हौसले है बुलंद...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2020   
Total Views |

IA 1_1  H x W:
 


सीमेवर चीनने शस्त्रास्त्रांची जमवाजमव केली असली तरी भारतानेही आवश्यक ती पूर्ण तयारी केली आहे. ‘भारतीय सैन्याचे हौसले बुलंद आहेत,’ असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेच्या अधिवेशनात स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. त्याचप्रमाणे सर्व पक्षांनी सरकारसोबत आणि भारतीय सैन्यासोबत उभे असल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे राजकीयदृष्ट्या एक सकारात्मक संदेश गेला आहे.
 
 
“आता लवकरच हिवाळा सुरू होईल आणि पूर्व लडाखच्या परिसरात बर्फवृष्टी सुरू होणार आहे. असे असताना आम्हाला भारतीय सैन्याची काळजी वाटते. कारण, आमच्या (चिनी सैनिक - पीएलए) सैनिकांना गरमागरम जेवण आम्ही पोहोचविण्याची सोय आम्ही केली आहे. मात्र, थोड्याच अंतरावर असलेल्या भारतीय सैनिकांना मात्र हवाबंद डब्यातील थंड अन्न खावे लागणार आहे,” अशा आशयाचा एक व्हिडिओ चिनी सैन्यातर्फे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. त्याला भारतीय सैन्यातर्फे तातडीने प्रत्युत्तर देणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये बर्फवृष्टी ध्यानात घेऊन अन्नपुरवठा कधीच पाठविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
 
विशेष म्हणजे, भारतीय सैन्याच्या व्हिडिओमध्ये डाळ, तांदूळ, गहू, राजमा, चणे यांची पोती, लोणची, जॅम्स, चॉकलेट्स, एनर्जी बार, बिस्कीट्स यांचा मोठ्या प्रमाणावर असलेला साठा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सीमेवरील फॉरवर्ड पोस्टवरही भारतीय सैन्य ताजे जेवण दररोज तयार करीत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. याउलट चिनी सैन्याला तयार अन्न पोहोचविले जात असले तरी ते किमान एक दिवस अगोदर तयार करण्यात आलेले होते. त्यामुळे भारतीय सैन्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने चिनी सैन्याच्या प्रचारातली हवाच निघून गेली. ‘पीएलए’च्या प्रपोगंडाचे अगदी दोन ते तीन दिवसांपूर्वीचे उदाहरण म्हणजे ‘एलएसी’वरील आपल्या फॉरवर्ड पोस्टवर पंजाबी भाषेतील गाणी वाजविणे. यामुळे भारतीय सैन्याचे लक्ष विचलित करण्याचा अपयशी प्रयत्नही झाला आहे.
 
अर्थात, आता पुढील काळात अशाप्रकारचे ‘प्रपोगंडा वॉर’ भारत आणि चीनदरम्यान मोठ्या प्रमाणावर सुरूच राहणार आहे. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी भारतीय सैन्याच्या आणि सरकारच्या अधिकृत वक्तव्ये, माहिती याकडेच लक्ष द्यायची गरज आहे; अर्थात देशात सध्या एक वर्ग भारत-चीनसमोर कसा कमकुवत आहे, भारतीय सैन्याची कशी क्षमता नाही, असा प्रचार मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहे. प्रामुख्याने समाजमाध्यमांवर याचे प्रमाण अधिक आहे. हा वर्ग चिनी सैन्याचे तयार केलेले व्हिडिओ, माहिती अगदी उत्साहाने प्रसारित करीत असतो. मात्र, भारतीय सैन्याने त्यास प्रत्युत्तर दिल्यावर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामध्ये जसा राजकीय नेत्यांचा समावेश आहे, तसाच अगदी सामरिकशास्त्राच्या अभ्यासकांचाही समावेश असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे आपल्याला काय दिसते, यापेक्षा काय दाखविले जाते, हे नेहमीच लक्षात ठेवणे गरजेचे असते.
 
