अमेरिकेतील निवडणुकांचे भवितव्य गुलदस्त्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020   
Total Views |


Donald trump_1  


डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निवडणुका पुढे ढकलण्याबाबत वक्तव्य केलं गेल्यामुळे, ट्रम्प यांना व्लादिमीर पुतिन आणि तुर्कीच्या एर्दोगानप्रमाणे अमेरिकेची सत्ता स्वतःच्या हातात घ्यायची आहे, असा कांगावा करणे सुरु झाले. यासाठी निमित्त झाले ते ३० जुलै रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटचे.
 

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असते. या निवडणुकांची नौबतं वर्षभरापूर्वीपासून वाजायला लागतात. जर विद्यमान अध्यक्ष पुन्हा निवडणुकीसाठी उभे राहत नसतील, तर रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्षाअंतर्गत निवडणुकांद्वारे आपापले उमेदवार ठरवतात. त्यासाठी अमेरिकेच्या राज्याराज्यांमध्ये त्या त्या पक्षाच्या इच्छुकांच्या प्रचार फेर्‍या आणि सार्वजनिक वादचर्चा पार पडतात. साधारणतः ऑगस्ट महिन्यात दोन्ही पक्षांची महाअधिवेशनं पार पडतात, ज्यात अध्यक्षपदाच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा केली जाते. नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतर येणार्‍या मंगळवारी मतदान पार पडते. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा किंवा मतं ठरलेली असतात. एखादा उमेदवार एका राज्यात विजयी ठरल्यास, त्या राज्याला दिलेली सर्व मतं त्या उमेदवारास मिळतात. कॅलिफोर्नियात ५५ जागा आहेत. त्यात जर डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवाराला रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारापेक्षा एक मत जरी जास्त मिळाले तरी ही सर्वच्या सर्व म्हणजे ५५ मतं डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवाराला मिळतात. अशा पद्धतीने जो उमेदवार २७० किंवा त्याहून जास्त जागा मिळवतो, तो अमेरिकेचा अध्यक्ष होतो. अमेरिकेत कॅलिफोर्निया, टेक्सास, फ्लोरिडा, न्यूयॉर्क, इलिनॉय आणि पेन्सिल्विनिया अशी मोठी राज्य दोन पक्षात वाटली गेल्यामुळे अनेकदा अध्यक्ष कोण होणार, हे नेहमी कुंपणावर असणारी छोटी राज्यं ठरवतात.
 

२०१६ सालच्या निवडणुकीत निवडणुकीच्या राजकारणाचा कोणताही अनुभव नसणार्‍या डोनाल्ड ट्र्म्प यांनी मातब्बर समजल्या जाणार्‍या हिलरी क्लिटंनना धूळ चारली आणि अमेरिकेच्या राजकारणाचा बाजच बदलला. ट्रम्प यांचा कारभार करण्याची स्टईल भारत किंवा अन्य विकसनशील देशांप्रमाणे राजकीय कुटुंबांप्रमाणे टोकाची व्यक्तिकेंद्रित आणि स्वतःच्या कुटुंबीयांना पुढे करणारी आहे. स्वतःच्या मित्र देशांशी भांडणं उकरुन काढणे, उत्तर कोरियासारख्या शत्रूदेशांच्या अध्यक्षांशी भेटून प्रसिद्धी मिळवणे, धोरणातील धरसोड वृत्ती, अमेरिकेतील मुख्यप्रवाही माध्यमांशी पुकारलेले युद्ध, अध्यक्षपदाच्या गरिमेचे भान न बाळगता ट्विटरवरुन वैयक्तिक शेरेबाजी आणि टीका-टिपण्णी करणे अशा अनेक घटना ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या टर्ममध्ये झाल्या. असे असले तरी ट्रम्प यांनी अर्थव्यवस्थेला मरगळीतून बाहेर काढले, बेरोजगारी कमी केली, अन्य देशांना अमेरिकेच्या ताकदीसमोर झुकायला लावले, परराष्ट्र संबंधांबाबत काही धाडसी निर्णयही घेतले. यावर्षीच्या सुरुवातीला जेव्हा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय निश्चित मानला जात होता. पण, कोरोनाच्या संकटामुळे परिस्थिती पार पालटली. अमेरिकेतील आजवरच्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ५० लाखांजवळ पोहोचला असून आजही दररोज ५० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण होत असून अन्य देशांच्या तुलनेत अमेरिकेत ‘लॉकडाऊन’ सपशेल फसला आहे. यात भर म्हणून कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉएडच्या पोलीस कस्टडीतील मृत्यूनंतर डेमोक्रेटिक पक्ष आणि पुरोगामी माध्यमांनी त्याला वर्णभेदाचा मुद्दा बनवून ट्रम्प यांच्याविरोधात चालवताना यशस्वी ठरत आहेत. त्यामुळे निवडणूकपूर्व कौलात ट्रम्प यांची सातत्याने पिछेहाट होत आहे. ताज्या सर्वेक्षणांनुसार माजी उपराष्ट्राध्यक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार यांनी डोनाल्ड ट्रम्पहून १० टक्क्यांहून मोठी आघाडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निवडणुका पुढे ढकलण्याबाबत वक्तव्य केलं गेल्यामुळे, ट्रम्प यांना व्लादिमीर पुतिन आणि तुर्कीच्या एर्दोगानप्रमाणे अमेरिकेची सत्ता स्वतःच्या हातात घ्यायची आहे, असा कांगावा करणे सुरु झाले. ट्रम्प यांना पुतिन आणि अन्य हुकूमशाहांबद्दल असलेले आकर्षण सर्वज्ञात आहे. यासाठी निमित्त झाले ते ३० जुलै रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटचे.
 
