पत्रकारितेला जाग आली?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2020   
Total Views |

journalism_1  H


मागल्या चार-पाच महिन्यांत कोरोनाचे थैमान व अव्यवस्था गलथान कारभार, यावर कोणी भाष्य करायला हवे होते? ते पत्रकारितेचे कर्तव्य विरोधी नेते पार पाडत होते आणि पत्रकार-संपादक मात्र सत्ताधारी बेफिकीरीचे गुणगान करण्यात रममाण झालेले होते. एक प्रकारची राजकीय भूमिकेची गुंगी बहुतांश संपादक-माध्यमांना चढलेली होती आणि त्यामुळे समोरचे सत्य दिसत नव्हते की, त्यावर बोलण्याची इच्छा होत नव्हती. ती सगळी गुंगी वा झिंग पांडुरंग रायकरच्या धक्कादायक मृत्यूने उतरवली आणि मराठी पत्रकारिता खडबडून जागी झाली आहे.



गेल्या आठवड्याच्या आरंभी ‘टीव्ही-9’ या मराठी वृत्तवाहिनीचा बातमीदार प्रतिनिधी पांडुरंग रायकर याचा कोरोनाच्या बाधेने दुर्दैवी मृत्यू झाला आणि मराठी पत्रकारितेला खडबडून जाग आली. अचानक या तमाम पत्रकारांना इथे महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे आणि देशातच नव्हे, तर अवघ्या जगात कोरोनाची मोठी बाधा इथे असल्याचा शोध लागला आहे. त्याहीपेक्षा या घटनेनंतर मराठी पत्रकारांनी लावलेला जगावेगळा शोध म्हणजे ‘कोविड सेंटर’ म्हणून जी भव्य हंगामी इस्पितळे महाविकास आघाडी सरकारने उभारली आहेत, ती पूर्णपणे निकामी, निरूपयोगी आहेत. तिथे कुठल्याच रुग्णासाठी पुरेशा सोयीसुविधा नाही किंवा उपकरणे व डॉक्टर्सचा पत्ता नाही. त्याखेरीज जी मुळची वा खासगी रुग्णालये आहेत, तिथे सामान्य माणसाला किंमत मोजूनही सहजासहजी प्रवेश वा उपचारही मिळू शकत नाहीत. अर्थात, उपचार ही दूरची गोष्ट झाली. त्या रुग्णाला इस्पितळात पोहोचण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या रुग्णवाहिकाही उपलब्ध नाहीत, असे एकामागून एक धक्कादायक शोध मराठी पत्रकारांना मागल्याच आठवड्यात लागलेले आहेत. मात्र, त्या शोधाशोधीमध्ये रायकरचा बळी पडला आहे. कारण, त्याला कोरोनाने ग्रासले नसते, तर आजही मराठी पत्रकारांना कोरोनाची बाधा इतकी भयानक किंवा राज्य शासनाचा आरोग्याचा कारभार गलथान बेजबाबदार असल्याचा थांगपत्ता लागला नसता.

