नवं ते हवं; पण जुनं ते सोनं!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

antics_1  H x W
 
 
केंद्रातल्या आणि राज्यांमधल्या शासनांना याची काही फिकीर नव्हती, असंच म्हणावं लगेल, कारण अशा तस्करीमार्गे परदेशात गेलेल्या वस्तू परत भारतात आणण्याबद्दलची उपलब्ध आकडेवारीच तसं सांगते आहे.
 
 
 
मनुष्य स्वभाव ही मोठी विचित्र गोष्ट आहे. कमालीची सुसंगती आणि कमालीची विसंगती, अशा दोन परस्परविरोधी ध्रुवांमध्ये माणसाचं मन नेहमी झोके घेत असतं. त्यामुळेच कोणता माणूस कोणत्या क्षणी काय विचार करेल आणि काय कृती करेल, याचा कसलाही भरवसा कोणताही मानसतज्ज्ञ देऊ शकत नाही.
 
 
माझ्या लहानपणी म्हणजे १९७०च्या दशकात सर्वत्र एक पद्धत रूढ होती. लग्न, मुंज, गणपती, नवरात्र, सत्यनारायण पूजा किंवा अगदी बारशापासून बाराव्यापर्यंत असं कोणतंही प्रयोजन असो, मोठेमोठे मंडप घालायचे. त्याच्या चारी बाजूंना चार भोंगे लावायचे आणि त्यातून दिवसभर हिंदी-मराठी गाण्यांच्या रेकॉर्ड्स लावून कल्लोळ उसळून द्यायचा. सुदैवाने त्या काळात गाणीही बरी असायची, हिंदीमध्ये राजेश खन्नाचा जमाना होता. बर्मन पितापुत्र, लक्ष्मी-प्यारे, कल्याणजी-आनंदजी ही टॉपची संगीतकार मंडळी राजेश खन्नाचा नव्याने येणारा प्रत्येक चित्रपट गाण्यांनीदेखील समृद्ध करून टाकत होती. मराठीत सुधीर फडके तर होतेच. पण, राम कदमांच्या ‘पिंजरा’मधल्या लावणींची धुंदी उतरता उतरत नव्हती.
 
 
आणि असं असूनही, म्हणजे श्रवणीय संगीताची अशी लयलूट चाललेली असूनही लोक एकमेकांना विचारायचे, “नवीन रेकॉर्ड कोणती आलीय?” म्हणजे ‘जुनं ते सोनं’ आहेच. पण, नवं तेही हवंच आहे. माझ्या एका तरुण मित्राला चित्रपटांचा फार शौक आहे. यु ट्यूबवर जुने-नवे असंख्य चित्रपट तो सतत पाहत असतो. गंमत म्हणजे त्याला १९५०-६०च्या दशकातील अंगभर कपडे घातलेली नि मुळुमुळु रडणारी मीनाकुमारीही आवडते नि २१व्या शतकातील किमान कपड्यातील बिनधास्त दीपिका पदुकोणही आवडते. आणखी एका तरुण मित्राचं छत्रपती शिवरायांवर आत्यंतिक प्रेम आहे. पण त्याला, ज्यांची देशनिष्ठा संशयास्पद आहे, असे सगळे चित्रपट खानही आवडतात. अलीकडे एका नव्या गायिकेने लताबाईंची गाजलेली निवडक गाणी पुन्हा गायली, तीदेखील लोकप्रिय झाली. मी एका संगीत रसिकाला विचारलं, “लताबाईंची ही सगळी गाणी आपल्याला ओरिजनल स्वरूपात उपलब्ध असताना तुम्हाला ही डुप्लिकेट गाणी ऐकण्यात काय आनंद मिळतो.” त्यावर त्याने उत्तर दिलं, “लताबाई त्या लताबाईच! त्याबद्दल वादच नाही. पण, ही नवी गायिका आहे ना, मग ऐकूया कसं गातेय ते!” म्हणजे ‘जुनं ते सोनं’ आहेच. पण, सतत नवे ते हवं आहे.
 