३ नोव्हेंबर रोजी होणार्‍या मतदानात ज्यांना मतदानकेंद्रावर जाऊन मत देणे शक्य नाही, अशा सर्वांसासाठी पोस्टाने मतदान करण्याची सोय असावी, याबाबत डेमोक्रेटिक पक्ष आग्रही आहे. एरवी भारताप्रमाणे अमेरिकेतही केवळ सैनिक तसेच निवडणुकीच्या प्रक्रियेत गुंतलेले शासकीय कर्मचारी पोस्टल बॅलटचा वापर करु शकतात. ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये अशी शंका व्यक्त केली की, स्वेच्छिक पोस्टल बॅलटचा वापर करु दिला, तर अमेरिकन पोस्ट विभागाचा कारभार लक्षात घेता, मोठ्या प्रमाणावर मतं वाटेत हरवू शकतात, तसेच मोजणी केंद्रात उशिरा पोहोचू शकतात आणि त्यामुळे मतमोजणीत गैरप्रकार आणि घोटाळे होऊन निकाल अनेक महिने खोळंबू शकतो. यातून अमेरिकेची बदनामी होऊ शकत असल्यामुळे जोपर्यंत लोक सुरक्षितपणे आणि योग्यरितीने मतदान करु शकत नाहीत, तोपर्यंत मतदानाची तारीख पुढे ढकलली तर? कोरोनाविरुद्धच्या लसीच्या चाचण्या आता अंतिम टप्यात आल्या असून काही दिवसांनी मतदान पुढे ढकलल्यास तोपर्यंत लस बाजारात येऊन लोकांचा पाठिंबा अपल्याला मिळू शकेल, असा ट्रम्प यांचा अंदाज असू शकतो. पण, ट्रम्प यांच्या ट्विटवर तत्काळ टीकेचे मोहोळ उठले. दोन्ही पक्षांच्या संसद सदस्यांनी निवडणूक ठरवण्याचे काम अमेरिकेतील काँग्रेस (संसद) करते आणि त्या पुढे ढकलता येणार नाहीत, असा खुलासा केला. यावर ट्रम्प यांनी ट्विटमधील प्रश्नचिन्हाचा आधार घेत स्वतःचा बचाव करुन घेतला. पण, तो टिकला नाही. कारण, तीन महिन्यांपूर्वी जो बायडन यांनी ट्रम्प निवडणुका पुढे ढकलतील, अशी भविष्यवाणी केली असता, त्याला असा विचार आपल्या मनासदेखील शिवणार नाही, असे बोलून ट्रम्प यांनी उत्तर दिले होते.
 
२०१६ साली पार पडलेल्या निवडणुका ट्रम्प यांनी रशियन हॅकरच्या मदतीने आपल्याकडे वळवल्या होत्या, असे आरोप त्यांच्यावर होत असतात. तेव्हा उघड झालेल्या ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ प्रकरणाने जगभर धुमाकूळ घातला होता. कशाप्रकारे फेसबुक वापरकर्त्यांच्या चोरलेल्या माहितीच्या आधारे मतदारांचे मानसचित्र उभे करता येते आणि त्यात मतदारांच्या मनात खोलवर असलेल्या भीतीचा, ज्याबाबत ते नेहमीच सर्वांशी बोलत नाही, वापर करुन त्यांच्या मतदानावर प्रभाव पाडता येतो, हे या प्रकरणातून समोर आले होते. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पचा द्वेष करणार्‍यांनी त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप करायलाही कमी केले नव्हते. अध्यक्ष झाल्यावरही ट्रम्प यांच्यापाठी चौकशीचा ससेमिरा लावला गेला; त्यांच्या पदच्युतीसाठी त्यांच्या विरोधात महाभियोग चालवला गेला. पण, या सर्वांतून ट्रम्प सहीसलामत बाहेर पडले. त्यामुळे केवळ ट्रम्पना विरोधासाठी विरोध करण्याऐवजी ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या भीतीकडे गांभीर्याने पाहायला हवे. एरवी पोस्टल बॅलटची संख्या कमी असते. पण, जर खरंच जवळपास अर्ध्याहून अधिक मतदारांनी पोस्टाने मत पाठवली, तर कोट्यवधी मतं मोजण्याच्या प्रक्रियेत घोटाळा होऊ शकतो. अमेरिकेत प्रत्येक राज्याची स्वतःची मतदान प्रक्रिया असते. काही राज्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान चालते, तर काही राज्यांत आजही बॅलटचा वापर होतो. अनेक ठिकाणी अध्यक्षपदाच्या निवडणुकांसोबत स्थानिक निवडणुकांसाठी मतदानही पार पडते. भारताप्रमाणे नि:पक्ष आणि स्वतंत्र निवडणूक आयोग अमेरिकेत नाही. २००० साली जॉर्ज बुश (ज्यु.) यांच्या विजयाच्या वेळेस २९ जागा असलेल्या फ्लोरिडा राज्यात मतदानामध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. या राज्यात बुश यांना केवळ ५३७ मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे अमेरिकेतील निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष आहे. भारतातही या सुमारास बिहारमध्ये निवडणुका होत आहेत. बिहारची लोकसंख्या अमेरिकेच्या एक तृतीयांश असली तरी दरवेळेस तिथे चालणार गैरप्रकार बघता तिथे मतदान घेण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे.
 
 

@@AUTHORINFO_V1@@