उडत्या हत्यारांच्या जमान्यात हातघाईची लढाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


India China_1  



नुसत्या हातांनी जर हे ‘घातक’ एवढे खतरनाक आहेत, तर मग त्यांच्या हातात स्टेन गन्स असतात, तेव्हा ते किती कहर करतील! आणि हे तर ‘घातक’ पलटणवालेच आहेत. मग स्पेशल फोर्समधला एक-एक कमांडो काय अचाट सामर्थ्याचा असेल!



१९३९ साली युरोपात दुसरं महायुद्ध सुरू झालं, तेव्हा भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. राजकीय परिभाषेत भारत ही इंग्रजांची वसाहत होती. तसेच कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅरेबियन बेटं आणि आफ्रिकेतले कित्येक छोटे-मोठे प्रदेश, याही इंग्रजांच्या वसाहती होत्या. या सर्व वसाहतींमध्ये इंग्रजांनी जोरदार सैन्यभरती सुरू केली. कारण, त्यांना लढायला माणसं हवी होती. काँग्रेस पक्षाने या सैन्यभरतीला विरोध केला. कारण, इंग्रज सरकारशी असहकार हे त्यांचं धोरण होतं. तात्याराव सावरकर यांनी मात्र सैन्यभरतीचं जोरदार समर्थन केलं. त्यांचं असं म्हणणं होतं की, भारतीय तरुणांनी आवर्जून सैन्यात शिरावं. इंग्रज अडचणीत सापडले आहेत. आतापर्यंत त्यांनी भारतीय सैनिकांना आधुनिक युद्धविद्या बेताबेतानेच शिकवलेली आहे. ती सगळी विद्या आपल्या तरुणांनी नीट आत्मसात करावी आणि मग पुढे वेळ येईल तेव्हा बंदुकांची तोंडं इंग्रजांकडेच वळवावीत. सावरकर हा विचार मांडू शकले. कारण, त्यांनी युद्धशास्त्राचा अभ्यास केला होता. १८५७च्या क्रांतियुद्धात ‘स्वातंत्र्य योद्धे’ इंग्रजांपेक्षा शौर्यात आणि सेनापतित्वात कमी नव्हते. त्यांच्या तलवारी, भाले आणि दांडपट्टे छत्रपती शिवराय आणि प्रतापी बाजीराव यांच्या काळाइतकेच तिखट होते. पण, बदलला होता तो काळ. इंग्रजांच्या आठ इंची अवजड तोफा ३२ हजार यार्डांवरून, तर २४ पौंडी हॉवित्झर तोफा, १२ हजार यार्डांवरून क्रांतिकारक सैन्यावर आगीचा वर्षाव करत होत्या. सैनिकांच्या हातातल्या ‘ली एनफिल्ड’ रायफल्स तीन हजार यार्डांवरून अचूक गोळ्या झाडत होत्या. भारतीय क्रांतिकारकांचा अक्षरशः हुरडा भाजून निघाला. दोन्ही सैन्यं जवळ येऊन, एकमेकांना भिडून आले आणि ढाल-तलवारींची हातघाईची लढाई करायला इंग्रजांनी मुळी अवकाशच ठेवला नाही. इंग्रजांच्या या आधुनिक रणतंत्राला स्वातंत्र्यसैनिकांकडे उत्तर नव्हतं. नंतरच्या काळातही इंग्रजांनी आपल्या सैन्यातील भारतीय सैनिकांना ही आधुनिक युद्धविद्या बेताबेतानेच शिकवली. तोफा, रणगाडे नि पुढे विमानं या शस्त्रांचं पुरेसं ज्ञान त्यांनी तो वेळपर्यंत भारतीयांना दिलेलं नव्हतं. या सगळ्याचा अभ्यास असल्यामुळे सावरकर आग्रहाने सांगत होते की, भारतीय तरुणांनो, आता इंग्रजांना ही सगळी विद्या आपल्याला शिकवावीच लागेल. कारण, ते अडचणीत सापडलेत. या संधीचा फायदा घ्या. काँग्रेसवाल्यांनी आणि त्यांच्या आचरट चेल्याचपाट्यांनी यावर सावरकरांची टिंगल केली की, ‘हे तर इंग्रजांना मदत करतायत. हे कसले स्वातंत्र्यवीर? हे तर रिक्रूटवीर!’


शिवकालीन कागदपत्रांमध्ये शस्त्रांचं वर्गीकरण दोन प्रकारांमध्ये केलेलं आढळतं. एक- गोडी हत्यारं म्हणजे ढाल-तलवार, कट्यार, भाला इत्यादी पारंपरिक शस्त्रं. ही शस्त्रं हातात घेतलेले उभय पक्षांचे योद्धे एकमेकांना भिडून एकमेकांवर तुटून पडायचे. त्याला म्हणायचं हातघाईची लढाई. दुसरा प्रकार- उडती हत्यारं. म्हणजे ज्यांच्याद्वारे प्राणघातक गोळ्या किंवा डोकी फोडणारे गोळे डागले-उडवले जातात अशी शस्त्रं. म्हणजेच तोफा आणि बंदुका. म्हणजेच आधुनिक भाषेत ‘फायर आर्म्स.’ युरोपातल्या फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, ब्रिटन, प्रशिया इत्यादी राष्ट्रांनी अधिकाधिक प्रगत तोफा आणि बंदुका रणभूमीवर आणल्या नि गोड्या हत्यारांचा आणि हातघाईच्या लढाईचा जमाना संपला.


