासाठी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करून जी टीका केली जाते, तिचा मर्यादित उपयोग आहे. लक्ष मतदारांवर केंद्रित करायला पाहिजे.
 
 
 
 
हा मतदार त्या त्या पक्षास मतदान करण्यास का प्रवृत्त होतो, त्याची ढोबळमानाने कारणे अशी आहेत - त्या त्या पक्षाच्या विचारधारेचे त्याला आकर्षण असते. शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंच्या ऊर्जेमुळे शिवसेनेला मतदान करतात. राष्ट्रवादीचे मतदार मराठा या अस्मितेने पक्षाला मतदान करतात आणि काँग्रेसचे मतदार हे काँग्रेसच्या प्रदीर्घ अस्तित्वामुळे तिच्याशी बांधील राहून मतदान करतात. या बांधील मतदारांव्यतिरिक्त निवडणुकींच्या आदल्या रात्री वस्त्या-वस्त्यांतून मतदारांना प्रभावित करण्यासाठी जे काही वाटप केले जाते, त्यामुळेदेखील मतदार ‘ज्याने दिले, त्याला मत दिले’ या भावनेतून मतदान करतात.
 
 
 
 
 
एक काळ असा होता की, भाजपविरुद्ध काही विषयसूची जाणीवपूर्वक सगळ्या माध्यमातून राबविली जाई. भाजप दलितविरोधी आहे, आंबेडकरविरोधी आहे, संविधानविरोधी आहे, वनवासीविरोधी आहे, मुसलमान-ख्रिश्चनविरोधी आहे. याची कथानके तयार केली जात, ती फिरत राहत. सर्वसामान्य मतदार या अपप्रचाराला सतत बळी पडत गेलेला आहे. परंतु, आता यातील अनेक विषय अर्थहीन झालेले आहेत. सर्वाधिक वनवासी आमदार भाजपत असतात. त्याचप्रमाणे दलितवर्गातूनही लक्षणीय संख्येत आमदार असतात. संविधानविरोधाचा विषय आता हास्यास्पद होण्याच्या स्थितीला आलेला आहे. भाजप ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करते, त्या विचारधारेने संविधान या विषयावर तालुका पातळीपर्यंत कार्यकर्त्यांचे अभ्यासवर्ग घेतले आहेत आणि २६ नोव्हेंबर या संविधान दिनी सर्वाधिक कार्यक्रम या विचारधारेचे कार्यकर्तेच महाराष्ट्रभर करीत असतात.
 
 
 
 
त्यांना एक मुद्दा राहिलेला आहे, तो म्हणजे मुसलमान. मुसलमानांची एकगठ्ठा मते आघाडीच्या पारड्यात कशी पडतील, याची चिंता सर्वांना आहे. म्हणून आघाडी सरकार मुस्लीम समाजाला प्रसन्न करण्यासाठी अनेक निर्णय करताना दिसते. त्यावर ‘शिवसेनेने हिंदुत्व सोडले’ अशी टीका केली जाते. टीका करणार्‍यांच्या हे लक्षात येत नाही की, या वाक्याचा लपलेला अर्थ असा होतो की, हिंदुत्व म्हणजे मुस्लीमविरोध. आपली मंडळी आघाडीने टाकलेल्या जाळ्यात फसत तर नाहीत ना, याचा विचार भाजपनेत्यांनीच केला पाहिजे.
 
 
 