कारण, ‘प्रपोगंडा’ हे युद्धातील एक महत्त्वाचे हत्यार आहे. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर तर ते अधिकच महत्त्वाचे ठरते. कारण, १९६२ साली चीनने केलेला भारताचा पराभव हा भारतीयांना अजूनही जिव्हारी लागतो; अर्थात १९६२ आणि २०२० या काळात परिस्थिती बदलली आहे. आज भारतीय सैन्याचा पराक्रम संपूर्ण जगाने वेळोवेळी पाहिला आहे. त्यातच उंचावरील डोंगरकपारीच्या युद्धामध्ये भारतीय सैन्य विशेष पारंगत आहे आणि त्यामुळेच भारतीय सैन्य कसे कमकुवत आहे, याचा प्रचार चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या मालकीच्या ‘ग्लोबल टाईम्स’ या वृत्तपत्रासह अन्य व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. त्यानंतर बर्फवृष्टीच्या काळात चिनी सैन्य कसे सज्ज आहे, असे दाखविण्याचाही प्रयत्न सुरू झाला. मात्र, त्यास भारतीय सैन्याने अतिशय सडेतोड उत्तर देऊन भारत दीर्घकाळच्या संघर्षाची जरी वेळ आली तरी भारत कसा सक्षम आहे, याची अगदी छायाचित्रे, व्हिडिओसह दाखविण्यास भारतीय सैन्याने सुरुवात केली आहे.
 

सैन्याचे मनोबल आणि सैन्याची तयारीही भक्कम
 
लेह-लडाखमध्ये तैनात असलेल्या एक ‘कोअर’मध्ये साधारणपणे ३० ते ४० हजार सैनिक असतात. हिवाळ्यात त्यांना सुमारे तीन हजार मेट्रिक टन अन्न-धान्याची आवश्यकता असते. भारतीय सैन्याने आता ते तिपटीने वाढविले आहे. त्यामुळे डाळ, तांदूळ, गहू, राजमा, चणे असे धान्य तसेच लोणची, जॅम्स, चॉकलेट्स, एनर्जी बार, बिस्कीट्स, ज्यूस, पॅकेज्ड फूड यांचा साठा तिप्पट करण्यात आला आहे. म्हणजेच, युद्ध जरी सुरू झाले, तरीदेखील अन्नधान्याचा पुरेसा साठा भारतीय सैन्याने आता करून ठेवण्यास प्रारंभ केला आहे.
 
 
लेहस्थित भारतीय सैन्याच्या १४व्या कोअरचे प्रमुख मेजर जनरल अरविंद कपूर यांनी भारतीय सैन्याच्या तयारीविषयी माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, गेल्या २० वर्षांत भारतीय सैन्याने लॉजिस्टिकच्या गरजांवर पूर्णपणे नियंत्रण प्राप्त केले आहे. त्यामुळे अन्नधान्य, खाद्यपदार्थ, हिवाळ्यासाठीचे विशेष तंबू, कपडे, औषधे यासह दारूगोळ्याचाही वेगवान पुरवठा करणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे आता भारतीय सैन्याकडे सुमारे एक वर्षाचा साठा आहे. यामध्ये एक गोष्ट ध्यानात घ्यायची गरज आहे की, लेह-लडाखमध्ये तापमान उणे असते, त्यात जवळपास १८ ते २० हजार फूट उंचावरील भारतीय सैन्यास रस्ता आणि हवाईमार्गाने सामान पोहोचविले जाते आणि हे वाटते तेवढे सोपे काम नाही. मात्र, असे असतानाही भारतीय सैन्याने त्यावर आपले पूर्ण नियंत्रण मिळविले आहे.
 
