नॉमिनी, नियम आणि निकड...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2020   
Total Views |


Nominee_1  H x



आयुष्य क्षणभंगुर आहेच, पण कोरोनामुळे ते जास्तच अशाश्वत झालेले आहे. त्यामुळे प्रत्येकाने विशेषत: वरिष्ठ नागरिकांनी आपल्या सर्व संपत्तीत मग ती स्थिर असो की अस्थिर ‘नॉमिनी’ नेमायला हवा. ‘नॉमिनेशन’ (नामांकन) करावयास हवे. त्याविषयी आज सविस्तर जाणून घेऊया...


कोणीही आपल्या संपत्तीचे ‘नॉमिनेशन’ केलेले नसेल, तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर वारसांना प्रॉपर्टीचा ताबा मिळविण्यासाठी अडचणी येऊ शकतात आणि प्रॉपर्टी ताब्यात येण्यास कालावधीही बराच लागतो. समजा, एखाद्याची बँकेच्या बचत खात्यात किंवा मुदत ठेव खात्यात बरीच मोठी रक्कम आहे व अशा व्यक्तीने ‘नॉमिनेशन’ केलेले नसेल व त्याचे निधन झाले, तर अशा प्रकरणात निधन झालेल्याच्या कायदेशीर वारसांना बँकेला वारसा हक्क प्रमाणपत्र (सक्सेशन सर्टिफिकेट) द्यावे लागते व हे तत्काळ मिळत नाही. हे मिळण्यासाठी काही महिने लागतात व वकिलांवर खर्च करावा लागतो व या प्रमाणपत्रासाठीचे शुल्क भरावे लागते, ते वेगळेच. हे सर्व जर त्या व्यक्तीने ‘नॉमिनेशन’ केले असते, तर मात्र टाळता आले असते. काही ठराविक मर्यादेपर्यंतची ‘नॉमिनेशन’ नसलेल्या व मृत झालेल्या खातेदाराची रक्कम बँकेचा शाखा प्रमुख मृत्यूच्या कायदेशीर वारसांना त्याच्या अधिकारात देऊ शकतो. पण, रक्कम जास्त असेल तर मात्र शाखा प्रमुखाला वारसाहक्क प्रमाणपत्र मागवूनच रक्कम सुपूर्द करावी लागते. ‘नॉमिनी’चा बहुतेक संपत्ती प्रकारात, संपत्तीवर अधिकार नसतो. त्याने फक्त संपत्ती ताब्यात घेऊन ती कायदेशीर वारसांना वाटायची असते किंवा त्यांच्याकडे सुपूर्द करावयाची असते.

 
‘नॉमिनेशन’ करणे ही सोयीस्कर प्रक्रिया आहे. गुंतवणुकीसाठी जो अर्ज केला जातो, त्यात ‘नॉमिनी’चा ‘कॉलम’ असतो. त्यात फक्त ‘नॉमिनी’चे नाव, वय, पत्ता व नाते ही माहिती भरुन द्यावी लागते. अज्ञान व्यक्तीसही ‘नॉमिनी’ करता येते. ‘नॉमिनी’ने कायदेशीर वारसांकडे संपत्ती सुपूर्द न केलेले कित्येक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे ‘नॉमिनी’ शक्यतो विश्वासातला व प्रामाणिक वृत्तीचा व जो कायदा मानतो असा करावा. मालकीच्या सदनिकेचे ‘नॉमिनेशन’ करण्यासाठी सोसायटीचा यासाठी अर्ज असतो, तो भरुन सोसायटीच्या सेक्रेटरीला देऊन त्याची पोचपावती घ्यावी. कायदेशीर वारसांपैकी एकास ‘नॉमिनी’ करणे हेदेखील चांगले असते. ‘नॉमिनी’कडून कायदेशीर वारसांनी किती कालावधीत प्रॉपर्टीचा ताबा घ्यायला हवा, याबाबत कायद्यात काहीही तरतूद नाही. कायदेशीर वारस पुढे न आल्यास ‘नॉमिनी’ प्रॉपर्टी स्वत:कडे कितीही कालावधी ठेवू शकतो. जर ‘नॉमिनी’ कायदेशीर वारस असेल व इतर कायदेशीर वारसांनी ‘रिझनेबल टाईम’मध्ये संपत्तीवर दावा केला नाही, तर अशा प्रकरणात ‘नॉमिनी’कडे संपूर्ण संपत्ती राहू शकते. ‘रिझनेबल टाईम’चा कालावधी किती हे कायद्यात नमूद करण्यात आले नसून, न्यायालयाने खटल्याचा तपशील विचारात घेऊन तो ठरवायचा असतो.
 