 
या मनोवस्थेचा परिणाम म्हणून समाजात आपल्याला असा एक प्रवाह दिसून येतो की, नव्या कालखंडात जगताना नव्या अवस्थेतले उद्योग, व्यवसाय, नोकऱ्या करून चांगली मिळकत करताना अनेकांना जुन्या वस्तू, जुनी गाणी, जुनी पुस्तकं, जुनी चित्रं, जुनी नाणी इत्यादी वस्तू जमवण्याचा छंद लागतो. अशा वस्तूंना म्हणतात ‘अ‍ॅण्टिक’ यात काहीही येतं. मूर्ती, चित्र, नाणी, हत्यारं यांपासून जुन्या ‘ग्रामोफोन रेकॉर्ड्स’ म्हणजे मेणाच्या तबकड्यांपर्यंत काहीही! अलीकडे काही काळापूर्वी एका पाश्चिमात्य प्राचीन वस्तू संग्राहकाने आपल्या संग्रहालयात जुन्या पोस्टर्सच्या संग्रहाचं प्रदर्शन भरवलं होतं. चार्ली चॅप्लिनच्या १९१४ सालातल्या मूक चित्रपटापासून १९९७च्या प्रचंड गाजलेल्या ‘टायटनिक’ या चित्रपटापर्यंतची अनेक कृष्णधवल आणि रंगीत पोस्टर्स तिथे होती. हे प्रदर्शन फारच लोकप्रिय ठरले. एकंदरितच पाश्चिमात्य समाजात अनेकांना हा ‘अ‍ॅण्टिक’ वस्तू गोळा करण्याचा छंद आहे, असतो. २०१९-२० या आर्थिक वर्षात जगभरच्या ‘अ‍ॅण्टिक’ बाजाराची उलाढाल (टर्नओव्हर) होती ६० कोटी डॉलर्स. २०२०-२१ या आर्थिक वर्षात ती तब्बल १२० कोटी, ४० लाख डॉलर्सवर पोहोचली, कारण कोरोनामुळे लोक घरात बसून होते. साहजिकच, ते इंटरनेटकडे वळले आणि त्यामुळे जगभरच्या ‘अ‍ॅण्टिक’ व्यापाऱ्यांच्या संकेतस्थळांना भेट देणारे नि ‘ऑनलाईन’ खरेदी करणारे यांच्या संस्थेने एकदम भरारीच मारली. आता व्यापार म्हटला की, त्यात फसवणूक आलीच. प्राचीन वस्तूंच्या व्यापारात दोन प्रकारची फसवणूक चालते. प्राचीन वस्तूंप्रमाणे हुबेहूब नव्याने बनवलेल्या वस्तू प्राचीन म्हणून विकणं आणि प्राचीन वस्तू चोरून, तस्करी करून त्या विकणं.
 
