भारत आणि उत्तर आफ्रिका समन्वय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2021   
Total Views |

India Africa_1  
 
 
भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये आफ्रिका खंडाचे स्थान स्वातंत्र्यापासूनच म्हणजे १९४७ सालापासूनच महत्त्वाचे राहिले आहे. मात्र, त्यापैकी उत्तर आफ्रिकेतील देशांसोबत भारताचे संबंध अधिक घनिष्ट करण्याची गरज आहे. कारण, आगामी काळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या देशांमध्ये करण्याची संधी भारताला आहे. त्याचप्रमाणे चीन ज्या पद्धतीने आफ्रिका खंडामध्ये गुंतवणूक करून आपला प्रभाव तेथे वाढवत आहे, त्यास प्रत्युत्तर देणेही गरजेचे आहे. पुढील काळात उत्तर आफ्रिका खंडातील देशांसोबत संबंध वाढविण्याकडे भारतास विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी विविध प्रकारची गुंतवणूक, उत्तर आफ्रिकी देशांना मदत देणे, तंत्रज्ञान सहकार्य आणि पर्यटन हे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
भारत आणि उत्तर आफ्रिका यांच्यातील संबंध पुढील मुद्द्यांद्वारे पाहता येतात. पेट्रोलियम पदार्थ, यंत्रसामग्री, विद्युत उपकरणे, औषधे या गोष्टींमध्ये भारत आणि उत्तर आफ्रिकन देश जुने व्यापारी मित्र आहेत. वर उल्लेख केलेल्या वस्तूंचा आयात व निर्यात दोन्ही प्रकारचा व्यापार होतो. ‘फॉस्फेट’ या रसायनाचा व्यापार आफ्रिकन देशांसाठी महत्त्वाचा आहे. जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अल्जेरिया, ट्युनिशिया आणि मोरोक्को या देशांतून निर्यात केलेले ‘फॉस्फेट’ मोठ्या प्रमाणावर वापरले जाते व भारताच्या एकूण गरजेच्या आयातीपैकी ५० टक्के आयात याच देशांतून होते. २०१९चा व्यापाराचा लेखाजोखा पाहिल्यास भारत आणि या प्रदेशातील व्यापार एकूण १८ कोटी अमेरिकन डॉलर्स एवढ्या मूल्याचा झाला. मात्र, संयुक्त अरब अमिरातीशी झालेला व्यापार सुमारे ६० कोटी अमेरिकन डॉलर्स एवढा होता. म्हणजेच, व्यापार वाढवायला खूपच मोठी संधी आहे.
 
दहशतवाद हा कोणा एका देशाला भेडसावणारा प्रश्न नसून, तो जागतिक प्रश्न आहे व त्यामुळे सर्व देशांनी एकत्र येऊन त्याचा सामना करायला हवा. म्हणूनच, भारत आणि इजिप्त या दोन देशांमध्ये संयुक्त युद्धसराव होत असतो. भारताकडून इजिप्तच्या सैन्यासाठी चिलखती गाड्यासुद्धा तयार केल्या जातात. २०२१मध्ये अल्जेरिया या देशाशी भारताने संबंध अधिक मजबूत करायला सुरुवात केली. भूमध्य समुद्राच्या जवळ असलेल्या अल्जेरिया प्रदेशात संयुक्त नौदल कवायती करून भारताने या प्रदेशांमध्ये असलेले आपले हितसंबंध वाढवण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर मोरोक्को या तिसर्‍या देशाबरोबरदेखील भारताने दहशतवादी कारवायांच्या संदर्भात महत्त्वाची भागीदारी करण्याबाबत बोलणी केली आहेत. याची जरी सुरुवात असली तरी तो शुभसंकेत मानायला हवा, भारताने उत्तर आफ्रिकन प्रदेशातील देशांना केलेली वैद्यकीय, आर्थिक आणि कृषिक्षेत्रातील मदत हा आहे. गद्दाफीच्या पराभवानंतर लिबियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी व स्थैर्य आणण्यासाठी भारताने एक दशलक्ष अमेरिकन डॉलर्स अर्थसाहाय्य केले होते.
 
 
‘कोविड-१९’ आजारावरील लसीचे डोस भारताने ‘व्हॅक्सिन मैत्री’ कार्यक्रमांतर्गत आफ्रिकेतील देशांना दिले. लिबियासारख्या देशात भारतीय कामगारांनादेखील सन्मानजनक वागणूक मिळते. तेथे भारतीय कामगार कुशल अशा वैद्यकीय क्षेत्रातसुद्धा कार्यरत आहेत. याचबरोबर भारताने उत्तर अमेरिका खंडातील देशांमध्ये विविध कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक सवलती आणि शिष्यवृत्ती यांचे वाटप केले आहे. तेथील विद्यार्थी शिक्षणासाठी भारतातसुद्धा येतात. भारताची सॉफ्ट पॉवर, त्यातही विशेषतः बॉलिवूड! बॉलिवूडचे गारूड उत्तर आफ्रिकन देशांवरही आहे. अल्जेरियासारख्या देशांनी हिंदी भाषेतील चित्रपटांचा प्रभाव पाहता बॉलिवूडवर माहितीपटसुद्धा बनवले आहेत.
 
भारत आणि उत्तर आफ्रिका खंडातील देशांचे संबंध ऐतिहासिक आहेत. पण, घनिष्ट नाहीत. व्यापार, संरक्षण, दहशतवाद टाळण्याचे सहकार्य या माध्यमातून हे संबंध दृढ होऊ शकतात. त्याचबरोबर भारत तुलनात्मकदृष्ट्या गरीब आफ्रिकेतील देशांसाठी व्यापाराची निर्मिती करणारा, रोजगाराची निर्मिती करणारा, पर्यटनाच्या संधी निर्माण करणारा आणि पर्यावरणस्नेही शाश्वत विकास करण्यासाठी प्रयत्नशील असलेला हक्काचा भागीदार म्हणून आपले स्थान बळकट करू शकतो. आफ्रिकेत आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी आगामी काळात उत्तर आफ्रिका खंडातील पाचही देशांशी भारताने आपले संबंध अधिक विस्तारले पाहिजेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@