सांगलीचा निसर्गशिक्षक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2021   
Total Views |

Amol Jadhav_1  
 
 
 
सांगलीतील जनमानसात निसर्गशिक्षणाचे बीज रुजण्यासाठी कार्यरत असलेले अमोल सर्जेराव जाधव यांच्याविषयी...
 
 
सर्गात भटकून त्याचा आनंद लुटणारे अनेक असतात. मात्र, भटकंती करुन मिळालेले हे ज्ञान वाटून निसर्ग प्रबोधनाचा मार्ग अवलंबणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. या वाटेवर चालणारा हा पाईक. सांगलीच्या निसर्गप्रेमींना आपल्या संस्थेच्या माध्यमातून निसर्ग वाचनाची गोडी लागण्यासाठी धडपडणारा. लहानपणी लागलेल्या वन्यप्राण्यांच्या कुतूहलाचे त्यांनी आवडीत रूपांतर केले. अजूनही नोकरी करत त्यांनी ती आवड जपली आहे. असा हा सांगलीचा निसर्गशिक्षक म्हणजे अमोल जाधव.
 
 
 
सांगलीत कृष्णाकाठावर वसलेल्या शिरटे गावात दि. १ नोव्हेंबर, १९८५ रोजी अमोल जाधव यांचा जन्म झाला. मोजक्याच घरांच्या या गावामध्ये जाधवांचा निसर्ग हाच सोबती. त्यामुळे कृष्णाकाठ, गावातील शेती ही त्यांच्या विरंगुळ्याची ठिकाणं. निसर्गाच्या सान्निध्यात त्यांची वाढ होत होती. मात्र, शिक्षणासाठी वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांनी ते सांगली शहरात दाखल झाले. त्या शांतिनिकेतन शैक्षणिक संकुलाचा आवार हे जाधवांच्या भटकंतीचे ठिकाण होते. शांतिनिकेतनमध्ये त्याकाळी छोटेसे प्राणिसंग्रहालयही होते. मधल्या सुट्टीत अगदी सुट्टी संपण्याची घंटा वाजेपर्यंत जाधव तिथल्या प्राण्यांना न्याहाळत बसायचे. वडिलांनीही अमोल यांना लागलेल्या निसर्गाच्या या आवडीवर कधी आडकाठी केली नाही. जाधव तिसरीत असताना एक जुने इयत्ता सहावीच्या विज्ञानाचे पुस्तक त्यांच्या हाती लागले. या पुस्तकात प्राण्यांच्या वर्गीकरणाची (टॅक्सोनॉमी) आणि शरीरशास्त्राची (अ‍ॅनाटॉमी) माहिती दिली होती. या माहितीच्या कुतूहलापोटी त्यांनी बेडूक, पालींना पकडून पुस्तकात लिहिलेली माहिती खरी आहे का, तेदेखील तपासून पाहण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे एकदा सुगरण पक्ष्याच्या घरट्यांना दगड मारताना त्यातील पिल्लं जमिनीवर पडली आणि त्यांचा मृत्यू झाला. ही गोष्ट जाधवांच्या मनाला चटका लावून गेली. त्यामुळे त्यांनी प्राण्यांना इजा न पोहोचविण्याचा निश्चय करून संवर्धनात्मक कामाकडे आपला मोर्चा वळविला.
 
 
 