त्या भयावह कर्तव्यहीन कुंभकर्णी झोपेतून पत्रकारांना जागवण्यासाठी रायकरला आपले प्राण वेचावे लागलेले आहेत. त्यानंतर हळूहळू या पत्रकारांचे कानही काम करू लागले आहेत. तसे नसते तर त्यांना ही परिस्थिती दोनचार महिने आधीच बघता आली असती किंवा त्या संबंधाने कानावर पडणार्‍या गोष्टी ऐकता आल्या असत्या ना? तसे झाले असते, तर पांडुरंग रायकरला आपली इहलोकीची यात्रा अशी तडकाफडकी संपवावी लागली नसती. मागले दोन दिवस हे पत्रकार घसा खरवडून सांगत आहेत की, पुण्यात मोठी ‘कोविड सेंटर’ म्हणून उभारलेली इस्पितळे वा केंद्रे कुठल्याही सुविधा नसलेली आहेत. त्या सेंटरचे आठवड्यापूर्वीच उद्घाटन झालेले होते. त्याच समारंभाला माजी मुख्यमंत्री व आजचे विरोधी नेते देवेंद्र फडणवीस व विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही उपस्थित होते. मग त्या उद्घाटन समारंभाचे वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकारांचे डोळे मिटलेले होते आणि त्यांनी कानात बोळे घातलेले होते काय? नसते तर त्यांना तिथे कुठलेही काम पूर्ण झालेले नाही किंवा रुग्णांना उपयुक्त ठरू शकेल, अशा कुठल्याही सुविधाच नाहीत हे दिसले असते ना? तपासता आले असते ना? पत्रकाराने तेवढेच बघायचे नसेल, तर वार्तांकन म्हणजे काय असते? जागोजागी होणार्‍या समारंभ-सोहळ्यात हजेरी लावणारे पुढारी वा नेते काय बरळतात, तेच टिपून घेण्याला ‘पत्रकारिता’ म्हणतात काय? एका नेत्याचे वक्तव्य ऐकून त्यावरची दुसर्‍या नेत्याची प्रतिक्रिया मिळवण्यासाठी चुगलखोरी करण्याला ‘पत्रकारिता’ समजले जाते काय? ज्या ‘कोविड सेंटर’मध्ये रायकरला दाखल करण्यात आले, तिथे डॉक्टर वा अन्य वैद्यकीय कर्मचारी उपकरणांचा पत्ताच नसल्याचे समजले कधी? पांडुरंगाचे प्राण कंठी आल्यावर? मग समारंभाच्या वेळी सर्वकाही होते आणि रायकरला दाखल करण्यापूर्वी ते सर्व साहित्य गायब करण्यात आलेले होते काय? नसेल तर उद्घाटनाचे वार्तांकन म्हणजे जमलेल्या पत्रकारांनी काय केलेले होते? आता त्यासाठी उद्घाटक अजितदादा वा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने शंख करणार्‍यांनी तरी कोणते दिवे लावले होते? ज्याचे उद्घाटन झाले, तो नुसता मंडपाचा देखावा आहे आणि तिथे कुठलीही सज्जताच झालेली नाही, ही आठवड्यापूर्वीची बातमी आहे. रायकरला कोरोनाची बाधा होण्यापूर्वीची ती बातमी आहे. त्याच्याच परिणामी या पत्रकाराचा बळी गेला आहे.




उद्घाटनाच्या बातम्या आल्या, त्या मजेशीर होत्या. त्यात कुठेही रुग्णांच्या सेवेसाठी उभारलेल्या सुविधा किंवा अन्य साधने व कर्मचार्‍यांचा मागमूस नव्हता. त्यापेक्षा फडणवीस व अजितदादा पुन्हा एकाच व्यासपीठावर येणार, याच्या कौतुक व गुणगानाने बातम्या ओथंबलेल्या होत्या. दोघे एकत्र येणार म्हणजे पुन्हा नव्या राजकारणाला चालना मिळू शकेल काय? महाविकास आघाडी सरकारला धोका आहे काय? हे दोन नेते काय बोलतील, करतील त्याचा भरपूर उहापोह होता. पण, ‘कोविड सेंटर’च्या सज्जतेचा कुठलाही तपशील नव्हता. तो तपशील मंत्रिमहोदय वा नेत्यांनी सांगितला आणि पत्रकारांनी पुढे सरकवला. तपासला बिलकुल नाही ; अन्यथा तेव्हाच निदान पांडुरंग रायकरला तरी इथे उपचाराला येणे म्हणजे मृत्यूला कवटाळणे असल्याची जाणीव झाली असती. जेव्हा पांडुरंगवर ती वेळ आली, तेव्हा त्याला तिथे साधे खायला मिळाले नाही किंवा उपचार करू शकतील असे डॉक्टर कर्मचारीही नव्हते. पुढे त्याची प्रकृती आणखी ढासळली, तेव्हा तर मंगेशकर रुग्णालयात न्यायला रुग्णवाहिका मिळवतानाही मित्र पत्रकारांची तारांबळ उडाली होती. एक रुग्णवाहिका मिळवली, तर त्यात प्राणवायूची सुविधा नव्हती आणि दुसरी आली त्यात प्राणवायू असला तरी डॉक्टर नसल्याने त्याला इस्पितळात नेता आले नाही. त्यातच पाच तास निघून गेले आणि रायकरची प्राणज्योत मालवली. हे सर्व पत्रकारांना समजण्यासाठी त्याचे प्राण पणाला लागण्याची गरज होती का? आणि तशा अवस्थेतून जायला लागलेला तोच एकटा माणूस पुण्यात नाही. रोजच्या रोज असे शेकडो रुग्ण अपुर्‍या वा नसलेल्या सुविधा मिळण्यासाठी झगडत आहेत. पण, त्याची खबरबात पत्रकार देत होते काय? त्यांनाच थांगपत्ता नव्हता आणि कोणी तिकडे लक्ष वेधलेच, तर ‘राजकारण नको’ म्हणून संपादक-अँकर डंका पिटत होते.