‘नॉमिनेशन’ करणे प्रक्रिया सोपी आहे. पण, स्पेलिंगची चूक होणार नाही याची खात्री करुन घ्या, म्हणजे स्पेलिंगची चूक होऊच देऊ नका. कारण, फक्त स्पेलिंगच्या चुकीची प्रकरणे/खटले न्यायालयात चालू असल्याचीही उदाहरणे देता येतील. ‘नॉमिनी’च्या ‘केवायसी’ कागदपत्रात जसे नाव आहे, तसेच ‘नॉमिनेशन’ फॉर्ममध्ये लिहा. म्हणजे भविष्यात प्रक्रिया सुरळीत होण्यात अडचणी येणार नाहीत. एकापेक्षा जास्त ‘नॉमिनी’ नेमलात, तर प्रत्येकाचा संपत्तीत किती टक्के हिस्सा आहे, हे नमूद करावे. हे नमूद नसल्यास त्यावरुन ‘नॉमिनींना’ न्यायालयात जावे लागेल. ‘नॉमिनी’ व्यक्ती जर अज्ञान (मायनर) असेल, तर सज्ञान व्यक्तीचे नाव ‘गार्डियन’ (पालक) म्हणून नमूद करावे लागते. कायमची परदेशी अस्तित्वात असलेल्या नातलगाचे नाव ‘नॉमिनी’ म्हणून देऊ नका. त्याला तर संपत्ती मालकाचा मृत्यूनंतर तत्काळ भारतात येणे जमते, नाहीतर प्रक्रिया लांबू शकते. संपत्ती मालक पहिले दिलेला ‘नॉमिनी’ त्याला वाटेल तेव्हा बदलूही शकतो. कित्येक जण फॉर्म भरताना त्यावेळेला लक्षात आलेले किंवा सुचवलेले नाव ‘नॉमिनी’ म्हणून देतात व नंतर कोणाचे नाव दिले आहे, हेच विसरुन देतात. त्यामुळे प्रत्येकाने संपत्तीचा प्रकार, त्यासाठी दिलेल्या ‘नॉमिनी’चा तपशील डायरीत लिहावा/रेकॉर्ड करावा व वर्षातून एकदा तो पुन्हा डोळ्याखालून घालवा. ‘नॉमिनी’चाच मृत्यू झाला किंवा त्याच्याशी संबंधित माणसे गेल्यास लवकरात लवकर नव्याने नामाकिंत करावे. ‘नॉमिनी’ची नोंद असेल, तर बँका व विमा कंपन्या, मृत व्यक्तीची सर्व रक्कम वारसा हक्क प्रमाणपत्र न मागता ‘नॉमिनी’कडे सुपूर्द करतात.
 
‘जीवन विमा कायद्यात २०१५’ साली एक तरतूद करण्यात आली आहे. ‘इन्शुरन्स लॉज अमेण्डमेन्ट अ‍ॅक्ट, २०१५’ यानुसार जर पालक, पती किंवा पत्नी स्वत:ची मुलगे/मुली अशांपैकी कोणी ‘नॉमिनी’ असेल, तर अशा ‘नॉमिनी’ला कायद्याच्या भाषेत ‘बेनिफिशिअल नॉमिनी’ म्हणून ग्राह्य मानून दाव्याची सर्व रक्कम दिली जाते. कायदेशीर वारस दाव्याच्या रकमेवर हक्क सांगू शकत नाहीत. जर ‘नॉमिनी’च मृत झाला असेल, तर कायदेशीर वारस हक्क सांगू शकतील. ‘नॉमिनी’ नमूद नसेल, तर कायदेशीर वारस विम्याच्या रकमेवर दावा करु शकतो, त्याला या प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व कागदपत्रं द्यावी लागतील. त्याशिवाय वारस हक्क प्रमाणपत्रही द्यावे लागेल. परिणामी, हा दावा उशिरा संमत होतो. कायदेशीर वारस बरेच असतील व त्यापैकी एक रकमेवर दावा करीत असेल, तर याला मान्यता आहे. असे ‘अ‍ॅफिडेविट-कम-इंडमेनिटी’ तयार करुन त्यावर सर्व कायदेशीर वारसांनी सह्या करुन ते जीवन विमा कंपनीस द्यावे लागते.
 
जीवन विमा पॉलिसीत ‘नॉमिनी’ची नोंद नसेल, ‘नॉमिनी’ वारला असेल व ‘नॉमिनी’ने दावा केल्यानंतर दावा संमत होण्याच्या कालावधीत ‘नॉमिनी’ वारला असेल, तरच कायदेशीर वारस दावा करु शकतो. एखाद्याला एकाहून अधिक अपत्ये आहेत व त्यापैकी एक अपत्य ‘नॉमिनी’ आहे, अशावेळी विमा कंपनी जे अपत्य ‘नॉमिनी’आहे, त्या अपत्याला दाव्याची रक्कम सुपूर्द करणार.


सर्वांनीच विशेषत: वरिष्ठ नागरिकांनी सर्व संपत्तीचे स्वत:च्या इच्छेप्रमाणे कोणाच्याही दबावाखाली न येता नामांकन करावे, म्हणजे स्वर्गातून आपली मुले, पत्नी भूतलावर कोर्टकचेरी करीत आहेत, हे चित्र पाहावे लागणार नाही.

 
@@AUTHORINFO_V1@@