 
आघाडीच्या शक्तिस्थानाचा हा जसा विचार करावा लागतो, तसा त्यांच्या दुर्बल स्थानांचाही विचार केला पाहिजे. आघाडीतील अनेक नेते अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत. प्रत्येकाला मुख्यमंत्रिपद पाहिजे आहे. त्याची इच्छा धरणारे प्रत्येक पक्षात तीन-चार जण तरी आहेत. महत्त्वाकांक्षेला फुंकर घालावी लागते, ती वाढवावी लागते. इंदिरा गांधी यांनी हे काम चरणसिंगांच्या बाबतीत केले. त्यांना पंतप्रधान करून मोराराजी देसाई यांचे सरकार पाडले, ही झाली चाणक्य नीती. निवडणूक हे सत्ताप्राप्तीचे युद्ध असते. हे युद्ध डावपेचात्मक असते. बुद्धिबळाच्या पटावरील कोणती सोंगटी कधी हालवायची, हा बुद्धीचा खेळ आहे. या बुद्धिबळाच्या डावात कसलेले प्रतिस्पर्धी आहेत, शरदराव पवार. त्यांच्या चाली कोणत्या कोणत्या असू शकतील, हे ज्याला अगोदरच समजेल तो त्यावर योग्य प्रतिचाल करील. भाजपत अशी बौद्धिक शक्ती प्रमोद महाजन यांच्याकडे होती, काही प्रमाणात ती गोपिनाथराव मुंडे यांच्याकडे होती. या शक्तीचे दर्शन भाजपनेत्यांना घडवावे लागेल.
 
 
 
 
भाजपच्या शक्तीचा विचार करता आघाडीकडे जे धनबळ आहे, जात आणि धर्माचे राजकारण करण्याची जी शक्ती आहे आणि अनेक ठिकाणी त्यांच्याकडे जी मसल पॉवर आहे, याबाबतीत भाजप दुर्बल आहे. भाजपची सगळ्यात मोठी शक्ती भाजपच्या विचारधारेत आहे. बूथ स्तरावरचा कार्यकर्ता कोणत्या पदासाठी काम करीत नाही किंवा राजकीय लाभासाठी काम करीत नाही, त्याच्या डोळ्यापुढे समृद्ध वैभवशाली, विश्वगुरूपदावर आरूढ झालेल्या भारतमातेचे चित्र असते. भारतमातेच्या वैभवासाठी कष्ट करायचे ही त्याची प्रेरणा आहे. तिला धक्का पोहोचेल, असा कुणीही व्यवहार करता कामा नये.
 
 
 
 
विचारबळ हे धनबळापेक्षा आणि अन्य सर्व बळांपेक्षा सर्वश्रेष्ठ असते. विचारबळ प्रेरणा देते. विचारबळ निष्ठा निर्माण करते. विचारबळ अमर्याद कष्ट करण्याची शक्ती देते. जनसंघ ते भाजप हा प्रवास विचार बळाचा प्रवास आहे. एक काळ असा होता की, रावण रथावर आणि राम जमिनीवर आहे. रावण दहा तोंडाचा आहे. अस्त्र-शस्त्राने परिपूर्ण आहे. ‘रावण रथी विरथ रघुवीरा’ ही ओळ प्रसिद्ध आहे. पण, शेवटी रामाचा विजय होतो. राम धर्माचा पक्ष घेऊन उभा होता, सत्याचा पक्ष घेऊन उभा होता, आपल्या विचारांवर तो अढळपणे उभा होता. हीच भाजपची सगळ्यात मोठी शक्ती आहे.
 
 
 
 
पुढील दोन-तीन वर्षांत जेवढ्या मोठ्या प्रमाणात बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाईल, त्याला विश्वासात घेतले जाईल, त्या त्या काळाची राजकीय आव्हाने कोणती आहेत, याविषयी त्याचे प्रबोधन केले जाईल, तेवढी ही शक्ती वाढेल. या कार्यकर्त्यांपुढे आपले आदर्श मांडले पाहिजेत. पंडित दीनदयाळ, अटलबिहारी वाजपेयी, कुशाभाऊ ठाकरे, लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी हे कोणत्या प्रेरणेने काम करतात, हे सोदाहरण सांगितले पाहिजे. त्यातूनच कार्यकर्त्यांना बळ प्राप्त होईल आणि मग तो अनैतिक आघाडीच्या विरुद्ध नैतिकतेच्या भूमिकेतून लढण्यास सिद्ध होईल. ‘जेथे धर्म तेथे विजय’, हे सिद्ध करून दाखवील.



 
 
 
@@AUTHORINFO_V1@@