सोज्वळ माणुसकी? छे! धूर्त बदमाषी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

Roosevelt_1  H
 
 
आता रुझवेल्ट पूर्ण तडफेने कामाला लागले. त्यांनी खास अध्यादेश काढून सैन्यदलांमधले आणि एकूण समाजातलेही पंचमस्तंभी म्हणजे जर्मनीला अनुकूल असणारे लोक यांची चौकशी नि कारवाई आरंभली. झालं!! अमेरिकतले लिबरल, मानवतावादी जागे झाले. त्यांनी रुझवेल्ट यांच्या धोरणावर कडक टीका सुरू केली. अगोदर दिलेले एलेनॉर रुझवेल्ट आणि मंत्री हेरॉल्ड आईक्स यांचे उद्गार हे या मोहिमेचाच एक भाग होते.
 
 
 
अमेरिकेचा सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष कोण, या प्रश्नावर आतापर्यंत अनेकदा, अनेक संस्थांनी लोकमताचा कौल घेतलेला आहे. प्रत्येक सर्वेक्षणातून जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन, फ्रँकलिन रुझवेल्ट आणि जॉन केनेडी हीच चार नावं पुन:पुन्हा पुढे आलेली आहेत. अमेरिकन राष्ट्राने ब्रिटनविरुद्ध जे स्वातंत्र्ययुद्ध पुकारलं, त्यात अमेरिकन सैन्याचा सर्वोच्च सेनापती होता जनरल जॉर्ज वाशिंग्टन. साहजिकच नवस्वतंत्र अमेरिकन राज्याचा प्रमुख तोच बनला. अब्राहम लिंकनने गुलामगिरीची प्रथा कायद्याने रद्द केली. त्यावरून यादवी युद्ध झालं. लिंकनने ते खंबीरपणे लढवलं आणि जिंकलं. फ्रँकलिन रुझवेल्टने प्रथम आर्थिक मंदीवर मात केली आणि नंतर दुसर्‍या महायुद्धात कणखरपणे अमेरिकेचं नेतृत्व केलं. जॉन केनेडीमध्ये अमेरिकेला नवं आश्वासक नेतृत्व आढळलं. त्याप्रमाणे त्याने काही धडाडीचे निर्णय घेतले देखील. पण, त्याच्या नेतृत्वगुणांचा पूर्ण विकास होण्यापूर्वीच त्याचा खून झाला. एखाद्या शोकांत नाटकाचा राजबिंडा नायक, त्याची सुंदर बायको, गोजिरवाणी मुलं यांच्यासह आता काहीतरी लोकविलक्षण कर्तबगारी करून दाखवणार, अशी लक्षणं दिसत असतानाच अचानक मृत्युमुखी पडावा आणि त्याच्या त्या अचानक जाण्यानेच तो लोकांचा अधिक आवडता व्हावा, तसं घडलं.
 
 
 
मग या चौघा राष्ट्राध्यक्षांमध्ये पुन्हा सर्वात लोकप्रिय कोण? या प्रश्नाला जॉर्ज वॉशिंग्टन हेच नि:संदिग्ध उत्तर आहे. वॉशिंग्टन १७८९ साली अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनला. अमेरिकन राज्यघटनेनुसार संसद आणि राष्ट्राध्यक्षपद यांची मुदत चार वर्षांची असते. त्यानुसार १७८९ ते १७९३ आणि १७९३ ते १७९७ असा दोन कार्यकाळ (टर्म्स) त्याने राष्ट्राध्यक्षपद भूषवले. तिसर्‍या वेळीदेखील तो सहजपणे निवडून आला असता. पण, त्यालाच सत्तेचा कंटाळा आला होता. आता त्याचं वय ६५ झालं होतं, शिवाय त्याला शेती-बागायतीची विलक्षण हौस होती. त्याने राजकारणातून पूर्णपणे निवृत्ती घेतली आणि राजधानीतसुद्धा न राहता तो माऊंट व्हर्नान इथल्या आपल्या मळ्यावर राहून प्रत्यक्ष मातीत खपू लागला. आपल्याकडच्या कथित शेतकरी राजकारण्यांना वॉशिंग्टनची ही गोष्ट समजली, तर ते गदागदा हसतील नि म्हणतील, “६५व्या वर्षी निवृत्त? आणि खरोखरच मातीत खपतो? सालं, येडंच दिसतंय!”
 
