पांढर्‍या झगेवाल्यांविरोधात अकाल तख्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2021   
Total Views |

christian miss 2_1 &



सज्ज जोपर्यंत भारतीय मूळ धर्म ख्रिश्चन धर्मांतरणाविरोधात एकजुटीने उभे राहत नाहीत, तोपर्यंत मिशनर्‍यांचे फावणार आहे. मात्र, आता ‘सव्वालाख से एक लड़ाऊं, चिड़ियन ते मैं बाज तुड़ाऊं, तबै गुरु गोबिंद सिंह नाम कहाऊं!’ असे म्हणणार्‍या गुरू गोविंदसिंग यांनी ज्याप्रमाणे परकीय आक्रमक मुघलांविरोधात लढा दिला, तसाच लढा त्यांचे अनुयायी आता ख्रिश्चन धर्मांतरणविरोधात देण्यास सज्ज झाले आहेत.


समाजमाध्यमांवर ‘आरारारारा’ असा आरडाओरडा करणार्‍या ख्रिश्चन पाद्री लोकांचे व्हिडिओ नेहमीच ‘ट्रेंडिंग’ असतात. सुटबूट घातलेला, व्यवस्थित मेकअप केलेला, उत्तम वक्तृत्व असलेला पाद्री येशूचे नाव घेऊन ‘एचआयव्ही एड्स’ बरा करण्यापासून मेलेल्या माणसाला जीवंत करण्यापर्यंत अचाट असे प्रयोग करीत असतो. त्याच्या प्रत्येक ‘आरारारारा’वर ‘स्टेज’वरच नाचणारे त्याचे अनुयायी, त्यांना पाहून बेफाम होणारा जनसमुदाय हा प्रामुख्याने विनोदाचा विषय होत असतो. मात्र, हा विषय विनोदाचा अजिबात नाही. कारण, अशा प्रकारचे चाळे करून अतिशय नियोजनबद्ध रितीने ख्रिश्चन धर्मांतरण देशात दीर्घकाळपासून सुरू आहे.महाराष्ट्रातल्या तलासरी, साक्री, पेठ-सुरगाणा आदी वनवासी पट्ट्यांमध्ये, तर हा प्रश्न अतिशय गंभीर आहेत. कारण, धर्मांतरणाचा थेट संबंध हा राष्ट्रीय सुरक्षेशी आहे आणि सीमावर्ती राज्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात धर्मांतरणाचे प्रकार होत असतील, तर तो केवळ योगायोग अथवा आपल्या धर्माच्या अनुयायांची संख्या वाढविणे, एवढ्यापुरतेच ते मर्यादित नसते. त्याद्वारे सीमावर्ती भागामध्ये अशांतता निर्माण करणे, अशांतता निर्माण झाल्यानंतर देशविरोधी तत्त्वांना तेथे रस्ता मोकळा करून देणे हा ‘अजेंडा’ राबविला जातो. ईशान्य भारतामध्ये होणारे असे प्रकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तेथे अफाट काम करून बर्‍याच प्रमाणात रोखले आहेत. आटोक्यात आणले आहेत.मात्र, आता पंजाबमध्ये ख्रिश्चन धर्मांतरणाचा अतिशय गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाकिस्तान सीमेवर असलेले पंजाब राज्य हे भूराजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे, हे वेगळे सांगायला नको. पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेली अमली पदार्थांची तस्करी ही थेट पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाशी संबंधित असल्याचे खुद्द पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे पंजाब हे नेहमीच देशविघातक तत्त्वांच्या रडारवर असलेले राज्य आहे. पंजाबमध्ये दीर्घकाळपासून ख्रिश्चन धर्मांतरणाचे प्रकार सुरू आहेत. त्यामध्ये प्रमुख लक्ष्य ठरत आहेत ते शीखधर्मीय. आपल्या लढवय्या बाण्यासाठी ओळखला जाणारा शीख समुदाय हा अशाप्रकारे ख्रिश्चन धर्मांतरणाच्या जाळ्यात अडकणे हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी अतिशय धोकादायक आहे. पंजाबमध्ये अचानक वाढलेली चर्चची संख्या, दर रविवारी गुरूद्वाराऐवजी पाद्री लोकांच्या प्रवचनांना होणारी गर्दी आणि गळ्यात शीख धर्मांच्या प्रतीकांचे ‘लॉकेट’ घालण्याऐवजी क्रॉस आनंदाने मिरविणारी तरुण पिढी हे चित्र पाहून अखेर शिखांचे सर्वोच्च धार्मिक पीठ असलेल्या ‘अकाल तख्ता’नेच या पांढर्‍या झगेवाल्यांचे आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या या प्रयत्नांना यश येणे आणि राष्ट्रीय सुरक्षेस असणारा धोका निकाली निघणे, हे अत्यंत गरजेचे आहे.