 
आपला भारत देश हा अतिप्राचीन असल्यामुळे आपल्याकडे सगळंच प्राचीन होतं. मुसलमानी आक्रमकांना सोनं, चांदी, हिरे, मोती अशा मौल्यवान वस्तूंमध्येच स्वारस्य होते, त्यांनी तेवढंच लुटलं, अगदी मनसोक्त लुटलं. पण, त्यापलीकडे मूर्ती कलाकुसरीच्या वस्तू, चित्रं, पुस्तकं यामध्ये त्यांना स्वारस्य नव्हतं. त्यांच्या धर्मगुरूंच्या मते हे सगळं ‘कुफ्र’ म्हणजे पाखंड होतं. त्यामुळे त्यांनी या सगळ्या वस्तूंचा विध्वंस केला आणि स्वतःला त्यासाठी ‘बुत्शिकन’, ‘कुफ्रशिकन’ म्हणून किताब घेतले. ‘बुत्शिकन’ म्हणजे ‘मूर्तिभंजक’, तर ‘कुफ्रशिकन’ म्हणजे ‘पाखंडभंजक’. पण, पोर्तुगीज, इंग्रज, फे्रंच हे पाश्चिमात्य आक्रमक मोठे चौकस बुद्धीचे होते. त्यांनी सोनं, चांदी, हिरे, मोती तर लुटलेच. पण, असंख्य मूर्ती, अगणित कलावस्तू, उत्तमोत्तम चित्रं आणि अनमोल ग्रंथ अगदी काळजीपूर्वक पळवले आणि आपापल्या देशात नेले, तिथे त्यांची खासगी संग्रहालयं या प्राचीन वस्तूंनी भरभरून ओसंडून जाऊ लागली. उदा. रॉबर्ट क्लाईव्ह घ्या. रॉबर्ट क्लाईव्हने ‘ईस्ट इंडिया कंपनी’चा गव्हर्नर जनरल या नात्याने बंगाल प्रांत जिंकला आणि तिथपासून इंग्रजी साम्राज्य भारतभर पसरू लागलं, हे आपल्याला माहीतच आहे. हा क्लाईव्ह सेवानिवृत्त होऊन इंग्लंडला परत गेल्यावर ब्रिस्टॉल शहरात राहत असे. तिथल्या बर्कले स्क्वेअरजवळचा त्याचा प्रासाद भारतातून नेलेल्या असंख्य प्राचीन मौल्यवान वस्तूंनी खच्च भरलेला होता. दुसरं उदाहरण, मुंबईजवळ भरसमुद्रात असलेल्या घारापुरी या बेटावरच्या पाशुपत शैवपंथीय कोरीव गुंफांचं घ्या. या गुंफा इसवी सनाच्या सातव्या किंवा आठव्या शतकात इथे राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्याच्या राजांनी निर्माण केल्या असाव्यात, असा तर्क आहे. तर्क आहे असं म्हणण्याचं कारण असं की, या गुंफांच्या माथ्यावर असलेला संबंधित शिलालेख पोर्तुगीज आक्रमकांनी उचकटून काढला आणि पोर्तुगालला नेला. आज पोर्तुगालच्या सरकारी संग्रहालयात तो नाही. याचाच अर्थ कुणा खासगी संग्राहकाकडे तो असावा आणि हा लुटीचा माल असल्यामुळे तो खासगी संग्राहक त्याबाबत गुप्तता पाळून आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
 
अलीकडे आपण वृत्तपत्रात बातमी वाचली असेल की, सप्टेंबर अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावरून परत येताना १५७ प्राचीन कलावस्तू परत घेऊन आले. इंग्रजांनी आपल्या देशातल्या प्राचीन कलावस्तू लुटल्या, तर आश्चर्य वाटायला नको, कारण ते शत्रूच होते, लुटारूच होते. पण, स्वातंत्र्यानंतरच्या काळात केंद्रात आणि राज्यांमधल्या स्वकीय सरकारांच्या कार्यकाळात प्राचीन वस्तूंच्या तस्करीला अधिकच संघटित रूप आलं. सोन्याच्या चिपा आणि ‘रोलेक्स’-‘राडो’ घड्याळांच्या स्मगलिंगबद्दल आपण खूप ऐकलं-वाचलं असेल. पण, त्याच काळात भारताच्या प्रांतोप्रांतातून असंख्य मूर्ती, कलावस्तू, नाणी, चित्रं ही चोरून परदेशांमधून विकून कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल होत होती. भारताचा हा प्राचीन ठेवा लुटणारे लोक दुर्दैवाने आपलेच होते. इंग्रज नव्हते. केंद्रातल्या आणि राज्यांमधल्या शासनांना याची काही फिकीर नव्हती, असंच म्हणावं लगेल, कारण अशा तस्करीमार्गे परदेशात गेलेल्या वस्तू परत भारतात आणण्याबद्दलची उपलब्ध आकडेवारीच तसं सांगते आहे. १९७६ ते २०१३ या काळात अशा परत आणलेल्या वस्तूंची संख्या आहे फक्त १३. त्यातही २००४ ते २०१३ या काळातली संख्या आहे फक्त एक आणि २०१४ ते २०२१ या काळातही आतापर्यंतची संख्या आहे २००. त्यात वर उल्लेख केलेल्या १५७ वस्तूही आहेत. अर्थ स्पष्टच आहे.
 