 
अब्राहम लिंकनने १८६१ ते १८६५ हा आपला पहिला कार्यकाळ गुलामगिरीविरोधी कायदा करून आणि यादवी युद्धात देशाची अखंडता कायम राखून गाजवून सोडला. त्या बळावर तो पुन्हा निवडूनही आला. पण, लगेचच त्याचा खून झाला. त्यामुळे जॉर्ज वॉशिंग्टनचा लोकप्रियतेचा उच्चांक ओलांडण्याची संधीच त्याला मिळाली नाही.
 
 
जॉन केनेडींचंही तसंच काहीसं म्हणावं लागेल. १९६१ ते १९६५ हा त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ. पण, जेमतेम अडीच वर्षांतच १९६३ साली त्यांचा खून झाला.
 
 
फ्रँकलिन रुझवेल्ट हे अत्यंत लोकप्रिय आहेत. किंबहुना, जॉर्न वॉशिंग्टननंतर सर्वाधिक लोकप्रिय आहेत, हे निवडणुकांनीच सिद्ध केलं. १९३० साली आर्थिक क्षेत्रात जागतिक मंदी आली. त्या पार्श्वभूमीवर १९३२ची निवडणूक रुझवेल्ट आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाने जिंकली. मग रुझवेल्ट यांनी दमदार धोरणं आखून मंदी हळूहळू दूर केली. त्यांच्या दुसर्‍या कार्यकाळात दुसरं महायुद्ध सुरू झालं. त्याचा परिणाम म्हणजे सर्वच उद्योगधंद्यांना प्रचंड बरकत येऊन अमेरिका ही सबल, समर्थ आणि श्रीमंत अशी महासत्ता बनली. त्यामुळे अमेरिकन जनतेने रुझवेल्ट आणि त्यांच्या पक्षाला सलग चार वेळा सत्ता दिली. आपल्या चौथ्या कार्यकाळात मात्र रुझवेल्ट जगलेच नाहीत. १९४५च्या एप्रिल महिन्यातच ते मरण पावले.
 
 
रुझवेल्ट हे डेमोक्रॅटिक पक्षाचे होते. म्हणजेच एक प्रकारे ते सनातनी विचारांचे होते. म्हणजे साधारणपणे पाश्चिमात्य देशातल्या सर्व रिपब्लिकन पक्षांचं असं म्हणणं असतं की, आम्ही सुधारक, उदारमतवादी, गरीब, मजूर, महिला, अशा ‘नाही रे’ वर्गाच्या हिताची काळजी घेणारे आहोत आणि हे डेमोक्रॅटिक लोक सनातनी कुठल्याही सुधारण नको असलेले ‘आहे रे’ वर्गाचे प्रतिनिधी असतात, तर रुझवेल्ट यांच्या पत्नी एलेनॉर या उदारमतवादी विचारांच्या, महिला, बाल, मजूर इत्यादी वर्गांसाठी प्रत्यक्ष काम करणार्‍या अशा होत्या. त्या अशा विषयांवर भाषणं देत वृत्तपत्रांमधून लेख लिहित, ठिकठिकाणी प्रवास करून प्रत्यक्ष जनजागृतीचं कार्य करीत, म्हणजेच एका मोठ्या राजकारणी पुरुषाची पत्नी किंवा नंतर राष्ट्राध्यक्ष पत्नी म्हणजे ‘फर्स्ट लेडी’ एवढीच त्यांची ओळख नसून, त्यांना त्यांची स्वतंत्र प्रतिमा होती. स्वतःचे विचार ‘लिबरल’ पक्षाकडे झुकणारे असूनही त्या नवर्‍याच्या निवडणूक मोहिमांमध्ये मात्र सहभागी होत, थोडक्यात त्यांच्या ‘लिबरल’ विचारांचा त्यांच्या नवर्‍याच्या डोक्याला ताप नव्हता.
 