पंजाबमध्ये ख्रिश्चन धर्मीयांची संख्या कशी वाढली, हे पाहणे, त्यासाठी महत्त्वाचे ठरते. पंजाबमध्ये २००१ सालच्या जनगणनेनुसार शीख धर्मीयांची लोकसंख्या ५९.९ टक्के होती. त्यावेळी ख्रिश्चन लोकसंख्या १.२ टक्के होती. मात्र, २०११ च्या जनगणनेची आकडेवारी पाहता शीख धर्मीयांची लोकसंख्या कमी झाली, तर ख्रिश्चनांची लोकसंख्या वाढली. आकडेवारीनुसार, २०११ च्या जनगणनेमध्ये शीख धर्मीयांची लोकसंख्या ही ५९.९ टक्क्यांवरून घसरून ५७.६९ टक्क्यांवर आली, तर ख्रिश्चन लोकसंख्या १.२ टक्क्यांवरून वाढून १.२६  टक्के झाली. अद्याप २०२१ सालची जनगणना होणे बाकी आहे, ती झाल्यानंतर पंजाबमधील शीख आणि ख्रिश्चन धर्मीयांच्या लोकसंख्येचे प्रमाण हे अतिशय भयानकपणे बदललेले असणार यात कोणतीही शंका नाही.धर्मांतरणाचा मुद्दा आला की, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे स्वयंघोषित ठेकेदार हे भारतीय राज्यघटनेचा दाखला देतात. भारतीय राज्यघटनेने ‘अनुच्छेद २६ ’ अंतर्गत प्रत्येक नागरिकास आपल्या धर्माचे पालन करणे आणि त्याचा प्रचार-प्रसार करण्याची परवानगी दिली आहे. स्वेच्छेने धर्मांतर करण्याचीदेखील परवानगी दिली आहे. मात्र, त्याचवेळी बळजबरीने अथवा फसवणुकीने धर्मांतर करण्यास परवानगी नाही. धर्मांतरणासंबंधी विविध राज्यांनी आपापल्या स्तरावर कायदेही केले आहेत आणि त्यावरून वादंगही होत असतात.धर्मांतरणाविरोधात प्रामुख्याने हिंदू समाजाने आवाज उठविल्यानंतर त्यांची खिल्ली उडविण्याचे प्रकार तर नित्याचेच आहेत. धर्मांतरणबंदी कायद्याची मागणी करणार्‍या हिंदू समुदायाची अशीच खिल्ली शिरोमणी अकाली दल पक्षाचे नेते मनजितसिंग सिरसा यांनीही उडविली होती. “ज्या धर्मांला स्वतःला वाचविण्यासाठी धर्मांतरणबंदी कायद्याची गरज पडते, तो धर्म तर अतिशय कमकुवत असणार,” अशा शब्दांत सिरसा यांनी हिंदू समाजाची खिल्ली उडविली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच जम्मू-काश्मीरमध्ये शीख युवतीसोबत झालेल्या ‘लव्ह जिहाद’च्या प्रकारानंतर धर्मांतरणबंदी कायद्याची मागणी केली होती. तसेच काहीसे झाले ते शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीचे. कारण, पंजाबमध्ये एकाएकी वाढलेल्या ख्रिस्ती धर्मांतरणाच्या प्रकारांकडे त्यांनी दीर्घकाळ दुर्लक्ष केले अथवा त्याचे नेमके गांभीर्य त्यांना जाणवले नाही.




