सप्रेशो व्हेरी, सजेस्टिओ फॉल्सी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

page 4_1  H x W


व्हेरी म्हणजे सत्य. ते सप्रेस करा. दाबून टाका आणि फॉल्सी म्हणजे खोडसाळ. त्याकडे फक्त निर्देश करा, सजेस्ट करा. सत्य दाबून टाका आणि खोडसाळ असत्याकडे बोट दाखवा. हा दिव्य संदेश तमाम युरोपीय राष्ट्रांनी अक्षरशः कृतीत उतरवला.


भारतीय पुराणकथांच्या अमर्याद भांडारातली एक गंमतीदार कथा आहे राजा चंद्रहासाची. केरळ देशचा राजा प्रसोम हा युद्धात मारला गेला. त्याचा मुलगा चंद्रहास हा लहान अर्भक होता. चंद्रहासाला घेऊन एक विश्वासू दासी केरळ देशातून पळाली आणि तिने जवळच्या कुंतल देशाचा आश्रय घेतला. परमेश्वरी कृपेने चंद्रहास मोठा होऊन एक राजबिंडा तरुण झाला. पण, तो राजपुत्र आहे, हे कुणालाच माहिती नव्हतं. कुंतल राजाचा प्रधान हा फार पाताळयंत्री इसम होता. त्याला हे रहस्य समजलं. त्याने चंद्रहासाला एक पत्र देऊन आपल्या मुलाकडे पाठवलं. पत्रातल्या शेवटच्या ओळी काव्यात होत्या. ‘चंद्रहासा पाठविले सदना, विष ययासी देईजे.’ हे पत्र प्रधानपुत्राऐवजी प्रधानकन्येच्या हातात पडलं. तिचं नाव होतं विषया. तिने विचार केला की, आपला बाप संतापी आहे, संतापाच्या भरात वाटेल ते करत असतो. एवढा राजबिंडा, उमदा तरुण आहे. त्याला उगीचच विष घालायचं? तिने म्हणून एका काडीने डोळ्यातलं काजळ काढून ‘य’चा ‘या’ केला. म्हणजे ‘विष ययासी देईजे’ऐवजी ‘विषया यासी देईजे’ असं केलं. नंतर प्रधानपुत्राने बापाचं पत्र पाहिलं. त्याने विचार केला की, मुलगा आपल्या बहिणीसाठी नवरा म्हणून चांगलाच दिसतो आहे. बापाची कुठचीच कामं सरळ नसतात, तेव्हा स्वत: कन्यादान करण्याऐवजी त्याने आपल्याला हे काम सोपवलं असावं. यामुळे त्याने विषयाचं लग्न चंद्रहासाशी लावून दिलं.साधारण २०१६ सालापासून जगभराच्या प्रचार माध्यमांमध्ये फेक न्यूज म्हणून जो बातमीचा प्रकार अधिकाधिक प्रसिद्धीला येत चालला आहे, त्याचा हा प्राचीन भारतीय नमुना आहे. आधुनिक पत्रकारिता विद्येच्या तज्ज्ञांनी ‘फेक न्यूज’चेदेखील तीन प्रकार वर्णन केले आहेत. ‘मिस इन्फर्मेशन’, ‘डिस इन्फर्मेशन’ आणि ‘माल इन्फर्मेशन’. त्यातला हा ‘मिस इन्फर्मेशन’च नमुना आहे.


आता यातला कुंतल देश म्हणजे आजच्या महाराष्ट्र राज्यातला साधारणपणे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे विभाग, शिवाय कर्नाटक राज्याचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशचा पश्चिम भाग, एवढा सगळा प्रदेश. आता त्या प्रदेशातले प्रधान वगैरे लोक त्याही काळात पाताळयंत्री होते आणि आपल्या बापाचं कोणतंही काम सरळ नसत, हे त्यांच्या पोरांनाही माहीत होतं, हे भलतंच जोरदार वैशिष्ट्य दिसतंय. आता त्या काळात म्हणजे कोणत्या काळात? तर बहुधा दोन हजार वर्षांपूर्वी. कारण महाराष्ट्रावर राज्य करणारं पहिलं ज्ञात राजघराणं म्हणजे सातवाहन राजकुल. हे सातवाहन राजे स्वतःला ‘कुंतलाधिपती’ म्हणवून घेत असत.आता त्या काळातले राजकारणी लोक इतकी महत्त्वाची पत्रं, अशा काव्यमय वगैरे भाषेत लिहित असत का? असा प्रश्न उरतोच. तर शेवटी ही कथा आहे. आपल्या बापाकडून आपल्या भावाला आलेलं पत्र प्रधानकन्येने कोणत्यातरी मार्गाने ‘इंटरसेप्ट’ केलं आणि त्यातली ‘इन्फर्मेशन’ ही ‘मिस इन्फर्मेशन’ करून भावाकडे पोहोचवली. या कारवाईमुळे कुणाचंच वाईट न होता, उलट कल्याणच झालं. ज्या ‘फेक न्यूज’चा हेतू कुणाचं वाईट करण्याचा नसतो ती ‘मिस इन्फर्मेशन’.