 
या प्रदेशात ऑक्टोबरअखेरीस हिवाळ्याला सुरुवात होते आणि नोव्हेंबरपासून वातावरण पूर्ण प्रतिकूल झालेले असते. अशा परिस्थितीमध्ये सैनिकांना राहण्यासाठी खास प्रकारच्या हिटर लावलेल्या तंबूंची गरज असते. त्याचप्रमाणे उणे 40 अंश तापमानात शरीरास उबदार ठेवून सुलभतेने वावरण्यासाठीचे खास कपडे, जॅकेट्स, फ्रॉस्टबाईट्सपासून वाचण्यासाठीचे खास हातमोजे, बूट, गॉगल्स अशा एकूण २१ उपकरणांचा पुरेसा साठा आतापर्यंत सैन्य तुकड्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यासोबतच शस्त्रसज्जतेच्या बाबतीत तर भारताने एप्रिलपासूनच तयारीस सुरुवात केली आहे.
 
सीडीएस जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लेह-लडाखचे वेळोवेळी दौरे करून सज्जतेचा आढावा घेतला आहे. शक्तिशाली बोफोर्स तोफाही तैनात केली जात आहे. त्याचप्रमाणे वायुदलप्रमुख एअरचीफ मार्शल आरकेआस भदौरिया यांनीदेखील वायुदलाच्या सज्जतेचा आढावा घेतला आहे. त्याचप्रमाणे भारतीय वायुदलाने जून महिन्यापासूनच ‘सुखोई 30 एमकेआय’, ‘जॅग्वार’ आणि ‘मिराज 2000’ ही प्रमुख लढाऊ विमाने पूर्व सीमेवर तैनात केली आहेत. त्याचप्रमाणे रात्र गस्तीद्वारे चीनला इशारादेखील देण्यात आला आहे. नुकतेच ताफ्यात सहभागी झालेल्या अत्याधुनिक आणि शक्तिशाली ‘राफेल’ लढाऊ विमानेदेखील तैनात ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ‘अपाचे’ आणि ‘चिनुक’ या हेलिकॉप्टर्सनाही सज्ज ठेवण्यात आले आहेत. केवळ लडाख सीमा नव्हे, तर अरुणाचल सीमेवरही भारतीय लष्कर आणि वायुसेना सज्ज आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि परदेशातून कितीही ‘प्रपोगंडा’ झाला तरी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे, याचा विसर पडायला नको.
 

Rajnath Singh_1 &nbs 
 
 
राजकीय पातळीवर सध्या तरी मतैक्य
 
कोरोना सावटाखाली सुरू असणार्‍या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी एप्रिलपासूनच्या घटनाक्रमाची सविस्तर माहिती देताना लडाखच्या पूर्व सीमेवर यथास्थिती एकतर्फी बदलण्याचे केलेले चीनचे सर्व प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडले आहेत. सीमाप्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडविण्यास भारताचे प्राधान्य आहे. मात्र, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता कायम राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यास सज्ज आहे. त्याचप्रमाणे सीमेवर चीनने शस्त्रास्त्रांची जमवाजमव केली असली तरी भारतानेही आवश्यक ती पूर्ण तयारी केली आहे.
‘भारतीय सैन्याचे हौसले बुलंद आहेत,’ असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. त्याचप्रमाणे सर्व पक्षांनी सरकारसोबत आणि भारतीय सैन्यासोबत उभे असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीदृष्ट्या एक सकारात्मक संदेश गेला आहे; अर्थात, राजनाथ सिंह यांचे निवेदन हे राजकीय मुत्सद्दीपणाचे उत्तम उदाहरण होते. त्यामध्ये त्यांनी आवश्यक तेवढीच माहिती दिली. मात्र, प्रत्यक्षात सीमेवर आता भारताचा वरचष्मा झाला असल्याचे तसेच कैलास-मानसरोवर यात्रा मार्गावरील महत्त्वाच्या भागावर नियंत्रण आल्याचे वृत्त आहे, त्यामुळे चिनी सैन्याला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे आता 2020च्या भारताची युद्धक्षमता काय आहे, याची जाणीव चीनला झाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@