गूढ कोकणातील सागरी कासवांच्या विणीचे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2021   
Total Views |

sea turtle_1  H



महाराष्ट्रातील विविध वन्यजीव संवर्धन मोहिमेमधील यशस्वी झालेली एक मोहीम म्हणजे ‘सागरी कासव संवर्धन मोहीम.’ गेल्या दोन दशकांपासून कोकण किनारपट्टीवर ही मोहीम स्थानिकांच्या पुढाकाराने सुरू आहे. संवर्धनातून रोजगारनिर्मिती या तत्त्वावर सुरू झालेल्या या मोहिमेची पाळेमुळे आता घट्ट रोवून बसली आहेत. या संवर्धनकार्याची माहिती देणारा हा लेख...



मुंबई (अक्षय मांडवकर) -
भारताच्या एकूण आठ हजार किलोमीटर लांब पसरलेल्या आणि जैविकदृष्ट्या संपन्न असलेल्या किनारपट्टीपैकी 720 किमींची किनारपट्टी महाराष्ट्राला लाभली आहे. ही किनारपट्टी अनेक सागरी जलचरांचे आश्रयस्थान आहे. त्यामधील एक जीव म्हणजे सागरी कासव. ‘
समुद्राचा स्वच्छता कर्मचारीम्हणवून घेणारा हा जीव फार क्वचितच लोकांच्या प्रत्यक्ष नजरेस पडतो. कारण, केवळ दोन कारणांवेळी तो किनार्‍यावर स्वत:हून येतो किंवा दुर्दैवाने वाहून येतो. त्यातील दुर्दैवाचे कारण म्हणजे हा जीव जखमी असल्यास किनार्यांवर वाहून येतो आणि दुसरे कारण म्हणजे अंडी घालण्यासाठी सागरी कासवांच्या माद्या समुद्रकिनार्‍यांवर येतात. सागरी कासवांमधील नर फार क्वचितच किनार्‍यावर आलेले आढळतात.
 

 

अशा समुद्री कासवांविषयी लिहिण्यामागचे कारण म्हणजे सध्या कोकण किनारपट्टीवर या कासवांचा सुरू झालेला विणीचा हंगाम. सागरी कासवांमधील ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्यांनी कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येण्यास सुरुवात केली आहे. यापार्श्वभूमीवर गेल्या 15 दिवसांमध्ये रायगडमधील हरिहरेश्वर, दिवेआगर, रत्नागिरीतील वेळास, आंजर्ले, दाभोळ, कोळथरे आणि सिंधुदुर्गातील वायंगणी-शिरोडा किनार्‍यांवर कासवाची घरटी आढळून आली आहेत.

 
 

कासवांविषयी थोडेसे...

कासवांचा समावेश सरपटणार्या प्राण्यांमध्ये होतो. कासवे, सरडे, साप, मगर, सुसर आणि न्यूझीलंडमध्ये सापडणारा ‘तुआतारा’ यांचा समावेश सरीसृपवर्गात होतो. त्यामध्ये कासवांना गण ’चिलोनिया’ असून त्यांची उत्पत्ती साधारण 20 कोटी वर्षांपूर्वी झाली असल्याचा अंदाज आहे. भारतात जमीन, गोडे पाणी आणि सागरी कासवांची एकंदर पाच कुळे आणि 31 जाती आहेत. सागरी कासवांचा समावेश यामधील ’डर्मोचिलिडी’ आणि ’चिलोनिडी’ या दोन कुळांमध्ये होतो. सागरी कासवे जास्त करुन उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील समुद्रात राहणे पसंत करतात. मात्र, श्वास घेण्यासाठी त्यांना समुद्राच्या पृष्ठभागावर यावे लागते. ती उत्तम पोहतात. त्यांना जमिनीवरील कासवांप्रमाणे डोके आणि पाय कवचामध्ये आत ओढून घेता येत नाहीत. या कासवांचे पुढील पाय वल्ह्यासारखे असतात. सागरी कासवांमधील नर हा मादीपेक्षा लहान असतो. नराला मोठी शेपूट असते. या कासवांचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा पिल्ले घरट्यातून बाहेर पडून समुद्रात गेली की, त्यामधील मादी कासवं केवळ अंडी घालण्यासाठी किनार्‍यावर येतात. नर सहसा किनार्‍यावर येत नाही. नर आणि मादी कासवांचे मिलनही समुद्रातच होते.


