कोण कोण गारद?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2020   
Total Views |

kangna vs mahavikasaghadi


आता एकामागून एक करत पवार, आदित्य व शिवसेनेच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांनाही प्रवक्त्यानेच कंगनाच्या टार्गेटवर आणून ठेवले. बुधवार, दि. ९ सप्टेंबरपर्यंत ‘उद्धवजी’ असे संबोधणार्‍या कंगनाने कार्यालयाची मोडतोड होताच एकेरी उल्लेख करून खुले आव्हान दिलेले आहे. बघितले ना? एक शरद आणि कोण कोण गारद होऊन गेले?


एक-दीड महिन्यापूर्वी वाजतगाजत शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत प्रसिद्ध झालेली होती. तिची आधीपासून जाहिरात करताना शीर्षक देण्यात आलेले होते, ‘एक शरद, बाकी गारद.’ आता मुलाखत सर्वांच्याच विस्मृतीत गेली आहे आणि गारद कोण कोणामुळे होत आहेत, त्याचा अंदाज येण्यापूर्वीच खुद्द पवारांना आपली कातडी वाचवण्यासाठी तारांबळ करावी लागत आहे. कंगना राणावत या अभिनेत्रीने सुशांत सिंह राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूनंतर मुंबई पोलिसांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला होता. पण, मुंबई पोलीस या आघाडी सरकारच्या कारकिर्दीत इतके गारद झालेले आहेत की, त्यांना स्वत:चा बचावही करण्याची हिंमत उरलेली नाही. साहजिकच ते काम त्यांनी जणू शिवसेनेवर सोपवले, किंवा शिवसेनेनेच ते घोंगडे आपल्या गळ्यात बांधून घेतले; अन्यथा आज पवारांवर इतकी हात झटकण्याची वेळ आली नसती. कारण, जे सरकार त्यांनीच मोठ्या शिताफीने बनवले आणि आपल्या मुरलेल्या मुरब्बी राजकारणाचा साक्षात्कार घडवला होता, त्याच्याच कर्तबगारीकडे संपूर्ण पाठ फिरवण्याची नामुष्की पवारांवर कशाला आली असती? कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर महापालिकेच्या पथकाने केलेली मोडतोडीची कारवाई पवारांनाही धोक्याचा इशारा वाटलेली आहे; अन्यथा त्यांनी तत्काळ त्यात आपले हात कशाला झटकले असते? लोकांना सूडबुद्धीची कारवाई वाटण्यासारखी शंकेची संधी द्यायची कशाला, अशी वरकरणी अलिप्त वाटणारी प्रतिक्रिया देताना पवारांनी साळसुदपणा दाखवला आहे. एका बाजूला त्यांनी आपण अशा कारवाईला मान्यता देत नसल्याचा देखावा उभा केलेला आहे आणि दुसरीकडे त्यासाठी कुठल्याही बाजूने ठाम भूमिका घेण्याचेही टाळलेले आहे. कारण, त्यांची अवस्था आपलेच दात आपलेच ओठ अशी झालेली आहे. ज्यांना मांडीवर बसवून मुख्यमंत्री केले, त्यांचे प्रताप नाकारायचे तरी कसे ना?