मात्र, ‘देर आए, दुरुस्त आए’ याप्रमाणे शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीला ख्रिश्चन धर्मांतर प्रश्नाची धग जाणवली हे महत्त्वाचे आहे. ‘अकाल तख्ता’चे जत्थेदार ज्ञानी हरप्रित सिंग यांनी ख्रिश्चन मिशनरी राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये बळजबरी धर्मांतरणाची मोहीम चालवित असल्याचे म्हटले आहे. सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये अनेक गेल्या काही वर्षांपासून बळजबरी अथवा फसवणूक अथवा आमीश दाखवून धर्मांतर होत असल्याचे त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात म्हटले आहे. “धर्म हा अध्यात्माचा विषय आहे. त्यामुळे बळजहरी धर्मांतरणाचे कधीही समर्थन केले जाऊ शकत नाही. त्याविरोधात शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीच्या प्रयत्नांना प्रत्येकाने पाठिंबा द्यावा,” असेही त्यांनी म्हटले आहे. धर्मांतरणाची व्यवस्था मोडून काढण्यासाठी आता शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीने ‘घर घर अंदर धर्मशाला’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे.याअंतर्गत शीख धर्मोपदेशकांची १५० दले तयार तयार करण्यात आली आहेत, प्रत्येक दलामध्ये धर्मोपदेशक, कविसर अर्थात लोकगायकांचा समावेश आहे. प्रत्येक दल पंजाबमधील प्रत्येक गावामध्ये सात दिवसांचा प्रवास करीत आहे. या सात दिवसांमध्ये धर्मोपदेशक प्रत्येक गावामध्ये धर्मसभा घेऊन शीख धर्माचे तत्त्वज्ञान सांगणार आहेत, त्याचप्रमाणे धर्माचा इतिहास, परंपरा, संस्कृती, गुरू ग्रंथसाहेब याविषयी जनजागृती करणार आहेत. गावातील प्रत्येक कुटुंबाशी संवाद साधून त्यांना शीख धर्म साहित्याचे वितरण केले जाणार आहे. लहान मुलांना सायंकाळच्या वेळी स्थानिक गुरूद्वारामध्ये एकत्र करून गुरवाणीची संथा त्यांना देण्यात येणार आहे. दलामधील कविसर अर्थात लोकगायक हे आपल्या पारंपरिक काव्यांद्वारे शीख धर्माची महती सांगणार आहेत. अखेरच्या दिवशी ‘अमृत संचार’ कार्यक्रमाचे आयोजन करून गावातील ज्येष्ठ व्यक्तींसोबत चर्चाही केली जाणार आहे. शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीच्या मुखिया बीबी जागिर कौर यांनी अशा प्रकारचे अभियान संपूर्ण देशभरात चालविण्याची गरज व्यक्त केली आहे. ख्रिश्चन मिशनरी प्रामुख्याने तरूण पिढीला लक्ष्य करीत आहेत. त्यामुळे तरूण पिढीला त्यांच्या भाषेत शीख धर्माचे तत्त्वज्ञान समजावून सांगण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली आहे.




एकूणच, पांढरे झगे घालून, शांतीची भाषा बोलण्याचा आव आणून, रूग्णसेवेचे ढोंग करून बेमालूमपणे धर्मांतर करणार्‍या ख्रिश्चन मिशनर्‍यांचा ‘अजेंडा’ आता हिंदू समाजाप्रमाणेच लढवय्या शीख समाजासही लक्षात आला, ही अतिशय समाधानाची बाब आहे. कारण, जोपर्यंत भारतीय मुळाचे धर्म ख्रिश्चन धर्मांतरणाविरोधात एकजुटीने उभे राहत नाहीत, तोपर्यंत मिशनर्‍यांचे फावणार आहे. मात्र, आता ‘सव्वा लाख से एक लड़ाऊं, चिड़ियन ते मैं बाज तुड़ाऊं, तबै गुरु गोबिंद सिंह नाम कहाऊं!’ असे म्हणणार्‍या गुरू गोविंदसिंग यांनी ज्याप्रमाणे परकीय आक्रमक मुघलांविरोधात लढा दिला, तसाच लढा त्यांचे अनुयायी आता ख्रिश्चन धर्मांतरणविरोधात देतील, यात कोणतीही शंका नाही.







@@AUTHORINFO_V1@@