परंतु, गोडी हत्यारं अगदीच बाद झाली असं नाही. कारण, छोट्या चकमकी, छापेमारी, ऐनवेळी बंदुकीतल्या गोळ्या संपणं किंवा बंदूक जाम होणं, असं काही घडू शकतं. तेव्हा सैनिक बंदुकीच्या पुढे लावलेलं बायोनेट (खास मराठी उच्चार ‘बागनेट’) तलवारीसारखं वापरतात. भारतीय सैन्यातले शीख सैनिक कृपाण, गुरखा सैनिक कुकरी, तर नागा सैनिक छोटा भाला वापरतात. १९९९च्या कारगील युद्धात राजस्थान रायफल्सच्या कॅप्टन केंगुरुसे या नागा अधिकार्‍याने दोन पाकिस्तान्यांना छातीत भाला खुपसून ठार केलं. कॅप्टन केंगुरुसेने ज्या पाकिस्तानी खंदकावर हल्ला केला, त्यात चार पाकिस्तानी होते. दोघांना त्याने गोळ्या घातल्या. तेवढ्यात इतर दोघे फारच जवळ आले. याने विचार केला, गोळ्या का वाया घालवा, म्हणून त्याने भाला उपसला आणि आपल्या पारंपरिक हत्याराला शत्रूच्या गरम रक्ताचा नैवेद्य दाखवला.


पण, परवाच्या गलवान खोर्‍यातल्या चकमकीत मात्र आपल्या सैनिकांनी अगदी कमाल-धमालच करून टाकली. उडती हत्यारं नाही, गोडी हत्यारं नाही. काड्या आणि सळ्या घेऊन हे मर्द चिन्यांच्या झुंडीत घुसले आणि किमान दीडशे चिन्यांना त्यांनी ठार केलं नि किमान साडेतीन दुश्मनांना जबर जखमी केलं. हे म्हणजे अगदी अमिताभ बच्चनसारखं झालं. २५ सशस्त्र गुंडांवर एकटा अमिताभ हातात एक खोरं घेऊन तुटून पडतो नि जिंकतो. तिकडे ठीक असतं. चित्रपटच खोटा असतो. त्यामुळे गुंडही खोटे नि लढाईही खोटी. पण, ‘१६ बिहार रेजिमेंटच्या जवानांनी म्हणे कोंबड्या-बकर्‍यांच्या मुंड्या मुरगाळाव्यात तशा अनेक चिनी सैनिकांच्या मुंड्या मुरगाळून त्यांना ठार केलं. म्हणजे बघा, तोफा-बंदुका नाहीत, कुकरी-कृपाण नाही, फक्त हातच. एकदम भीम-जरासंधासारखी कुस्तीच. खरीखुरी हातघाईची लढाई! कसं घडलं हे?


असं पाहा की, भारतीय सैन्याला किंबहुना जगभरच्या सर्व सैन्यदलांना आधुनिक हत्यारांप्रमाणेच पारंपरिक हत्यारांचंही कसून प्रशिक्षण दिलं जातं. आता यात ज्युडो-कराटे-कुंग फू-तायक्वांदो इत्यादी आधुनिक मार्शल आर्टसचाही समावेश असतो. आता ‘१६ बिहार रेजिमेंट’ ही इंग्रजांनी १९४१ साली म्हणजे दुसर्‍या महायुद्ध काळात उभारलेली एक प्रादेशिक सैन्य तुकडी. स्वातंत्र्यानंतर भारतीय सेनाश्रेष्ठींनी असं धोरण ठरवलं की, रेजिमेंटची प्रादेशिक नावं कायम ठेवायची, पण त्यातले सैनिक आणि अधिकारी मात्र सरमिसळ सर्व प्रांतांतले असावेत. त्यानुसार गलवान खोर्‍यात, भारत-चीन यांच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर (लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल) सैन्यात असलेल्या १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर होते कर्नल संतोष बाबू. हे आंध्र प्रदेशचे अधिकारी. १९६२ साली चीनने भारताच्या काश्मीर प्रांतातील लद्दाख प्रदेशावर आक्रमण करून, लडाखचा बराच मोठा भाग व्यापला आणि एकतर्फी युद्धबंदी केली. चिनी सैन्य ज्या रेषेवर थांबले, तिला आज ‘प्रत्यक्ष ताबारेषा’ म्हणतात. त्या परिसराला ‘गलवान खोरे’ म्हणतात. कारण, ‘गलवान’ नावाची एक बारकीशी नदी तिथून उगम पावून शियोक नदीला मिळते नि शियोक नदी पुढे सिंधू नदीला मिळते.


