सिंधुदुर्गातील 'मायरिस्टिका स्वॅम्प'चे दुर्मीळ जंगल 'जैविक वारसा स्थळ' म्हणून घोषित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2021   
Total Views |

Myristica swamp_1 &n
(छायाचित्र - साईली पालांडे-दातार)

जैविक विविधता कायद्याअंतर्गत घोषणा

मुंबई (अक्षय मांडवकर) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हेवाळे आणि बांबर्डे गावांच्या हद्दीवर असलेल्या दुर्मीळ 'मायरिस्टिका स्वॅम्प'चे जंगल 'जैविक वारसा स्थळ' म्हणून घोषित करण्यात आले आहे. वन विभागाने 'जैविक विविधता कायद्या'अंतर्गत या जंगलाला हा दर्जा दिला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील ग्रामस्थांनी या 'मायरिस्टिका स्वॅम्प'च्या देवराईचे संरक्षण केले असून महाराष्ट्र आढळणारे 'मायरिस्टिका स्वॅम्प'चे हे एकमेव जंगल आहे.


भारतात केवळ तीन राज्यांमध्ये 'मायरिस्टिका स्वॅम्प'चे जंगल आढळून येते. 'मायरिस्टिका स्वॅम्प'' ही गोड्या पाण्यातील दलदलीच्या जंगलाची परिसंस्था महाराष्ट्र केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात अस्त्तिवात आहे. याठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून या जंगलाचे जतन गावकऱ्यांनी देवराईच्या स्वरुपात केले आहे. २०१८ मध्ये या देवराईची पहिली नोंद गायत्री श्रीधरन आणि मल्हार इंदुलकर या अभ्यासकांनी केली. सद्यस्थितीत हेवाळे ग्रामस्थांच्या 'जाॅईन्ट फाॅरेस्ट मॅनेजमेंट कमिटी'च्या माध्यमातून या जागेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात येते. हेवाळे-बांबर्डे या गावांच्या हद्दीवर असलेल्या या जंगलाला 'कान्हळाची राई' देखील म्हटले जात असल्याची माहिती यावर अभ्यास करणाऱ्या अभ्यासिका साईली पालांडे-दातार यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. त्या म्हणाल्या की, "ही जंगली जायफळाची झाडे बहुसंख्याने असलेली गोड्यापाण्याची दलदल परिसंस्था आहे. ही परिसंस्था अत्यंत दुर्मीळ असून अशा परिसंस्थांचे वय साधारण १४० दशलक्ष वर्षे इतके आहे. महाराष्ट्रातील आजवर माहीत असलेला हा एकमेव गोड्या पाण्याच्या दलदलीचा अधिवास असून यातून अनेक बारमाही जिवंत झरे वाहत असतात. पश्चिम घाट या जैवविविधते समृद्ध पट्ट्यात ही राई सर्वात उत्तरेकडील राई आहे."

 
Myristica swamp_1 &n
 
'कान्हाळाची राई' ही हेवाळे बांबर्डे परिसरातील स्थानिकांनी शतकानूशतके राखलेली देवराई आहे. यातील झाड शिमग्यासाठी/ होळीसाठी पवित्र मानले जाते. आज आजूबाजूच्या रबर लागवडीमुळे हिचे अस्तित्व धोक्यात आल्याचे पालांडे यांनी नमूद केले. या परिसंस्थेत सापडणारी एकमेवाद्वितीय वृक्ष आणि प्राणी संपदा वाचविण्याच्या दृष्टीने 'जैविक वारसा स्थळ' म्हणून तिचे मानांकन होणे ही फार महत्वाची उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या परिसरातील गावांच्या संवर्धनांकार्याचा गौरव आहे. या मानांकनामुळे गावकऱ्यांच्या पारंपरिक हक्कावर गदा येणार नाही. तसेच, संवर्धनासाठी गावकरी, अभ्यासक आणिमहाराष्ट्र वनखाते यांच्या मधील समन्वयाने काम घडणार आहे. वन विभागाने 'जैविक विविधता कायदा, २००२' मधील कलम ३२ चा वापर करुन या जंगलाला 'जैविक वारसा स्थळा'चा दर्जा दिला आहे. कोल्हापूर वन विभागाने यासंबंधीच प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला होता. महाराष्ट्रामधील हे चौथे 'जैविक वारसा स्थळ' असून यापूर्वी गडचिरोलीमधील ग्लोरी आॅफ अल्लापल्ली, लँडोरखोरी रिझर्व फॉरेस्ट, जळगाव आणि गणेशखिंड गार्डन, पुणे यांना हा दर्जा देण्यात आला आहे.
 
 
 


गावकऱ्यांच्या हक्कांवर रोख नाही 

गेल्या महिन्यात हेवाळे आणि बांबर्डे गावांच्या हद्दीवर असलेल्या दुर्मीळ 'मायरिस्टिका स्वॅम्प'चे जंगल 'जैविक वारसा स्थळ' म्हणून घोषित करण्यासंबंधीचा प्रस्ताव आमच्या माध्यमातून राज्य शासनाला पाठविण्यात आला होता. या जंगलाला जैविक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या हक्कांवर कोणत्याही प्रकारची रोख येणार नाही. या जंगलाचा जैवविविधता व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येईल - डाॅ. व्ही. क्लेमेंट बेन, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर 
 
 
'मायरिस्टिका स्वॅम्प'विषयी
उष्णकटिबंधीय क्षेत्रात गोड्या पाण्याच्या दलदलीच्या परिसरात 'मायरिस्टिका' प्रजातीच्या वृक्षांचे जंगल आढळते. पृथ्वीवरील सर्वात प्राचीन फुलझाडांमध्ये या वनस्पतीचा समावेश होतो. जायफळाच्या जातीमध्ये 'मायरिस्टिका' वृक्षांचा समावेश होत असून त्यांना 'आययूसीएन' या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगातील 'धोकाग्रस्त' वृक्षांच्या यादीत स्थान दिले आहे. कांदळवनांसारखीच या वृक्षांची मुळे खोडापासून जमिनीच्या दिशेने विस्तारलेली असतात. सदाहरित असणाऱ्या या वृक्षांची घनदाट मुळे ओल्या गाळयुक्त काळ्या मातीत उभे राहण्याकरिता मदत करतात. 'मायरिस्टिका स्वॅम्प''ची ही परिसंस्था भारतात केवळ कनार्टकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यात, केरळमधील दक्षिणेकडील भागात आणि गोव्यामध्ये काही ठिकाणी आढळून येते. त्यामुळे महाराष्ट्रात ही परिसंस्था आढळून येणे महत्त्वाचे असून तिचे संवर्धन करणे आवश्यक होते. यांना जमिनीवरील कांदळवने म्हणूनही संबोधले जाते. 



@@AUTHORINFO_V1@@