महाविद्यालयीन वयात त्यांची ही आवड शिक्षक प्रा. सुरेश गायकवाडांमुळे बहरली. गायकवाड हे त्यावेळी सांगलीचे मानद वन्यजीव रक्षक होते. त्यामुळे या क्षेत्रात त्यांना गाढा अनुभव होता. गायकवाडांबरोबर चांदोली आणि दाजीपूर अभयारण्यांमध्ये जाधवांची सफर सुरू झाली. जंगलवाचनाचे काम नेमक्या कशा पद्धतीने करावे, तिथल्या वन्यजीवांच्या खुणा कशाप्रकारे ओळखाव्यात, यासंबंधीचे ज्ञान त्यांना मिळाले. निसर्गात भटकंती करण्याची आवड सगळ्यांना असते. मात्र, तेथील गोष्टींची जाणीव त्यांना असतेच असे नाही. त्यामुळे निसर्ग प्रबोधनाच्या वाटेची दिशा जाधवांना मिळाली. ‘प्राणिशास्त्र’ विषयातून पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर घरातील बेताच्या परिस्थितीमुळे जाधवांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. मात्र, सुट्टीच्या दिवसांमध्ये त्यांनी आपली निसर्ग निरीक्षणाची आवड जोपासली. २००७ पासून त्यांनी सांगली शहरातील मानवी वस्तीत शिरणार्‍या सापांचे बचावकार्य सुरू केले. त्यावेळी केवळ सापांना सोडून पकडून देण्यापुरतेच हे काम मर्यादित होते. मात्र, जाधवांची प्रसिद्ध उभयसृपशास्त्रज्ञ डॉ. वरद गिरी यांच्याशी भेट घडली आणि सापांविषयींचा त्यांचा दृष्टिकोनच बदलला. आता हा दृष्टिकोन थोडा शास्त्रीय झाला. हे काम सुरूच असताना सांगलीतील समविचारी लोकांनी एकत्र येऊन एक निसर्ग संवर्धन संस्था स्थापन करण्याचे निश्चित केले.
 
 
 
२००८ साली ‘नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी’ ही संस्था स्थापित झाली. जाधव या संस्थेच्या संस्थापकीय सदस्यांपैकी एक असून सांगली जिल्ह्यात वन्यजीव आणि पर्यावरणीय जनजागृतीसाठी ही संस्था कार्यरत आहे. जाधव यांनी वन्यजीव बचाव आणि शुश्रूषा क्षेत्रात विपुल काम केले आहे. पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या नोंदी ठेवून वन्यजीवांच्या स्वभावशास्त्रावरही त्यांचा अभ्यास आहे. निसर्गशिक्षणाच्या अनुषंगाने सध्या त्यांचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामध्ये अनेक शाळा, महाविद्यालये, सामाजिक कार्यक्रम आणि कार्यशाळांमधून पर्यावरण शिक्षण, जैवविविधता, प्रदूषण, अद्भुत आणि विस्मयकारक जीवसृष्टी, पर्यावरणपूरक जीवनशैली, मानव-वन्यजीव संघर्ष, इ. विषयावर स्लाईडशो, प्रेझेंटेशन आणि मार्गदर्शन, कार्यशाळा इ. कार्यक्रम सुरू आहेत. विद्यार्थी आणि तरुणांमध्ये पर्यावरण आणि सजीवसृष्टीविषयी जनजागृती आणि या क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी निसर्ग सहलींचे आयोजन, जंगलातील शिबिरे, पक्षिनिरीक्षण, छायाचित्र प्रदर्शन, छायाचित्रण सहली, इत्यादीचे आयोजन ते आपल्या संस्थेच्या माध्यमातून करतात. वनविभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी वन्यजीव सुरक्षित पकडणे, त्यांची शास्त्रीय माहिती जमा करणे, त्यांची शुश्रूषा करणे इत्यादीचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शनही ते करतात. जनसामान्यांमध्ये विविध पर्यावरणीय विषयांवर जनजागृतीसाठी मुद्रित माध्यमे, आकाशवाणी तसेच मराठी वृत्तवाहिन्यांवरून प्रबोधनात्मक कार्यक्रमांमध्ये त्यांचा आवर्जून सहभाग असतो. नोकरी सांभाळून जाधव करत असलेल्या या कामांना कुटुंबाचाही तितकाच पाठिंबा आहे. सध्या ते मानव-सर्प आणि मानव-मगर संघर्ष यावर सांगलीमध्ये आणि मानव-बिबट्या संघर्षावर काम करत आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
 
 
@@AUTHORINFO_V1@@