इजाजत मागणारा ‘रडवय्या’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2020
Total Views |

agralekh_1  H x


काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपद बळकावण्यासाठी उद्धव ठाकरेंनी लाचारीच्या सर्व सीमा ओलांडल्या. अशा व्यक्तीने स्वतःला ‘लढवय्या’ म्हणवून घेणे, अजिबात शोभत नाही, उलट त्यांनी आपल्याला ‘रडवय्या’ म्हणवून घ्यावे नि त्याचे बॅनर-पोस्टर राज्यभर लावावे, तेच त्यांना शोभून दिसेल.



सोनिया गांधींनी बोलावलेल्या बिगर भाजप मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ‘मी लढवय्या पित्याचा लढवय्या मुलगा’ असल्याचे म्हटल्याने तिकडे स्वर्गात बाळासाहेब ठाकरेंनाही खंत वाटली असेल. कारण, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आपली अवघी हयात काँग्रेसविरोधात लढण्यात घालवली. काँग्रेसशी लढताना सोनिया गांधींवर त्यांनी काय आणि कशी टीका केली, हेदेखील सर्वश्रुत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचाही बाळासाहेबांनी वेळोवेळी आपल्या खास ठाकरी शैलीत समाचार घेतला. आज मात्र त्याच बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा पित्याचे नाव घेऊन आपणही लढवय्या असल्याचे सांगतो आणि बोलायला दिल्याने सोनियांचे अजीजीने आभारही मानतो हे पाहता ते वास्तवात ‘रडवय्या’च ठरतात. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून महाराष्ट्राने त्यांचा लढवय्या नव्हे तर ‘रडवय्या बाणा’ पाहिला. सुरुवातीला मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी गांधी-पवारांच्या वार्‍या करत रडून दाखवणार्‍यांनी नंतर विधान परिषद निवडणुकीवेळीही खुर्ची टिकवण्यासाठी तेच करुन दाखवले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपद बळकावण्यासाठी लाचारीच्या सर्व सीमा त्यांनी ओलांडल्या. कसेही आणि काहीही करा, पण मला मुख्यमंत्रिपदी बसवा, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पित्याच्या विचारांचा धगधगता अंगार टाकून देऊन ‘१०, जनपथ’ आणि ‘सिल्व्हर ओक’ची बाजिंदी पत्करली. दरम्यानच्या काळात नगर जिल्ह्यातील पाच शिवसेना नगरसेवक चंबुगबाळ घेऊन राष्ट्रवादीत दाखल झाले, तर त्यांना परत मिळवण्यासाठीही ‘मातोश्री’ने आपला ‘रडवय्या बाणा’ दाखवून दिला. कोरोना काळातही वैद्यकीय सेवा-सुविधांची उभारणी, स्थलांतरित मजुरांची पाठवणी, अन्नधान्य पुरवठा, दळणवळणाच्या सोयी, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, ‘निसर्ग’ चक्रीवादळ अशा अनेक समस्यांविरोधात स्वतःहून लढण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारच्या नावाने बोटे मोडत रडूनच दाखवले, लढून नव्हे. त्यामुळे अशा व्यक्तीने स्वतःला ‘लढवय्या’ म्हणवून घेणे, अजिबात शोभत नाही, उलट त्यांनी आपल्याला ‘रडवय्या’ म्हणवून घ्यावे नि त्याचे बॅनर-पोस्टर राज्यभर लावावे, तेच त्यांना शोभून दिसेल.
आपली आपण करी स्तुती! स्वदेशी भोगी विपत्ति!
सांगे वडिलांची कीर्ती! तो येक मूर्ख!!