रायकरच्या मृत्यूनंतर खवळलेल्या पत्रकारांनी ज्या काही तक्रारी केल्या आहेत, त्यापेक्षा मागल्या चार महिन्यांत विरोधी पक्षांनी काय वेगळे सांगितले होते? मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत आणि व्हिडिओ माध्यमातून सरकार हाकत आहेत, ही आजची गोष्ट नाही. विरोधी नेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर प्रत्येक जिल्ह्यांना भेट देऊन तिथल्या त्रुटी वा व्यवस्थेतले दोष सांगत आहेत. त्यांच्यावर राजकारण केल्याचा आरोप हेच संपादक करीत नव्हते काय? सत्तेतून बाजूला व्हावे लागल्यामुळे भाजपचे विविध नेते कासावीस आहेत, अशी टीका कोणी सत्ताधारी पक्षाने केलेली नाही. साध्या व योग्य टिकेलाही ‘ऑपरेशन कमळ’ म्हणून हिणवण्याचे पाप कोणाचे होते? सत्ताधारी पक्षाचे असे बेताल आरोप समजू शकतात. पण, मागल्या चार-पाच महिन्यांत कोरोनाचे थैमान व अव्यवस्था गलथान कारभार, यावर कोणी भाष्य करायला हवे होते? ते पत्रकारितेचे कर्तव्य विरोधी नेते पार पाडत होते आणि पत्रकार-संपादक मात्र सत्ताधारी बेफिकीरीचे गुणगान करण्यात रममाण झालेले होते. एकप्रकारची राजकीय भूमिकेची गुंगी बहुतांश संपादक-माध्यमांना चढलेली होती आणि त्यामुळे समोरचे सत्य दिसत नव्हते की, त्यावर बोलण्याची इच्छा होत नव्हती. ती सगळी गुंगी वा झिंग पांडुरंग रायकरच्या धक्कादायक मृत्यूने उतरवली आणि मराठी पत्रकारिता खडबडून जागी झाली आहे. आता त्यांना तीन-चार महिन्यांपासून फडणवीस, दरेकर जे सांगत होते, त्यातली बातमी समजू लागली आहे. मात्र, तोपर्यंत एक सहकारी पांडुरंग रायकर आपले प्राण गमावून बसला आहे. हे आधीपासून सांगितले, बोलले गेले असते, तर त्या त्रुटी दूर होऊ शकल्या असत्या आणि आपल्यापैकीच एक निरपराध पत्रकार बचावला असता. ही आजची पश्चातबुद्धी आहे. त्याला ‘श्रद्धांजली’ वा ‘हळहळ’ही म्हणता येणार नाही. ज्या सरकारचे गोडवे गाण्याचे पाप केले, त्याचे दोष दाखवण्याची नामुष्की आलेली आहे. पण, त्यात एक हकनाक बळी गेला आहे.
@@AUTHORINFO_V1@@