समुद्री कासवांना असलेले धोके

 

सागरी कासवांचा संकटग्रस्तप्रजातींमध्ये समावेश होण्यासाठी बहुतांश करुन मानवनिर्मित समस्या कारणीभूत आहेत.समुद्री कासवांमधील अंड्यांना किनार्‍यावरील शिकारी प्राणी उदा. कुत्रे, कोल्हा, लांडगा, पक्षी यांच्यापासून धोका असतो. मासेमारीची जाळी खराब झाल्यानंतर तिला समुद्रात फेकून दिले जाते. या जाळ्या सागरी कासवांसाठी फास ठरतात. या जाळ्यांमध्ये अनेक वेळा अडकून न सुटल्याने सागरी कासवांचा पाण्यात गुदमरून मृत्यू होतो. याशिवाय बोटींना धडकल्याने कासवांचा जीव जातो. किनार्‍यावरील कृत्रिम प्रकाशही कासवांसाठी हानीकारक असतो. शिवाय समुद्रातील वाढत्या कचर्याच्या प्रमाणामुळे सागरी कासवांचा जीव धोक्यात आला आहे.

 
 
 

भारतातील सागरी कासवे

जगभरातील अथांग सागरात सागरी कासवांच्या एकूण सात प्रजातींचा अधिवास आहे. त्यामधील पाच प्रजाती भारताच्या सागरीपरिक्षेत्रात आढळतात. त्यामध्ये ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी, हॉक्सबिल, लॉगरहेड आणि सागरी कासवांमधील सगळ्यात मोठ्या कासव लेदरबॅक कासवाचा समावेश आहे. सागरी कासवांच्या दोन कुळातील डर्मोचिलिडीकुळामध्ये कातडी असणार्या सागरी कासवाचा म्हणजेच लेदरबॅक कासवाचा समावेश होतो. चिलोनिडी कुळामध्ये ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी, हॉक्सबिल आणि लॉगरहेड या प्रजाती येतात. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍याबरोबरच अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर सागरी कासवांची विण होते. पश्चिम किनारपट्टीचा विचार केल्यास गुजरात आणि महाराष्ट्र आणि गोवा किनार्यावर सागरी कासवं अंडी घालण्यासाठी येतात. महाराष्ट्र आणि गोव्यातील किनार्‍यांवर ‘ऑलिव्ह रिडले’ ही एकच प्रजात अंडी घालण्यासाठी येते. गुजरातमध्ये ‘ऑलिव्ह रिडले’बरोबरच ‘ग्रीन सी’ प्रजातीच्या माद्यांची विण होते.

पूर्व किनारपट्टीवर ओडिशामध्ये मोठ्या संख्येने ‘ऑलिव्ह रिडले’ माद्या एकाच वेळी अंडी घालण्यासाठी येतात. याला ‘मासनेस्टिंग’ किंवा ‘अरिबाडा’ असे म्हणतात. ओडिशामधील ऋषिकुल्य किनारपट्टीवर एकाच वेळी हजारोंच्या संख्येने या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. याशिवाय आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू किनारपट्टीवरही ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीची विण होते. याशिवाय लक्षद्वीप बेटावर ‘ग्रीन सी’ आणि ‘हॉक्सबिल’ प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी दाखल होतात. अंदमान-निकोबार बेटांवर ‘ग्रीन सी’, ‘ऑलिव्ह रिडले’, ‘हॉक्सबिल’ आणि ‘लेदरबॅग’ या तिन्ही कासवांची विण होते.

 
 
 