१५ जूनच्या रात्री गलवान खोर्‍यात गस्त घालणार्‍या ‘१६ बिहार’च्या एका छोट्या तुकडीला आढळलं की, चिनी सैनिकांची एक बर्‍यापैकी मोठी तुकडी प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडून भारतीय भूमीवर एक पक्का निवारा उभा करीत आहे. त्यांनी काही ट्रक्ससहीत चक्क एक जेसीबीही कामाला लावला आहे. गस्ती सैनिकांकडून खबर मिळताक्षणी कर्नल संतोष बाबू घटनास्थळी पोहोचले. चिन्यांनी लढाईचं वेगळंच तंत्र काढलं. गोळीबार केला तर त्या हल्ल्याचं स्वरूप बदलतं. तेव्हा चिन्यांनी लोखंडी सळ्या आणि खिळे बसवलेले दंडुके घेऊन भारतीय पथकाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. आरडाओरडा ऐकून मागे वाहनांमध्ये थांबलेले ‘१६ बिहार’चे जवान पुढे जाऊन पाहतात तो काय, गुंड टोळ्यांप्रमाणे ‘राडा’ चालू होता. बंदुका न वापरण्याची चिन्यांची युक्ती आपल्या लोकांनी ओळखली आणि रेजिमेंटच्या ‘घातक’ पलटणीला पाचारण केलं.


भारतीय सैन्यात ‘स्पेशल फोर्स’ किंवा ‘कमांडो’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या काही खास पलटणी आहेत. प्रत्येक कमांडो हा एकटाच एकेका साध्या सैन्य तुकडीइतका कसलेला योद्धा असतो. आता सैन्याच्या प्रत्येक बटालियनमध्ये सुमारे २० सैनिकांची एक खास पलटण असते. हे लोक कमांडो नसतात, पण साध्या जवानापेक्षा जास्त तरबेज, कुशल आणि प्रशिक्षित असतात. १९९३ सालापासून सैन्याच्या प्रत्येक बटालियनला ही विशेष प्रशिक्षित पलटण जोडण्याची पद्धत सुरू झाली. त्यावेळी सरसेनापती असलेल्या जनरल बिपीनचंद्र जोशी यांनी या खास पलटणीसाठी नावही मोठं समर्पक शोधलं- ‘घातक’!


खबर मिळताच ‘१६ बिहार’चा २० जवानांचा ‘घातक’ दस्ता घटनास्थळी हजर झाला. बघतात तर चिनी सैनिकांच्या हाँगकाँग रोडस्टाईल गुंडागर्दीत कर्नल संतोष बाबूंसह किमान ३० जण ठार झालेत. ‘बिहार रेजिमेंट’च्या दोन युद्ध घोषणा आहेत- जय बजरंग बली आणि बिरसा मुंडा की जय! त्या घोषणा देत हे २० ‘घातक’ लाठ्याकाठ्या आणि लोखंडी सळ्या घेऊन चिन्यांवर तुटून पडले... आणि मग चिन्यांच्या प्राणांतिक मरण किंकाळ्यांनी गलवान खोरं कोंडून गेलं. अनेक चिन्यांची डोकी भोपळ्यासारखी एकाच घावात फुटली. अनेक चिन्यांच्या मुंड्या अक्षरशः कोंबड्यांसारख्या पिरगाळण्यात आल्या. अनेक चिन्यांना सरळ खाली दरीत फेकून देण्यात आलं. ट्रक्स, जीप्स, तंबू आणि अन्य सामग्रीही दरीत फेकून देण्यात आली. अधिकृत आकडा अजून कुणीच जाहीर केलेला नाही. पण, २० प्रशिक्षित आणि पेटलेल्या ‘घातक’ सैनिकांनी किमान १५० चिनी सैनिक ठार केलेत नि किमान साडेतीनशे कायमचे अपंग केलेत. बाकी जंगम मालमत्तेच्या हानीचा हिशोब वेगळाच! नुसत्या हातांनी जर हे ‘घातक’ एवढे खतरनाक आहेत, तर मग त्यांच्या हातात स्टेन गन्स असतात, तेव्हा ते किती कहर करतील! आणि हे तर ‘घातक’ पलटणवालेच आहेत. मग स्पेशल फोर्समधला एक-एक कमांडो काय अचाट सामर्थ्याचा असेल! गुरु गोविंदसिंग आपल्या कवितेत म्हणतात, ‘चिडियों से मैं ब्याज बनाऊँ, सवा लाख से एक लडाऊँ’ - ‘मी चिमण्यांचे शिकारी ससाणे बनवेन आणि मोगलांच्या सव्वा लाख फौजेशी माझा एक पठ्ठा मुकाबला करेलकिंवा शिवरायांचा एक-एक मावळा रणांगणात दहा सुलतानी सैनिकांना भारी पडायचा, या कविकल्पना नव्हेत? उत्तम प्रशिक्षण आणि जिगर यांतून असे योद्धे निर्माण होतात. उडत्या हत्यारांचं तंत्रज्ञान कितीही पुढारलं तरी ते पेलण्यासाठी हातघाईची लढाई करू शकणारी समर्थ मनगटं हवीतच!

@@AUTHORINFO_V1@@