यासंदर्भात अलीकडे म्हणजे २०१३मध्ये स्पेनमध्ये एक लक्षवेधक घटना घडली. ईशान्य स्पेनमध्ये इल्युशिया नावाचं गाव आहे. दोन हजार वर्षांपूर्वी या परिसरात केल्टिबेरियन नावाचे लोक राज्य करीत होते. रोमनांनी त्यांच्यावर स्वारी करून त्यांचा पराभव केला. स्पॅनिश पोलिसांना अशी पक्की खबर मिळाली की, रिकार्डो ग्रेनडा नावाच्या माणसाने त्या परिसरात खासगी उत्खनन करून अंसख्य प्राचीन वस्तू मिळवल्या आहेत. पोलिसांनी धाड घातली, त्यांना ग्रेनडाच्या घरात किमान चार हजार प्राचीन वस्तू मिळाल्या, त्यात केल्टिबेरियन लोकांची नाणी होती, चिलखतं होती, गलोलींमधून शत्रूंवर फेकायचे तीक्ष्ण दगड होते, सुळसुळीत वस्त्र अंगावर टिकून राहावं म्हणून लावले जाणारे ‘बू्रच’ होते. मग पोलिसांनी तज्ज्ञांच्या मदतीने न मिळालेल्या वस्तूंचा म्हणजेच ग्रेनडाने अगोदरच विकून टाकलेल्या वस्तूंचा शोध घ्यायला सुरुवात केली. या बाबतीत प्राचीन वस्तूंचा आंतरराष्ट्रीय बाजार हा फारच रहस्यमय, गूढ असतो. कारण कोणती वस्तू चोरीची नि कोणती वस्तू अधिकृत, हे ठरवणं मोठं अवघड असतं. तरी स्पॅनिश पोलीस आणि प्राचीन वस्तुतज्ज्ञ यांनी चिकाटीने शोध घेत ब्राँझपासून बनवलेली १८ शिरस्त्राणं शोधून काढली. युरोप-अमेरिकेतल्या वेगवेगळ्या खासगी संग्राहकांकडे ती गेलेली होती. पैकी सर्वाधिक म्हणजे सात शिरस्त्राणं क्रिश्चन लेवेट या संग्राहकाने घेतली होती. तो मुळात ब्रिटिश आहे. पण, दक्षिण फ्रान्समध्ये मुगिन या ठिकाणी स्थायिक झाला आहे. त्याचा खासगी संग्रह खूपच समृद्ध आहे. स्पॅनिश अधिकारी त्याच्याकडे गेले आणि त्यांनी शिरस्त्राणांबद्दल त्याच्याशी बोलणं केलं, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. लेवेटने त्यांना सातही शिरस्त्राणं परत करण्याची तयारी दर्शवली. मग ‘युनेस्को’ने म्हणजे ‘युनो’च्या सांस्कृतिक विभागाने आपल्या पॅरिसमधल्या कार्यालयात एक खास समारंभ केला. क्रिश्चन लेवेटने ती अनमोल शिरस्त्राणं समारंभपूर्वक स्पॅनिश अधिकाऱ्यांना सुपूर्त केली आणि त्यांनी ती हवाईदलाच्या खास विमानाने राजधानी माद्रिदला परत नेली.
 
हास्यास्पद गोष्ट अशी की, या तस्करीबद्दल रिकार्डो ग्रेनडाला शिक्षा किती झाली? तर फक्त तीन वर्षे कैद आणि ती पूर्ण भोगण्यापूर्वीच तो मरण पावला!
 
@@AUTHORINFO_V1@@