महाराष्ट्रातील परिस्थिती

राज्यात रायगडमधील दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, मारळ, रत्नागिरीतील वेळास, केळशी, आंजर्ले, मुरूड, कर्दे, लाडघर, गावखडी, वेत्ये-तिवरे-आंबोळगड, माडबन, दाभोळ, कोळथरे, गुहागर आणि सिंधुदुर्गातील वेळागर, मोचेमाड, सागरतीर्थ, वायगंणी (वेंगुर्ला), मुणगे, तांबळडेग, शिरोडा या किनार्‍यांवर समुद्री कासवांमधील ’ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या दरवर्षी अंडी घालण्यासाठी येतात. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम आहे. राज्यात 2002 पासून ’सागरी कासव संवर्धन मोहिमे’ला चिपळूणच्या ’सह्याद्री निसर्गमित्र’ या संस्थेने सुरुवात केली. 2002 च्या दरम्यान संस्थेचा एक कार्यकर्ता सागरी गरुडाच्या सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी वेळास किनारी गेला होता. त्याला तेथे समुद्री कासवांच्या घरट्यांचा शोध लागला. त्यानंतर संस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक भाऊ काटदरे यांनी त्याबाबत अभ्यास करुन तसेच स्थानिकांकडून माहिती घेऊन सागरी कासवांच्या संरक्षणाचा प्रकल्प वन विभागाच्या साहाय्याने हाती घेतला. 2003 साली वेळासमध्ये नियमित जाऊन जनजागृती तसेच प्रत्यक्ष कासवांच्या घरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू झाले. कासवांची अंडी किंवा प्रत्यक्ष कासवंच ग्रामस्थांकडून खाण्यासाठी चोरली जात होते. त्यामुळे त्यांच्या मनपरिवर्तनाचे काम हाती घेण्यात आले. या सर्व आघाड्यांवरील प्रयत्नांमुळे पहिल्या वर्षी संस्थेतर्फे याठिकाणी 50 घरटी सुरक्षित करण्यात आली. त्यातून बाहेर पडलेल्या 2 हजार, 734 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. पुढे हा प्रकल्प आणखी काही गावांमध्ये राबविण्यात आला. त्यासाठी प्रत्येक किनार्‍यावर कासवमित्राची नेमणूक करण्यात आली. संवर्धनाच्या कामासोबतत्यातून रोजगार निर्मितीच्या उद्देशाने संस्थेने 2006 साली ’कासव महोत्सवा’ची सुरुवात केली. स्थानिक लोकांच्या घरात या सर्व पर्यटकांचे राहणे आणि जेवणाची सोय करण्यात आली. त्यामुळे गावकर्‍यांच्या हाताला चार पैसे लागले. संवर्धनाचे हे काम सुस्थितीत सुरू झाल्यानंतर संस्थेने या कामाला स्थानिक ग्रामपंचायत आणि वन विभागाकडे सोपवले.

 
 
 

सागरी कासव संवर्धन कसे होते?

महाराष्ट्रातील सागरी कासव विणीच्या किनार्‍यांवर कासवमित्रांची नेमणूक करण्यात आली आहे. या कासव मित्रांना वन विभागाकडून मानधन देण्यात येते. साधारणपणे नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान ’ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या रात्रीच्या वेळेस किंवा पहाटे अंडी घालण्यासाठी किनार्‍यावर येतात. वाळूत साधारण दीड फूट खोल खड्डा करुन त्यामध्ये अंडी घालतात. याला ’घरटे’ म्हटले जाते. सागरी कासवांमध्ये पालकत्व नसल्याने माद्या अंडी घालून पुन्हा समुद्रात परतात. त्यामुळे ही घरटी एकतर समुद्राच्या भरतीमुळे उद्ध्वस्त होण्याची भिती असते किंवा शिकारी प्राण्यांकडून त्यामधील अंडी फस्त केली जातात. अशावेळी मादी कासवाचे शरीर वाळूत घासल्यामुळे त्यावर तयार झालेल्या चिन्हाच्या मदतीने कासव मित्रही घरटी शोधून काढतात.कासवमित्रांकडून ही अंडी टोपलीत सुरक्षितरीत्या ठेवली जातात. भरती रेषेपासून दूर कृत्रिम घरट्यांची निर्मिती करण्यासाठी उबवणी केंद्र तयार केले जाते. त्याला ’हॅचरी’ म्हणतात. या ’हॅचरी’त मादीकासवाने केलेल्या खड्ड्याप्रमाणे कृत्रिम खड्डा तयार केला जातो. त्यामध्ये ही अंडी ठेवून त्यावर वाळू टाकून खड्डा भरला जातो. त्याभोवती कुंपण तयार केले जाते. अंड्यांमधून बाहेर पडलेली पिल्ले इतरत्र भटकू नयेत म्हणून त्यावर जाळीदार टोपले ठेवले जाते. साधारण 50 ते 55 दिवसांच्या उबवणीच्या कालावधीनंतर पिल्ले त्या कृत्रिम घरट्यामधून बाहेर पडतात. याला शास्त्रीय भाषेत ’इएक्स-सेटूकॉन्झर्वेशन’ असे म्हणतात. काही किनार्‍यांवर पौर्णिमेच्या मोठ्या भरती रेषेपासून दूर कासवांचे घरटे आढळल्यास त्याला त्याच ठिकाणी ठेवून नैसर्गिक पद्धतीने संवर्धन केले जाते. याला ’इन-सेटू कॉन्झर्वेशन’ असे म्हटले जाते.