अशा शब्दांत समर्थ रामदास स्वामींनी मूर्खाची लक्षणे सांगून ठेवलेली आहेत. स्वतःचे सांगण्यासारखे काही कर्तृत्व नसले की, वाडवडिलांच्या कर्तबगारीच्या कथा आपले महत्त्व वाढवून वा पटवून देण्यासाठी वर्तमानातील पिढ्या सांगत असतात आणि समर्थांनी अशाच व्यक्तींची वैशिष्ट्ये या ओवीतून सांगितली आहेत. आता आपल्याला रामदास स्वामींनी सांगितलेली लक्षणे लागू होतात की नाही, याचा विचार उद्धव ठाकरेंनी स्वतःचा स्वतःच केलेला बरा. पण, ज्या पित्याचे नाव आपण घेतो, ते कोणाविरोधात लढले, त्याचे त्यांनी जरा तरी भान ठेवावे, तर ते सोडून उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे ज्यांच्याविरोधात लढले, त्यांच्या नव्हे तर पित्याच्याच विचाराविरोधात लढत आहेत, तेही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांशी हातमिळवणी करुन. बाळासाहेब ठाकरेंनी सातत्याने राष्ट्र आणि हिंदूहिताचाच पुरस्कार केला. राष्ट्र आणि हिंदूंविरोधात कोणी एक शब्द काढला तरी त्या व्यक्तीचे दात घशात घालण्याची हिंमत बाळासाहेब ठाकरेंकडे आणि त्यांच्या शिवसेनेत होती आणि हाच त्यांचा विचार होता. पण, आजच्या शिवसेनेकडे आणि तिच्या पक्षप्रमुखाकडे पाहिले की, शिवसेना आता पक्की ‘सोनियासेना’ झाल्याचेच स्पष्ट होते. हिंदूंच्या मागण्यांकडे आणि प्रश्नांकडे दुर्लक्ष करत शिवसेना नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही आता केवळ हिंदूंना ‘दहशतवादी’ म्हणणार्‍या, जम्मू-काश्मीरबाबत पाकपूरक भूमिका घेणार्‍या, प्रभू श्रीरामाचे अस्तित्व नाकारणार्‍या, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अश्लाघ्य भाषेत आरोप करणार्‍या, चिनी कम्युनिस्ट पक्षाशी गुप्त करार करणार्‍या काँग्रेस, सोनिया गांधी आणि राहुल गांधींची तळी उचलण्याचे काम उरले आहे. पिता ज्यांच्याविरोधात लढला, त्यांच्याच चरणी लोटांगणे घालण्याची वेळ पुत्र उद्धव ठाकरेंनी आणलेली आहे. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी पूर्ण सत्य सांगावे, अर्ध सत्य नव्हे. बाळासाहेब लढवय्या होते, पण तुम्ही नाही, तुम्ही रडवय्या आहात आणि हेच ते सत्य.



उद्धव ठाकरेंनी स्वतःला ‘लढवय्या’ म्हटले असेल तर त्याचा एका वेगळ्या अंगानेही विचार केला पाहिजे. कोणाशी लढाई करुन नव्हे तर भाजपसारख्या मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद तर मिळवले, पण ते टिकवण्यासाठी त्यांना शिवसेनेचे स्वत्व विकावे लागले. अर्थात, पिता बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रनिष्ठ व हिंदुत्वनिष्ठ विचारांना काडी लावत उद्धव ठाकरे सोनिया-पवारांचे पायधरु झाले. हा सत्तेसाठी स्वतःचे अस्तित्व पणाला लावण्याचाच प्रकार. म्हणून त्याला स्वतःचे अस्तित्व स्वतःच्याच हाताने संपवणारी लढाईही म्हणता येऊ शकते. नऊ महिन्यांपूर्वी त्यांनी या लढ्याला सुरुवात केली आणि आतापर्यंत त्यांनी शिवसेनेची बर्‍यापैकी वाताहत करुन दाखवली आहे. पण, ते तेवढ्यावरच कसे थांबतील? पाठीशी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवारांसारखी थोर थोर मंडळी असताना ज्वलंत राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्वाचे व्रत घेतलेल्या शिवसेनेचा कोथळा काढूनच उद्धव ठाकरे ही लढाई संपवतील. सोनिया गांधींसमोर त्यांनी स्वतःला, ‘लढवय्या’ म्हणवून घेतले त्याचा अर्थ हा असा आहे, स्वतःच्याच पक्षाविरोधात, विचारसरणीविरोधात लढण्याचा आणि स्वतःलाच पराभूत करण्याचा.




सोनिया गांधींनी बोलावलेल्या बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी याच दिशेने आणखी पुढचे पाऊल उचलले. पिता बाळासाहेब ठाकरे ज्या तडफेने आणि ताकदीने काँग्रेस व त्या पक्षाच्या विचाराविरोधात लढले, झगडले, प्रसंगी वादही अंगावर घेतले, त्याच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींसमोर बोलण्यासाठी हात जोडून ‘इजाजत’ मागण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी केलेल्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरेंचे वागणे निराळे होते आणि आताचे निराळे. उद्धव ठाकरे जीएसटी किंवा कोरोना आदी मुद्द्यांबाबत मोदींसमोर एका सुरात तर सोनिया गांधींसमोर दुसर्‍या सुरात बोलत होते. दुतोंड्या सापालाही आपली शरम वाटेल, असा हा प्रकार होता. मात्र, १८ सेकंदात तीन वेळा सोनियांपुढे ‘इजाजत’ मागण्याची, क्षमा मागण्याची लाचारी करणार्‍या उद्धव ठाकरेंना त्याचे काय? उलट ते त्यावरही मला सोनिया गांधींपुढे ‘इजाजत’ मागण्याचा सन्मान मिळाला, असेच अभिमानाने सांगतील. मालकीणीची गुलामगिरी पत्करली की असेच होते, मात्र, अशा व्यक्तींना ‘लढवय्या’ म्हणता येत नाही, हो, फार फार तर ‘इजाजत मागणारा रडवय्या’ म्हणूू शकतो.
@@AUTHORINFO_V1@@