'शिव'सेनेला आनंद झाला नाही का ?

    18-Sep-2020
Total Views |

ch patil vs shivsena_1&nb


मुंबई :
आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे “छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय” असे नामांतर करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी यासंदर्भात घोषणा केली. यानिर्णयाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील जनतेने स्वागत केले. मात्र मुख्यमंत्री व शिवसेनेनं यानिर्णयावर मौन बाळगले. यावरूनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ट्विट करत त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.




त्यांनी लिहिले की, "उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांनी आग्र्यामध्ये बनत असलेल्या नवीन संग्रहालयला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले आहे. आश्चर्याची गोष्ट ही आहे की 'शिव'सेनेच्या एकाही नेत्याने, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत धन्यवाद केले नाही.त्यांना या गोष्टीचा आनंद झाला नाही का?" असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला. ते पुढे म्हणतात,"महाराष्ट्र सरकारच्याच काही घटक पक्षांनी मागच्या वर्षी छत्रपती उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असण्याचे पुरावे मागितले होते. कमीत कमी त्या पापाचे थोडेतरी प्रायश्चित्त करताना महाराजांच्या सन्मानार्थ दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेने योगीजी यांच्या या घोषणेची प्रशंसा करायला हवी." असे म्हणत त्यांनी आघाडी सरकारमधील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावला. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणतात, "काँग्रेस सरकारने आपल्या कार्यकाळात शैक्षणिक पाठ्यक्रमात कुरघोड्या करून भारत देशाच्या अनेक महानायकांचे योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. देशाच्या सर्वसामान्य नागरिकांना नेहमी हेच वाटत होते की, काँग्रेसचे मागील सरकार मानसिक रूपाने छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, लोकमान्य टिळक, गुरू गोविंद सिंह जी यांच्यापासून इतके दूर का होते ? त्यांच्यासोबत राहून 'शिव'सेनेची मानसिक परिस्थितीदेखील तशीच झाली आहे का? असा सवालही त्यांनी केला.