कासव महोत्सव

घरट्यातून पिल्ले बाहेर पडण्याच्या कालावधीत ’कासव महोत्सवा’चे आयोजन करण्यात येते. रत्नागिरीतील वेळास आणि आंजर्ले गावामध्ये या महोत्सवाचे आयोजन होते. यावेळी घरट्यामधून बाहेर येऊन समुद्राच्या दिशेने जाणार्‍या पिल्लांचे दर्शन पर्यटकांना करवून देण्यात येते. पर्यटकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय गावातच केली जाते. यासाठी एक पॅकेजतयार करण्यात येते. या पॅकेजचे दर एकच ठरवून तो संपूर्ण गावाला मान्य करावा लागतो. महत्त्वाचे म्हणजे पर्यटकांना दाखवण्यासाठी घरट्याबाहेर आलेल्या पिल्लांना थांबवले जात नाही. कासवमित्रांकडूनदर एक तासाने घरट्याची पाहणी करुन घरट्याबाहेर पडलेल्या पिल्लांना तातडीने समुद्रात सोडले जाते. त्यासाठी पर्यटकांसाठी राखून ठेवलेल्या विहित वेळेची वाट पाहिली जात नाही.


तापमान वाढीचा धोका

जागतिक तापमान वाढीचा परिणाम राज्यातील सागरी कासव विणीवरही पडल्याचे दिसत आहे. कारण, यापूर्वी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोठ्या संख्येने अंडी देण्यासाठी येणार्‍या माद्या आता जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात येऊ लागल्या आहेत. शिवाय, ’हॅचरी’मधील कृत्रिम खड्ड्यातील वाढते तापमानही चितेंचा विषय आहे. कोकणात झालेल्या संशोधनानुसार्‍या खड्ड्याच्या परिसरातील तापमान वाढल्यानंतर त्यामधील वाळूत आर्द्रता वाढते. महाराष्ट्रातील किनारे हे खाडीक्षेत्राजवळ असल्याने तेथील वाळूमध्ये आर्द्रता निर्माण होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे संशोधकांच्या अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

परिणामी घरट्यामधील वाळू कडक होते आणि त्यामध्ये पिल्ले अडकल्याने त्यांचा मृत्यू होतो. या प्रकारचे निरीक्षण गेल्यावर्षी रत्नागिरीतील काही किनार्यांवर संशोधकांनी नोंदवले होते. नोव्हेंबर-डिसेंबर या थंडीच्या महिन्यांमध्ये सागरी कासवांनी दिलेल्या अंड्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कारण, यामधून नर कासवांची पैदास होण्याची शक्यता असते. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये समुद्री कासवांची सर्वाधिक विण ही फेब्रुवारी महिन्यात झाली आहे. साधारण वाळूचे तापमान 31.5 सेल्सियस राहिल्यास अंड्यांमध्ये मादीकासवांचे भ्रूण विकसित होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या अंड्यामधून मादी कासवांची पैदास होते. म्हणूनच प्रजोत्पादनाचे प्रमाण समसमान ठेवण्याकरिता थंडीमधील दिलेल्या अंड्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. याशिवाय कोल्हे आणि कुत्र्यांबरोबरच जमिनीखालील लाल मुंग्यांमुळेदेखील कासवांच्या पिल्लांना धोका असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे लाल मुंग्यांना घरट्यांपासून दूर ठेवण्यासाठी ’हॅचरी’भोवती चर खोदून त्यावर कडुलिंबाचा सुकलेला पाला टाकला जातो. यामुळे मुंग्यांच्या प्रादुर्भाव होत नसल्याचे संशोधनातील निरीक्षणामधून उघड झाले आहे.

@@AUTHORINFO_V1@@