इमरान खानचे रडगाणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2020   
Total Views |


Imran Khan_1  H




‘रडगाणे’ या शब्दाला चेहरा असता, तर तो नक्कीच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा राहिला असता. कारण, जगात सर्वात जास्तवेळा रडगाणे गाणारा नेता म्हणून इमरान खानची ओळख झाली आहे. रडगाणे गायचा नवा कार्यक्रम संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७५व्या वर्षपूर्तीनिमित्त पार पडला आहे. काश्मीर मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या प्रत्येक व्यासपीठावर तेच ते मुद्दे सांगायचे, असा पाकचा कार्यक्रम आहे; अर्थात पाकच्या या रडगाण्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतके देश वगळता अन्य सर्व देश दुर्लक्ष करीत असतात. मात्र, दरवेळी काश्मीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याविषयी तेच ते आरोप करून वेळ वाया घालविण्याचे काम पाकतर्फे होत असते. यावेळी तर भारताच्या प्रतिनिधींनी इमरान खान यांचे संबोधन सुरू होताच ‘वॉकआऊट’ करीत पाकला त्यांचे स्थानही नेमकेपणाने दाखवून दिले.
 

भारतीय मुस्लिमांचा मसिहा बनण्याची पाकच्या राज्यकर्त्यांची जुनीच सवय आहे. इमरान खानही त्यास अपवाद नाहीत. त्यामुळे भारतावर राज्य पुरस्कृत ‘इस्लामोफोबिया’ पसरविण्याचा हास्यास्पद दावा त्यांनी केला. त्यासाठी मग देशी पुरोगामी मंडळी करतात, तसाच आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर त्यांनी केला. रा. स्व. संघ हा मुस्लिमांविरोधात हिंसा पसरवित आहे, हे सांगताना १९९२ सालचे ‘बाबरी ढाँचा पतन’ आणि २००२ ची ‘गुजरात दंगल’ हे गुळगुळीत झालेले संदर्भ सांगण्यात आले. रा. स्व. संघ महात्मा गांधी आणि पं. नेहरू यांच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांना हरताळ फासून भारताला हिंदूराष्ट्र बनवणार असल्याचे इमरान खान यांनी सांगितले; अर्थात पाकचे धर्मनिरपेक्षतेवर बोलणे ऐकून संयुक्त राष्ट्र संघटनेनेही डोक्याला हात लावला असणार, यात कोणतीही शंका नाही.
 
त्यानंतर इमरान खाननी छाती फुगवत भारतातर्फे दुःसाहस करण्यात आले तर पाक शेवटपर्यंत लढाई लढेल, अशी फुशारकी मारली. भारतातर्फे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते, असेही सांगण्यात आले. त्यानंतर इमरान पुन्हा आले ते काश्मीरवर. काश्मीरमध्ये भारतीय सैन्यातर्फे आणि भारत सरकारतर्फे अत्याचार केले जातात, काश्मिरी जनतेच्या हक्कांवर बंधने आणली जातात, काश्मिरी नेत्यांवर निर्बंध आणले जातात आणि काश्मीरमध्ये शिरकाण केले जाते, असे वाटेल ते आरोप करण्यात आले. त्यापुढे जाऊन मोदी सरकार काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करीत असून, ‘जिनेव्हा करारा’नुसार हा युद्धगुन्हा असल्याचाही जावईशोध इमरान खाननी लावून टाकला. एकूणच ‘कलम ३७०’ संपुष्टात आणल्याच्या धक्क्यातून पाकिस्तान अद्यापही सावरला नसल्याचेच इमरान खान वारंवार सिद्ध करीत आहेत. मात्र, इमरान खान यांना तोंडघशी पाडण्याचे काम केले ते काश्मिरी फुटीरतावादी हाशिम कुरेशीचा मुलगा जुनैद कुरेशी याने. विशेष म्हणजेच, हाशिम कुरेशी याने १९७१ साली ‘इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण केले होते. त्याचा मुलगा जुनैद हा ‘युरोपियन फाऊंडेशन फॉर साऊथ एशियन स्टडिज’चा शीर्षस्थ पदाधिकारी आहे. त्याने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत एक अहवाल सादर केला, त्यामध्ये पाकपुरस्कृत दहशतादामुळे काश्मिरी जनतेच्या मानवी हक्कांची कशी पायमल्ली होते, हे सप्रमाण दाखवून दिले आहे.
 
जुनैदनी आपल्या अहवालात इमरान खानचे खरे मालक असणार्‍या पाक सैन्याचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आणला आहे. पाक सैन्य १९८० सालाच्या आधीपासूनच काश्मिरी तरुणांची भर्ती ‘हिजबुल मुजाहिद्दीन’, ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-महंमद’ या दहशतवादी संघटनांमध्ये करीत आहे. त्यामुळे काश्मिरी जनतेचे रक्त सांडण्यामागे पाकिस्तानच जबाबदार असल्याचे अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानला काश्मीरच्या स्वायत्ततेशी कोणतेही कर्तव्य नाही, त्यांनी काश्मीरचा आणि काश्मिरी तरुणांचा वापर केवळ दहशतवादी संघटनांसाठी केला आहे. सर्वांत महत्त्वाचे पाकिस्तानमुळे ‘काश्मिरियत’ धोक्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. जुनैद कुरेशी यांच्या आरोपामुळे खरे तर आधीच उघडा पडलेला पाकिस्तान आणखीनच गोत्यात आला आहे. कारण, सध्या पाकिस्तान हे संपूर्ण जगासाठी अपयशी राष्ट्र कसे असते, याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यामुळे पाकिस्तानचे रडगाणे हा जगासाठी सध्या मनोरंजनाचा विषय ठरत आहे.

@@AUTHORINFO_V1@@