सध्याच्या आघाडी सरकारमधल्या किंवा गोटातले सर्वात मुरब्बी धूर्त राजकारणी आहेत, यात शंकाच नाही. पण, त्यांना वयानुसार वा जबाबदारीने या सरकारमध्ये काही करता येत नाही. अधूनमधून मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांचे कान उपटणे वा जाहीरपणे त्यांना सल्ले देण्यापर्यंत ते त्यात सहभागी असतात. पण, जिथे जबाबदारीची वेळ येऊ शकेल, तिथून हात झटकून बाजूला होत असतात. आताही अर्णब गोस्वामीने आघाडी सरकार विरोधात उघडलेल्या मोहिमेला वेळीच आवरावे, असा सल्ला चुकून त्यांनी ‘सामना’च्या कार्यकारी संपादकांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेला होता. पण, तो संदेश उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत घेऊन जाण्यापेक्षा संपादकांनी त्याचा उल्लेख आपल्याच लेखामध्ये करून पवारांना पुरते तोंडघशी पाडले. कारण, ‘अर्णबला आवरा’ म्हणजे आविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी करा, असे पवार उघडपणे बोलू धजणार नाहीत. तेच त्यामुळे अडचणीत येतील. म्हणूनच, त्यांनी हा सल्ला गुपचुप दिला. त्याचा अर्थ इतकाच होता की, गाजावाजा केल्याशिवाय अर्णबच्या ‘रिपब्लिक’ चॅनेलची विविध कायदेशीर मार्गाने मुस्कटदाबी करावी. सरकारच्या हाती अनेक विशेषाधिकार असतात, त्याच्या दिमतीला अनेक संस्थात्मक यंत्रणांचे अधिकार असतात. त्या यंत्रणांना कामाला जुंपून माध्यमे चालवणार्‍या कंपन्या वा मालकांची कोंडी करणे शक्य असते. साहजिकच आपले भांडवल, गुंतवणूक व धंदा जपण्यासाठी त्यांना सत्ताधार्‍यांचे पाय धरायला यावे लागते. मग अत्यंत साळसूद भाषेत त्यांना त्यांची ‘औकात’ दाखवून विरोधी प्रचाराच्या मोहिमा आवरायला भाग पाडणे शक्य असते. जे सामान्य लोकांना दिसत नाही. पण, व्यवहारी दृश्यामध्ये सरकारने कुठली अन्याय्य कारवाई केल्याचे नजरेस येत नाही. तसे काही करावे, असेच पवारांना सांगायचे होते. ‘अर्णबला आवरा’ याचा अर्थ गुपचुप कारवाई करणे असा होता. पण, शिवसेनेचे प्रवक्ते म्हणजे मित्रांनाच गोत्यात टाकण्यातले वाक्बगार आणि त्यांनी त्याचा गाजावाजा करून टाकला.


आपल्याला आठवत असेल तर ‘सामना’तल्या त्या लेखानंतर तत्काळ अर्णबने खुलेआम पवारांनाच आव्हान दिले होते. पण, त्यांनी चुकूनही त्याला प्रतिसाद वा प्रत्युत्तर दिलेले नव्हते. कारण, आपल्याच विश्वासू शिवसैनिकाने दगा दिल्याची जाणीव पवारांना तत्काळ झाली होती आणि बहुधा त्यानंतर प्रवक्त्यामार्फत मुख्यमंत्र्यांना सल्ले देण्याचा उद्योग पवारांनी कायमचा गुंडाळून ठेवलेला असावा. पण, सेना प्रवक्त्यांना रोज कुणा आप्तस्वकीयांना ‘गारद’ केल्याशिवाय अन्न गोड लागत नाही. म्हणून त्याने कंगनाला शिंगावर घेण्याचा आव आणला. वास्तवात कंगनाच यांना जाणीवपूर्वक डिवचत होती आणि अंगावर यावेत म्हणून प्रयत्नशील होती. त्या सापळ्यात शिवसेनेला प्रवक्त्याने आयतेच अडकवून दिले. त्यासाठी चित्रसृष्टीत वा तिथे होणार्‍या पार्ट्यांमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासोबत असणारे कोण कोण मित्र कुठे हजेरी लावतात, त्याचाही पाढा ‘सामना’तून वाचला गेला. मग काय? कोणीही उठून आदित्य ठाकरे यांचे नाव कुठेही गोवू लागला. पण, सेना प्रवक्त्यांची भूक तेवढ्याने कुठे भागणार होती? पवारांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरेंना या भोवर्‍यात गुंतवून झाल्यावर प्रवक्त्यांची नजर खुद्द पक्षप्रमुख व मुख्यमंत्र्यांकडेच वळली. ते डोके खाजवून उद्धव ठाकरेंना कुठल्या गोत्यात टाकायचे, त्याचा शोध घेऊ लागले आणि कंगनाने तोच सापळा लावला. तिने आधी मुंबई पोलिसांना लक्ष्य केलेले होतेच. त्यात ‘पाकव्याप्त काश्मीर’शी मुंबईच्या सुरक्षेची तुलना करून प्रवक्त्यांना जाळ्यात ओढले आणि मर्दुमकी दाखवण्याच्या खास शैलीत ‘सामना’ त्यात फसतच गेला. आता एकामागून एक करत पवार, आदित्य व शिवसेनेच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांनाही प्रवक्त्यानेच कंगनाच्या टार्गेटवर आणून ठेवले. बुधवार, दि. 9 सप्टेंबरपर्यंत ‘उद्धवजी’ असे संबोधणार्‍या कंगनाने कार्यालयाची मोडतोड होताच एकेरी उल्लेख करून खुले आव्हान दिलेले आहे. बघितले ना? एक शरद आणि कोण कोण गारद होऊन गेले?