 
पण, एकदा ती वेळ आलीच. एलेनॉर यांनी एका वृत्तपत्रात लिहिलं, ‘पंचम स्तंभी लोकांपासून सावधगिरी बाळगण्याच्या या आचरट हट्टापायी आम्ही अमेरिकन लोक, नागरी स्वातंत्र्याची आमची दिव्य परंपरा गमावून तर बसणार नाही ना?’ पाठोपाठ हेरॉल्ड आईक्स या अमेरिकेच्या केंद्रीय अंतर्गत सुरक्षा मंत्र्याने टिप्पणी केली, ‘अमेरिका ही आता निवांत जगण्याची जागा राहिलेली नाही. भविष्यात निरागस लोकांना अशा प्रकारांना तोंड द्यावे लागेल की, आम्हाला लाज वाटेल.’ या दोघा ‘लिबरल’ लोकांचे हे १९४० सालचे विचार आहेत. त्यांनी ते व्यक्त करण्यासारखं काय घडलं होतं? घडलं होतं असं की, दि. २२ मे, १९४० या दिवशी अवघ्या १२ दिवसांच्या लढाईत फ्रान्सने हिटलरसमोर संपूर्ण शरणागती पत्करली होती.
 
 
तुम्ही म्हणाल, याचा अमेरिकेशी काय संबंध? मार्च १९३३ मध्ये रुझवेल्ट सत्तेवर आले. जागतिक व्यापार मंदीचा सर्वतोपरी सामना करण्यात ते आणि त्यांचं सरकार गढून गेलं. अमेरिका प्रथमपासूनच युरोपीय राजकारणाशी फटकून होती. व्यापारापुरताच ती युरोपशी संबंध ठेवत असे. १९१४ ते १९१८च्या महायुद्धात अमेरिकेला युरोपीय राजकारणात उतरावंच लागलं. पण, त्यानंतर अमेरिकेत पुन्हा अलिप्त झाली. १९३३ सालच्या जानेवारी महिन्यात जर्मनीचा चॅन्सलर बनलेल्या अ‍ॅडॉल्फ हिटलरचं अमेरिकेकडेही बारीक लक्ष होतं. १९३५ साली त्याने जर्मनीत लष्करी सेवा सक्तीची केली. त्याचबरोबर युरोपातल्या अनेक देशांत आणि अमेरिकेतही त्याचे गुप्तहेर आपली हेरजाळी पसरवू लागले. तत्कालीन अमेरिकेत शेकडो जर्मन भाषक लोक पोटापाण्यासाठी आलेले होते. हलक्या आणि मध्यम नोकरी-व्यवसायांमध्ये ते कार्यरत होते. उदा. इमारतीला लिफ्टचालक, कोपर्‍यावरचा मांस विकणारा खाटीक, छोट्या कंपन्यांमधले कारकून इत्यादी.
 
 
१९३६च्या मार्चमध्ये हिटलरच्या सैन्याने र्‍हाईनलँडवर ताबा मिळवला. जगभरच्या मुत्सद्यांनी मनाशी खूणगाठ बांधली की, आज ना उद्या युद्धाचा भडका उडणार! अमेरिकेतल्या जर्मन गुप्तचरांच्या हालचाली वाढू लागल्या. १९३८ पर्यंत त्या इतक्या वाढल्या की, ‘वॉर्नर ब्रदर्स’ या प्रख्यात चित्रपट कंपनीने त्यांवर आधारित ‘कन्फेशन्स ऑफ अ नाझी स्पाय’ हा चित्रपट काढला. मे १९३९ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट तिकीट बारीवर साफ कोसळला. कारण, अमेरिकन राजकारणी आणि अमेरिकन अमेरिकन जनता आपल्या अलिप्तपणाच्या धुंदीत इतके मश्गूल होते की, चित्रपटात दाखवलेली अमेरिकाविरोधी हेरगिरी हा त्यांना कल्पनाविलास वाटला.
 