कंसाच्या वधानंतर कृष्णाने पुन्हा राजा उग्रसेनाला राज्यावर बसवलं. त्यामुळे संतापलेला मगध सम्राट जरासंध. जो कंसाचा सासरा होता, तो प्रचंड सैन्यानिशी मथुरेवर चाल करून आला. त्या सैन्यात हंस आणि डिंभक नावाचे दोघे अत्यंत पराक्रमी राजे होते. ते दोघे एकमेकांचे जिवलग मित्र होते. एक दिवस कृष्णाने रणांगणावर एक जोरदार अफवा सोडून दिली की, यादव सैन्याशी लढताना हंस ठार झाला आहे. ही वार्ता ऐकून डिंभकाचं सगळं धैर्यच खचलं. त्याने रणांगणावरच आत्महत्या केली. मग ही वार्ता हंसापर्यंत पोहोचवण्यात आली. दु:खी झालेल्या हंसाने पण आत्महत्या केली. जरासंधाच्या पक्षातले दोन प्रबळ योद्धे हकनाक मेले. ही कारवाई धर्मसंस्थापनेसाठी अवतीर्ण झालेल्या कृष्णाने केली म्हणून तिला कृष्णाची चतुराई म्हणायचं; अन्यथा या ‘फेक न्यूज’ला आधुनिक परिभाषेत म्हणायचं ‘डिस इन्फर्मेशन.’ म्हणजे कुणाचं तरी वाईट करण्यासाठी, अकल्याण करण्यासाठीच सोडलेली बातमी.


महाभारत युद्धात पितामह भीष्मानंतर कौरव सेनेचे सेनापती द्रोणाचार्य झाले. साक्षात भगवान परशुरामांकडून धनुर्विद्या शिकलेल्या आचार्य द्रोणांच्या झंजावातासमोर पांडव सैन्याचा साफ हुरडा भाजला जाऊ लागला. कृष्णाने भीमाकरवी अश्वत्थामा नावाचा एक हत्ती मारवला आणि रणांगणावर अफवा सोडून दिली ‘अश्वत्थामा ठार झाला.’ आपल्या पुत्राच्या वधाची ती बातमी ऐकून आचार्य द्रोण हादरले. आता आपल्याला ‘जेन्युईन न्यूज’ कोण देईल, तर सत्यवचनी युधिष्ठिर. म्हणून त्यांनी युधिष्ठिराला प्रश्न केला असता, तो उत्तरला, “होय, अश्वत्थामा मेला. मात्र, तो माणूस की हत्ती, हे मला माहीत नाही.” हा वाक्याचा अर्धा भाग तो फक्त पुटपुटला. आचार्य द्रोणांना ‘जेन्युईन न्यूज’ कळली. ते हताश होऊन रथावरून खाली उतरले आणि रणभूमीवर बसून शोक करू लागले. ही संधी साधून पांडव सेनापती धृष्टद्दुम्न त्यांच्यावर धावला आणि तलवारीच्या एका घावात त्याने त्यांचा शिरच्छेद केला. पुन्हा एकदा धर्मसंस्थापक कृष्णाने ही कारवाई केली म्हणून तिला चातुर्य म्हणायचं; अन्यथा आधुनिक परिभाषेत ‘फेक न्यूज’च्या या प्रकाराला म्हणायचं ‘माल इन्फर्मेशन.’ कुणाचा तरी घात करण्यासाठी जाणून बुजून ‘जेन्युईन न्यूज’ म्हणून जी बातमी सोडली जाते, तिला म्हणायचं ‘माल इन्फर्मेशन.’