विषय तिथेच संपलेला नाही. जी बेकायदा कारवाई कायदेशीर यंत्रणेकडून झालेली आहे, त्यासाठी हायकोर्टानेच ताशेरे मारलेले आहेत. त्याचा गुंता वाढणार आहेच. पण, विनाविलंब कंगनाने खुद्द शरद पवार यांनाच आपले लक्ष्य बनवले आहे. ज्या इमारतीवर ‘अनधिकृत’ वा ‘बेकायदा’ असे आरोप ठेवून कारवाई करण्यात आली; त्या गुन्ह्याबद्दल पवारांनाच जाब विचारण्याचे आव्हान तिने दिले आहे. तिच्या म्हणण्यानुसार, इमारतीमध्ये काही बेकायदा असेल तर त्याला पवार जबाबदार आहेत. कारण, त्यांच्याच सहकार्याने हे बांधकाम केलेले आहे. थोडक्यात, आता तिच्या रडारवर पवार आले आहेत आणि मोकाट बोलण्याची संधीच शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी दिल्याने, तिला आवरणे पुढे अशक्य होणार आहे. कायदा वा सरकार तिच्या बोलण्याला आवरू शकत नाहीत आणि तोंडही देऊ शकत नाहीत. ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही,’ अशी दुर्दशा शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी जवळच्या लोकांची करून टाकली आहे. एका मुलाखतीत सर्वांनाच गारद करायला निघालेल्या पवारांनाच त्यामधून गारद व्हायची पाळी आलेली आहे. कारण, लवकरच संसदेचे अधिवेशन सुरू होणार असून, त्या मोसमात दिल्लीत वास्तव्य करणार्‍या पवारांना तिथले पत्रकार कंगनाचे आरोप व शेलक्या भाषेतील उल्लेखावरून अनेक प्रश्न विचारणार आहेत. ज्याची उत्तरे पवारांना द्यायची नाहीत वा देणेही सोयीचे नाही. त्या प्रश्नांचा भडीमार सोसण्याखेरीज पर्याय नाही. याला म्हणतात, ‘एक शरद आणि तोच गारद.’ ही किमया फक्त शिवसेनेचे उथळ प्रवक्तेच करू शकतात. अन्य कोणाला ते शक्य नाही. अर्थात, त्यासाठी तोंडघशी पडण्याची पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सवय जडली आहे. आजवर त्यांनी अनेकदा प्रवक्त्यांसाठी माफी मागितली आहे. पण, पवारांसाठी तो अनुभव नवा असेल. एक मुलाखत देऊन कुठे फसलो, म्हणून त्यांनी कपाळावर हात मारावा की हे सरकार बनवण्याच्या फंदात का पडलो, म्हणून पश्चात्ताप करावा; हाच आता यक्षप्रश्न बनलेला असेल.

@@AUTHORINFO_V1@@