 
चारच महिने उलटले. सप्टेंबर १९३९ मध्ये दुसर्‍या महायुद्धाला सुरुवात झाली. तरीही अमेरिकन संरक्षण दलं आणि जनता सुस्तच होती. दि. १० मे, १९४० रोजी हिटलरने फ्रान्सवर प्रचंड आक्रमण केलं. अवघ्या १२ दिवसांत बलदंड भासणारा फ्रान्स मोडून पडला. दि. २२ मे, १९४० रोजी फ्रान्सने संपूर्ण शरणागती स्वीकारली. त्यावेळी पॅरिसमध्ये असलेला अमेरिकेचा राजदूत विल्यम बुलिट याने रुझवेल्टना लिहलं, “फे्ंरच कम्युनिस्टांनी स्वदेशाशी विश्वासघात केला आहे. सैन्यातल्या कम्युनिस्टांनी आक्रमक जर्मनांशी लढायला नकार दिला आणि उलट अनेक लष्करी गुपितं फोडली. नागरी कम्युनिस्टांनी आक्रमक नाझींना सर्वप्रकारे सहकार्य केलं. त्यामुळेच फ्रान्सचा एवढ्या वेगाने पराभव झाला. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की, आपल्या तिन्ही सेनादलांमधला प्रत्येक पंचमस्तंभी वेचून काढा.” पाठोपाठ अमेरिकन सेनाश्रेष्ठींनी रुझवेल्टना संदेश पाठवला की, “फ्रान्स पडला. त्याचे सेनेगॉल आणि मार्टिनेक इथले नाविक नि हवाई अड्डे जर का नाझींच्या हाती लागले, तर आपल्याला अमेरिकेच्या मुख्य भूमीचं संरक्षण करणं जड जाईल.”
 
 
आता रुझवेल्ट पूर्ण तडफेने कामाला लागले. त्यांनी खास अध्यादेश काढून सैन्यदलांमधले आणि एकूण समाजातलेही पंचमस्तंभी म्हणजे जर्मनीला अनुकूल असणारे लोक यांची चौकशी नि कारवाई आरंभली. झालं!! अमेरिकतले लिबरल, मानवतावादी जागे झाले. त्यांनी रुझवेल्ट यांच्या धोरणावर कडक टीका सुरू केली. अगोदर दिलेले एलेनॉर रुझवेल्ट आणि मंत्री हेरॉल्ड आईक्स यांचे उद्गार हे या मोहिमेचाच एक भाग होते.
 
 
पण, रुझवेल्ट चांगलेच खंबीर होते. त्यांनी बायकोसकट सगळ्या लिबरल मुखंडांकडे दुर्लक्ष केलं आणि संबंधित खात्याला आदेश दिला की, पंचमस्तंभी असण्याची शक्यता असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा फोन बेधडक टॅप करा. पुढे १९४१च्या डिसेंबर महिन्यात जेव्हा जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर आकस्मिक हल्ला करून प्रचंड विध्वंस केला, तेव्हा अमेरिकन जनता खवळून उठली आणि लिबरलांची धूर्त उदारमतवादी बदमाषी कापरासारखी वार्‍यावर उडून गेली.
 
 
मायकेल स्कॉट नीबर्ग या विद्वान प्राध्यापकाने ‘व्हेन फ्रान्स फेल’ या नावाचं पुस्तकच लिहून हा इतिहास जागवला आहे. कशासाठी? तर त्याला असं म्हणायचं आहे की, एशियन-अमेरिकन लोकांविरुद्ध नुसतीच हिंसक कृत्यं करून किंवा ‘कोविड’ची साथ त्यांच्यामुळे फौलावली म्हणून त्यांना नुसतेच शिव्याशाप देऊन भागणार नाही. या सगळ्याच्या पाठी जे सूत्र आहे, ते नीट ओळखा अणि त्याला तोंड द्या.
 
 
हे पुस्तक बाजारात येतंय न येतंय, तोच चीनने एका नव्या अतिवेगवान क्षेपणास्त्राची चाचणी केल्याची बातमी आली आहे. ध्वनीच्या वेगाच्या पाचपट अधिक वेग असणारं हे क्षेपणास्त्र युद्धासाठी नसून, अवकाश संशोधनयान आहे, असं चीनने म्हटलं आहे. दर सेकंदाला १,१०० फूट हा ध्वनीचा साधारण वेग असतो.
 
 
आता यावर उदारमतवादी काय बरं म्हणतील? ते काहीही म्हणतो. वर दिलेली सगळी उदाहरणं वर्तमान भारतीय परिस्थितीला लावून पाहा. खूप काही समजेल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@