आता पुढची गंमत पाहा. १९व्या शतकात ब्रिटन ही जागतिक महासत्ता बनली. ब्रिटनला फक्त जगावर राजकीय सत्ता गाजवण्यातच स्वारस्य होतं, असे नव्हे. तर जगभरच्या देशांच्या, वंशांच्या, इतिहास, धर्म, संस्कृती, सभ्यता आणि भाषा या समस्यांमध्येच त्यांना प्रचंड रस होता, त्यामुळे ब्रिटिश संशोधक जगभरच्या सर्व भूभागांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये नाना प्रकारचे उपद्व्याप करण्यात गुंतलेले होते. असाच ऑस्टिन हेन्री लेथार्ड हा संशोधक, सन १८५०मध्ये तत्कालीन मेसोपोटेमिया म्हणजे आताच्या इराक देशात उत्खनन करत होता, त्याला एकफारच महत्त्वपूर्ण खजिना गवसला. निनवेह नावाच्या प्राचीन शहरात त्याला कित्येक मातीच्या भाजलेल्या विटा सापडल्या. त्यावर कोणत्यातरी अज्ञात लिपीमध्ये काहीतरी लिहिलेलं होतं. हे सगळं घबाड लंडनला नेण्यात आलं. त्यावर कसून संशोधन करण्यात आलं. त्यातून असं उघडकीला आलं की, इसवी सन पूर्व किमान दोन हजार वर्षांपूर्वी मेसोपोटेमियामध्ये असीरियन संस्कृती नांदून गेली. त्यावेळचा एक राजा अशुरबनिपाल याच्या ग्रंथालयातले हे ग्रंथ आहेत. म्हणजे ताम्रपटाप्रमाणे मातीच्या विटांवर मजकूर कोरलेला आहे आणि तो मजकूर म्हणजे अशुरबनिपालच्याही पूर्वीच्या काळातल्या गिलगमेश नावाच्या राजाच्या काळातलं महाकाव्य आहे. जगभरात आतापर्यंत उत्खननात सापडलेला सर्वात प्राचीन लेख म्हणजे इजिप्तच्या पिरॅमिड्समधले लेख. त्यानंतर दोन क्रमांकाचा सर्वाधिक प्राचीन मजकूर म्हणजे हे ‘एपिक ऑफ गिलगमेश.’ या महाकाव्याचा अभ्यास केल्यावर तज्ज्ञांना असं आढळलं की, बायबलच्या जुन्या आणि नव्या करारात येणार्‍या अनेक पुराणकथा या ‘गिलगमेश’मध्येही आहेत. उदा. बायबलच्या ‘जेनेसिस’ उर्फ ‘उत्पत्ती’ या भागात येणारी जलप्रलयाची कथा घ्या. देवाने नोहाला सांगितलं की, जलप्रलय होणार आहे. मग नोहाने एक मजबूत होडी तयार केली. त्यात जगातल्या सगळ्या सजीवांचे नमुने भरले. मग प्रलयातून वाचल्यावर त्याने नवीन सजीवसृष्टीची उत्पत्ती केली, इत्यादी.आता ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातले एक तज्ज्ञ अभ्यासक प्रा. डॉ. मार्टिन वर्दिग्ंटन म्हणतायत की, ‘फेक न्यूज’ हा प्रकार बायबल आणि त्यापैकी मूळ असणार्‍या ‘गिलगमेश’मध्येही आढळतो. बायबलमध्ये देव नोहाला जलप्रलय होणार, अशी सूचना देतो. तर ‘गिलगमेश’मध्ये ‘ईया’ नावाचा देव ‘उठानापिष्ठी’ या त्याच्या भक्ताला सांगतो की, “लवकर एक होडी बांध. आकाशातून अन्नवर्षाव होणार आहे.” ही एक प्रकारची ‘फेक न्यूज’च आहे. मात्र, ही ‘मिस इन्फर्मेशन’ आहे. कारण, यामुळे कुणाचे वाईट न होता उलट कल्याणच झाले.

असो. आमचा धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्ण आणि प्राचीन सुमेरियन किंवा असीरियन जे कोणी असतील ते त्यांचा देव ‘ईया’ यांनी मानवजातीच्या भल्यासाठी ‘फेक न्यूज’ वापरली.आधुनिक युगाचा प्रारंभ साधारण १५व्या शतकापासून मानतात. त्या काळात होऊन गेलेला इटलीचा महान राजनीतिज्ञ मॅकियावेली याचा मात्र संदेश आहे की, ‘सप्रेशो व्हेरी, सजेस्टिओ फॉल्सी.’ व्हेरी म्हणजे सत्य. ते सप्रेस करा. दाबून टाका आणि फॉल्सी म्हणजे खोडसाळ. त्याकडे फक्त निर्देश करा, सजेस्ट करा. सत्य दाबून टाका आणि खोडसाळ असत्याकडे बोट दाखवा.हा दिव्य संदेश तमाम युरोपीय राष्ट्रांनी अक्षरशः कृतीत उतरवला आणि आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या चारही खंडांमध्ये स्थानिकांच्या कत्तली करून साम्राज्यं निर्माण केली.अगदी अलीकडे साम्यवाद्यांनी या संदेशाचा जो काही मनमोकळा वापर केला, त्या पातळीवर मात्र कुणीच पोचू शकणार नाही. अत्यंत सुंदर भाषेत, ओघवत्या आणि मनमोहक शैलीत खोटं बोलणं, खोटं लिहिणं, खोट्या बातम्या पेरणं, याबाबतीत त्यांचा क्रमांक अव्वल. आता एकविसाव्या शतकात सोशल मीडियाच्या उदयामुळे तर ‘फेक न्यूज’ इतकी बोकाळली आहे की, आता खरी बातमी कोणती हेच कळेनासं झालं आहे. ‘फेक न्यूज’साठी परवाच एका लब्धप्रतिष्ठित पत्रकाराला त्याच्या कंपनीने बी.पी.एल. (पक्षी :XX पे लाथ) दिली आहे.

@@AUTHORINFO_V1@@